in

इस्लाम : स्त्री-पुरुष समानता

इस्लाम : स्त्री-पुरुष समानता

         पैगंबर हजरत मुहम्मद सलेअल्लाहु अलैहिवस्सलम यांच्या जीवनशैलीने आणि ते प्रचार-प्रसार करीत असलेल्या इस्लाम धर्माने प्रभावित होऊन ज्या प्रकारे असंख्य पुरूष इस्लाम धर्मात दाखल झाले, त्याप्रमाणे असंख्य महिलांनी देखील इस्लाम धर्माचा स्वीकार केला. त्यांच्या शिक्षण-प्रशिक्षणाची जबाबदारी स्वतः पैगंबर साहेबांवर होती. ते त्या स्त्रियांच्या कुटूंबातील ज्येष्ठ म्हणजे आई, वडिल, भाऊ अथवा मामा, चुलते यांना या आधुनिक आणि प्रगत धर्माच्या अनेक बाबींचे शिक्षण प्रशिक्षण देत असत. पैगंबर साहेबांची कार्यमग्नता आणि गोषापर्दा यामुळे स्त्रियांबरोबर ते थेट संवाद साधत नसत. या कार्यात त्यांच्या धर्मपत्नी विशेषतः आएशा रजिअल्लाहुतआला अन्हा त्यांच्या सर्वात मोठ्या सहकारी होत्या. त्या पैगंबर साहेबांच्या देहावसानंतर अर्धशतक हयात राहिल्या आणि त्यांनी सर्व मर्यादा सांभाळून या प्रबोधन कार्याचा विडा उचलला त्या खूप प्रतिभाशाली आणि बुध्दीमान होत्या. त्यांची स्मरण शक्ती अप्रतिम होती.


          इस्लामच्या उदयकाळात शत्रूनी या नवजात राज्यावर चोहीकडून हल्ला चढविला होता. अशा धर्मयुध्दात पैगंबर साहेबांच्या अनुमतीने महिलादेखील भाग घ्यायच्या. जखमींची मलमपट्टी करणे, त्यांना पाणी पाजणे, रणसामग्री आणि खाद्यपदार्थांची व्यवस्था करणे हे त्यांचे विशेष कार्य होते. काही प्रसंगी या महिलांनी सशस्त्र लढासुध्दा दिल्याची इतिहासात नोंद आहे. स्त्रियांना गोषा-पर्दा पाळण्याचे आदेश असलेतरी असे नाही की त्यांना सामाजिक कार्यातून वंचित करण्यात आले होते. युध्द केव्हातरी होते. परंतु, दैनंदिन जीवनातील अनेक कामे दररोज करावी लागतात. ही कामे स्त्री व पुरूष दोघांनी समान सामाजिक पातळीवर कायम राहून पार पाडण्याची मुभा इस्लाम धर्माने नैतिक जबाबदाऱ्या सांभाळण्याच्या शर्तीवर दिली आहे.


         हजरत मुहम्मद पैगंबर सलेअल्लाहु अलैवस्सलम एक क्रांतिकारी प्रेषित, धर्मवेत्ते आणि धर्मपारायण होते. त्यांनी केवळ धर्मप्रचार आणि प्रवचनावरच भर दिला नसून प्रत्येक काम प्रत्यक्ष कृतीने आणि व्यवहारातून करून दाखविले. संपूर्ण पृथ्वी त्यांची कर्मभूमी होती. त्यांचे प्रत्येक कार्य प्रलयापर्यंत साक्षी म्हणून जगणार होते म्हणून त्यांनी महिलांच्या बाबतीत अत्यंत पारदर्शक आदेश दिले. संपूर्ण पृथ्वी त्यांची कर्मभूमी असली तरी मदिना त्यांचे केंद्रबिंदू होते. त्यांनी मदिनेत एका  अत्याधुनिक बाजारपेठेची स्थापना केली. त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी अनेक लोकांवर टाकली. त्यात अनेक महिलांचा देखील समावेश होता. सिग्रह बिन्त महारबा शिफा बिन्त अब्दुल्लाह, अस्मा बिन्त महारबा, खौला बिन्त सुवैब, मलिका उम्मे साएब आणि कीला अन्नमारिया इत्यादींची नावे उल्लेखनीय आहेत. त्यांच्या मदतीकरिता पुरूषांचा देखील समावेश करण्यात आला होता आणि या ग्रुपला जवळजवळ एका मंत्रालयाचे रूप प्राप्त झाले होते. या महिला कुशलतापूर्वक बाजारपेठेची कामे करायच्या. भाव, वजन, आयात, निर्यात, व्यापाऱ्यांची बसण्याची जागा, रहदारी, बाजार व्यवस्थापन, ग्राहक, सरकार व व्यापाऱ्यांचे गाऱ्हाणे या सर्व बाबींवर या स्त्रियांचेच नियंत्रण होते. त्यांनी ठरवून दिलेले भाव, वजन, नाण्यांचे मूल्य आणि गाहाण्यांचे निराकरण आजही आपणां सर्वांना मार्गदर्शक ठरत आहे.


           पवित्र कुरआनात अनेक ठिकाणी स्त्री – पुरूष समानतेचे दर्शन घडवू आणले आहे. आणि तसे आदेशही दिले आहेत. मक्कावासियांच्या छळाला कंटाळून श्रध्दावंतांनी मदिनेकडे हिजरत म्हणजेच प्रयाण पत्करले होते. हा प्रवास आणि स्वदेश त्याग काही साधीसोपी गोष्ट नव्हती. बेबंदशाहीच्या काळात मुलाबाळांच्या समवेत, रखरखत्या वाळवंटातून साडेचारशे किलोमीटर गाठणे जिवापलिकडचे काम होते. हा मानसिक आणि शारिरिक त्रास पुरूषांबरोबर स्त्रियांनी देखील भोगला. पवित्र कुरआन त्यांना कोणत्या शब्दात सांत्वना देत आहे पहा…!


         “मी तुमच्यापैकी कोणाचेही कष्ट वाया घालविणार नाही, मग तो पुरूष असो वा स्त्री. तुम्ही सर्वजण परस्परांशी संबंधित आहात, म्हणून ज्या लोकांनी माझ्यासाठी स्वदेश त्याग केला आणि ज्यांना माझ्या मार्गात आपल्या घरातून बाहेर काढण्यात आले आणि जे छळले गेले आणि माझ्यासाठी लढले व मारले गेले. त्यांचे सर्व अपराध दाखल करीन ज्यांच्याखालून कालवे वाहात असतील. हा त्यांचा मोबदला आहे अल्लाहजवळ आणि तो सर्वोत्तम आहे” असे कुरआनच्या तिसऱ्या भागात, अलिइमान या अध्यायात १९५ व्या श्लोकात म्हटले आहे.


          सांगायचे तात्पर्य एवढेच की, अल्लाहच्या दरबारात स्त्री व पुरूष दोघांना समान लेखले गेले आहे. त्यामुळे स्त्रियांना आपोआप शक्ती प्राप्त झाली आहे.

Read More 

What do you think?

Written by jyubedatamboli

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

असा श्रीगुरू जन्मोजन्मी असावा