लेखक प्रवीण धोपट यांच्या ‘लेट नाइट मुंबई’ या देखण्या आणि आगळ्यावेगळ्या विषयाच्या पुस्तकाची अर्पणपत्रिकाही नेमकी आहे – “सूर्य मावळल्यानंतर ज्यांचा दिवस उजाडतो त्या प्रत्येकाला….”
या देखण्या पुस्तकातले हरेक पान याला अनुसरूनच आहे हे विशेष होय! मुंबई शहराविषयी आजवर विविध भाषांमधून पुष्कळ लेखन केलं गेलंय, मुंबईच्या भौगोलिक महत्वापासून ते इतिहासापर्यंत आणि राजकीय वजनापासून ते मायानगरीपर्यंत भिन्न बिंदूंना केंद्रस्थानी ठेवून हे लेखन संपन्न झालेय. मुंबईविषयी एक आकर्षण देशभरातील सर्व लोकांना आहे, इथल्या माणसांची ओळख बनून राहिलेल्या मुंबईकर स्पिरीटवर सारेच फिदा असतात. मुंबईची आपली एक बंबईया भाषा आहे जी मराठी तर आहेच आहे मात्र हिंग्लिशदेखील आहे! मुंबईच्या बॉलीवूडी स्टारडमपासून ते धारावीच्या विशालकाय बकालतेविषयी सर्वांना जिज्ञासा असते. इथल्या डब्यावाल्यांपासून ते अब्जाधिश अंबानींच्या अँटॅलिया निवासस्थानापर्यंत अनेक गोष्टींचे लोकांना कुतूहल असते. स्वप्ननगरीचा स्वॅग असो की मंत्रालयाचा दबदबा, दलालस्ट्रीटची पॉवर असो की गेट वे ऑफ इंडियाचा भारदस्त लुक चर्चा तर होतच राहणार! अशा सहस्रावधी अंगांनी सजलेल्या, नटलेल्या मुंबईच्या रात्रींची शब्दचित्रे प्रवीण धोपट यांनी चितारलीत. यात रात्रीची मुंबई कैद झालीय असे म्हणणे अतिशयोक्तीचे वाटेल मात्र वास्तव काहीसे तसेच आहे. फुटपाथच्या कडेला तसेच फ्लायओव्हरखालच्या अंधारल्या जागी पडून असणारी जिवंत कलेवरे यात आहेत आणि लखलखीत उजेडात न्हाऊन निघालेलं नाइट लाईफही यात आहे. मुंबईवर प्रेम असणाऱ्यांना हे आवडेल आणि ज्यांना रात्रीच्या मुंबईचं रूप ठाऊक नाही त्यांनाही हे पुस्तक आवडेल.
प्रवीण धोपट यांनी कथा, कादंबरी आणि नाटक या साहित्य प्रकारात लेखन केलं आहे. मुक्त पत्रकारितेपासून सुरुवात करून त्यांनी प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीसाठी नाट्यलेखन केले आहे. त्याचबरोबर चित्रपटांसाठी पटकथा लेखन आणि संवादलेखनही त्यांनी केले आहे. ‘लेट नाइट मुंबई’मधून एकाच वेळी लेखक प्रवीण धोपट यांची स्थितप्रज्ञता आणि संवेदनशीलता जाणवते. 166 पानांच्या या पुस्तकात एकतीस प्रकरणे आहेत. ज्यांच्या शीर्षकांतून आशय विषयाचा अंदाज येतो. मुंबईची ओळख म्हणून विख्यात असणाऱ्या उपनगरांची काही प्रकरणे यात आहेत. जसे की भेंडीबाजार, मदनपुरा, मरीन ड्राईव्ह, बेहराम बाग! याखेरीज मुंबईच्या अस्तित्वाची आयडेंटीटी बनून राहिलेली काही प्रकरणे आहेत, त्यात गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, मुंबईची लाईफलाईन म्हणून लोकल ट्रेन्सचा उल्लेख येतो, तिच्याशी निगडीतही काही लेखन आहे. ‘व्हीटी ते सीएसटी रात्री बारा त्रेचाळीस नंतर’ या प्रकरणात व्हीटीवरचे जग आपल्या भेटीस येते. दादर जंक्शन हे गर्दीने गजबजलेलं स्टेशन. इथली रात्र कधीच कंटाळवाणी वाटत नाही. अहोरात्र जिथे रुग्णवाहिकेचे सायरन वाजतात ते केईएम हॉस्पिटल असो वा जिथे रात्रीचे प्रहर कधीच थांबलेले नसतात, घड्याळाच्या काट्यांनुसार जिथलं विश्व हलत असतं असं छत्रपती शिवाजी राष्ट्रीय विमानतळ असो, तिथल्या रात्रींची दुनिया एकशे ऐंशी कोनात परस्पर विरुद्ध असते तरीही तिथे मुंबईचे वेगळेपण ठसठशीत जाणवतेच.
याखेरीज मुंबईमधले विशाल कुंटणखाने, फॉकलंड रोड – कामाठीपुऱ्याच्या बदनाम गल्ल्या, भाजीपाल्याची वाहतूक विक्री व्यवस्था असणाऱ्या मंडई, ओपन बारपासून ते रात्रीच्या सोबतीने रंगत जाणारे बार, हुक्का पार्लर्स, कॉल सेंटर्स, भय्या मंडळींचे तबेले, छापखाने आणि औद्योगिक वसाहतींमधली धडधडणारी यंत्रे अशी विविधांगी दुनिया देखील आपल्या पुढ्यात येते. मुंबईचे समुद्र किनारे, चेकनाके, अस्ताव्यस्त पसरलेले रस्त्यांचे जाळे यांच्या विश्वात भारावून जायला होतं. यातले बारकावे जितके लोभस आहेत तितकेच जिवघेणेही आहेत. वर्तमानपत्रांची छपाई पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या वितरणाची जटील आणि विविध पातळ्यांवरून आकारास येणारी व्यवस्था कार्यरत असते, ज्यात लाखो लोकांचे हात लागतात. त्याचे तपशील वाचून हरखून जायला होतं. फॉकलंड रोडचे वर्णन उदास करून जाते, तिथल्या बायकांचे आयुष्य अकारण हुरहूर लावते. ‘पिओ और पिने दो’ मधून थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यातली मदिरेची नि तिच्या चाहत्यांची चवचाल दुनिया समोर येते, ज्याची नशा यावी !
या लेखनासाठी प्रवीण धोपट यांनी मेहनत घेतलीय हे वाचताक्षणीच जाणवते. जितक्या विविध ठिकाणी त्यांना जावे लागलेय तिथल्या दुनियेशी, तिथल्या माणसांशी त्यांना एकरूप व्हावं लागलेय, तिथल्या खाचाखोचा समजून घ्याव्या लागल्या असतील, तिथले घटनाक्रम आणि त्यात विरघळलेलं जीवन हे सर्व नेमकं न्याहाळावं लागलं असणार. हरेक ठिकाणची विशेषता आणि त्या अनुषंगाने तिथं येणारे अनुभव याचे शब्दचित्र त्यांनी साचेबद्ध होऊ दिलेले नाही ही नोंद इथे महत्वाची ठरते. कारण, गेट वे ऑफ इंडियाच्या नाइट लाईफबद्दलचं लेखन असो वा वेश्यावस्तीतल्या रात्री असोत, त्यांच्या काही चौकटी आहेत ज्या तिथे रात्री आलेल्या कित्येकांना अनुभवास आलेल्या असतील. इथे त्या चौकटींशी फारकत घेणारी एक तटस्थ नि काहीशी विरक्त अशी दुनिया दिसते. त्यामुळे ज्यांनी मुंबईची लेट नाइट अनुभवली आहे अशांना देखील यातले बारकावे आवडतील. ‘हे आपल्या लक्षात कसं आलं नाही’, असा प्रश्न त्यांना पडेल इतके विस्मयकारक तपशील यात आहेत. मुंबईची लेटनाइट लाईफ पाहून लेखकाच्या मनात जे विचार आले वा ज्या पद्धतीने त्यांनी ते शब्दबद्ध केलेय, ते वाचून इतरांना देखील ते तसेच वाटेल याची शक्यता अत्यंत कमी असते कारण एखाद्या गोष्टीकडे वा व्यक्तीकडे पाहण्याचा वैचारिक दृष्टीकोन व्यक्तीसापेक्ष बदलतो. असे असूनही मुंबईची ही रजनीचित्रे ओळखीची वाटतात, मनाच्या कप्प्यात रुतून बसतात.
‘दैनिक महानगरसाठी ही लेखमाला लिहिली नसती तर आयुष्यात काहीच फरक पडला नसता मात्र ‘त्या’ रात्रींनी आयुष्यातलं एक शहाणपण माझ्या पदरात टाकलं’, असा उल्लेख प्रस्तावनेत आलाय. समृद्धतेची ही शहाणीव लेखकासह वाचकांनाही लाभते. याआधी नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, भाऊ पाध्ये, अरुण साधू, सुहास सोनावणे, जयंत पवार, मधुवंती सप्रे, नितीन साळुंखे, प्रसाद मोकाशी यांच्या लेखनातून जी मुंबई नाइट साकळलीय, ती इथे निस्संशय जशीच्या तशी दिसत नाही कारण हे लेखन कमालीच्या तटस्थतेने केलेलं आहे, यात कुठलेही अभिनिवेश नाहीत. त्यामुळे अगदी परिचयाचे असूनही अनभिज्ञ असे रात्रविश्व अनुभवास येते. जी मुंबई लाखो लोकांना भुरळ पाडते तिचे रात्रीचे हे रूप जितके वेधक रंजक आहे तितकेच रुखरुख लावणारे आहे. रोहन प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केलेय. मजकुरासोबतच्या फोटोंनी आशय अधिक प्रभावी झालाय.
– समीर गायकवाड
GIPHY App Key not set. Please check settings