अल्लाह देतो छप्पर फाडके
रमजान महिना अल्लाहची इबादत (भक्ती)करण्याचा त्यांच्याजवळ आपल्यासाठी आशिर्वाद मागण्याचा महिना अल्लाहकडे मागा म्हणजे मिळेल हे सांगणारी ही छोटीशी गोष्ट.
फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक जाहितदक्ष राजा होता. तो प्रजेसाठी सर्व सुखसोयी मिळवून देण्याचा रात्रंदिवस प्रयास करायचा. अधेमधे वेश पालटून राज्यामध्ये फिरायचा. लोकांच्या अडीअडचणी जाणून घ्यायचा. आपण राज्यकारभार करत आहोत, ते योग्य दिशेने होत आहे का हे जाणून घ्यायचा. राज्यकारभाराबद्दल प्रजेला काय वाटते, काय अपेक्षा आहेत याचा अंदाज घ्यायचा. राजाच्या सोबत त्याचे विश्वासू सोबतीही असायचे.
एके दिवशी राजा व त्याचे सोबती राज्यातून फेरफटका मारत असताना राजाच्या शर्टाचे बटन तुटले. आता काय करायचे असा प्रश्न पडला. बटन तुटलेल्या अवस्थेत फिरणे योग्य होणार नाही हे त्यांना समजले. त्यांच्याजवळ बटन लावण्यासाठी सामग्रीही नव्हती. पुढे जात असताना त्यांना शिंप्याचे दुकान दिसले. शिंपी आपले काम गडबडीने पूर्ण करत होता. बरेच लोक शिवलेले कपडे घेवून जाण्यासाठी थांबलेले होते. राजाचे सोबती तिथे गेले. शिंप्याने काही वेळ थांबावे लागेल म्हटले. थोडा वेळ थांबूनही नंबर लागत नाही हे पाहून सोबत्यांनी शिंप्याला बाजूला बोलावून खरी हकीगत सांगितली. शिंप्याने हातातील काम बाजूला सारून बटन लावून दिले. सामान्य वेशातील राजाने विचारले किती रक्कम द्यायची या कामाची. तो विचारात पडला. त्याने विचार केला दोन रूपये मागावेत, पुन्हा त्याला वाटले दोन रूपये थोडे जास्तच होता. राजा म्हणेल एवढ्याशा कामाचे दोन रूपये घेवून लोकांना फसवतोय. शेवटी शिंप्याने म्हटले, तुम्हाला जे द्यायचे ते द्या. त्याने राजावर ही गोष्ट ढकलली. राजा म्हणाला, अमुक अमुक ही दोन गावे तुला बक्षिस देत आहे. तू आमच्या अडचणीच्यावेळी मदत केली आहेस. दोन गावे बक्षिस दिली याचा अर्थ त्या दोन गावचे वतन शिप्याला मिळाले, शिंपी खूष झाला.
ही गोष्ट फक्त राजा आणि शिंपी यांची नसून ती तुमची-आमची सर्वांची आहे. अल्लाहकडे मागायचे आहे. ते भरभरून मागा, त्यात कंजुशी करू नका. अल्लाहला सांगा की जे द्यायचे आहे, जेवढं द्यायचं आहे ते मला दे. मागितल्यावर अल्लाह देईल की, नाही अशी शंका, किंतू-परंतू मनात ठेवू नका. अल्लाह देईल असा ठाम विश्वास बाळगा. अल्लाह जब देता है, छप्पर फाडके देता है. असे म्हटले जाते ते उगीच नाही.
GIPHY App Key not set. Please check settings