in

हिरवाई..

हिरवाई 

आज पुष्कळ हिरवाई दिसतेय. त्याविषयी काही अवांतर. गावाकडं एखादा पिकल्या केसांचा वा अर्धवट वयाचा डंगरा इसम बाईलवेडा झाल्यागत वागू लागतो तेव्हा ‘गडी लई हिरवट’ असल्याचा शेरा मारला जातो.

‘पिकल्या पानाचा देठ की ओ हिरवा..’ ही संकल्पना यातूनच उगम पावलेली!

‘पांढरे केस, हिरवी मने’ या नावाचे वि. द. घाटे यांचे पुस्तक जीवनासक्त व्यक्तींच्या आयुष्याचा धांडोळा घेणारे आहे. ते ‘कथित’ हिरवट नाहीये. असो.

शांता शेळके यांची ‘पाकोळी’ ही कविता सुप्रसिद्ध आहे. कवितेची सुरुवातच हिरवी ‘झाडी या शब्दांनी केलीय.
हिरवी झाडी, पिवळा डोंगर, निळी-सावळी दरी,
बेट बांबुचे त्यातुन वाजे, वार्‍याची पावरी.
कभिन्न काळ्या खडकांमधुनी, फुटति दुधाचे झरे.
संथपणे गिरक्या घेती, शुभ्र शुभ्र पाखरे!.. ‘

मध्यंतरी ‘काय झाडी काय डोंगर’ अशी भ्रष्ट स्लोगन प्रसिद्धी पावली होती, त्यातली झाडी पैशांनी बरबटलेली होती. शांताबाईंची कविता वाचली की याची किळस येऊ लागते. असो.

गावाकडे अजूनही नव्या नवरीला हिरवा चुडा घातला जातो.
देशभरात नववधूला लाल बांगड्या घालून लाल साडी नेसावी लागते.
आपल्याकडे मात्र हिरवा चुडा घालावा लागतो.
हिरवा रंग संपन्नता दर्शवतो.
हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे वधूचा संसार प्रेम, सुख आणि समृद्धीनं भरलेला राहील असा त्यामागचा उद्देश असावा. वधूला तिच्या पुढच्या आयुष्यात कशाचीही कमतरता भासू नये असा त्यामागचा अर्थ असावा.
स्त्रियांच्या प्रजननक्षमतेचं व त्यांना मिळालेल्या मातृत्वाच्या देणगीचं हे एक प्रतीक मानलं जातं. म्हणून वधूला हिरवा चुडा घातला जातो.

काळ्या मातीच्या कुशीत पाऊस कोसळतो तेव्हा तिच्या गर्भातल्या बीजांना तो जोजावतो. बियांमधून अंकुर बाहेर येतात. पाहता पाहता सारं रान हिरवंगार होऊन जातं. ‘वरुणराजाने काळ्या आईला हिरवा शालू नेसवला’ असं साहित्यिक वर्णन त्यातून प्रसवतं.

‘काळी माती, निळं पानी, हिरवं शिवार, ताज्या ताज्या माळव्याच्या भुईला या भार!’ या गीतामधला हरेक रंग त्या त्या घटकाची अर्थसमृद्धी करतो.
नुसतं शिवार म्हटलं की बेजान वाटतं मात्र हिरवं शिवार म्हटलं की मन प्रसन्न होऊन जातं!
शेतीमातीची नाळ हिरवाईशी घट्ट जोडलेली असल्याने असं होत असावं!

माझ्या सोलापुरातील नव्यापेठेत झुंजार वाचनालय जोमात होतं तेव्हा सुभाष देशपांडे यांची ‘हिरवी प्रेतं हिरवा प्रकाश’ ही कादंबरी वाचल्याचे स्मरते. त्या वयात ती अधिक हॉरर वाटली होती हे वेगळे सांगायला नको!

राम कदमांच्या ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’मध्ये ‘हिरवा शालू हिरवी चोळी’ ही लावणी होती. आमच्या सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब येथील लावणी कला केंद्रात ही लावणी अजूनही फर्माईशवर सादर केली जाते! आताच्या मुली त्यावर नीट नाचत नाहीत ही गोष्ट वेगळी!

महागुरूंच्या ‘नवरा माझा नवसाचा’मध्ये ‘हिरवा निसर्ग हा भवतीने..’ हे गाणं जरा बरं होतं आताच्या भाग दोन मध्ये गाण्यांची वाट लागलीय. पुनश्च असो.

लग्नात समारंभात उखाणे घेताना तोंडाचं बोळकं झालेल्या सरूबाईंनी उखाणा घेतला होता तेव्हा सगळे गार झाले होते – “महादेवाच्या पिंडीवर बेल शोभतो हिरवा, संपतरावांचे नाव घेताना जीवाला लागतो गारवा!”
अर्थातच हिरवाईत ताकदच तशी आहे!

उषा मंगेशकर यांनी गायलेल्या ‘साजनी बाई येणार साजन माझा..’ या प्रसिद्ध गाण्याची पहिली ओळच ‘हिरवा शालू पाच नि मरवा वेणीची पेडी घाला..’ अशी आहे! आता वेणी कुणी घालत नाही त्यामुळे ‘हिरवा शालू नि वेणीची पेडी’ ही केवळ फॅण्टसी झालीय.

काकडी मिरची आणि कैरी हे सारं हिरवंच असतं मात्र त्यांच्या चवीत आमूलाग्र फरक असतो.
खायचं पानही हिरवं असतं आणि धोतराही हिरव्याच पानांचा असतो.
चारा हिरवा असतो तोवरच गुरे त्याला तोंड लावतात.
पिवळट पडलेल्या कडब्याला भाव असतो गवताला नाही.
हिरवाई संपली की जीवनातलं सत्व संपलं असं मानलं जातं.
एखाद्या स्टेशनवर थांबलेल्या रेल्वेगाडीला देखील हिरवा झेंडा वा हिरवी लाइट दाखवली तरच ती पुढे मार्गस्थ होते.

हिरवा रंग जगण्याशी संबंधित आहे. अन्नधान्याशी निगडीत आहे. आणि सरते शेवटी पृथ्वीच्या सचेत असण्याशी त्याचा दाट संबंध आहे. यालाही एक अपवाद आहे – डबक्यात साठलेल्या हिरव्या पाण्याला पिण्यायोग्य मानलं जात नाही.

विविध प्रकारच्या द्वेष, तिरस्कार, मत्सराने ग्रासलेला माणूस शेवाळलेल्या हिरव्या डबक्यात रूपांतरित होतो तेव्हा त्याचं फक्त आणि फक्त उपद्रवमूल्य शिल्लक असतं. आपण बहरदार हिरवा ऋतु व्हायचं की हिरव्या पाण्याचे डबकं व्हायचंय हे ज्याला त्याला ठरवावं लागतं!

💚❤️

– समीर गायकवाड

Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

अनमोल ‘रतन’!

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

कृत्तिका हर्षल