in

तुझा देव माझा देव

साहित्यवड या दिवाळीअंकात प्रकाशित झालेली माझी कथा

ऑपेरेशन थियेटरकडे जाणाऱ्या पॅसेजमधे भयाण शांतता पसरली होती. अशा शांततेत मनगटावरच्या घड्याळीचे ठोके देखील व्यवस्थित ऐकू येत आहेत असे वाटते. प्रत्येक क्षण खूप मोठा वाटत असतो. एक जोडपे तिथेच खुर्च्यांवर बसले होते. सिस्टर्सची अधूनमधून येजा  सुरु होती. त्यांच्या हालचालीवरुन आत गडबड सुरु आहे हे जरी लक्षात आले तरी पेशंट नक्की कसा आहे याची कसलीही कल्पना येत नव्हती. असे काही तास शांततेत गेल्यानंतर डॉक्टर बाहेर आले. तसेच ते दोघेही  डॉक्टरांशी बोलायला उठले. डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या केबीन मधे यायला सांगितले. डॉक्टर चेंजरुम मधे जाऊन कपडे बदलून आले.

“बसा”

“कसा आहे तो?”

“छान, आता गुंगीत आहे.” असे सांगत डॉक्टरांनी त्या दोघांना एक कागद पेन घेऊन त्यावर ह्रदयाचे चित्र काढले. त्यातले चार कप्पे दाखविले. रक्कतपुरवठा कसा होता. ह्रदयात नक्की छिद्र कुठे आहे ते समजावून सांगितले.  ऑपरेशनमधे डॉक्टारांनी नक्की काय केले ते समजावून सांगितले. तसे ऑपरेशनच्या आधी सुद्धा सारे समजावून सांगितले होते तरी डॉक्टरांनी परत आज काय घडले ते समजावून सांगितले. पेशंटच्या नातेवाईकांनी मान डोलावली.

“सध्या सारे व्हायटल्स नॉर्मल दिसत आहेत. आपण तीन ते चार दिवस ICU  मधे मॉनिटर करु मग हलवू. बाकी पुढे काय काळजी घ्यायची, डायेट वगैरे ते तुमचे पिडियाट्रिशियन समजावून सांगतिल. Don’t worry he will be absolutely normal.”  त्या बाईंनी लगेच उठून डॉक्टरांचे हात धरले.

“खूप धन्यवाद डॉक्टर. तुमच्यामुळेच हे शक्य झाले.”

“मी कोण जे काही ते त्याच्या हातात.” असे म्हणत डॉक्टरांनी आपले हात काढून घेतले. Paediatric Congenital heart defect, एक चार वर्षाचा मुलगा जन्मतःच हा दोष घेऊन आलेला. डॉक्टरांनी तो दोष आज ओपन हॉर्ट सर्जरी करुन दूर केला. डॉक्टर स्वानंद मराठे साठी जरी ही गोष्ट नेहमीची असली तरी  समोरच्या व्यक्तीसाठी हा त्यांच्या मुलाच्या जीवनमरणाचा प्रश्न होता. आठवड्याला एखादी बायपास, महिन्या दोन महिन्यात एखादी ओपन हॉर्ट सर्जरी आणि रोजची ओपीडी करीत लोकांची ह्रदय तपासणे हा डॉक्टरांचा नियमित कार्यक्रम होता. गेल्या पंधरा वर्षाच्या कारकि‍र्दीत बायपास व्यतिरीक्त शंभराच्यावर ओपन हॉर्ट सर्जरी केल्या होत्या. असे असले तरी डॉ.स्वानंद यांना प्रत्येक मोठ्या ऑपरेशनच्या आधी प्रचंड  भिती वाटते, मन अस्वस्थ होते आणि ऑपरेशन झाल्यावर खूप हायसे वाटते. पेशंटसमोर चेहऱ्यावर कितीही शांतता दाखविली तरी मनात प्रचंड भिती असते. आजही तेच झाले होते. पेशंटचे पालक निघून गेल्यावर डॉक्टरांनी नेहमीप्रमाणे आपले ड्राव्हर उघडले त्यातून एक तांब्याचा सिक्का काढला तो त्यांनी डोळ्याला लावला आणि आपल्या पँटच्या खिशात ठेवला. केबीनला लागून असलेल्या बाल्कनीचे दार उघडले. वर सूर्याकडे बघून त्याचे आभार मानले. मागच्या दाराने खाली आले. सिगारेट सिलगावली. पुण्यात वाढलेली वाहन गर्दीच्या धुरात आपल्या सिगारेटचा धूर मिसळला. ऑपरेशन पूर्ण झाल्याचा सुस्कारा सोडला. परत एक कश मारला.

“अरे स्वानंद चल रे.” स्वातीची घाई सुरु होती आणि स्वानंद काहीतरी शोधत होता. महत्वाच्या कामासाठी जायच्या वेळेवर स्वानंदने काही शोधणे स्वातीसाठी नवीन नव्हते. ही त्याची सवय होती. गेली पंचवीस वर्षे ती त्याला ओळखत होती. दोघेही पुण्याला बी. जे. मेडिकल कॉलेजला शिकायला होते, तो तिच्यापेक्षा दोन वर्षीनी सिनियर होता. कॉलेजला असाच मेसमधे काहीतरी शोधत तो ती उभी होती तिथे आला. तो आपल्याच धुंदीत तिच्या पायाजवळ आला तशी ती झटक्यात मागे गेली. 

“सॉरी”

“काही शोधताय का?”

“हो तो फोटो.” तो तिच्या पायाच्या बाजूला पडलेल्या स्वामी समर्थांच्या फोटोकडे बोट दाखवत बोलला.

“हाच ना” तिने तो फोटो उचलून त्याच्या हातात दिला.

“माझ्या आईने दिला. सांगितले की जवळ असू दे.  तो नेहमी माझ्या वॉलेटमधे असतो. आता पैसे काढताना उडाला.”

“श्रद्धाळू दिसता.”

“आईची श्रद्धा आहे. स्वामी जवळ असले की सारं व्यवस्थित होतं.”

“आणि तुमची”

“माझी आईवर श्रद्धा आहे.” त्याच्या या उत्तराने ती हसली. त्याने लगेच विचारले.

“कॉफी.”

एकंदरीत परिस्थितीच अशी होती तिच्याकडे नाही म्हणणे हा पर्याय नव्हता. अशा कॉफी होत राहिल्या आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. तो औरंगाबाद, दौलताबाद, अजिंठा वगैरे फिरायला गेला असताना मित्रांसोबत तिच्या घरी काही जाऊन आला. ग्रॅज्युएशन नंतर तो दिल्लीला AIMS मधे पुढील शिक्षणासाठी गेला. त्याने हॉर्ट सर्जन म्हणून तर तिने सायकॅट्रिस या विषयात पुढील शिक्षण घेतले. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होताच दोघांनी लग्न करण्याचा विचार केला. या लग्नाला स्वातीच्या वडिलांचा विरोध होता. स्वाती म्हणजे स्वाती जैन आणि हा स्वानंद मराठे तेंव्हा दोघांच्या श्रद्धांमधे फरक होता. तिच्या वडिलांचा विरोध त्यामुळे नव्हता. स्वातीचे वडील हे औरंगाबादमधे फार मोठे धान्याचे व्यापारी होते. शहरातील काही मोठ्या श्रीमंत लोकांत त्यांची गणना होत होती. घरी कशाचीही कमी नव्हती. याउलट स्वानंदच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. वडील लहानपणीच वारले होते. हा एकुलता एक मुलगा होता. स्वानंदची आई एका शाळेत शिक्षिका होती. आपल्या त्या तुटपुंज्या पगारातून कसेबसे  मुलाचे मेडिकलचे शिक्षण पूर्ण केले. स्वातीच्या वडिलांच्या विरोधाचे हे मुख्य कारण होते. त्यांना स्वानंद पुढे जाऊन मोठा डॉक्टर होईल याची खातरी होती पण सुरवातीचे काही दिवस त्रास होईल हे त्यांनी मुलीला समजावून सांगितले. स्वानंदला सुद्धा परिस्थितीतील तफावतीची पूर्ण कल्पना होती. त्याने सुद्धा तिला तेच सांगितले पण स्वातीने आपला हट्ट सोडला नाही. मग काय.. स्वानंद मराठे  औरंगाबादमधील प्रसिद्ध व्यापारी सुंदरलाल जैन यांचा जावई झाला. लग्न झाल्यानंतर मात्र सुंदर काका स्वानंदच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्याला जेंव्हा कधी पैशाची गरज लागली ती पूर्ण केली. मुलाप्रमाणे प्रेम दिले. स्वानंदच्या वडिलांची जागा त्यांनी घेतली.  त्याच्या लंडनमधील शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलला. जेव्हा स्वानंदने मराठे हॉस्पीटल उभे करायचा निर्णय घेतला तेव्हा ते त्याच्या पाठीशी उभे राहिले. सुंदरलाल जैन मागे आहे म्हटल्यावर बँकांनी देखील कर्ज देण्यात कमी केले नाही. पुण्यात डीपी रोडला मराठे हॉस्पीटल उभे झाले आणि लवकरच नावारुपास आले. स्वानंदने देखील त्यांनी वाईट वाटेल असे काहीच केले नाही. त्यांनाही आपल्या जावयाच्या कर्तत्वाचा खूप अभिमान आहे. सुंदरकाका आता दुकानात जात नाही सारा व्यापार आपल्या मुलाकडे सोपवला. ते आता नातवंड, काही सामाजिक कार्यक्रम, घर बसल्या शेअर मार्केट यामधे वेळ घालवतात. वर्षातून एकदा तिर्थयात्रा करुन येतात. कधी राजस्थानमधील दिलवारा तर कधी रणकपुर तर कधी गोमटेश्वराचे दर्शन घ्यायला दक्षिणेत जातात. गेले काही दिवस त्यांना धाप लागणे, छातीत दुखणे, झोपेत श्वास घ्यायला त्रास होणे असे त्रास जाणवत होते. काही चेकअप आणि टेस्ट केल्यानंतर निदान झाले की Mitral valve regurgitation (MR). त्यांचा ह्रदयाच्या उजव्या बाजूला खालच्या आणि वरच्या कप्प्यांना जो़डणाऱ्या झडपेमधे समस्या होती. ओपन हॉर्ट सर्जरी करुन ती झडप योग्य करावी लागणार होती. दुसरा पर्याय नव्हता. काही दिवस दवाखान्यात ठेवल्यानंतर आज ऑपरेशन होते. त्यासाठी निघायलाच स्वाती घाई करीत होती, आणि स्वानंद कपाटांमधे, ड्राव्हरमधे, टेबलखाली काहीतरी शोधत होता पण त्याला हवे ते सापडत नव्हते.

“अरे चल रे स्वानंद” स्वातीने परत आवाज दिला. स्वाती बघतच होती. स्वानंद पाणी प्यायचे निमित्त करुन स्वयंपाकघरात गेला. तिथेदेखील जमेल तसे शोधू लागला.

“अरे काय शोधतोय?”

“काही नाही गं आलोच. तू सिस्टरला फोन करुन विचार ईसीजी, बिपी, शुगर, पल्स काय म्हणते?”

“मी केला होता फोन मघाशी. सारं नॉर्मल आहे. आय मिन ऑपरेशन करण्याइतपत नॉर्मल.” पाणी पिऊन स्वानंद बाथरुममधे गेला. बाथरुममधून येताच परत देवघरात गेला. देवाला नमस्कार केला.

“अरे किती वेळा नमस्कार करशील.” 

“निघायच्या आधीचाच एकदा फक्त.” सकाळपासून तो सतत देवघरात जाऊन नमस्कार करीत होता हे स्वातीने बघितले होते. मग त्याने घरात शोभेसाठी म्हणून ठेवलेल्या काही मूर्त्या किंवा देवाचे सुंदर पेंटिंग्ज त्यालाही नमस्कार केला. ड्रायव्हर कार घेऊन आला. स्वातीने ड्रायव्हरला आधीच सांगितले होते की आज मोठे ऑपरेशन आहे. असे मोठे ऑपरेशन असले की डॉक्टर मर्सिडीज वापरत नाही तर त्यांच्या जुन्या मारुती अल्टोनेच जातात हे आता ड्रायव्हरला देखील माहित होते. स्वातीने खूपदा सांगितले तेंव्हा कुठे तो हल्ली ती अल्टो स्वतः चालवत नाही. त्याने पहिली ओपन हॉर्ट सर्जरी केली तेंव्हा त्याच्याकडे ती अल्टो होती त्याला आजही मोठे ऑपरेशन असले की तिच गाडी न्यायची असते. ड्रायव्हरने त्याची बॅग घेतली आणि गाडीत ठेवली. दोघेही मागेच बसले.  गाडीत बसल्यावर लगेच त्याने गाडीत असलेल्या गणपतीच्या मूर्तीला रितसर नमस्कार केला. गाडीतही त्याचे बॅगमधे, इकडेतिकडे काहीतरी शोधणे सुरुच होते. वाटेत जी छोटी मोठी मंदिरे लागली त्यांना त्याने नमस्कार केला. गाडी सिंहगडरोडला लागली नवशा मारुतीचे मंदिर आले तेंव्हा त्याने दोन्ही हात जोडून नमस्कार केला. हे याचे नेहमीचेच असले तरी आज जरा जास्त अस्वस्थ आहे हे तिला जाणवत होते.

“होईल सारं बरोबर इतका अस्वस्थ होऊ नको.”

“तू स्वतः बघितले का बीपी, शुगर, पल्स, ECG वगैरे”

“तिने व्हाटसअॅप केले होते”

“हिमोग्लोबिन काऊंट, लिव्हर फंक्शन, इनप्लेशन.”

“सारं काल बघितलं ना. सारं नॉर्मल आहे तेंव्हाच ऑपरेशन करायचा निर्णय घेतला ना. होईल व्यवस्थित.”

“He is 78 understand.” त्याचा आवाज वाढला होता. “We can’t take any chance.”

“I understand, calm down.”

“Do you understand the risk? मी पेशंटला सांगतो की काळजी करु नका तेंव्हा माझ्या मनात धस्स होतं. माहिती असतं मला मी कुणाचे तरी ह्दय उघडे करणार आहे. एक सेकंदाची चूक त्याच्या जीवाशी खेळ. बडबड करुन सांत्वना देऊन दोन झोपेच्या गोळ्या देण्याइतपत सोपे नसतं ते.” तिने त्याच्याकडे रागाने बघितले आणि तोंड दुसऱ्या दिशेला वळविले.  

“Sorry, I don’t mean it.” त्याने तिच्या हातावर हात ठेवला. “You know I get nervous and today”

“I know but … तुझं हे नेहमीचेच झाले आहे स्वानंद.”  थोडावेळ दोघेही शांत होते. गाडीत जिंदगी एक सफर सुहाना वाजत होते. गाडी राजाराम पुलाच्या सिग्नलला थांबली. गाडीतील शांतता तिला खायला उठली.

“अरे आतापर्यंत शंभराच्या वर ऑपरेशन केली हे आणखीन एक. यात इतकं अस्वस्थ होण्यासारख काय आहे?”

“तुला सांगू स्वाती अगं पहिलं ऑपरेशन असतं तर लोकं विसरले असते. कोण स्वानंद मराठे. आता शंभराच्यावर ओपन हॉर्ट सर्जिरी केलेल्या डॉक्टरचा प्रश्न आहे. एक छोटी चूक आणि आतापर्यंत मिळवलेलं क्रेडिट लगेच धुळीला मिळेल. त्यात माझ्या सासऱ्यांचे, एका प्रसिद्ध व्यापाऱ्याचे ऑपरेशन.” तेवढ्यात सिग्नलवरची दोन मुल कारच्या काचेवर टकटक करीत होते. स्वातीने तिकडे दुर्लक्ष करीत त्याला म्हटले

“काही होणार नाही. आणि समजा झालेच तर लोक समजतील अरे देवसुद्धा चुकतो कधीकधी तू तर माणूस आहे. इतका विचार करु नको, तुलाच त्रास होईल. होईल व्यवस्थित”

“लोक देवाची चूक माफ करतील, माणसांची चूक देखील माफ करतील पण डॉक्टरांची चूक कधी माफ करीत नाही. तुला म्हटले होते दुसऱ्या डॉक्टरांकडे करु. पण तू.”

“तू माझा हट्ट म्हण पण बाबांचा फक्त तुझ्यावरच विश्वास आहे. गेले असते का दुसऱ्या डॉक्टरांकडे. दादा वहिनी तयार झाले असते का? सर्वांचा फक्त तु्झ्यावरच विश्वास आहे.”

“विश्वास. मला तर आता या विश्वासाचीच भिती वाटायला लागली आहे.” त्याचा स्वर चिडलेला होता. तेवढ्यात परत त्या मुलांनी काचेवर टकटक केली. केविलवाण्या नजरेने साब असे म्हटले. तो चिडूनच म्हणाला.

“क्या है?”  पोरांनी केविलवाण्या नजरेने हात पुढे करीत काहीतरी द्या म्हटले.

“अरे त्यांच्यावर का चिडतोय?”

“दे त्यांना दहा वीस रुपये.” तो. तिने पर्स उघडली. पर्समधे खूप शोधले पण काही सापडले नाही.

“माझ्याकडे सुटे नाही तू दे.” त्यानेही त्याच्या वॉलेटमधे बघितले. त्याच्याकडेही सुटे नव्हते. त्याने शेवटी चिडून वॉलेटमधली पाचशेची नोट काढली त्या पोरांना दिली. तितक्यात सिग्नल ग्रीन झाला आणि गाडी चालायला लागली. स्वाती सारा प्रकार बघत होती. तिला काहीतरी वेगळं वाटत होतं. गाडी पुलावरुन खाली उतरताच ती ड्रायव्हरला म्हणाली.

“गाडी त्या गल्लीत घ्या आणि थांबवा थोडा वेळ.” ड्रायव्हरने तेच केले.

“इथे कशाला गाडी थांबवली काय झाले तुला?”

“मला काय झाले? अरे तुला काय झाले?”

“मला काही नाही झाले. हा असा नर्व्हसनेस ऑपरेशनच्या आधी नेहमीच असतो. You know it.”

“स्वानंद तू केल्या असशील ओपन हॉर्ट सर्जरी. तुझ्या ह्रदयात, मनात काय चालले हे माझ्याशिवाय कुणालाच कळत नाही. तुला सुद्धा नाही. काय झाले?” तिच्या बोलण्यात प्रेम आणि जरब दोन्ही होते. त्याने एक लांब श्वास टाकला.

“तुला आठवते लग्नानंतर आपण हरिहरेश्वरला गेलो होतो. येताना खूप उशीर झाला होता. पाऊस होता. वाटेत गाडी खराब झाली होती”

“हो. एका गावात मंदिरात थांबलो होतो. रात्री त्या पुजाऱ्याच्या मुलीला खूप ताप होता तूच औषध दिले होते.”

“साधा फ्लू होता. मी फक्त ताप उतरविण्याचे औषध दिले होते.”

“हो तुझ्यासाठी छोटीच गोष्ट होती पण त्याक्षणाला त्या पुजाऱ्यासाठी तू देव होता.”

“त्याने मला फी देऊ केली होती. मी नाकारली. तेंव्हा त्याने मला देवीचा  फोटो असलेले एक तांब्याचे कॉइन दिले होते. सांगितले जवळ असू द्या.”

“हो आठवतं पण त्याचा काय संबंध?”

“ते दिसत नाही आहे.”

“ठीक आहे ना शोधू नंतर.”

“अग प्रत्येक ऑपरेशनच्या आधी आणि नंतर मी त्याला नमस्कार करतो. ऑपरेशन थियेटरमधे शिरण्याआधी मी जर काही बघत असेल तर ते तांब्याचे कॉइन.” 

“मग आता काय करायचे असे म्हणणे आहे तुझे?”

“आजचे ऑपरेशन उद्यावर ढकलायचे?”

“अरे सारी तयारी झाली आहे. दादा वहिनी सारे आहेत. दुसऱ्या हॉस्पीटलचे डॉक्टर सुद्धा आले आहेत. आता उद्यावर ढकलायचे का तर तुला ते कॉईन सापडत नाही आहे म्हणून.”

“आपण काहीतरी कारण शोधू ना पेशंटचे बिपी किंवा पल्स नॉर्मल नाही आहे.”

“दादा वहिनींना ते पटेलही पूर्ण विश्वास आहे त्यांचा तुझ्यावर. त्या डॉक्टरांचे काय. परत त्यांची इतर ऑपरेशन सोडून उद्या त्यांना येणे जमणार आहे का?”

“खूप भिती वाटते ग स्वाती.”  

“आता हा सारा विचार करु नको. पर्याय नाही आहे. तुझ्या मनाला बरं वाटावे म्हणून तू ज्या टेबलमधे तू कॉइन ठेवतो ना त्या टेबलला नमस्कार. होईल सारं व्यवस्थित.”

तो हॉस्पीटलला आला. तो पोहचेपर्यंत सारी तयारी झाली होती. स्वाती दादा वहिनींकडे गेली. त्यांना धीर दिला. स्वानंद इतर डॉक्टरांना भेटला. चेंजरुममधे जाऊन कपडे बदलून आला. स्वानंदला स्वातीने सांगितले त्याची आठवण झाली. त्याने टेबलला, त्या टेबलवर ठेवलेल्या फाईलला नमस्कार केला. सारेच ऑपेरशन थियेटरमधे पोहचले. ऑपरेशन थियेटरच्या पॅसेजमधे शांतता होतीच पण ऑपरेशन सुरु होताच त्याची भयाणता जाणवायला लागली. स्वातीचे दादा, वहिनी तिथेच बसले होते. घरचे हॉस्पीटल असले तरी स्वाती आत गेली नाही तिथेच दादा वहिनीजवळ बसली. दोन अडीच तास अशीच शांतता होती. सिस्टर्सची लगबग सुरु होती मधेच कुणीतरी लगबगीने बाहेर येत होती. काही तासांनी स्वानंद बाहेर आला, स्वाती उठली पण त्याने तिला थांबविले. मग ती त्या पॅसेजमधे थांबली. तो आपल्या केबीनमधे गेला, गलोव्हज काढले, आज त्याला कपडे बदलायची देखील इच्छा होत नव्हती. तो तसाच खुर्चीत बसला होता. स्वाती इतर डॉक्टरांशी बोलली. पेशंटला ICU मधे हलविले तेंव्हा ती ICU मधे गेली. सारे रिपोर्ट चेक केले आणि काही वेळाने ती स्वानंदच्या केबीन मधे आली स्वानंद त्याच कपड्यात टेबलवर असलेल्या फाईलवर डोकं ठेऊन झोपला होता. तिने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली.

“स्वानंद ए स्वानंद” तो झोपेतून जागा झाला. “अरे कपडे बदलून घे मग झोप.”

“Oh Sorry काल रात्रभर झोप लागली नाही ग”

“त्या कॉइनसाठी?”

“नाही ग ते सकाळी समजले. तशीच झोप आली नाही. काकांचे ऑपरेशन म्हणून.”

“मी तर गाढ झोपले बा”

“बघितलं मी.  how is he now?”

“He is recovering. Under monitor in ICU. He will be absolutely fine soon.” असे म्हणत तिने त्याचा हात हातात घेतला. “Thank you.”  तो अजूनही झोपेत होता. तो उठला त्याने फाईल उचलून ड्राव्हरमधे ठेवली तर काहीतरी पडल्याचा आवाज आला. कसला आवाज आहे म्हणून स्वाती देखील थांबली. तिने वळून बघितले. तो खाली काहीतरी शोधत होता. त्याने बघितले तर त्याला ते तांब्याचे कॉईन दिसले.

“अग स्वाती हे बघ हे कॉईन त्या फाईलमधे होते. मी कुठे कुठे शोधत होतो.” 

“सापडले ना.”

“मी जायच्या आधी या फाइलला नमस्कार केला होता.”

“जा आता चेंज करुन ये आणि झोप शांत.” ती हसली.

“स्वाती तुला खरंच भिती वाटली नाही”

“नाही”

“मी ते कॉईन सापडत नाही म्हटले तरी भिती वाटली नाही.”

“नाही. अजिबात नाही” ती त्याच्या जवळ आली त्याचे दोन हात हातात घेतले. “माझा देव या दोन हातात आहे. त्या कॉइनमधे नाही.”

स्वाती गेल्यावर तो फ्रेश होऊन चेंज करुन आला. त्याने नेहमीप्रमाणे त्या सिक्क्याला नमस्कार केला. तो सिक्का आपल्या वॉलेटमधे ठेवला. बालकनीचे दार उघडले. समोर तळपणाऱ्या सूर्याला मनानेच नमस्कार केला. त्याचे आभार मानले. बाल्कनीतून खाली गेला आणि आपल्या सिगरेटचा धूर पुण्यात आधीच वाढलेल्या वाहनांच्या प्रदूषणात मिसळला.  

प्रवीण कावडकर

Read More 

What do you think?

20 Points
Upvote Downvote

Written by Mitraho

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

चुंबन-चिकित्सा

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

जे मागायचे ते अल्लाह कडे मागा