in

पती बनले प्रेरणास्थान

 पती बनले प्रेरणास्थान

         माझ्याप्रमाणेच पती मन्सूर रमजान तांबोळी यांनी प्रतिकूल परिस्थितीत डी. एड. पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं. होस्टेलवर राहणाऱ्या मित्रांचे डबे पोहचवत आपलं शिक्षण घेतलं होतं. डी. एड. झाल्यावर पाच वर्षे नोकरी मिळाली नाही. त्यावेळी भाजीपाला फळे डोक्यावर बुट्टी घेऊन घरोघरी विकून आई-वडील, भाऊ-बहीण, भाचा यांच्या संगोपनाची जबाबदारी पार पाडली. प्रसंगी शेतमजुरीही केली. १९७७ च्या संपकाळात काम केल्याने त्यांना सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये क्लार्क पदावर नोकरी लागली.


       २५ मे १९८० साली आम्ही विवाह बंधनात गुंतलो. त्यावेळी मीही शिक्षिका म्हणून कार्यरत होते. मी फक्त एफ. वाय. बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. लग्नानंतर पुढे शिकण्याचा मनोदय व्यक्त करताच त्यांनी कसलीही आडकाठी न घालता परवानगी दिली पण एक सूचना दिली की, तुझ्या शिक्षणाचा नोकरीमध्ये, अध्यापनामध्ये कसलीही कुचराई होता कामा नये. आपल्याला जीवनात स्थैर्य देणारी नोकरी प्रामाणिकपणे पार पाडण्यावर त्यांचा कटाक्ष होता. त्यांची सूचना शंभर टक्के पाळून मी प्रथम श्रेणीत हिंदी शिष्यवृत्ती मिळवून बी.ए झाले.

      

       लग्नाच्या वेळी मी खूपच अशक्त व सडपातळ होते. कॉलेजमध्ये ‘वाऱ्यापासून सावधान’, ‘ग्राईप वॉटरचा अभाव’ असे ‘फिशपाँड’ मला मिळाले होते. मला पाहिल्यावर माझ्यादेखत पतींना लोक म्हणायचे, ‘काय बायको पसंत केलीस मर्दा! नुसती नोकरी पाहिलीस वाटतं. अंगात ताकद आहे का तिच्यात नोकरी करायची तरी?’ लोकांचे हे बोलणे यांनी चांगलंच मनावर घेतलं व माझं आरोग्य सुधाण्यासाठी पूर्ण लक्ष दिलं. फळं-भाजीपाला यांच्या बरोबरच रात्री भिजवलेली हरभऱ्याची डाळ व शेंगदाणे मला सक्तीने खायला लावले. ओळखीच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचे औषधोपचार सुरू केले. डॉक्टरांनीही काही गोळ्यांचा कोर्स दिला. त्या महागड्या होत्या. नव्या संसाराची उभारणी चालू होती, लग्नासाठी झालेले कर्ज फेडायचे होते. मी गोळ्यांना नको म्हटले तरी पतीराजांनी माझं काही एक न ऐकता तो गोळ्यांचा कोर्स पूर्ण करायला लावला. चार वर्षात नावे ठेवणाऱ्या लोकांची बोलती बंद केली. मला आरोग्याचं सुंदर लेणं मिळवून देणाऱ्या पतीराजांच्या ऋणात मी आयुष्यभर राहीन. 


         बीए झाल्यानंतर पुढची आठ-दहा वर्षे संसार नेटका करण्यात, नोकरीत, मुलांच्या संगोपनात व स्वतःचे घर बांधण्यात वाऱ्याच्या वेगाने निघून गेली. मग मी बहिःस्थ विद्यार्थिनी म्हणून एमएसाठी एडमिशन घेतले. त्यानंतर सुट्टीतील बी. एड. चा कोर्स सोलापूर येथे जाऊन पूर्ण केला. त्यावेळी पतींसह सर्व नातेवाईकांनी मुलांची जबाबदारी स्वीकारली. अशा प्रकारे मी एमए बीएड झाले. माझा मुलगा मोहसीन बीकॉमचा अभ्यास करत होता. कन्या अरमान डी. एड.चा कोर्स पूर्ण करत होती व छोटी कन्या यास्मीन बी. ई (इलेक्ट्रॉनिक्स) चा अभ्यास करत होती. मी पीएच. डी. होण्याची मनीषा व्यक्त करताच मुलांसह पतीराजांनी आनंदाने प्रोत्साहन दिले. त्यांच्या सक्रिय, भक्कम पाठिंब्यावरच मी उच्चतम शिक्षण घेऊ शकले. मी आज थोडं फार लिहिते. अशा प्रेमळ, समंजस पतीसाठी मी परमेश्वराजवळ उदंड आयुष्य मागते.

 

Read More 

What do you think?

11 Points
Upvote Downvote

Written by jyubedatamboli

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

गोष्ट एका मायाळू घोडीची!

फायर ऑफ लव्ह – निसर्ग आणि मानवाच्या प्रेमाचे महाकाव्य!