in

जीवन सुंदर करण्याचा फॉर्म्युला

 जीवन सुंदर करण्याचा फॉर्म्युला (सकारात्मक दृष्टीकोन)

                            फोटो साभार:गुगल

शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं । 

काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं । 

काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं । 

सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं ।

                        सांगा कसं जगायचं ?

        कवीवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या या सर्वश्रुत ओळी जीवन सुंदर करण्याचा फॉर्म्युला सांगून जातात. ग्लास अर्धा भरला आहे असं म्हणता येतं. ग्लास अर्धा रिकामा आहे असंही म्हणता येतं. ग्लास पूर्णपणे भरलेला नाही असंही म्हणता येतं. या अर्ध्या भरलेल्या ग्लासातील पाण्याने माझी तहान निश्चित भागू शकते असे म्हणत समाधानाने पाणी प्राशन करुन तृप्त होणे हाच जीवन सुंदर करण्याचा फॉर्म्युला. यालाच सकारात्मक दृष्टिकोन म्हणावे व जीवन सुंदर करावे.


       संतोष आणि विनोद हे दोन मित्र फिरायला जातात. वाटेत टवटवीत गुलाबांनी फुललेले एक झाड त्यांच्या दृष्टीस पडते. त्याला पाहून विनोद म्हणाला, “संतोष, ते पहा गुलाबाचे झाड, देव तरी किती दुष्ट आहे पहा, अशा सुंदर फुलांना बोचऱ्या काट्यांवर उभे केले आहे.” संतोष म्हणाला.” तसं नाही मित्रा हे झाड मुळात काटेरीच होते. आपल्या कृपाळू ईश्वराने या काट्यांवरसुध्दा किती सुंदर फुले निर्माण केलीत!” झाडं तेच काटे तेच, फुलंही तीच पण दोघांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. संतोषचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. त्यामुळे संतोषचे जीवन सुंदर आहे. होय ना ?


दआपल्या संत महात्म्यांनी शिकवण दिली आहे की, 

‘ठेविले अनंते तैसेचि रहावे। 

चित्ती असू द्यावे समाधान।’ 

संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज व नरसी मेहता पंढरीत विठुरायांना वंदन करताना म्हणतात,


संत एकनाथ महाराज – ‘विठुराया, तू मला किती चांगली अर्धांगिनी दिलीस. तिच्यामुळेच मी भक्तिमार्गाला लागलो. भक्तीत रमता आले.’


संत तुकाराम – विठुराया मला किती छान कजाग अर्धांगिनी

दिलीस. तिच्यामुळेच मला तुझ्या भक्तीत रमता आले.


नरसी मेहता – ‘विठुराया, माझ्या अर्धांगिनीला अकालीच मरण दिलेस त्यामुळेच मला तुझ्या भक्तीचा लाभमिळाला. 

         या ठिकाणी सर्वसामान्य मनुष्य देवाला व दैवाला दोष देत निराशेच्या गर्तेत जीवन जगतात पण संतमहात्म्ये प्रत्येक गोष्टीत समाधान मानतात त्यामुळे त्यांचे जीवन कृतार्थ होते. तुकाराम महाराजांनी जीवन सुंदर करण्याचा फॉर्म्युला ‘मन करा रे प्रसन्न सर्व सिध्दीचे कारण’ या ओवीतून सांगितला आहे. एक हरीबा नावाचा शेतकरी होता. थोडीशी शेती व पशूपालन करुन त्याचा उदरनिर्वाह कसाबसा चालायचा. गेली वीस वर्षे त्याने पंढरीची वारी कधी चुकवली नव्हती. एकदा तो वारीत अर्ध्या वाटेवर गेल्यानंतर घरुन फोन आला की, त्याच्या दुभत्या म्हशीचा मृत्यू झाला. ही बातमी ऐकून हरीबाला फार दुःख झाले. कारण ती म्हैस म्हणजे त्याच्या कुटुंबाचा मुख्य आधार होता. वारी अर्ध्यावर सोडून तो घरी परत जाण्यासाठी निघाला एवढ्यात एक सद्गृहस्थ त्याच्यासमोर उभा राहिला व म्हणाला, “हरीबा, विठुरायाचे आभार मान, तुझी श्रध्दा अशी डळमळीत होवू देऊ नकोस” हरीबा म्हणाला, “हेच फळ दिले का विठुरायाने माझ्या भक्तीला म्हणून त्याचे आभार मानू का?” सद्गृहस्थ म्हणाले, “हरी अरे विठुरायाच्या कृपेने तुझा जीव वाचला. तुझ्या म्हैशीचा मृत्यू सर्पदंशाने झाला. तू तर नेहमी म्हैशीच्या बाजूला गोठ्यातच झोपतोस ना? तुझ्या जीवावर आलेलं संकट त्या मुक्या माऊलीने आपल्या जीवावर घेतले. इतके दिवस तुझा संसार चालविला व जाताना तिची लेक तुझ्या पदरात घालून गेलीय. तिचा सांभाळ कर, ती तुझा संसार चालवेल.” हरीबाच्या डोक्यात प्रकाश पडला व तो आनंदाने ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल म्हणत नाचू लागला, एवढ्या-तेवढ्या कारणाने आपण देवाला दोष देतो, चिडतो, वैतागून जातो असे न करता असे करण्यामागे देवाचा काहीतरी उदात्त हेतू असावा असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास जीवन अधिक सुंदर होईल, होय ना?


        प्राप्त परिस्थितीत जीवन सुंदर करणारे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आमचे फॅमिली डॉक्टर श्री. व सौ. बाणदार मॅडम्. गेली ४२ वर्षे गोरगरीब जनतेची अतिशय निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि अखंडपणे सेवा करत आहेत. त्यांच्या एकुलत्या एक १९ वर्षाच्या डॉक्टर बनू पाहणाऱ्या उमद्या तरुण मुलाचं अपघाती निधन झालं. प्रयत्नांची शर्थ करुनही तो वाचला नाही. सारा परिसर दुःखाच्या सागरात बुडून गेला. डॉक्टरांचे नातेवाईक, पेशंट सगळे आक्रोश करत होते पण डॉक्टर दीपस्तंभासारखे उभे होते. खरं तर जीवन उद्ध्वस्त होण्याचा तो प्रसंग पण अशा वेळीही डॉक्टरांनी मशिदीसमोर लाडक्या पुत्राची डेडबॉडी ठेवून शांतपणे नमाज अदा केली. ‘ज्यानं आम्हाला पुत्र दिला., त्यानंच त्याला नेलं असं मानून, पुन्हा रुग्णसेवा सुरु केली. आजही सुरु आहे. आभाळाएवढं दुःख उराशी बाळगून रुग्णसेवा करण्यात रमणारे डॉक्टर जीवन सुंदर असल्याचा मंत्रच देतात. चार वर्षापूर्वी डॉ. मॅडमांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला. लक्षणे ओळखून डॉक्टरांनी त्यांना मुंबईला नेले. व आधुनिक उपचार केले. उपचारा दरम्यान मी त्यांना म्हणाले, “डॉक्टर, हे काय झालं हो, तुम्ही दोघेजण रात्रंदिवस रुग्णसेवा करता, त्यांच्या वेदना दूर करता आणि तुमच्याच वाट्याला हे नवीन संकट कसे आले हो ?” मला मध्येच थांबवत डॉक्टर म्हणाले, “असं नाही समजायचं मॅडम्, आम्ही उपचार करत असलेल्या सर्व पेशंटच्या सदिच्छेने व आशिर्वादाने, ईश्वर-अल्लाहच्या कृपेने आमच्या मॅडम या व्याधीतून मुक्त झाल्या आहेत. त्यांची तब्बेत सुधारत आहे. लवकरच बऱ्या होऊन त्या रुग्णसेवेत रुजू होतील.” डॉक्टरांचे बोलणे ऐकून मी भारावून गेले व जीवन सुंदर करण्याचा नवा कोरा फॉर्म्युला घेऊन आले.


        सुप्रसिध्द व्याख्याते गणेश शिंदे यांच्या बालपणातील एक प्रसंग. ते ज्या कॉलनीत रहात होते. त्या कॉलनीतील सर्व घरे स्लॅबची होती. त्यांचे एकुलते एकच घर पत्र्याचे होते. हे छोट्या गणेशच्या जेंव्हा लक्षात आले तेंव्हा त्याने आईला विचारले की, “आई सर्वांची घरे स्लॅबची आणि आपलेच घर पत्र्याचे का?” त्यांची आई त्यांना म्हणाली, “बाळा तुझे वडील शिक्षक आहेत” गणेश मध्येच म्हणाला, “शिक्षकांनी स्लॅबच्या घरात रहायचं नसतं का?” आई शांतपणे म्हणाली, “बाळ, तुझे वडील भूगोल शिकवतात. तुला सर्व ऋतूंची ओळख व्हावी म्हणून त्यांनी पत्र्याचे घर बांधले आहे. पत्र्याच्या घरात पाऊस आला की लगेच कळते, उन्हाळा आला की पत्रे तापतात, घामाच्या धारा निघू लागल्या की उन्हाळा सुरु झाल्याचे कळते. स्लॅबच्या घरात पावसाळा, उन्हाळा कळतच नाही. म्हणून आपले पत्र्याचे सुंदर घर पप्पांनी उभं केलंय.” या ठिकाणी एखाद्या सर्वसामान्य स्त्रीने घर बापाचा उद्धार केला असता पण तिला जीवन सुंदर करण्याचा फॉर्म्युला कळला होता ना ?


          आयुष्य जसे समोर आले आहे तसे आनंदाने स्वीकारावे, जीवनात घडलेल्या कुठल्याही गोष्टीबद्दल खेद किंवा खंत बाळगू नये. कारण जीवन जगणं हीच मुळात अत्यंत सुंदर गोष्ट आहे. जीवनात आलेल्या प्रत्येक क्षणाचा, अनुभवाचा मनमुराद आस्वाद घ्यावा, जीवन समजून घेणं हीच उत्कट आणि आनंददायी बाब आहे.

Read More 

What do you think?

Written by jyubedatamboli

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

‘प्लरिबस’च्या निमित्ताने… ‘सह नौ भुनक्तु’ व्यवस्थांचा मागोवा – १२ : जठराग्नी शमवाया भूतां

आरोही – विशेष फूल फुलताना!