in

सहरी व नीयत

 

सहरी व नीयत

        रोजे म्हणजे उपवास धरताना पहाटेच्या वेळी केलेले अन्नग्रहण म्हणजे सहरी. रोजाधारकाला सुर्योदय होण्यापूर्वी जेवण घ्यावे लागते. सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत पाण्याचा थेंबही प्राशन करायचा नसल्यामुळे पहाटेच्या वेळी थोडे का होईना भोजन घेणे अपरिहार्य आहे. कुणी म्हणेल की रात्रीचे जेवण घेऊन झोपतो व पहाटे काही न खाताच रोजा धरतो अशाप्रकारे केलेला रोजा अल्लाहचरणी मान्य होत नाही. खरे पहाता पहाटेची वेळ म्हणजे साखर झोपेची. यावेळी उठणे इतर वेळी कठीण जाते पण आपण पूर्ण श्रध्देने रोजे करायचा मनाशी निश्चय केला की पहाटे उठणे फार सोपे जाते. नव्हे तर त्या नेमक्या वेळी झोपेतून आपोआप जाग येते व उपवासधारक चटकन् उठून बसतो.


       पहाटेच्या वेळी खरं तर भूक नसते पण अल्लाहच्या आज्ञेनुसार आहार घेणे हे कर्तव्य समजून आहार घेतला जातो. कुणी चहा, ब्रेड, बिस्किट वगैरे तत्सम पदार्थ खातात. कुणी हत्का नाश्ता करतो तर कुणी पहाटे पूर्ण ताजा गरम आहारही घेतो. रमजान महिन्यात खरी कसोटी असते आम्हा स्त्रियांची, पती, मुले, सासू-सासरे हे रोजा धरणार असतील तर त्यांना उठवण्यापूर्वी त्यांच्या आवडीनुसार स्वयंपाक तयार करावा लागतो. म्हणजे सगळे उठण्यापूर्वी तास-अर्धा तास आधी स्वयंपाक करण्यासाठी उठावे लागते. आदल्या दिवशी ईशाची म्हणजेच रात्रीची नमाज, तरावीहची नमाज पठण स्वयंपाक जेवणखान आवरून झोपी जाताना किमान साडेदहा-अकरा वाजलेले असतात. पुन्हा पहाटे तीन-साडेतीन पूर्वी उठावे लागते. सर्व महिला वर्ग हे काम पूर्ण श्रध्देने व आवडीने करतात. कारण सर्वांच्या उपवासाच्या श्रेयातून मिळणारा काही हिस्सा तिलाही मिळणार असतो.


       उपवास राखतानाचे दुसरे महत्वपूर्ण घटक म्हणजे ‘नीयत’ हे आहे. नीयत म्हणजे इरादा, हेतू किंवा संकल्प असा आहे. ‘नीयत’ शिवाय उपवास होऊ शकत नाही. कुणी प्रातःकाळापासून सुर्यास्तापर्यंत त्या सर्व गोष्टीपासून अलिप्त राहिला, ज्या पासून एक उपवासधारक स्वतःला सांभाळतो, परंतू त्याने रोजा राखण्याची नीयत केली नसेल तर अशा व्यक्तीचा उपवास होऊ शकणार नाही. प्रेषितसाहेबांनी फर्माविले की ज्या व्यक्तीने फज्र म्हणजे पहाटेपूर्वीच नीयत केली नसेल, त्याचा उपवास होऊ शकणार नाही. काही धर्म मार्तडांनी सखोल अध्ययन करून आणि प्रेषित साहेबांच्या इतर वाचनांना समोर ठेवून असा निर्णय दिला आहे की मध्यान्हच्या एक तासआधी जर कुणी उपवासाची नीयत केली असेल तर आणि काही खाल्ले पिले नसेल तर रमजान आणि इतर दिवसांचाही उपवास राखता येईल. नीयत राखणे आणि त्याचा निश्चय करण्याचे ठिकाण हृदय आहे, म्हणून केवळ मनातून जरी इरादा, निश्चय केला, की कुठला उपवास करीत आहे तरी पुरेसे आहे. तोंडाने नीयतीची ‘दुआ उच्चारली नाही तरी चालेल, परंतु दुआ तोंडाने उच्चारणे जास्त बरे’ असे म्हटले जाते.


       उक्ती आणि कृतीमध्ये एकनिष्ठता रहावी म्हणून प्रत्येक रोजाधारकाकडून एक वचन घेतले जाते. पहाटेची न्याहरी म्हणजेच सेहरी घेतल्यानंतर रोजाधारकाने एक श्लोक म्हणावा लागतो “अल्लाहुम्मा असूमु गदल्लका फग फिरली मा कद्दमतु वमा अख्तरतु” याचा मराठीत अर्थ असा “हे अल्लाह ! उगवणाऱ्या दिवशी मी तुझ्याकरिता उपवास करतोय, तूच माझ्या मागील व पुढील पापांना क्षमा प्रदान कर” या वचनाला सर्वसाधारण भाषेत ‘सहेरी की दुआ’ असे म्हणतात. ही एक प्रकारची प्रतिज्ञा आहे, वचन आहे, जी अल्लाहला साक्षी ठेवून उद्‌गारायची असते. याचा अर्थ असा की, “मी अल्लाहबरोबर केलेला करार दिवसभर मोडणार नाही.’


         सतत तीस दिवस या कराराचे पालन करत राहिल्याने माणसाच्या अंतःकरणात एक विधायक बदल घडून येतो आणि आपले वचन पाळण्याची त्याला सवय लागते. कुणी पहात नसले तरी तो सर्वज्ञ आणि सर्व काही पहाणारा आहे. मौज-मजेची सर्व साधने उपलब्ध असताना देखील अल्लाह पहात असल्याचे विचार ध्यानी-मनी राखून आपल्या करारांशी एकनिष्ठ राहणे म्हणजेच खऱ्या अर्थाने उपवास करणे होय. इस्लामी शरीअतमध्ये उक्तीला जितके महत्व आहे, त्यापेक्षा अधिक महत्व कृतीला आहे. रोजे रमजानचे असोत किंवा एरवी विविध कारणांनी राखण्यात आलेले असतो, त्याकरिता सेहरीचे सेवन करणे आवश्यक आहे. पैगंबर साहेबांचा आदेश आहे की सेहरी खात जा, अशाकरिता की सेहरीच्या सेवनात बरकत म्हणजे कल्याणकारी अंश आहेत. एका हदीसमध्ये सांगण्यात आले आहे की ‘आमच्यात आणि अहलेकिताबच्या म्हणजेच ईश्वरी ग्रंथावर श्रध्दा ठेवणाऱ्यांच्या उपवासामध्ये फरक व वैशिष्ट्य सहरी खाण्याचे आहे. म्हणजे आम्ही सहरी घेत असतो व ते घेत नाहीत. रोजाधारक बंधु-भगिनींनो सेहरी सेवन करा, नीयत करा व रोजा रहा. आता आपण शारीरिक स्वच्छता व पावित्र्य याविषयी पाहू या….!

Read More 

What do you think?

Written by jyubedatamboli

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

‘रमजान’ महिन्याच महत्व