in

साप – मनातले आणि हरवलेल्या जंगलातले!

साप हा शेतकऱ्याचा मित्रच! काही हजार वर्षापूर्वी जेव्हा आताच्या विविध धर्मातल्या देवदेवतांच्या संकल्पना रूढ नसतील तेव्हा माणूस निसर्गातील प्रतिकेच शिरी मिरवत असावा, त्यांच्यापुढेच नतमस्तक होत असावा. सूर्य, चंद्र, तारे, चांदण्या हे त्याची तत्कालीन दैवते (?) असावीत. पर्वतशिखरे, टेकड्या, नद्या, मैदाने, शेतशिवारे, जंगले यांची तो आराधना करत असावा. त्याच्यासाठी झाडे, पाने, फुलं, पाणी, पाऊस, अग्नी हे सर्व जीवश्च असणार. त्यांची आपल्यावर कृपा राहावी हा विचार त्याच्या मनात जेव्हा आला असेल वा त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना त्याने निसर्गातल्या अशा सर्व प्रतिकांना वंदनीय स्थान दिले असणार. जेव्हापासून कृषक संस्कृती अस्तित्वात होती तेव्हापासून झाडे, पाने, फुलं, पाणी. पाऊस, साप, माती, पिके आदींना वेगळेच स्थान असावे. त्यांच्या नागपूजनाचे कारण हे असू शकते. आताच्या समाजाच्या डोक्यात नागपूजनाची ती संकल्पना अंशतःही नाही. सर्वच धर्मात अशा सर्व प्रतिकांना वेगळेच स्वरूप दिले गेल्याने यामागची मूळ भावना कधीच लोप पावली असावी. आता नारायण नागबळी या भाकड संकल्पनेपुरताच अनेकांचा नागांशी संबंध उरलाय! असो. व्ही.सुरेश या प्रसिद्ध सर्पमित्राविषयी ही पोस्ट!

 
जगभरात आपल्या देशाची प्रतिमा सापांनागांचा, साधूंचा देश म्हणून आजही रुजून आहे. मागे एकदा ब्रिटनचे प्रिन्स 
व्ही. सुरेश, त्यांनी पकडलेले नाग रेस्क्यू करताना    चार्ल्स जेव्हा भारताच्या दौऱ्यावर आले तेव्हा त्यांनी एक इच्छा व्यक्त केली. ती होती, सुरेश या सर्पमित्राला भेटण्याची! सुरेश अवघे बारा वर्षे वयाचे होते तेव्हाची गोष्ट. त्यांच्या घराच्या परिसरात एक मोठा साप आढळला. हा साप चावेल किंवा इजा करेल या भीतीयुक्त हेतूने परिसरातील नागरिकांनी काठीच्या सहाय्याने त्या सापाला जंग जंग पछाडलं आणि सरते शेवटी अतिशय क्रूरतेने त्याला मारुन टाकलं. त्यानंतर आसुरी आनंद झाल्यासारखे सर्वजण हसत होते किंवा उड्या मारत होते. तो प्रसंग सुरेशनी पाहिला आणि त्यांचे मन हेलावले. सापासारखे सरपटणारे प्राणी हे सुद्धा जीवच आहेत. मग, त्यांना अशी वागणूक का. घरात, शेतात कुठेही साप आढळला तर त्याला अशी वागणूक आणि तेच मंदिरात गेले तर तेथे सापाची पुजा. ही काय पद्धत आहे. सापांच्या संरक्षणासाठी आपणच काही तरी करायला हवे, असा चंग त्याने बांधला. त्याचवेळी त्यांनी ठरवले की आपण सापांची हत्या होऊ द्यायची नाही, त्यांचे मित्र व्हायचे! आज चाळीस वर्षांनंतर ते जगविख्यात सर्पमित्र म्हणून सर्वांना ज्ञात आहेत.

वाढते शहरीकरण, घटणारे जंगल, कमी होणारे शेतीचे क्षेत्र, वाढता मानवी हस्तक्षेप अशा विविध कारणांमुळे मानव-

व्ही. सुरेश मोठ्या किंग कोब्रा समवेत  वन्यप्राणी संघर्ष बळावतो आहे. यामुळे मानव अधिक हिंसक होतो आहे आणि वन्यप्राण्यांचे अस्तित्व अधिकाधिक संकटात येत आहे. तसेच, या संघर्षातून मोठी हानी होते आहे,सुरेश अतिशय व्यथित होतात. हा प्रश्न सुटला पाहिजे, यासाठी ते आग्रही आहेत. सापांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्यावर प्रेम करण्यासाठीच आपला जन्म झाला आहे, देवाने आपल्याला पाठविले आहे, असे सुरेश यांना वाटते. त्यामुळे दिवसरात्र त्यांची सर्प सेवा, सुरक्षा सुरू असते. सर्पमित्र म्हणून त्यांची कारकिर्द अतिशय भरगच्च अशी आहे. आजवर त्यांनी शंभरहून अधिक किंग कोब्रा पकडले आहेत. कुठल्याही हत्यार किंवा उपकरणाशिवाय ते साप पकडतात आणि त्यांची निसर्गाच्या अधिवासात पाठवणी करतात. तीस हजाराहून अधिक भटकलेल्या सापांचा (स्ट्रेइंग स्नेक्स) त्यांनी बचाव करुन पुन्हा त्यांना सुरक्षित जंगलात सोडले आहे. हे सारे करीत असताना तीन हजार सापांनी त्यांना दंश केला आहे. तर, ३०० विषारी सापांनी सुरेश यांना चावा घेतला आहे. आजवर दहा वेळेस ‘आयसीयु’मध्ये तर सहा वेळा त्यांना कृत्रिम श्वासोच्छासावर ठेवण्यात आले आहे. असे असतानाही सापांविषयी त्यांचे ममत्व तसूभरही कमी झालेले नाही. याउलट सापांच्या बचावासाठी ते आक्रमकच झाले आहेत.

केवळ सापांना वाचविणे आणि जंगलात सोडून देणे हेच काम ते व्ही. सुरेश !  नागासोबत स्टंट करणे  प्राणावर बेतू शकते!   करतात असे नाही. तर, सापांची अंडी त्यांना दिसली तर त्याचेही ते संरक्षण करतात. थिरुवअनंतपुरम येथे राहणाऱ्या सुरेश यांचे घर सापांचे छोटेखानी पार्कच आहे. विविध प्रकारच्या सापांविषयी असलेले त्यांचे अचूक आणि अगाध ज्ञान थक्क करणारेच आहे. सापांच्या प्रेमात ते का पडले हे त्यांनाही निटसे सांगता येत नाही. पण, सापांसाठीच आपण या पृथ्वीतलावर आलो आहोत, याची जाणिव त्यांना सतत वाटते. सुरेश अवघे १२ वर्षे वयाचे होते तेव्हा त्यांनी पहिला साप पकडला होता. त्यानंतर त्यांचा विश्वास वाढत गेला आणि मदत करण्याची त्यांची हातोटी अव्याहत सुरू आहे. ते कुठेही असले आणि त्यांना मदतीसाठी फोन आला तर ते जातातच. कुठल्याही सुरक्षा उपकरणांशिवाय साप पकडण्याचे त्यांचे कसब वाखाणण्याजोगेच आहे. सापाला कुठलीही इजा व्हायला नको हा प्रमुख उद्देश त्यामागे असल्याचे सुरेश सांगतात. त्यामुळे हे ऐकून त्यांच्याविषयी आणि सापांविषयी सर्वसामान्यांमध्ये आस्था, आदर निर्माण होतो. विविध शाळा, कॉलेज, कार्यक्रमांमध्ये ते सापांविषयी रंजक माहिती सांगतात. सापांचे विविध प्रकार, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांच्याशी निगडीत बाबी सांगताना ते वेगळेच भासतात. उपस्थितांना तर सर्पज्ञान मिळतेच शिवाय सापांविषयी प्रेम वाटायला लागते. सापांना इजा किंवा त्यांच्याशी वाईट वर्तन ते कधीही कुणालाही करू देत नाहीत. त्यांच्या या कार्यशैलीची महती सर्वदूर गेल्याने तातडीने सुरेश यांनाच पाचारण केले जाते. गेल्या काही वर्षात नागरिकरण वाढत आहे. जंगलांचा आकार कमी होतो आहे. त्यामुळे मानवी वस्तीलगत साप आढळून येतात. साप हा सुद्धा एक जीवच आहे. आपल्या संस्कृतीचा विचार केला तर सापांची पूजा करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. असे असताना केवळ घरापरिसरात किंवा कामाच्या ठिकाणी साप आढळला तर त्याच्यावर हल्ला चढवायचा हे योग्य नाही. साप हा अतिशय शांत असतो. ज्यावेळी त्याला धोका किंवा असुरक्षितता वाटते तेव्हाच तो दंश करतो. ही बाब आपण समजून घ्यायला हवी, असे सुरेश सांगतात. अवघ्या एका महिन्यातच त्यांनी कोब्रा जातीच्या सापाची ४५० अंडी सुरक्षित सांभाळली. आजही त्यांच्या घरी विविध जातीच्या सापांची अंडी आहेत. अंड्यातून पिले बाहेर आली की, ते सापांना सुरक्षित वातावरणात सोडतात.

सुरेश यांच्या कार्याची दखल घेऊनच केरळ सरकारने त्यांना सरकारी नोकरी देऊ केली. थिरुवअनंतपुरम मधील कट्टकाडा जवळ असलेल्या जंगलात स्नेक पार्क (सर्पोद्यान) साकारुन तेथेच सुरेश यांना नोकरी देण्याचे केरळ सरकारने निश्चित केले. मात्र, सरकारी नोकरीद्वारे सापांची सेवा आणि सर्वसामान्यांना मदत मी करु शकत नाही, असे सांगत अतिशय नम्रपणे त्यांनी नोकरी नाकारली. त्यानंतरही त्यांच्या कार्यात कुठलाही खंड पडला नाही. कुठल्या सुरक्षा साधनाशिवाय विषारी, अतिविषारी साप पकडणाऱ्या सुरेश यांची महती थेट प्रिन्स चार्ल्स यांच्यापर्यंत पोहचली. त्यामुळेच चार्ल्स यांनी भारत दौऱ्यात सुरेश यांच्या भेटीची इच्छा प्रदर्शित केली. ब्रिटनच्या प्रिन्सची इच्छा असल्याने सारी यंत्रणा कामाला लागली आणि वाझचल येथे ही भेट घडविण्यात आली. सुरेश यांचे सर्पप्रेम पाहून चार्ल्स सुद्धा थक्क झाले. भरभरुन त्यांनी कौतुक केले. आजवर अनेक पुरस्कारांनी सुरेश यांचा सन्मान झाला आहे पण त्यांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. कारण, सापांवर त्यांचे नितांत प्रेम आहे. सुरेश यांच्यासारखे सर्पप्रेम आपल्या सर्वांना जमणार नाही मात्र त्यांच्या अंतरंगी असणारी निसर्गाप्रतीची कृतज्ञता तरी आपल्या ठायी असण्यास काहीच अडचण नसावी!

आताच्या काळात बोगस सर्पमित्रांची बजबजपुरी झालीय. काहीजण केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हा उद्योग करून सापांना अर्धमेले करून सोडून देतात. एकेकाळी गारुडी या जमातीच्या लोकांना साप बाळगल्याच्या कारणावरून कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागलेय, आता कारवाईचा फार्स उरकला जातो. साप दूध पितो, लाह्या खातो यासह त्याच्या कात टाकण्यापासून ते त्याच्या प्रजननापर्यंत लाखो अंधश्रद्धा आपल्याकडे रूढ आहेत. सापाच्या डोळ्यात लोकांचे चेहरे ट्रॅप होतात आणि तो इच्छाधारी माणूस वा नागनागीण होऊन बदला घेऊ शकतो आदी गोष्टींनी याला अमाप खतपाणी घातलेय. वास्तवात हा एक भेदरट जीव आहे जो स्वसंरक्षणार्थ चावा घेऊ शकतो! आपण त्यांच्या अधिवासात घुसखोरी केलीय आणि आपणच म्हणतो कि आमच्या घरात साप घुसलाय! मित्रांनो आपण आपलं क्षेत्रच निश्चित केलेलं नाही, एकही निसर्गस्वरूप आपण शिल्लक ठेवणार नाही अशी आपली मानसिकता झालीय. त्यामुळे काही काळाने का होईना सारा निसर्ग मानवजातीविरोधात उभा ठाकला तर नवल वाटू नये!

खऱ्या अर्थाने जर आपले निसर्गावर प्रेम असेल आणि निसर्ग व पर्यावरण याविषयी आपल्याला आत्मीयता असेल तरच निसर्गातील या घटकांची पूजा करण्यास आपण लायक आहोत! अन्यथा तोदेखील आपल्या नखशिखांत पाखंडीपणाचा एक भाग होय!

– समीर गायकवाड

(या पोस्टमधली व्ही.सुरेश यांच्याविषयीची माहिती भावेश ब्राह्मणकर यांच्या लेखामधून साभार. अलीकडे साप, नाग पकडल्यानंतर त्यांच्याशी स्टंट करताना अनेकांना जीव गमवावे लागलेत. तरीही अशा प्रकारच्या क्लिप्सचे पेव फुटल्यावर स्वतः सुरेश यांनीच असे व्हीडिओ समाजमाध्यमावर टाकणे बंद केले आहे आणि तशा अर्थाचे आवाहन ते सातत्याने करताना दिसतात. त्यामुळे अशा घटनांना आणि व्यक्तींना कुणी प्रोत्साहन देत असेल तर त्याला परावृत्त केले पाहिजे)


#नागपंचमी #साप #जंगल #ब्लॉग #trending #google #search #sameerbapu #sameergaikwad #समीरगायकवाड #समीरबापू #वाचन #साहित्य #ब्लॉग #सदर #स्तंभलेखन #निसर्ग #पर्यावरण       

Read More 

What do you think?

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

क्लिऑन – धूर्त कपटी रोमन नेता!