in

हजरत मुहम्मद पैगंबर (स.अ.) यांचे कार्य

हजरत मुहम्मद पैगंबर (स.अ.) यांचे कार्य

         इस्लामचे अंतिम प्रेषित मुहम्मद पैगंबर सलेल्लाहु अलैहिवस्सलम एका अशा जनसमुदायासाठी अल्लाहकडून संदेशवाहक म्हणून पाठविण्यात आले, जो आपल्या जहाल प्रवृत्तीमुळे संपूर्ण सभ्य आणि सुशिक्षित जगापासून तुटलेला व अलिप्त होता. अरबस्तानच्या या दक्षिण-पश्चिम भागात कुठलेही राजघराणे नव्हते, राजकुमार नव्हते, नाण्याचे चलन नव्हते. राजमहाल दरबार, मंत्री, सैनिक, कायदे, न्यायालये वगैरे प्रकार नव्हते. ‘बळी तो कान पिळी’ असा प्रकार होता. या भौगोलिक क्षेत्रातील काही घराणी अत्यंत सभ्य व सुसंस्कृत होती. परंतु दुर्गम आणि वाळवंटी प्रदेश आणि काही लोकांच्या रानटीपणामुळे हा प्रदेश सुसंस्कृत जगतापासून दुर्लक्षित होता. कुणीही राज्यकर्ता या प्रदेशावर राज्य करण्यास तयार नव्हता. मक्का शहर यमेन आणि सिरीया आणि इराकच्या हमरस्त्यावर असले तरी येणारे जाणारे काफिले केवळ विसावा व चारापाणी घेण्यासाठीच तेथे थांबायचे. या शहरात अत्यंत प्राचीन काळापासून पवित्र कअबागृह असल्याने ज्या कबिल्यांची या गृहावर श्रध्दा होती. त्यापैकी अनेक जण वर्षातून किमान एकदा या शहरी हज्ज यात्रेसाठी हमखास यायचे. यापलिकडे या क्षेत्राची जगाला माहिती नव्हती.


         अशा दुर्गम प्रदेशात सोमवार दि. २३ जून ५७१ बारा रबीअलअव्वल रोजी पैगंबर हजरत सल्लल्लाहु अलैहीवस्सलम यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या सहा महिन्याआधीच वडिलांचे निधन झाले होते. वयाच्या सहाव्या वर्ष आईचेही निधन झाले. नंतरचे पालनपोषण वृध्द आजोबा अब्दुल मुत्तलिब आणि चुलते अबुतालिब यांनी केले. एका संकेतानुसार हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहिवस्सलम यांना २२ डिसेंबर ६०९ रोजी अल्लाहकडून प्रेषितत्व बहाल करण्यात आले. प्रेषित म्हणजे दिव्य बोधाद्वारे प्राप्त होणारे ईश्वरी आदेश जनसामान्यापर्यंत पोहोचविणारा संदेशवाहक…


          या मक्का शहरात तब्बल तेरा वर्षे पैगंबर साहेबांनी कुरआन, एकेश्वरवाद, सत्य आणि अहिंसेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याचे अतोनात प्रयत्न केले. परंतु, बोटावर मोजण्याइतकीच माणसे त्यांच्या धर्मात परावर्तित झाली. उलट मक्कावासी आणि त्यांचे नातेवाईक त्यांच्या जिवाचे शत्रू बनले. नाईलाज म्हणून पैगंबर साहेबांनी स्वदेशत्याग करण्याचे ठरविले आणि ८ सप्टेंबर ६२२ रोजी मक्केहून मदिनेकडे त्यांनी स्थलांतर केले. मदिनेत पोहोचल्यावर दहा वर्षाच्या आत संपूर्ण परिसरात एक विधायक क्रांती घडून आली.


         मार्च ६३२ मध्ये जेव्हा पैगंबर साहेबांनी अंतिम हज्जयात्रा केली आणि अरफातच्या मैदानात हज्जचा एक विधी म्हणून अंतिम प्रवचन दिले. त्याप्रसंगी त्या मैदानात श्रोत्यांची संख्या एक लाख वीस हजारापेक्षा अधिक होती. जे कुटूंब आणि लांबच्या प्रदेशात वास्तव्य करणारी जी माणसे हज्ज यात्रेस पोहचली नव्हती त्यांची संख्या अगणित होती. ज्या लोकांनी इमान व श्रध्देच्या अवस्थेत पैगंबरसाहेबांचे दर्शन घेतले आणि त्यांच्यावर ईमान राखले, त्यांच्यावर आपले सर्वस्व म्हणजे प्राणसुध्दा अर्पण करण्याचे साहस केले आणि खऱ्या अर्थाने ते राखले. अशाच व्यक्तींना इतिहासात सिहाबी म्हणजेच पैगंबर साहेबांचे सोबती ही उपाधी देण्यात आली. मक्कावासियांच्या द्वेष व अत्याचाराला कंटाळून जेव्हा पैगंबर साहेबांनी स्वदेशत्याग केला आणि सुमारे ४५० कि.मी. उत्तरेकडे प्रवास करून मदिना शहरी स्थायिक झाले. तेव्हा त्यांचे नातलग, अनुयायी, पैगंबर साहेबांचे सोबती म्हणजेच सिहाबी देखील त्यांच्या पाठोपाठ हिजरत म्हणजेच स्थलांतर करून मदिनेत दाखल झाले. ते पूर्णतः लुटले गेले होते. शरीरावर असलेले वस्त्र एवढीच त्यांची मालमत्ता होती परंतू यापैकी एकालाही पैगंबर साहेबांनी भीक मागू दिली नाही. त्यांनी मदिनेत बंधुसंघाची म्हणजे मुआखतची स्थापना केली. येणारा प्रत्येक मक्कावासी मदिनावासियांचा भाऊ होता. हे लोकदेखील इतके स्वाभिमानी होते की ते सतत मदीनावासियांवर अवलंबून राहिले नाहीत. काहीनी तर पहिल्या दिवशीच बाजारपेठ गाठली. काहींनी दुसऱ्या दिवशी जंगलाची वाट धरली आणि जळाऊ लाकडे तोडून बाजारात विकायला लागले. काहींनी मोलमजूरीची कामे पत्करली आणि पहाता पहाता मदिना शहर हे एक स्वावलंबी शहर म्हणून परिसरात प्रसिध्द झाले. पैगंबर साहेबांच्या शिक्षण आणि प्रबोधन साहेबांच्या शिक्षण आणि प्रबोधन कार्यामुळे एका आत्मनिर्भर आणि आदर्श समाजाची निर्मिती झाली. मक्कावासियांकरिता मदिना एक नवीन शहर, अनोळखी गल्लीबोळ, अपरिचित माणसे, शेजारी परंतु प्रेषितसाहेब म्हणजे सर्वांचे अंतिम आणि पृथ्वीतलावरील एकमेव आश्रयस्थान, आत्मविश्वास आणि एकमेकांवरील भरवसा यामुळे एका मातब्बर समाजाची निर्मिती झाली.


          मदिनावासियांचे सर्वात मोठे संरक्षक त्यांचे शेजारी होते. आणि हे शेजारी एकाच धर्माचे नसून विविध धर्मीय होते. जेणेकरून या शहराचे रूपांतर लगेचच एका राष्ट्रकुलात कॉमनवेल्थमध्ये झाले जे नंतर एका शक्तीशाली संस्कृतीमध्ये परावर्तित झाले.

Read More 

What do you think?

Written by jyubedatamboli

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

इस्तिगफार म्हणजे क्षमायाचना

शारिरीक स्वच्छता व पावित्र्य