✍️: डॉ.ज्युबेदा मन्सूर तांबोळी
फोटो: साभार गुगल
रमजानचा महिना भुकेची जाणीव करून देणारा महिना आहे. स्वतः उपाशी असल्याशिवाय भुकेची जाणीव होवू शकत नाही. गोरगरीब लोक परिस्थितीमुळे उपाशी असतात. आपल्याकडे मागतात पण त्यावेळी त्यांच्या उपाशी पोटाची आपल्याला अनुभूती नसते. अकरा महिने आपण सर्वजण २/३ वेळा पोटभर जेवण घेत असतो. भरल्या पोटी अंतरआत्म्यात डोकावण्याची संधी मिळत नाही. ती संधी रमजानमध्ये मिळते. मन शांत व मवाळ होते. रोजा करुन जे अन्न रोजामुळे वाचते ते गरजूना देणे हा रोजाचाच एक भाग आहे. त्यामुळे आपल्याला अल्लाहची कृपा मिळते. अल्लाहच्या कृपेने दारिद्रय व उपासमारी पासून सुटका होते हे सांगणारी ही कथा.
एक अत्यंत गरीब माणूस एकदा एका महान सुफीकडे गेला. आणि म्हणाला, बाबा! मला चार मुली आहेत. लग्नाच्या वयाला आल्या आहेत. गरिबी अशी आहे की, दोन वेळेचे जेवण मिळणे कठीण होत आहे. बाबा! कांहीतरी उपाय सुचवा. बाबांनी त्याला सांगितले की, दररोज दोनशे भुकेल्यांना जेऊ घाल. तो गृहस्थ गडबडला, आश्रमाबाहेर येऊन रडू लागला. त्याचे रडणे बघून एका व्यक्तिने त्याला रडण्याचे कारण विचारले. गरीबान सांगितले की, माझ्या कुटुबिंयांना दोन घास मिळणे कठीण झाले आहे.
बाबांनी सांगितल्यानुसार दोनशे माणसांना कसे जेवण घालू? का रडतोस हे विचारणारा मनुष्य हुशार व जाणकार होता. तो म्हणाला, भूक केवळ माणसानाच लागत नसते. चिमण्या,पक्षी एवढेच काय मुंग्यादेखील भुकेल्या असतात. मूठभर पीठ मुंग्यांच्या बिळापाशी अथवा मूठभर धान्य चिमणी पाखरांना खाऊ घाल दोनशे प्राण्यांची भूक भागेल. तुला तेवढेच पुण्य लाभेल.
तो गरीब गृहस्थ घरी आला. त्याने मुंग्याना पीठ व पक्षांना मूठभर धान्य घालण्याचा रतीब सुरू केला. कांही दिवसातच तो इतका श्रीमंत झाला त्याच्या चारही मुली चांगल्या ठिकाणी विवाहबध्द झाल्या आणि समाधानाने संसारात रमल्या. तो गृहस्थही छोटाशा व्यवसायात व अल्लाहच्या भक्तीत रममाण झाला. बंधूभगिनीनो अल्लाहने आपल्याला ज्या परिस्थितीत ठेवले आहे त्या परिस्थितीतही जमेल तेवढे अन्नदान करू या आणि आल्लाहच्या कृपेचे धनी होवू या.
GIPHY App Key not set. Please check settings