दिनूची दणक्यात दिवाळी, इतरांची का निराळी।
फोटो साभार:गुगल
दसरा सण नुकताच संपला होता ‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ या उक्तीप्रमाणे सर्वांवर आनंदाचा वर्षाव करून गेला होता. थंडीची चाहूल लागली होती. सणांचा राजा दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपला होता. त्याचवेळी माझ्या काकांना श्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले, तेही अतिदक्षता विभागात. प्रसंग गंभीर होता. इथेच मला स्वच्छंदी दिनू भेटला. दिनू पस्तीशीच्या आसपास वय असलेला दवाखान्यातील सफाई कर्मचारी. सावळ्या रंगाचा, मध्यम उंचीचा, सदा आनंदी दिसणारा, बोलका, परोपकारी, कार्यतत्पर दिनू दवाखान्यात आला की अतीव यातना भोगणाऱ्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरही स्मितरेषा उमटायची. दिनू कचरा गोळा करत करत सर्वांशी बोलत बोलत गाडी पुढे ढकलतो. काय काका बरं हाय का? मावशी तुमची तब्बेत काय म्हणते ? पलीकडच्या माई, तुम्ही आज गप्प का दिसता ? आज हे दादा एकदम फ्रेश दिसतात अशी सर्वांची विचारपूस करतो. प्रसंगी कपडे बदलायला, कूस बदलायला, उठवून बसवायला मदत करतो. कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या ताई-माईंना प्रेमळ सूचनाही देतो. असा हा दिनू सर्वांचा लाडका दिनू बनला आहे.
डॉक्टरना, कर्मचाऱ्यांना, पेशंटना, पेशंटच्या नातेवाईकांना दिवाळीचे वेध लागले होते. दिवाळीला काय खरेदी करायचे याचे मनसुबे सुरू होते. महिला कर्मचाऱ्यांच्या ड्रेस, साडी खरेदीच्या गप्पा दवाखान्याच्या बाजूला हळू आवाजात रंगात येऊ लागल्या होत्या. दिवाळी पाच दिवसावर आलेली असतानाच केर गोळा करणारे दिनूचे हात चमचम चमकू लागले होते. निरखून पहाते तर काय दिनूच्या हातात चांदीचे सुंदर ब्रेसलेट व चांदीच्या दोन अंगठ्या विराजमान झाल्या होत्या. आज केर गोळा करणारे त्याचे हात अधिकच सुंदर दिसत होते. हातातल्या रूपेरी दागिन्यामुळे नेहमी प्रसन्न दिसणारा त्याचा चेहरा आज वेगळ्याच तेजाने उजळून निघालेला दिसत होता. त्याचा हात आज दररोजच्या गतीपेक्षा अधिक गतीने कचऱ्याची विभागणी करून कचरा गोळा करण्यात गुंतला होता. नेहमीप्रमाणे सर्वांची विचारपूस करून मदत करत होता. एका पेशंटने हाताकडे पाहून हसत विचारलेच ‘दिनूची दिवाळी नटली जणू’ तसा दिनू हसत म्हणाला, परवाच सरांनी दोन हजार बोनस दिला. फार फार दिवसाची इच्छा पूर्ण करण्यासाठी सरळ गेलो सराफ कट्ट्याकडे. एक हजाराचे ब्रेसलेट घेतले. व एक हजाराच्या या दोन अंगठ्या घेतल्या चांदीच्या. हात पुढे करून सर्वांना ब्रेसलेट व अंगठ्या दाखवताना त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद खरंच अवर्णनीय होता. एका सहकाऱ्याने शंका विचारलीच स्वतःसाठीच सगळा बोनस खर्च केलास ? बायको, मुलांना, आईला काय घेतलास की नाही ? दिनू हसत हसत म्हणाला, सिव्हीलचा पगार झाल्याबरोबर बायकोला दोन हजार साडीसाठी दिलं. पाहीजे तशी घे म्हटलं. असलीच आणली, तसलीच आणली नको पुन्हा. दोन्ही मुलांच्या कपड्यांसाठी दोन हजार आणि फराळाच्या बाजारासाठी दोन हजार दिलं. खूष झाली बायको व म्हणाली, तुमच्या आईसाठी लुगडं तुम्हीच आणा मला नाही त्या लुगड्यातलं कळत. “मी स्वतः जाऊन आईसाठी हजाराचं लुगडं चोळी आणली. आई जाम खूष झाली. पाचशे रूपये आधीच बाजूला ठेवलेत. फटाके, मेणबत्या, पणत्या, साबण, वाशेल तेल इ. या वस्तू आणण्यासाठी असा खुलासा करून दिनू गडबडीने बाहेर पडला कारण त्याला ही ड्युटी करून सिव्हीलची परमंनंट ड्युटी करायची होती. डबल ड्युटी आनंदाने पार पाडणाऱ्या दिनूने नऊ-दहा हजारात दणक्यात दिवाळी करण्याचा हिशोब कसा चुटकीसरशी मांडला बघा! दिनू निघून गेला पण माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले.
उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या तुमच्या-आमच्या आसपास वावरणाऱ्या मित्रमैत्रिणींच्या घरातील दिवाळी कशी साजरी झाली? किती आनंद देऊन गेली? किती निराशा पदरी पडल्या? किती समाधानाचे दीप मनामनात उजळून गेले? याबाबतीतील उदाहरणे पाहण्यात, ऐकण्यात आली ती सर्व उदाहरणे वाचल्यावर तुम्हीच सांगा ‘दिनूची दिवाळी दणक्यात की या सर्वांची दिवाळी दणक्यात ?
* आयटी क्षेत्रात इंजिनिअर म्हणून लठ्ठ पगाराची नोकरी करणाऱ्या रोहितला ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रमोशन मिळाले. पगारात चाळीस टक्क्यांनी वाढ झाली. रोहित – रीना आनंदून गेले. गावाकडचे कुटुंबीय, नातेवाईक खूश झाले. दिवाळीच्या आधी (चार दिवस) त्याला ऑफिसमध्ये एकाएकी चक्कर आली. उपचारादरम्यान समजले की रोहितची शुगर कमी झालीय व बी. पी. वाढलाय. आठ दिवस दवाखान्यात ऍडमिट व्हावे लागले. शिवाय बी. पी. ची गोळी कायमची सुरू झाली. शुगर कमी होऊ नये याची दक्षता घेण्याचा सल्ला मिळाला. त्यामुळे रोहित रीना यांची यावर्षीची दिवाळी फुल्ल काळजीत गेली.
* निखिलरावांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ऐंशी लाखाचा फ्लॅट बुक केला. फ्लॅट सोळाव्या मजल्यावर होता. रम्य परिसर होता. सुशिक्षित अपार्टमेंट होते. तरीही त्यांची पत्नी नीरजा नाराज होती. याचे कारण असे होते मोठा फ्लॅट घेतल्यावर निखिलराव आईवडिलांना. गावाकडून इकडे कायमचे राहण्यासाठी आणणार होते. त्यामुळे नीरजा तूर्त मोठा फ्लॅट नकोच म्हणत होती. कारण तिला आपल्या संसारात सासू-सासऱ्यांची लुडबूड नको होती. तिला येथे फक्त राजाराणीचा संसार हवा होता. सासू-सासरे कायमचे इकडे आले तर आपल्या मुक्त राहणीमानावर गदा येईल या भितीने ती ऐंशीलाखाच्या फ्लॅट बुकिंगमुळेही दिवाळीचा आनंद उपभोगू शकली नाही.
* सुषमा-सागरची दिवाळी यंदा दणक्यात होणार नव्हतीच कारण त्यांचा एकुलता एक श्रीराज यंदा बारावीला होता. श्रीराज हुशार होता. अभ्यास ही मन लावून करत होता. पण त्याच्या आई-वडिलांना फारच टेन्शन आलं होतं. कारण आयुष्याला कलाटणी देणारं हे वर्ष होते. सुषमा सागरला अॅट ऍनी कॉस्ट श्रीराजला एम्. बी. बी. एस्. डॉक्टर बनवायचं होतं. चार-दोन मार्कासाठी चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळण्याची संधी त्यांना घालवायची नव्हती. त्यांनी वर्षभर श्रीराजच्या मागे टुमणे लावले होते. एन्जॉय काय नंतर करता येईल यावर्षी अभ्यास महत्वाचा.. त्यात कालच अॅकॅडमीतून सरांचा फोन आला होता की श्रीराजला या युनिट टेस्टमध्ये ९६% च मार्कस् पडलेत. तो इतरांपेक्षा दोन टक्क्यांनी मागे पडलाय. मग काय विचारता दोन मार्कस् गेले कुठे? या विचारात श्रीबाळा अभ्यास कर म्हणण्यात दिवाळी निघून गेली. फराळाचं काहीच नाही केलं विकतच आणलं थोडं सुषमा-सागर यांची दिवाळी फुल्ल टेन्शन मध्येच गेली.
* सुशिलाताईना ही दिवाळी फारच दुःखदायक वाटली. त्यांच्यात कसलाही उत्साह, हुरूप राहिला नाही कारण त्यांच्या एकुलत्या एका लेकाला सुरेशला दुसरी मुलगी झाली लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी ऐन दिवाळीत लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या पोटी दीपाली आली म्हणून सुनिल-सुवर्णा खूश झाली. पण वंशाला दिवा नाही झाला म्हणून सुशिलाताईंनी अंथरूण घातलं. तिसरा चान्स घ्यायलाच पाहिजे असा त्यांच्याकडे हट्ट धरला पण ते दोघे आपल्या मतावर ठाम होते. दोन्ही मुलीना चांगल वाढवायचं शिक्षण देऊन स्वावलंबी बनवायचं असा ठाम निर्धार त्यांनी केला होता. हे पाहून सुशीलाताई खचून गेल्या आपल्या जावेला परिस्थिती गरीबीची असूनही देवाने दोन नातू दिले आणि मला दोन नाती. कष्टान मिळविलेल्या इस्टेटीचे मालक जावई होणार या कल्पनेने त्यांनी हाय खाल्ली होती. त्यामुळे त्यांना दिवाळीचा फराळ गोड वाटला नाही.
* स्मिताची दिवाळी काही वेगळीच म्हणा ना! स्मिताने पतीकडून सुभाषकडून हट्टाने चार तोळ्यांचा राणीहार करून घेतला होता. परवाच्या कार्यक्रमात रोहिणीने घातलेला हार तिला भारीच आवडला होता. तीन पदरी राणीहार शालूवर खुलून दिसत होता. अगदी अगदी तस्साच हार तिनं बनवून घेतला होता. भावाला ओवाळणी म्हणून शालू ची मागणी तिनं आधीच केली होती. शालूवर राणीहार घालून कॉलनीभर मिरवण्याचा घाट तिनं घातला होता. रोहिणीच्या राणीहारापेक्षा आपला हार वजनाने जास्त व सुंदर नाजूक डिझाइनचा आहे असे समजून ती खूप आनंदात होती. पण तिच्या आनंदावर विरजण पडलं मैत्रिणीसमवेत दुचाकीवरून तिन्हीसांजेला घरी परत येत असताना चोरट्यांनी तिच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे गंठन हिसकावून नेले. ऐन दिवाळीत आलेला हा प्रसंग स्मिताला असह्य झाला. दिवाळी अशी तशीच गेली.
* मेघाला तिच्या पतीने मयूरने पाच हजाराची साडी आणली. आता तरी मेघा माझ्या पसंतीवर खूश होईल या कल्पनेने मयूर आनंदात घरी आला. त्याने साडी मेघाच्या हातात दिली. मेघाने साडी पाहिली नाक मुरडत म्हणाली, ” मला हा कलर नको होता. या कलरच्या चार-पाच साड्या आहेत माझ्याकडे, शिवाय या डिझाइनच्या साड्या जांभळ्या रंगात जास्त खुलून दिसतात.” काय बोलणार बिचारा मयूर? संयम राखत म्हणाला, ‘उद्या तू माझ्याबरोबर दुकानात चल तुला पाहिजे तो कलर घे. बदलून देण्याच्या अटीवरच मी साडी आणली आहे.’ दुसऱ्या दिवशी मेघा दुकानात गेली. पाहिजे तो कलर मिळविण्यासाठी दुकान पालथे घातले तरी तिला पाहिजे तसा कलर मिळाला नाही थोडा फेंटच वाटतो म्हणाली. ती साडी नेसल्यावर कॉलनीतल्या एकीनेही साडी छान आहे असे म्हटले नाही म्हणून मेघा लक्ष्मीपूजेच्या दिवसापासून नाराज झाली. मयुरने समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण बाईसाहेबांचा मूड काही ठिकाणावर आला नाही. पाच हजार पाण्यात गेल्याच्या दुःखात मयूरही दिवाळीत डिस्मूड झाला.
पाहिलीत श्रीमंत लोकांची असंतुष्ट दिवाळी? कुणाचा टॉमी दिवाळीत आजारी होता. कुणाच्या मुलाने पसंत केलेल्या मुलीने लग्नासाठी नकार दिला होता. लाखो कारणे आहेत दिवाळीत दुःखी होण्याची पण या छोट्या दुःखावर मात करून दिनूप्रमाणे थोडक्यात सुख मानणारी व्यक्ती खऱ्या अर्थाने सुखी होते. दहा हजारात दणक्यात दिवाळी साजरी करणारा दिनू आणि त्याचं कुटुंब पाहिलं की, वाटतं सुख शेवटी मानण्यावर असतं. ते व्यक्तीच्या वृत्तीवर अवलंबून असतं. फार दिवसांनी चांदीचं ब्रेसलेट व चांदीच्या अंगठ्या घालण्याचं स्वप्न साकार झाल्यावर आनंदसागरात पोहणारा दिनू, सकारात्मक वृत्ती ठेवून समाधानाने – आनंदाने जीवन व्यतीत करणारा दिनू मला आदर्शवत वाटला. तुम्हालाही वाटला ना ?
नाहीतर एवढ्या तेवढ्या कारणावरून दुःखी होणारे बाकीचे लोक भौतिक सुविधा हात जोडून उभ्या असतानाही सुखी होऊ शकत नाही. आणखी हवं, वेगळं हवं, सर्वांत भारी हवं, आत्ताच हवं, या सगळ्या ‘हवं’ मुळे माणूस नेहमी असमाधानाच्या भोवऱ्यात अडकतो. त्या भोवऱ्यातून सुटका करून घेण्याची क्षमता तो ‘हवं’ मुळे आधीच गमावून बसलेला असतो. त्यामुळे आज परिस्थितीने समृद्ध असलेले लोकही असमाधानी राहतात. त्यांना सुखी माणसाचा सदरा शोधूनही सापडत नाही. सगळं माझ्या मनासारखं व्हावं. अशी अपेक्षा करणारे आपण कधीच सुखी होणार नाही का? त्यापेक्षा जे झालं ते चांगलं झालं. जे होत आहे ते चांगलं होत आहे व जे होणार आहे तेही चांगलच होईल अशी वृत्ती ठेवून जीवन व्यतीत करायचे ठरविले तर आपल्यासारखे सुखी आपणच होऊ. व दिनूप्रमाणे आलेली येणारी प्रत्येक दिवाळी दणक्यात साजरी करू. करणार ना अल्पसंतुष्ट, सुखी-समाधानी दिनूचे अनुकरण ?



GIPHY App Key not set. Please check settings