आपण म्हणतो, फॅशन, ट्रेंड सारखे बदलत राहतात. आत्ता फॅशनमध्ये असलेली गोष्ट दोन महिन्यात आउटडेटेड झालेली असते. पण मला वाटतं, फॅशन फक्त गोल गोल घुमत असते. ती दोन महिन्याने आउटडेटेड होते खरी, पण काही वर्षांनी तश्शीच परत येते.
मी जेव्हा अकरावीत कॉलेजमध्ये गेले तेव्हा जी माझी हेअरस्टाईल होती, तीच माझ्या मुलीची आहे आत्ता ती अकरावीत असताना! अगदी कानात रिंग्स ही तशाच!!
मी बनाना क्लिप मध्ये अडकवायचे केस, आणि पोरगी बनाना क्लच मध्ये अडकवते, एवढाच फरक फक्त!!
त्या कानातल्या रिंगची फॅशन आमच्यावेळी रविना टंडनने आणली होती. तिच्या कानात नेहमी वेगवेगळ्या रिंगा असायच्या. अन् तिचं बघून आमच्याही!!
किंबहुना मागच्या एक-दोन वर्षापासून जी ऑक्सिडाईज गळ्यातल्या कानातल्यांची फॅशन आली आहे ना, तीची मूळ सुरुवात पण आमच्याच वेळी झाली होती.
ती देखील फिरून आलीये हो परत!!
मला खूप आवड होती कानातल्यांची!! आणि माझ्या आईलाही खूप हौस होती मला कानातली, गळ्यातली घेऊन द्यायची. हरतऱ्हेची कानातली होती माझ्याकडे!! ती तेव्हा घेतलेली कानातली मी खूप वापरली, आणि इतकी जपून वापरली की तीच सारी आता माझी मुलगी पण घालून फिरते.
मुलीला जेव्हा तिच्या मैत्रिणी विचारतात, हे कानातलं कुठून आणलं ग? तेव्हा ती सांगते, हे पंचवीस वर्षांपूर्वी आणलंय, माझ्या आईने! तिचं आहे ते!!
तिच्या मैत्रिणींना तर झटकाच बसतो एकदम!
माझ्या मुलीच्या जवळपास प्रत्येक ड्रेसवर सूट होईल अशी कानातली तिला माझ्याकडच्या पंचवीस वर्षांपूर्वीच्या जीवापाड जपलेल्या खजिन्यात सापडतात. ती ते फारच आनंदाने घालून फिरते. अन् त्यावेळी मी मात्र माझ्या रुपातलं तिचं sweet sixteen अगदी कौतुकाने न्याहाळत बसते!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
www.hallaagullaa.com
GIPHY App Key not set. Please check settings