सुखद क्षणांसाठी ’गझिबो’
कोकणात सुंदर कौलारु घर बांधलं. छोटीशी बाग फुलवली.सारखं काहीतरी कमी वाटत होतं. मुंबईत बंगल्याच्या बाजूला एक गझिबो असतो तसा आपल्या घराच्या बाजुला एकही भिंत नसलेला गझिबो बांधला.घराची शोभा आणखी वाढली.झाडांच्या सावलीत व मोकळ्या हवेच्या ठिकाणी असलेल्या हा गझिबो सगळ्यांना तेथे रमायला खुनवत असतो.
घराएवढाच वेळ माझा गझिबोत जातो.गझिबोत सकाळच्या प्रसन्न वेळी पक्षांचे मधूर संगीत ऐकतो तर दुपारी दाट सावलीत पुस्तक वाचताना खुर्चीत कधी झोप लागते तेच कळत नाही. संध्याकाळी गप्पा मारायला गावक-यांना आमचा गझिबो खूपच आवडीचा वाटतो.
गझिबोच्या बाजूला सुंदर फुलांची झाडे लावली आहेत. व वेली गझिबोवर सोडल्या आहेत.या फुलांवर फुलपाखरं बागडताना पाहण्याचा आंनद अवर्णनीय आहे.गझिबोच्या समोर भागात गवताचे लॉन लावणार आहे.पावसात पाण्याचे तुषार अंगावर झेलत बसून पावसात भिजत राहतो. रात्री काजव्याच्यासह आकाशातले तारेतारका पाहत जागत राहतो.दिवाळीत दिव्यांनी गझिबो सजवतो.एकूणच मनात भरभरून चैतन्य निर्माण करणारे क्षण.
गझिबोत मी संगीत ऐकतो,शांतपणे लिखाण करतो,वाचन करतो,गप्पा मारतो, निसर्गातली फोटोग्राफी करतो व बाजूच्या झाडांची निगराणी करताना किती वेळ जातो तेच कळत नाही.
’गझिबो’, माझ्या घरातले माझ्या आवडीचे ठिकाण झाले आहे.
जिथे कोवळ्या स्वप्नांना नवं क्षितिज दिसावं,कितीही खचलो कधी तरी नवीन उमेद मिळावी,मित्रमैत्रिणींच्या गप्पांची गाठोडी बांधली जावीत,कडवट आठवणी विसरून नवीन वाट दिसावी,बाहेरच्या कोलाहलापासून दूर माझा गझिबो ही माझी एक हक्काची जागा झाली आहे.
घरातला असा एकतरी कोपरा असतो की जो नुसता घराचा कोपरा नाही तर आपल्या मनाचा कोपरा असतो..
GIPHY App Key not set. Please check settings