इबादतीचा (भक्तीचा) पूल बांधूया
रमजान महिना हा अल्लाहच्या इबादतीचा (भक्तीचा) महिना आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव सुर्योदयापूर्वीपासून सुर्यास्तापर्यंत पाण्याचा एक थेंबही मुखात न घेता राहतात. दिवसभर व रात्री उशीरापर्यंत नमाजपठण, कुरआन पठण, तरावीहची विशेष नमाज अदा करतात. ही इबादत सर्वांना जीवनात जगण्याचे बळ अल्लाह कृपेने येते हे सांगणारी ही कथा.
सलीम नावाचा एक गरीब माणूस शहरात कामानिमित्त गेलेला असतो. एके ठिकाणी त्याला खूप गर्दी झालेली दिसली. त्याने गर्दीबाबत विचारले असता त्याला राज्याचा भावी राजा निवडला जाणार आहे हे कळले. रस्त्यावर लोकांची मोठी रांग उभी होती. राजहत्ती पुष्पमाला घेवून निघाला होता. हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालेल तो भावी राजा होणार होता. सलीम पण त्या रांगेत उभा राहिला आणि आश्चर्य हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली.
सलीमला राजवाड्यात नेल्यावर राजा होण्यापूर्वी त्याला अटी सांगितल्या गेल्या की, ही निवड पाच वर्षापर्यंत राहील. पाच वर्षानंतर एक नदी पार करून जंगलात रहायला जावे लागेल. त्या नदीत मोठमोठ्या मगरी आहेत. त्या मगरीच्या तडाख्यातून जीव वाचविणे कठीण आहे. यापूर्वी बऱ्याच राजांनी आपला जीव गमावला आहे. सलीमने विचार केला पाच वर्षे तरी राजाप्रमाणे जगता येईल आरामात. नंतरचे नंतर बघू. त्याने राज्यकारभार हाती घेतला. उत्तम प्रकारे राज्यकारभार केला. लोकोपयोगी अनेक कामे केली. बघता बघता पाच वर्षे संपली. राजाला आता इथून गेले की, आज जंगलात जावे लागणार हे बघून प्रजेला खूप दुःख झाले. पण सलीमराजा खूष होता. तो खूष होण्याचे कारण वेगळे होते.
गेल्या पाच वर्षात त्याने जंगलात राहणाऱ्या लोकांच्या मदतीने नदीवर एक भक्कम लाकडी पूल बांधून घेतला होता. मगरींच्या तावडीतून सुटण्याचा मार्ग सलीमने आधीच तयार केला होता. त्यामुळे तो निश्चित होता.
बंधूभगिनीनो ही कथा सलीमराजाची नसून अखंड मानवजातीची आहे. मानवाने आपल्या जीवनात भक्तीचा, सत्कार्याचा पूल बांधून ठेवला पाहिजे. तरच तो संसार सागरातून पार होईल. सुलभतेने रमजान महिन्यात इबादतीचा (भक्तीचा) पूल बांधू या.
– डॉ.सौ.ज्युबेदा तांबोळी
GIPHY App Key not set. Please check settings