‘सलाम बॅांम्बे’मध्ये पंधरा सोळा वर्षांची एक विलक्षण कोवळी मुलगी लाईनमध्ये आणलेली असते. तिला या विश्वातलं खाण्यापिण्याचं, नटण्यामुरडण्याचं सुखही लोभसवाणं वाटतं. तिची नथ उतरवण्याच्या वेळेस तिचा सौदा होतो.
कृष्णा हा त्याच एरियात चहा नाश्ता पोहोचवण्याचं काम करणारा अनाथ पोर. तिथलं बदमाश पब्लिक त्याला चायपाव म्हणूनच हाक मारतं. ते त्याचं टोपणनाव.
चौदा पंधरा वर्षांचा हा चुणचुणीत पोरगा त्या मुलीवर जीव लावून बसतो! त्या मुलीची तिथली पहचान ‘सोला साल‘ या नावाची!
या कोवळ्या मुलीला ‘बाबा‘चं आकर्षण असतं. बाबा (नाना पाटेकर) हा तिथला नामचीन दलाल. त्याचं रफटफ वागणं, त्याचं व्यसनी असणं आणि त्याचा अय्याशी रूबाब तिला खुणावतो.
कृष्णा उर्फ चायपाव हा तिच्या परिघाबाहेरचा. तिच्यासाठी तो केवळ मित्रच! कृष्णाला वाटत असतं की या मुलीला इथून बाहेर काढून आपण आपली अशी स्वतःची जिंदगी जगली पाहिजे.
ही अशक्य कोटीतली गोष्ट असते तरीही तो याचं स्वप्न पाहतो. एके दिवशी ‘सोला साल‘चा सौदा ठरतो.
तिला न्यायला कार येते, नेमक्या त्याचवेळी कृष्णा तिथं येतो. त्याला तिच्याशी बोलायचं असतं, मनातली गोष्ट सांगायची असते.
कारचा ड्रायव्हर स्टार्टर मारतो, गिअर टाकतो; खडर्रखड आवाज काढत गाडी पुढे झाड लागते. कृष्णा कारच्या दरवाजांना झटू लागतो.
काचेआडून काही सांगायचा प्रयत्न करू लागतो. तिला काहीच संदर्भ लागत नाही. कार स्पीड पकडते. कृष्णा कारसोबत धावू लागतो आणि कार वेगाने पुढे निघून जाते.
बॅकसाइडच्या काचेतून ती कृष्णाकडे हताश होऊन पाहते. कृष्णा खचून जातो. फुटलेल्या ग्लासचे पैसे मुकाट भरतो.
त्याची सगळी स्वप्नं तशीच करपून जातात जसं त्याचं आयुष्य करपून गेलेलं असतं…
‘सलाम बॅांम्बे‘ कमीअधिक फरकाने माझीच कहाणी मांडतो असं राहून राहून वाटतं.
सगळ्यांचीच सगळी स्वप्नं पूर्ण होत नसतात आणि सर्व गोष्टी सर्वांना सांगता येत नसतात.
काही गोष्टी कधीच सांगता येत नाहीत, कदाचित आपल्या मनात आपल्या एकट्यासोबत त्या स्मृतींच्या स्वरूपात राहून जगण्याचं निमित्त देत राहतात.
हेही काही कमी नाही…
हॅपी व्हॅलेंटाईन डे…


GIPHY App Key not set. Please check settings