‘द राँग ट्रेन थिअरी‘ नावाचे एक गृहीतक जपानमध्ये प्रसिद्ध आहे. कधीकधी चुकीचे लोक आपल्याला योग्य दिशेने घेऊन जातात मात्र तो प्रवास सहनशीलतेचा अंत पाहतो! ‘द राँग ट्रेन थिअरी‘मध्ये एक सुंदर आणि तितकीच दुःखद गोष्ट आहे.
कधीकधी आपण चुकीचा मार्ग स्वीकारतो, चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करतो किंवा चुकीच्या जागी खूप वेळ थांबून राहतो. चुकीचे करिअर निवडतो, चुकीच्या गावी स्थलांतरित होतो, चुकीच्या नात्यात – भावनांत गुंतून पडतो, चुकीच्या कल्पनांना आपलं विश्व मानतो, चुकीच्या शब्दांना भुलतो – बळी पडतो, असं बरंच काही चुकीचं आपल्यापैकी अनेकांनी आयुष्यात स्वीकारलेलं असतं.
हे आपल्यासोबतच का घडतं? खरे तर आपण जेव्हा या निर्णयाचा स्वीकार केलेला असतो तेव्हा सुरुवातीला हे सगळं आपल्याला खूप भारी वाटत असतं. हे सर्व आपल्या मनासारखं घडतंय या आनंदात आपण मग्न होतो.
मात्र जसजसा काळ पुढे जाऊ लागतो तसतसे आपल्याला उमगते की, आपला हा निर्णय चुकलेला आहे. तरीही आपल्याला वाटत राहतं की, होतं असं कधीकधी, म्हणून आपण निराश व्हायचं का? लवकरच परिस्थिती बदलेल असं आपण स्वतःला बजावू लागतो.
आणखी काही काळानंतर स्थिती बदलते, मात्र ती पहिल्यापेक्षा खराब झालेली असते! माणूस हतबल होतो! इथे काहीजण निराशेच्या गर्तेत जातात, डिप्रेशनमध्ये खोल बुडून जातात. तर बरेच जण आलेल्या दिवसांना तोंड देत संघर्ष करत राहतात.
स्थिती बदलण्याचे विचार आता सोडून दिलेले असतात आणि आपण आहे त्या स्थितीचा सामना करण्यात गढून जातो. दिवसामागून दिवस जातात आणि मोठ्या कालखंडानंतर एक वेळ अशी येते की परिस्थिती आमूलाग्र बदललेली असते. आपल्या नकळत हे आस्ते कदम घडलेले असते. आपण थोडेसे सुखावतो, स्थिरावतो!
आपण मागे वळून पाहतो तेव्हा, स्वतःचा संघर्ष पाहून थक्क होऊन जातो! जग आपली पाठ थोपटतं, कालपर्यंत ज्यांनी आपल्याला दूर लोटलेले असते तेही जवळ येतात! सारं काही मनासारखं घडू लागतं.
जे निराशेच्या गर्तेत खोल बुडून गेलेले असतात, ते देखील अपवाद वगळता बाहेर पडतात, त्यांचेही दिवस बदलतात!
मग आपल्या मनात विचार येतो की, आपण ‘ते’ जे निर्णय घेतले होते ज्यांच्यामुळे आपण कोलमडून गेलो होतो, आता सारे काही संपले म्हणून हतबल झालो होतो; ते सर्व नेमकं काय होतं? हे जे काही घडतं, ते म्हणजे ‘द राँग ट्रेन थिअरी’!
जीवनात बहुतांश लोक निर्णय घेण्यात चुकतात, जे चुकत नाहीत ते जिनियस असतात; त्यांचा सवालच येत नाही. मात्र ज्यांचे निर्णय चुकलेले असतात त्यांच्यापैकी काही मोजक्या लोकांना लगेच कळते की, आपला हा निर्णय चुकलेला आहे!
जग काय म्हणेल, आपली गणना हाराकिरी पत्करणारा माणूस म्हणून होईल का, असले गैरलागू विचार फाट्यावर मारत ते तात्काळ आपली चूक मान्य करून झालेले नुकसान, तोटा, हानी स्वीकारून दुसरा उचित निर्णय घेतात आणि द्रुतगतीने पुढे जातात!
आणि बहुसंख्य लोक ज्यांना कळलेलं असतं की आपलं चुकलं आहे, तरीही ती चूक ते पुढे रेटतच नेतात, त्यांना अपार संघर्ष करावा लागतो मग बऱ्याच काळानंतर ते देखील नव्या उत्तम स्थितीत पोहोचतात!
हा सर्व प्रकार काय सांगतो? आपल्या वकुबाचे हे मोजमाप नसते. आपल्याला चपखल बसेल असा काळ-वेळ येईपर्यंत, आपल्याला जगाच्या व्यवहाराची समज येईपर्यंत, काही अंशी तरी कठोरता अंगी बाणेपर्यंत, नकार देण्याची हिंमत अंगी येईपर्यंत, व्यवहारी नियम आपल्या ठायी रुजेपर्यंत आपण संघर्षरत असतो!
जेव्हा हे सारे बदल घडलेले असतात, तेव्हा आपण त्या स्थितीत पोहोचलेले असतो, ज्याची वाट पाहिलेली असते! हा जीवनप्रवास चुकीच्या गाडीत बसून केला तरीही, आपण जर संघर्ष करत राहिलो तर इप्सित ठिकाणी पोहोचतोच!
किंबहुना आपल्या दुर्गुणांपायी, स्वभावापायी, कर्मापायी, कमतरतेपायी आपण मागे राहिलेले असतो! मात्र जेव्हा याची भरपाई होते तेव्हा ध्येय गाठतो! ‘राँग ट्रेन’ योग्य जागीच घेऊन जाते मात्र त्यासाठी ती आपली अग्नीपरीक्षा घेते.
खरे हुशार चलाख ते लोक असतात ज्यांना लगेच लक्षात आलेलं असतं की, आपली ट्रेन चुकीची आहे, म्हणजेच आपला निर्णय चुकलेला आहे; हे कळताच त्यांनी ती ट्रेन, म्हणजेच तो निर्णय बदलून नवा मार्ग स्वीकारलेला असतो!
आपण खडतर मार्ग स्वीकारतो तरीही आपलेही इप्सित गंतव्य स्थळ येतेच, त्यासाठी आपली कसोटी घेतलेली असते. ‘राँग ट्रेन’मधला जीवन प्रवास विलक्षण दमवणारा असला तरी, याचे सिंहावलोकन सुखावणारे असते हे नक्की! अर्थातच, त्यासाठीची सगळी लढाई आपण एकट्यानेच लढलेली असते! आपल्या भल्यासाठीच हे घडलेलं असतं!
या दरम्यान, नकळत आपले सगळे दंभ गळून पडतात, दुर्गुण घटतात, चार चांगल्या गोष्टींचा आपण अंगीकार करतो. परिस्थिती अशीच का आहे, हे माझ्याबरोबरच का घडतेय असे प्रश्न विचारत बसण्याऐवजी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरु केलेल्या दिवसापासूनच आपलं परिवर्तन सुरु झालेलं असतं, मात्र आपला फोकस केवळ लक्ष्यावर असल्याने आपल्याला ते उमगत नाही!
कितीही वाईट दिवस आले तरी खचून चालत नाही नि हातावर हात धरून बसूनही चालत नाही, आपण आशावादी प्रयत्नवादी राहिलं की दिवस बदलल्याशिवाय राहत नसतात! आपली गाडी जरी चुकीची असली तरी आपणही ईप्सित गाठतोच!
– समीर गायकवाड


GIPHY App Key not set. Please check settings