काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, मंडईलगतच्या रस्त्याच्या कडेला एक अंध चिमुरडी उभी असायची.
तो रस्ता तिच्या परिचयाचा असावा
तिचे अंध वडील तिथेच कुठेतरी आसपास असायचे, तिच्या हाती अंध व्यक्तींची छोटी काठी दिसे.
तिचा चेहरा वाहतुकीच्या सन्मुख असे, रोज सकाळी ठराविक वेळी ती कुणाची तरी वाट पाहत उभी असे.
दरम्यान त्याच वेळी एक हार गजरे विकणारा
वृध्द इसम तिथे येई
बहुतेक त्यांची ओळख असावी.
तिला पाहताच सायकल थांबवून तो स्टॅंड लावे आणि कॅरीयरवर ठेवलेला फुलांचे हारांचे गाठोडे खुले करे.
तो हलकेच काहीतरी पुटपुटत असे.
मग तिच्या चेहऱ्यावर मंद स्मित हास्य उमटे
काही वेळातच ती पुढे होई आणि अगदी हळुवारपणे साऱ्या फुलांवरून अलगद हात फिरवे.
तिच्या मखमली स्पर्शाने पाकळ्या शहारल्यागत होत असत,
ती फुलांवरून हात फिरवत असताना तो वृध्द तृप्त नजरेने तिच्याकडे पाहत राही.
त्यासमयी तिचा चेहरा विलक्षण आनंदी प्रसन्न दिसत असे.
काही क्षणांनंतर तिने मानेने इशारा करे, मग ती फुलं तो चवाळ्यात झाकून ठेवत असे.
तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवून तिचा निरोप घेताना त्याचे डोळे पाणावलेले दिसत.
निमिषार्धात तो सायकलवर टांग टाकून आस्ते कदम पायडल मारत तिथून रवाना होत असे.
दत्त चौकापाशी दत्त मंदिराबाहेर तो दिवसभर हार फुले गजरे विकत उभा असायचा.
त्याच्याकडील फुलांमध्ये जो सुगंध दरवळायचा त्याची अनुभूती जगाच्या पाठीवर कुठेही येत नव्हती!
फक्त आणि फक्त त्याच्याकडील फुलांनाच तसा सुगंध येत असे!
त्याची फुलं लवकर संपत असत, तो लवकर घरी परतत असे.
परतीच्या मार्गावर तो क्षणभर तिथे थांबायचा जिथे त्याच्या फुलांना सुगंध लाभलेला असे.
नंतर कळले की, तिच्या समग्र शिक्षणाचा खर्च त्याने उचलला, लहान असताना ती नॅबच्या शाळेत शिकायची.
आता तिचे लग्न झालेय
नुकताच तिला मुलगा झालाय, त्याला उत्तम दृष्टी आहे असं डॅाक्टरांनी सांगितलंय.
त्या वृद्धाचेच नाव तिने मुलाला दिलेय, अमृत!
तो आता हयात नाही पण त्याच्या स्मृती तिच्या ठायी अमर आहेत! चिरंतन आहेत!
तिच्या हातांना जो अद्भूत गंध दरवळ होता तसाच गंध तिच्या बाळाच्या तान्हुल्या हातांनाही असेल याची मला खात्री आहे!
– समीर गायकवाड



GIPHY App Key not set. Please check settings