in

दौरा

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

 सोयाबीनचं पीक पाण्यावाचून सुकत चाललं होतं. बांधा-धुर्‍यावरचं गवत वाळून कोळ झालतं. उडीद-मूग तर वाळूनच गेलते. अनेकांनी कुळव फिरवून मोडून टाकले होते. अशातही एखादी झड पडून गेली, तर सोयाबीन थोडंफार हाताला लागेल; अशी सगळ्यांनाच आशा होती. सोयाबीन पेरल्यावर चार-पाच पानांवर असताना एक मामुली झड पडून गेली होती. लोकांनी आशेनं खुरपणी-फवारणीचा खर्च केला होता. पण अख्खा ऑगस्ट कोरडा गेला. सोयाबीनचा फुलोरा गळून पडत होता. आंब्याच्या झाडाखाली बसून माऊली काडीनं मातीत उगाचच रेघोट्या ओढत होता. माऊलीनं खुरपणासाठी लग्नातली अंगठी उमरग्याच्या सोनाराकडे गहाण ठेवून महिना तीन टक्क्यानं पाच हजार आणले होते. अंगठी नसलेल्या बोटावर अंगठीचा पांढरा वण दिसत होता. माऊलीच लक्ष त्या पांढऱ्या वणाकडे गेलं. फवारणीचं औषध उधारीवर आणलं होतं. फवारणीचा पंप भाड्यानं आणून दोघा बापल्योकानंच दोनदा फवारणी केली. रघुतात्या पाणी आणायला आणि मावल्या फवारायला. पलीकडं भावकीच्या सोयाबीनमध्ये स्प्रिंकलर चालू होतं. माऊली उदास डोळ्यांनी ते दृश्य पाहत होता. शेतात पाणी व्हावं यासाठी रघुतात्यानं खाल्लेल्या खस्तांचा इतिहास त्याच्या डोळ्यांपुढून सरकू लागला. पाण्याच्या नादानं घर कर्जबाजारी झालं. कडूसं पडल्यावर माऊली उठला. तोंडातली तंबाखू थुंकून गाडीवाटेला आला. मागून नबी येत होता. त्यांनं हाक मारली. माऊली थांबला. दोघं बोलत गावाकडं आले. घरी आल्यावर वसरीवर रांजणातल्या पाण्यानं पाय धुतले. बाहेर पत्र्याच्या शेडमध्ये त्याची बायको भाकरी थापत होती. चुलीच्या उजेडात ती देखणी दिसत होती. घरात आला. मायबाप टीव्हीवर देवाची मालिका बघत बसले होते. माऊली पलंगावर आडवा झाला. बायकोनं लग्नातल्या फुलांच्या कुंड्या, तोरणं यांनी खोली सजवली होती. वर लक्ष गेलं. मोजून साडेचार पत्रे. तेही जागोजागी एमसील लावून अंगावर गाठी झाल्यासारखे. माऊली चौकात आला. गणूच्या टपरीवर एक सुपारी सांगितली. गणू म्हणाला, “उधारी लई झाल्याय.कवा देतूस गा?”

 “देतो, जरा दम धर.” -माऊली.

 “नाही गा, माल भरायचाय. बग काय तर हाय का? उदार दिऊन पार कड लागली.”

 “हंऽ पर माजं तसं नाही. देतो म्हंजी देतो.” – माऊली. गणू सुपारी घासू लागला. सुगंधी छिटा सुपारी तोंडात टाकून माऊली सटकला. डोकं फ्रेश झाल्यासारखं वाटलं. कट्ट्यावर बसून एक पिचकारी मारली. पुन्हा डोळ्यापुढं सुकलेलं सोयाबीन दिसू लागलं.

 माऊली शेतात. शेतातून घरात. चौकात. शेतात…

 पाऊस कुठं बेपत्ता झालता कुणाला ठावं? रात्री पलंगावर डोळे उघडे ठेवून नुसतं पडून राहू लागला. आधीच्यासारखं हा तिची वाट न पाहता आपल्याच तंद्रीत पडलेला. ती बिचारी शेजारी गुपचूप झोपायची. कामानं थकल्यामुळे लगेच झोपी जायची. हा दीड-दोन वाजेपर्यंत जागायचा. सकाळी आठला उठायचा. सोयाबीन चक्क गेलं होतं. लोकांनी सोयाबीनमध्ये कुळव घातले होते. जनावरं सोडली होती. पण माऊलीला तसं करू वाटत नव्हतं. लागलेल्या चार-चार शेंगा एखादा झडगा आला तर फुगतील, पदरात पडतील- असं वाटायचं.

 माऊलीची माय शारदा कामाला जात होती, म्हणून घर भागत होतं. रघुतात्याही भाड्यानं कुळवपाळ्या करत होता. पण काम कवातरच मिळायचं. भावकीतला नारायण आबा एके दिवशी माऊलीकडं आला. त्याचं सोयाबीन स्प्रिंकलरच्या पाण्यावर छान आलं होतं. फवारणीसाठी त्याला माणूस मिळत नव्हता. माऊली मोबाईलवर गेम खेळत बसला होता. त्याचं लक्ष वर गेलं. दारात आबा. “या आबा.”

 “तुला फोनच करनार होतो, पन समक्ष बोलावं मनून आलो.”

 “बोला.”

 “सोयाबीनवर लई आळी झाल्याय गा. आवशीद आनून ठिवलाव. यितूस का उद्या फवारायला?”

 “पानी कोन देतंय?” -माऊली

 “तात्याला घि मग संगं. आर्दा रोजगार देतो तात्याचा. बारा-तेरा घागरीच पानी पडतंय की. तुजा डब्बा पार होजूकना बसायचंच हाय.” -आबा.

 “तात्यालाच इचारा. माजं काय नाही, म्या येतो.”

 “कुटं गेलते तात्या?” 

 “भजनाला गेल्यासतील.”

 “मग गाठतो त्येला देवळाकडंच.” म्हणत आबा उठला, तर शारदानं चहा आणला. म्हणाली,

 “दाजी, च्या तर पिऊन जावा गरिबाचा.”

 “आसं का वैनी? द्या पेतो की!” म्हणत आबानं हात पुढे केला. “च्याला म्या कदी नगं म्हनतनी.” म्हणत फुरका मारला. आबाचा ल्योक मिलिट्रीत आहे. त्याच्या आधारानं आबानं मळा फुलवला. बोरला पाणी भरपूर लागलं. आबाची कोरडवाहू शेती पाण्याची झाली. शारदानं आबाच्या लोका-सुना-नातवाची विचारपूस केली. आबानंही माऊलीच्या बायकोला दिवस गेलेत की नाही ते खूबीनं काढून घेतलं. ऐसपैस गप्पा मारून आबा गेला. दिवसभर फवारून अंग पिळवटून गेलतं. माऊली सुपारी खायला चौकात आला. तिथं दुष्काळाची चर्चा सुरू होती. माऊली पिचकार्‍या मारत बसला. जाधवाच्या रामनं सांगितलं की, उद्या आपल्या शिवारात केंद्रीय पथकाचा दुष्काळ पाहणी दौरा आहे. माऊलीनं विचारलं,

 “कोन-कोन हाय गा पथकात?”

 “अधिकारी आस्तेत मोठे.” -गणेश.

 “मग तेंला काय झाट्टा कळतंय?” माऊलीनं असं म्हटल्यावर सगळे हसायला लागले. सकाळी माऊली ग्रामपंचायतीपुढं आला. तिथं त्याला माहिती मिळाली की, पथक तळ्याकडच्या इनामाच्या शिवारात आलंय. माऊली सरसर इनामाकडं निघाला. या शिवारात बागायत जास्त आहे. विहिरींना, बोअरना पाणी आहे. त्यामुळं इनाम शिवार हिरवागार दिसतो. माऊली घामाघूम झाला होता. बघतो तर रोडला गाड्यांची भली मोठी रांग. लाल दिव्याच्या गाड्या, कारा, पोलीसगाडी. गर्दीतून माऊली पुढे आला. पथकासोबत तहसीलदार, कृषी विभागाचे अधिकारी, आमदारही होते. सगळे शिवाप्पा सावकाराच्या उसाकडं गेले. त्यातल्या पंजाबी घातलेल्या एका बाईनं विचारलं, 

 “ये क्या है?” 

 “ये ऊस है. कारखाने में इसकी शक्कर बनती है.” आमदारांनी माहिती पुरवली. 

 “इसे कैसे खाते है?” म्हटल्यावर सावकारानं दोन-तीन चांगले ऊस काढून आणले. त्यातला एक मोडून आमदाराला, एक तुकडा त्या गोऱ्यापान बाईला दिला. आमदारांनी ऊस सोलून खाऊन दाखवला. सावकारानं सगळ्या साहेबांना एक-एक कांडकं दिलं. हास्यविनोदात उसपान कार्यक्रम रंगला होता. माऊलीचा डोकं सटकलं. तो पुढं होऊन आमदारांना म्हणाला,

 “सायेब, हेन्ला तिकडं खाल्लाकडल्या शिवारात घिऊन चला. हितं इनामाच्या मळ्यावात कशाला आनलाव?” 

आमदार तुच्छतेनं म्हणाले, 

 “तिकडं पक्का रोड नाही. गाड्या कशा जाणार? व्हय रं?” 

 “मग हे लोक ऊस बघून काय शेट्टाची भरपाई देणार?” माऊली तापला. त्याला उत्तर न देता आमदार अधिकाऱ्यांना घेऊन पुढं पाटलाच्या शेताकडं निघाले. दोन्ही बाजूंना मशीनगन घेतलेले सिक्युरिटी गार्ड. मागे पोलीस. एकाएकी माऊली गर्दीतून पुढे घुसला. अधिकाऱ्याजवळ जाणार तोच गार्डनं अडवलं. तरी माऊलीनं मुसंडी मारून एका अधिकाऱ्याचा हात धरलाच. अधिकारी घाबरला. माऊली त्याला ओढत ओरडू लागला,

 “हितं कशाला टायमपास करलालाव, मायघाल्यांनोऽऽ तिकडं हामच्या शिवारात चलाऽऽ करपल्याली पिकं बघा.” पोलिसांनी माऊलीला गच्च पकडलं. ते माउलीला बाजूला ओढू लागले. त्या अधिकाऱ्याचा हात माऊलीच्या हातातून निसटला, तरी पथकातले सगळे सदस्य घाबरून माऊलीकडेच बघत स्तब्ध उभे राहिले. 

 “चला, माजं शेत बगाऽ चला सायेब! चलो, देखो मेरा खेत. पूरा जल गया. काटा निकल्या ओऽऽ” पथकाकडं बघत माऊली ओरडत होता. रडत होता. पोलीस त्याला धरून गाडीकडे नेत होते. माऊलीला पोलीसगाडीत घातलं. गाडी निघून गेली. आमदार भेदरलेल्या अधिकाऱ्यांना घेऊन धीर देत पुढे निघाले. गर्दीला चेव आला. रामनं घोषणा दिली,

 “केंद्रीय पथकऽऽ” लोक ओरडले,

 “मुर्दाबादऽऽ” लोक खवळले. ‘आमचा सर्वे – नीट करा’, ‘केंद्रीय पथक -मुर्दाबाद’ अशा घोषणा सुरू झाल्या. केंद्रीय पथकाने पाहणी आवरती घेतली. पोलीस बंदोबस्तात गाड्यांमध्ये बसून पथक पसार झालं.

          •••

(पूर्वप्रकाशित: अक्षरलिपी दिवाळी विशेषांक २०२१)

Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by Pramod Mane

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

तीर्थराज मणिकर्ण

गुलमोहर आणि डियर बाओबाब – वेध एका रंजक गोष्टीचा!