काही गोष्टी हिंदी सिनेमांतच शोभून दिसतात मात्र काही खऱ्याखुऱ्या गोष्टी अशाही असतात की सिनेमाने देखील तोंडात बोटे घालावीत. ही गोष्ट अशाच एका युगुलाची. आपल्याकडे कला क्षेत्रातील प्रेमाचे दाखले देताना नेहमीच अमृता प्रीतम आणि साहिर लुधियानवी यांच्या प्लेटॉनिक नात्याचा उल्लेख केला जातो. कदाचित हिंदी आणि पंजाबीचे उत्तरेकडील वर्चस्व याला कारणीभूत असावे. खरेतर असेच एक उदाहरण आसामी कलाक्षेत्रातलेही आहे, मात्र त्याचा फारसा उल्लेख कुठे आढळत नाही. गोष्ट आहे एका ख्यातनाम चित्रकाराची आणि एका विलक्षण गोड गळ्याच्या गायिकेची. नील पवन बरुआ हा एका युगाचा कुंचल्याचा श्रेष्ठ जादूगार आणि दीपाली बोरठाकूर, ही आसामची गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध!
1958 साली दीपाली बोरठाकूर केवळ 17 वर्षांच्या होत्या जेव्हा ऑल इंडिया रेडिओ, गुवाहाटी येथे त्यांचे पहिले गाणे रेकॉर्ड झाले. “मोर बोपाई लाहोरी” हे त्यांचे पहिले गाणे, हे अजूनही असाममधले सर्वाधिक ऐकले जाणारे गाणे आहे. ‘लाचित बोरफुकन’ सिनेमाद्वारे त्या प्लेबॅक सिंगर म्हणून आसाममध्ये प्रसिद्ध झाल्या. यातल्या गीतांनी त्यांना रातोरात ख्याती कीर्ती मिळवून दिली. दरम्यान काही लोकगीतेही त्यांनी गायली. त्यांचा मधुर आणि भावपूर्ण आवाज आसामच्या लोकसंगीताला एक नवे परिमाण देत होता. 1969 पर्यंत त्या गायन क्षेत्रात सक्रिय होत्या. त्यांनी गायलेले अखेरचे गाणे अगदी भावपूर्ण होते. त्या गीताचा अर्थ ब्रम्हपुत्रेच्या प्रवाहाशी निगडित होता आणि नद्यांच्या प्रवाहात वाहत जाऊ नये, किंबहुना स्वतःमधली नदी वाहती ठेवावी अशा अर्थाचे हे गाणे होते. दुर्दैवाने त्यांच्या बाबतीत हे गाणे खरे ठरले.
दीपाली आणि नील पवन बरुआ यांचे प्रेम म्हणजे आसामच्या सांस्कृतिक इतिहासातील एक प्रेरणादायी कथाच जणू. 1969 मध्ये दीपाली यांना मोटर न्यूरॉन आजार झाला, ज्यामुळे त्यांना गाण्याची आणि चालण्याची क्षमता हळूहळू गमवावी लागली. वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी त्यांना व्हीलचेअरवर यावे लागले. अशा परिस्थितीतही नील बरुआ यांनी 1976 मध्ये त्यांच्याशी लग्न केले.
नील बरुआ यांचे दीपालीवर असीम प्रेम होते. आपण जिच्यावर प्रेम करतो ती अशी अकाली खुर्चीवर खिळून राहिलीदशकांच्या वैवाहिक प्रवासानंतर.. तेव्हा काही क्षणासाठी त्यांना यातना झाल्या. मात्र त्यांनी नियतीचे आव्हान स्वीकारले. दीपालीचा या नात्याला साहजिकच नकार होता कारण हा आजार पूर्ण बरा होईल असे उपचार नव्हते नि अद्यापही नाहीत. आपल्यामुळे नीलच्या आयुष्यात अडथळ्यांची सुरु होईल हे दीपालीना ठाऊक होते म्हणूनच त्यांनी आधी नकार दिला होता. मात्र काही केल्या नील बरुआ ऐकायला तयार नव्हते. अखेर दीपाली राजी झाल्या. खरे तर त्यांची तक्रार रास्त होती कारण जसजसे दिवस पुढे जाणार होते तसतसे त्यांची अवस्था बिकट होणार होती नि याचा थेट परिणाम नील बरुआंच्या कलेवर पडणार होता!
नील बरुआ हे साधेसुधे प्रतिभावंत नव्हते! 1936 मध्ये जन्मलेले नील बरुआ हे आसाममधील एक प्रख्यात चित्रकार होते, ज्यांनी आपल्या अनोख्या आणि भावनिक कलाकृतींद्वारे पूर्वोत्तर राज्यांच्या सांस्कृतिक विश्वात अमीट छाप सोडली. त्यांचे वडील बिनंद चंद्र बरुआ हे विख्यात कवी होते. त्यांना नादमय कवी अशीही ओळख लाभली होती. नील यांच्या मातोश्री लावण्यप्रभा बरुआ ह्या चित्रकला आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रात ख्यातनाम होत्या. या दोघांचा समृद्ध वारसा नील यांना लाभला होता. शांतिनिकेतनमधील कला भवन येथून त्यांनी चित्रकलेत शिक्षण घेतले आणि ग्लेझ्ड पॉटरी, कविता, मुखवटे बनवणे आणि वृंदावनी वस्त्र यासारख्या कलेत आपली निपुणता दाखवली. अल्पावधीत संपूर्ण आसाममध्ये त्यांचे नाव झाले.
दीपाली बोरठाकूर यांनी पहिले गाणे गायले तेव्हा नील बरुआ बावीस वर्षांचे होते. तेव्हापासूनच ते दीपालींच्या प्रेमात होते. पण प्रेम व्यक्त करायला त्यांनी आणखी काही वर्षे लावली. दीपाली जेव्हा प्लेबॅक सिंगर म्हणून फेमस झाल्या तेव्हा त्यांना कळून चुकले होते की नील बरुआ आपल्या प्रेमात वेडे झाले आहेत! त्यांच्या भेटी गाठी सुरु झाल्या होत्या. या काळात त्यांचे नाते भावनिक ओढीचे अधिक होते. ते सार्वजनिक जीवनात एकत्र येण्याविषयी विचार करत होते आणि दोघेही आपापल्या क्षेत्रात नाव कमावत होते. या दरम्यान त्यांच्या प्रेमाला एक दशक पूर्ण झाले.
1969 साल हे त्यांच्या आयुष्यातले महत्वाचे वर्ष होते कारण या वर्षीच ते आपल्या नात्याची कबुली देणार होते मात्र तसे होऊ शकले नाही कारण दीपालींचा आजार बळावला आणि बघता बघता त्या व्हीलचेअरला खिळल्या. या वेळी दीपाली सत्तावीस वर्षांच्या होत्या आणि नील तेहतीस वर्षांचे होते. दिपालींनी लग्नास होकार देण्यास अवधी मागितला. दीपालीच्या होकारासाठी नील प्रतिक्षारत झाले! दीपालींनी आपला होकार कळवायला सात वर्षे घेतली!
खरे तर दीपालींनी मुद्दामच वेळ घेतला होता, कारण आपण दिरंगाई केली तर एके दिवशी नील आपल्यावर नाराज होतील, रुसतील आणि आपला नाद सोडतील अशी त्यांची आशा होती. मात्र तसे काही घडले नाही. नील बरुआ निरोपाची वाट पाहतच होते. अखेर 1976चे साल उजाडले. दीपालींना नील बरुआ यांना होकार देण्याशिवाय पर्यायच नव्हता. आपण होकारास विलंब करून एक प्रकारे नीलवर अन्याय करत आहोत हे त्यांचे मन वारंवार बजावत होते. अखेर त्यांनी होकार दिला.
दीपालींनी होकार दिला असला तरी त्यांचे मोठे भाऊ महेंद्र यांनी या लग्नास पाठिंबा दिला नव्हता. त्यांना वाटायचे की, हे नाते टिकणार नाही आणि आधीच आजारी असलेल्या आपल्या बहिणीला नाते तुटण्याचा मानसिक धक्का सहन होणार नाही, त्यातून काहीतरी बरेवाईट घडू शकते. त्यामुळे महेंद्र बोरठाकूर यांनी नील बरुआंना सांगितले होते की, ‘प्रेमाचा हा आवेश संपल्यानंतर आपली चूक झाली असे तुम्हाला वाटले तर आम्हाला खूप खूप दु:ख होईल. जे आम्ही सहन करू शकणार नाही!’
महेंद्र यांनी इतके समजावून सांगितले तरीही नील बरुआ मागे हटले नाहीत. त्यांनी आपल्या प्रेमाची आणि समर्पणाची, दीपाली प्रति बांधिलकीची ओढ दाखवली. शब्द दिल्याप्रमाणे त्यांनी दीपालींना आयुष्यभर साथ दिली. ही प्रेमकहाणी आजही अनेकांना भावनिक प्रेरणा देते.
1969 नंतर दीपाली गाऊ शकल्या नाहीत हे वास्तव होते मात्र त्यांनी नीलला कायम प्रोत्साहन दिले. परिणामी, दरम्यानच्या काळात नील अतिशय सक्रिय राहिले. आपल्या चित्रांमध्ये त्यांनी अमूर्तता आणि असामान्य माध्यमांचा वापर वाढवला. त्यांची चित्रे गूढतेकडे अधिक झुकली. त्यांनी काही टाकाऊ वस्तू कॅनव्हास म्हणून वापरल्या, जसे की सिगारेट पॅकेट्स आणि माचिसचे कव्हरबॉक्सेस! 1971 मध्ये त्यांनी ‘असम चारु-कारु कला परिषद’ आणि ‘बसुंधरा कला निकेतन’ स्थापन केले, ज्यामुळे अनेक नव्या कलाकारांना प्रेरणा आणि व्यासपीठ मिळाले. आसाममधील चित्रकारांसाठी आजदेखील हा सर्वात नामांकित प्लॅटफॉर्म आहे.
1976 मध्ये लग्न झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात एकच ध्येय उरले होते ते म्हणजे दीपालींची खुशी! आणि अक्षरशः ते यासाठी तीळ तीळ झिजले! आपल्या प्रेमासाठी ते ध्यासपूर्ण जीवन जगले! या दोहोंच्या नात्यात शारीरिक सुखाची कुठली अनुभूती असण्याचा प्रश्नच नव्हता! परस्परांसाठीचे निव्वळ समर्पण भाव त्यांनी जपले!
लग्नानंतरची पुढची 43 वर्षे त्यांनी दीपालींची निष्ठेने आणि प्रेमाने काळजी घेतली. स्वतःच्या हातांनी दीपाली यांना खाऊ पिऊ घालणे, आंघोळ घालणे, कपडे घालणे आणि त्यांच्या प्रत्येक गरजेची काळजी घेणे हीच त्यांची दिनचर्या होती! आसाममध्ये आजही त्यांच्या या निस्वार्थ प्रेमाला वंदन केले जाते, त्याचे दाखले दिले जातात!
दीपाली बोरठाकूर यांनी त्यांच्या कारकिर्दीत फक्त 24 गाणी सिनेमासाठी रेकॉर्ड केली, बाकी सोळा गाणी ध्वनीमुद्रित झाली. इतकी छोटी कारकीर्द असूनही त्या आसामच्या सर्वात आवडत्या गायिका होत. 1998 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या संगीत आणि सांस्कृतिक योगदानाची ही उचित दखल होती. मात्र या नंतरच्या काळात त्यांची प्रकृती वेगाने ढासळत गेली. त्या पुरत्या बेडरिडन झाल्या. नील बरुआ यांच्यासाठी सेवाभाव बनून राहिल्या. त्यांनीही मनोभावे त्यांची सेवा केली. ‘मेड फॉर इच अदर’ असे हे नाते होते! अखेर वयाच्या 77 व्या वर्षी, 21 डिसेंबर 2018 रोजी दीपालींची प्राणज्योत मालवली.
त्या दिवसापासून नील बरूआ यांचे आयुष्य सैरभैर, दिशाहीन झाले. आपल्या प्रिय पत्नीच्या आठवणी त्यांना सतावू लागल्या. एव्हाना तेही थकले होते, मात्र प्रेमाच्या समर्पणात त्यांना त्याची जाणिवच झाली नव्हती. दरम्यान त्यांच्या योगदानासाठी आसाम सरकारने २०२१ मध्ये त्यांना आसाम सौरभ पुरस्कार देऊन गौरवले होते. यावेळी ते भावनाविवश झाले होते नि दिपालींच्या आठवणींनी कासावीस झाले होते.
दीपाली मरण पावल्या तेव्हा नील 83 वर्षांचे होते! जणू काही ते दिपालींच्या सेवेसाठीच जगत होते, कारण प्रिय पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी अंथरूण धरले! तीन वर्षे ते मृत्यूची याचना करत होते. दीपाली गेल्यानंतर चार वर्षांनी 2022 मध्ये त्यांचेही निधन झाले. प्रेमाचे एक अग्निकुंड विझले! आसाममध्ये शोककळा पसरली! सिनेमामध्ये वा कथा कादंबऱ्यामध्येही इतके रसरशीत प्रेम कुणी चितारले नसेल, जे हे दोघे जगले! असाधारण माणसांची अभूतपूर्व प्रेमकथा असंच म्हणता येईल!
प्रेमात आपल्या जीवनाची आहुती देणारे पुरुष विरळच म्हणावे लागतील अशी आताची सामाजिक स्थिती असताना हे उदाहरण अगदी ठसठशीतपणे लक्षात राहावे असेच आहे. मात्र दुर्दैवाने पूर्वोत्तर राज्ये वगळता याची फारशी माहिती कुठेच दिसत नाही! सच्चे मोती शोधायला समुद्रतळाशी जावे लागते असं म्हटलं जातं, ते काही उगाच नाही!
ही पोस्ट लिहिताना Shrikant Barhate श्रीकांत बारहाते, या माझ्या जिवलग मित्राची अतिव आठवण झाली कारण ते देखील त्यांच्या पत्नीची गेली तीन दशके अशीच सेवा करत आहेत! या प्रेमपुरुषांना वंदन!
– समीर गायकवाड
नोंद – सोबतच्या स्ट्रीट वॉलपेंटींगमध्ये नील आणि दीपाली यांचे चित्र, जे त्यांच्याच अकादमीच्या मुलाने चितारले आहे.
GIPHY App Key not set. Please check settings