सोलापुरात आमचे घर ज्या परिसरात आहे तिथे वेगाने नवनवी बांधकामे होताहेत. गेल्या दशकापासून या भागाचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. वीस वर्षांपूर्वी इथे घासगवताने वेढलेला इलाखा होता. आता मात्र मोकळी जमीन नजरेसही पडत नाही. इथे बांधकामावरचे मजूर नित्य नजरेस पडतात. या संपूर्ण भागात बांधकामांवर सुरक्षेच्या दृष्टीने नजर ठेवण्यासाठी काही माणसं नेमली जातात. रामय्या आणि त्याची बायको भारती हे इथे दोन दशकापासून याच कामावर आहेत. अनेक प्रोजेक्टवर त्यांनी हे काम इमाने इतबारे केलेय. बांधकाम साहित्याची राखण केली आहे.
प्लॉटला कुंपण मारल्यापासून ते इमारत पूर्ण होऊन लोक राहायला येईपर्यंत हे दांपत्य त्या त्या प्रोजेक्टपाशी
सुरुवातीला पत्र्याच्या शेडमध्ये नंतर एखाद्या पडीक खोलीमध्ये वास्तव्य करते. एक प्रोजेक्ट पूर्ण झाला की दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये ते कामास जातात. काळ्या कुळकुळीत रंगाचा मरतुकडा रामय्या आणि त्याच्यासारखीच काटकुळया अंगचणीची त्याची बायको भारती यांना बऱ्याच वर्षांपासून पाहत आलोय.
त्यांच्या राहणीमानात, वागण्या बोलण्यात, नम्रतेत काहीही बदल झालेला नाही. इथेच एखाद्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांना पोरीबाळी झाल्या. एका मुलीचे तर मध्यंतरी लग्नही झालेय. दुसरी मुलगी आणि धाकटा मुलगा त्याने त्याच्या गावी कर्नाटकात आळंदला पाठवलेत. त्यांच्या आयुष्यात सुखे यावीत म्हणून हे नवराबायको अक्षरशः हाडाची काडे करून राबत असतात.
यांनी कितीएक इमारतीवर आपलेपणाने काम केलेय पण यांचे स्वतःचे साधे पत्र्याचे शेडदेखील झालं नव्हतं. त्यांना कुठं बाहेर उन्हातान्हात वणवण भटकताना पाहिलं की पोटात कालवायचं. रामय्या लाजराबुजरा नि अबोल असल्याने त्याच्याशी फारसा संवाद कधीच झाला नाही मात्र त्याची बायको भारती ही बोलक्या स्वभावाची असल्याने त्यांच्या कुटुंबाविषयी इथे अनेकांना आस्था आहे. सर्वांना त्यांची फिकीर असायची.
यंदाच्या दिवाळीत रामय्याला एका नामवंत बिल्डरने रो हाऊसच्या एका प्रोजेक्टमध्ये वनरूम किचनचे घर दिलेय! या बिल्डरच्या घौडदौडीचा, अफाट यशाचा तो कष्टरूपी साक्षीदार आहे. त्यांच्या बहुतांश प्रोजेक्टवर हे दांपत्य वॉचमन म्हणून कामास राहिलंय, तिथे पाणी मारण्याचे काम त्यांनी केलेय. बऱ्याचदा बांधकाम मजूर म्हणूनही ते जोडीने काम करताना दिसत.
लोकांच्या घरांची राखण करणाऱ्या रामय्याला आपलंही एक घर असावं असं नक्कीच वाटलं असेल! यंदाच्या दिवाळीत त्याचं हे स्वप्न पूर्ण झालंय! यासाठी संबंधित बिल्डरचेही कौतुक करावे तितके कमी आहे कारण आजकाल कृतज्ञतेची भावना लोप पावत चाललीय, लोक उपकाराची मदतीची जाणीव ठेवत नाहीत; जगण्याचा सारा परीघ एक रुक्ष व्यवहार बनून राहिलाय, त्या पार्श्वभूमीवर हे वेगळेपण अगदी खुलून दिसतेय!
भारती आणि रामय्या जोडीने आज सकाळी घरी आले होते, स्वतःच्या हातांनी बनवलेला दिवाळी फराळ त्यांनी या वेळी भेट म्हणून दिला. घराविषयी बोलताना त्यांना रडू कोसळलं होतं! आनंदाश्रू कधी कधी अतिव प्रतीक्षा करायला लावतात!
माझ्या आयुष्यातला हा सर्वाधिक रुचकर फराळ होता, कारण निष्ठा आणि सच्चेपणासोबतच कष्टाचा दरवळही या फराळात होता!
आनंद, सुख, शांती आणि तृप्तता यांच्यावर सर्वांचा हक्क आहे मात्र हे सर्वांना लाभत नाही! निदान भल्या माणसांच्या वाट्याला हे समाधान लाभलं तरी चराचराचा लंबक संतुलन राखून असल्याचे नितळ सुख लाभते!
– समीर गायकवाड
GIPHY App Key not set. Please check settings