सावळ्याचं निळं गोंदण
राधा वागवत राहिली आपल्या तन – मनावर
एक असीम ओढीनं तिनं जपले
प्रेम आणि विरहाच्या झुल्यावरचे अबोल क्षण
सावळा कर्म आणि धर्माची वेस हाती गच्च पकडून चालत राहिला एका
आदिम-अविनाशी भविष्याकडे…
राधेनं मात्र सांभाळला रितीभातींचा जनमान्य हुंकार
प्रवाहात राहूनही प्रवाहाविरुद्ध झुंजण्याचं राधेचं स्विकारलेपण
आणि नजरेआडचं जपता जपता समोरचं नाकारणारा ‘तो’
द्वंद्व तर मनातच घडलं असावं अन्यथा सगळा पट हातात असतानाही सावळ्याचं
अबद्ध नाकारलेपण राधेनं पचवलं कसं असावं?
कृष्ण गोंदण
राधेचे आंदण
द्वय देहाचे
विरले मी पण
राधा – सावळ्याची निळाई
राधा – सावळ्याच्या बासुरीचा धुंद अलवार सूर
राधा – प्राक्तनाच्या कठोर जाणिवेलाही फुंकर घालणारी मंद झुळूक
विचारले असतील का मनातल्या मनात तरी राधेनं जाब दिल्या-घेतल्या वचनांचे?
मांडले असतील का हिशेब उन्मळून पडलेल्या आवेगांचे?
की जाणाऱ्यांची वाट अडवताना त्याच्या नजरेतली असहायता तिलाच नकोशी वाटली असावी?
तरीही अनुत्तरित प्रश्नाच्या झुल्यावर हिंदोळणारी राधा आणि ते प्रश्नच टाळत राहणारा सावळ्या… दोघेही सच्चे… दोघेही शाश्वत.
कृष्ण राधा
राधा कृष्ण
एक तन
एक मन
श्रद्धा
०२. ०७. २०१६
GIPHY App Key not set. Please check settings