डोहाच्या काठावर बसून अगदी शांतपणे डोहातल्या हिरवट निळ्या पाण्यात माशांसाठी एकेक गोळी फेकायचा. त्याने कणकेची गोळी फेकताच माशांची झुंबड उडायची. खरे तर या डोहात पूर्वी एकही मासा नव्हता, हे सर्व मासे त्यानेच आणून सोडले होते.
इथे आलं की त्याला खूप शांती लाभायची. त्या डोहापाशी मनुष्यवस्ती नव्हती नि कसली वर्दळही नव्हती. तो डोह, गर्द वनराईत हिरव्या काळ्या सावल्यांच्या दाटीत दडून होता. रात्रीच नव्हे तर दिवसादेखील तिथे विलक्षण नीरव शांतता असे. एकट्याने थांबले तर मनात भीतीचे काहूर उठावे असा तिथला भवताल होता.
शिवाय त्या डोहाविषयी वदंताही खूप होत्या, लोक त्याविषयी नानाविध भयावह गोष्टी सांगत त्यामुळे तिथे कुणीच येत नसे. लोक म्हणत की, या डोहात कुणीच जिवंत राहत नाही, त्यामुळेच यात मासे नाहीत!
मात्र त्या व्यक्तीने डोहात सोडलेले मासे जगले होते. माशांना खाऊ घालून झाल्यावर जवळपास तासभर तो एकटाच डोहातल्या शांत गंभीर पाण्याकडे पाहत राहायचा. कधी कधी एकटक बघत राहायचा.
सारंगी त्याची पत्नी. माशांना हवे असणारे कणकेचे छोटे छोटे गोळे त्याला बनवून द्यायची. त्याने टाकलेल्या खाद्यावर सगळे मासे तुटून पडत असले तरी नारंगी रंगाचा एक छोटासा चमकदार मासा काहीच खायचा नाही. तो इसम इथे येताच सगळे मासे डोहाच्या काठापाशी येत आणि अन्नासाठी तडफडत, तो नारंगी मासा याला अपवाद होता.
रोज तो खाद्य टाकायचा आणि तो छोटासा मासा वगळता सारे मासे त्यासाठी फडफडत, तो इवलासा मासा त्या माशांच्या गर्दीनजीक यायचा मात्र काही खायचा नाही. त्या व्यक्तीच्या हातातले सगळे गोळे संपले की, सर्व मासे एकेक करून दूर निघून जात वा तळाशी जात, अपवाद त्या छोट्या माशाचा! बाकी सर्व मासे आकाराने दिवसागणिक वाढत होते मात्र हा छोटा मासा गेल्या कित्येक आठवड्यापासून तेव्हढाच होता!
तो माणूस तिथे असेपर्यन्त, तो नारंगी मासा अगदी धीम्या गतीने गोलाकार शैलीत काठाच्या आसपास फिरत राही. तो इसम त्या छोट्याशा माशाकडे अगदी संमोहन झाल्यागत बघत राहायचा, बऱ्याच वेळाने भानावर आल्यावर तो निघून जायचा.
तिथून घरी गेल्यावर काहीबाही खाऊन तो कामावर जायचा. मात्र त्याच्या वागण्या बोलण्यावरून घरात खटके उडत. सारंगी त्याला वैतागली होती. त्याचा सहवास तिला नकोनकोसा वाटत होता. ती त्याची दुसरी बायको असली तरी लग्नाची होती, त्यामुळे ती त्याला सहजी सोडू शकत नव्हती.
नवरा कामावर गेल्यावर, शून्यात नजर लावून ती घरातल्या रिकाम्या अक्वेरियमकडे बघत बसायची. त्यात काठोकाठ पाणी भरलेले असे, पण मासा मात्र एकही नव्हता! तरीही तिची नजर त्यातल्या पाण्यावर स्थिरावलेली असे. बऱ्याचदा तिच्या डोळ्यात पाणी तरळायचे.
खूपच अस्वस्थ झाल्यावर तिच्या अंतःकरणात नानाविध आठवणींचे मोहोळ उठायचे. अशा वेळी दुपारच्या प्रहरी, महिन्याकाठी एकदा का होईना ती देखील त्याच डोहापाशी यायची. येताना कणकेचे इवलेसे गोळे करून आणायची.
ती तिथे आली की, तो छोटा नारंगी मासा सर्वात जास्त ऍक्टिव्ह असायचा. अगदी फडफडत तिच्या समोर राहायचा! एरव्ही तो शांत असतो हे तिला ठाऊकच नव्हते. तरीही तिची नजर त्यालाच शोधत असे. ती बराच वेळ तिथे बसून राही.
नवरा घरी यायची वेळ होण्याआधी ती डोहाजवळून निघायची आणि वेळेत घरी पोहोचायची. तरीही तो तिच्या चरित्रावर संशय घ्यायचा. कुठे गेली होतीस, का गेली होतीस असे प्रश्न विचारून मारहाण करायचा.
त्यांची भांडणे झाली की, रात्रीतून तो अक्वेरियममधलं पाणी ओतून द्यायचा. सकाळ होताच घरातल्या सगळ्या गोष्टी आवरण्याआधी ती त्यात ताजे पाणी भरून ठेवायची. नाश्ता करून झाल्यावर कामावर निघताना तो, त्या पाण्याने भरलेल्या अक्वेरियमकडे कुत्सित कटाक्ष टाकायचा.
हे असं बऱ्याच दिवसापासून जारी होतं. खरे तर त्या डोहाकडे येण्यासाठी त्याचे मन उत्सुक नसे, पण अगदी चुंबकाने खेचल्यागत तो तिथे यायचाच! नंतर त्याला त्या डोहाचे जणू व्यसनच लागले.
लोक म्हणत, आताशा त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. तो सायको झालाय, एकटाच डोहापाशी बडबडत बसतो. एके दिवशी डोहाकडे जाताना वाटेवर त्याच्या मोटरसायकलला एक कारचालक डॅश देऊन पळून गेला. त्याच्या हातातली कणकेच्या गोळ्यांची पिशवी हवेत उडाली आणि सगळया गोळया चिखलात जिकडे तिकडे फेकल्या गेल्या.
त्या दिवशी त्याला भयानक मनस्ताप झाला. घरी गेल्यावर त्याने सगळा राग सारंगीवर काढला. तिला जबर मारहाण केली. नेहमीप्रमाणे संतापल्यावर अक्वेरियममधलं पाणी ओतून दिलं आणि शांतपणे झोपी गेला.
त्या दिवशी सकाळी, तिने निक्षून सांगितलं की, ती आता अधिक सहन करू शकणार नाही. ती हे घर सोडून जाणार आहे! हे ऐकताच त्याचा चेहरा चमकला. त्याने खुशीने होकार दिला. तो आता तिसरं लग्न करण्यास मोकळा झाला होता.
तिने होकार दिला खरा, मात्र तिचे मन थाऱ्यावर नव्हते. तिला ठाऊक होतं की, आपला नवरा सकाळी घरातून गेल्यावर त्या डोहापाशी दोन तास तरी थांबेल आणि मग पुढे कामावर रवाना होईल. तेव्हा आणखी दोन तास तरी आपण घरीच थांबलं पाहिजे हे तिने ताडले होते.
दोनेक तासांनी ती शांतपणे घरातून निघाली. घर लॉक केले आणि चावी ठरलेल्या जागी दरवाजाच्या वरती फटीत ठेवली, निघताना लिहिलेली चिठ्ठी तिने अशा जागी ठेवली की, ती त्याला सहजी मिळावी. तिने घराबाहेर पडताना त्याच्या मालकीची कोणतीही वस्तू न्यायला त्याने मनाई केली होती, त्यामुळे फक्त अक्वेरियम घेऊन ती बाहेर पडली.
ते अक्वेरियम तिचेच होते, बाकी कपडेलत्ते तिने घेतले नाहीत. ती डोहापाशी येताच सर्व मासे आनंदले, खास करून तो नारंगी मासा! तिने सर्व माशांना खायला दिले. काही वेळ ती तिथे थांबली आणि थोड्या वेळाने मन भरल्यावर डोहाच्या काठाशी वाकली. आपला मुलायम हात तिने पाण्यात घातला. ती अगदी हळुवारपणे पाण्यात हात फिरवत होती.
तो इसम आल्यानंतर एरव्ही दूर असणारा तो नारंगी मासा, तिने पाण्यात हात घालताच, सुळकन तिच्या तळव्यापाशी आला आणि हातात विसावला. त्याच्या स्पर्शाने तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. तिने तो मासा अलगद घेतला आणि अक्वेरियममधल्या पाण्यात ठेवला. काही वेळातच अंग झटकत ती उभी राहिली.
नारंगी मासा असलेलं अक्वेरियम हाती घेऊन ती झपाझप पावले टाकत वेगाने निघून गेली, फक्त एकदाच तिने डोहाकडे मागे वळून पाहिलं! डोहाचे पाणी एकदम थिजले होते. हिरवट शेवाळल्यागत चैतन्यहीन दिसत होते.
दोन वर्षांपूर्वीच तिने दुसरे लग्न केले होते. पहिला नवरा व्यसनी होता आणि खूप मारायचा. एके दिवशी तो घर सोडून निघून गेला तो कायमचाच! तीनेक वर्षे तिने एकटीने काढली. त्या नंतर हा इसम तिच्या आयुष्यात आला. खरेतर त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवले होते.
तिच्या मुलासह स्वीकार करतो, असे सांगून लग्न केले, गोड बोलून तिचे घर स्वतःच्या नावावर करुन घेतले आणि त्यानंतर तिचा जबर छळ सुरु केला. तिला गुरासारखी मारहाण करायचा, पहिल्या नवऱ्याशी अजून संबंध आहेत असं खोटंनाटं बोलायचा.
मार खाऊन घाबराघुबरा झाल्यावर तो पोर अक्वेरियममधल्या नारिंगी कोवळ्या माशाजवळ यायचा! त्याने काचेला हात लावताच, तो मासा आनंदाने उसळी मारायचा, तो त्याच्याशी बोलू लागताच त्या इवल्या जिवाला उधाण यायचे! तो वेगाने गोलाकार गिरक्या घ्यायचा!
एके दिवशी त्याने गोड बोलून त्या मुलाला सोबत नेले आणि त्या संध्याकाळी तो एकटाच घरी परतला. तिने खोदून खोदून विचारले तरी त्याने काही केल्या एकच उत्तर दिले, मुलाला सरकारी हॉस्टेलवर ठेवलेय, दिवाळीलाच त्याला भेटता येईल. तिच्या मनात मात्र त्याने काहीतरी बरेवाईट केल्याची भीती होती.
ती मुकाट सहन करत राहिली. त्या घटनेनंतर पाचव्या दिवशी त्याने पाण्याच्या एका पिशवीत खूप मासे आणले आणि घरातल्या अक्वेरियममधला नारंगी मासाही त्या थैलीत घातला. त्याला विरोध करायची तिची बिशादच नव्हती. त्या दिवसापासुंन ते घर सोडून जाईपर्यंत मागचे सहासात महिने तिने माशांसाठी कणकेच्या गोळ्या करून दिल्या होत्या.
सुरुवातीला तिला ठाऊक नव्हते की हा माणूस रोज गोळे घेऊन जातो कुठे? एके दिवशी तिने पाठलाग केला तर विजनवासातल्या भीतीदायक डोहापाशी तो थांबत असल्याचे तिला दिसले. डोहातल्या पाण्यात घरातला नारिंगी मासा पाहून त्या भीतीदायक क्षणीही तिला हायसे वाटले!
मात्र अधूनमधून ती तिथे जात राहिली. काही वेळापूर्वी तिच्या हाताने अक्वेरियममधल्या पाण्यात नारंगी मासा ठेवला तेव्हा तिच्या लक्षात आले की, हा मासा तर जेव्हढा होता तेव्हढाच आहे, तो वाढलाच नाही! तिच्या चेहऱ्यावर गूढ स्मितहास्य उमटले. ती दिवसभर चालत राहिली. दूर क्षितिजापार निघून गेली.
संध्याकाळ होण्याआधीच तो जरा लवकर घरी परतला. पाहतो, तर घराला कुलूप होते, दारावर नेहमीच्या जागी त्याने हात फिरवला तेव्हा, चावी हाताला लागली. तिच्या नावाने शिव्या हासडतच तो घरात शिरला. टेबलावर ठेवलेली चिठ्ठी वाचली आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. आपल्या मालकीची एकमेव वस्तू म्हणजे अक्वेरियम घेऊन जात असल्याची, एका ओळीचीचिठ्ठी होती ती!
ती चिट्ठी वाचून त्याचा चेहरा विलक्षण पडला. घशाला कोरड पडली. त्याच्या सर्वांगाला दरदरुन घाम फुटला. अंगाला कंप सुटला. त्याही स्थितीत त्याने मनात काहीएक विचार केला आणि गाडीला किक मारून थेट डोहाच्या दिशेने निघाला. बाइक चालवताना त्याच्या मनाला लक्ष इंगळ्या डसत होत्या.
वेगाने बाईक चालवत थोड्याच वेळात तो तिथे पोहोचला देखील! आणखी थोड्या वेळाने अंधार पडणार होता. या निर्मनुष्य डोहापाशी या सांजवेळी तो कधीच आला नव्हता. त्यामुळे आता भीतीने त्याची गाळण उडाली होती.
डोहाजवळ येताच त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. एरव्ही हिरवे निळे दिसणारे पाणी, आता पुरते शेवाळल्यागत दिसत होते. पाण्यातले सर्व मासे मरुन पडले होते आणि त्यांची कलेवरे पृष्ठभागावर तरंगत होती. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. भीतीने मरायची पाळी आलेली असतानाही त्याने जवळच पडलेली एक काटकी हातात घेऊन शेवाळलेला पृष्ठभाग ढवळण्याचा प्रयत्न केला.
त्याची भेदरलेली नजर त्या नारंगी माशाला शोधत होती. त्याने काही वेळ हलवून पाहिले मात्र तो मासा काही त्याला दिसला नाही, पूर्वी त्याने पाण्यात सोडलेले सर्व मासे मात्र मृतावस्थेत दिसत होते. हातातली काटकी फेकुन देत, हतबल होऊन एका क्षणासाठी पापण्या मिटल्या.
डोळे उघडताच डोहातल्या गढूळलेल्या पाण्यात, त्याला त्या कोवळ्या मुलाचा रडवेला चेहरा निमिषार्धासाठी दिसला. एक मोठी किंकाळी फोडून तो तिथेच बेशुद्ध पडला. दोनेक दिवसांनी तो सिव्हिल हॉस्पिटलमध्येच शुद्धीवर आला. त्याची बाईक त्याच्या घरी पोहोच करण्यात आली होती.
डॉक्टरांनी सांगितलं की, त्या सुनसान डोहापाशी तो बारा तास पडून होता. सकाळी कुत्री ओरडायला लागल्यावर माणसं गोळा झाली आणि त्यांनी पोलिसांना कळवलं. त्यांनी त्याला इथं ऍडमिट केलं. आता तो धोक्याबाहेर होता. आणखी दोन दिवस त्याच्यावर उपचार करून त्याला डिसचार्ज देण्यात आला.
त्या दिवशी दुपारीच तो रिक्षाने घरी आला. घरात पाऊल टाकताच तो घाबरून गेला. संपूर्ण घरात त्याला जुनाट पाण्याचा वास येत होता. त्या रात्री त्याला लवकर झोप लागलीच नाही.
घाबरून जागे होत त्याने घरातल्या सर्व लाईटस लावल्या. पाणी प्यायला उठून माठापाशी गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की घरातलं पाणी जुनं आहे, चार दिवस घरी नसल्याने कुणी पाणीच भरलेलं नाही. तरीही त्याची नजर माठाकडे गेली आणि तो नखशिखांत हादरला.
माठ काठोकाठ गच्च भरलेला होता पण त्यात सारं शेवाळंच होतं. त्या शेवाळ्याला डोहातल्या पाण्याचा गंध होता. बराच वेळ तो गुडघ्यात डोकं खुपसून बसून होता. कधी एकदा सकाळ होते असं त्याला झालं होतं.
नवे घर विकत घेण्यासाठी अवघ्या काही दिवसांत त्याने ते घर विकले. आता तो नव्या घरी राहतो. मात्र तिथेही रोज रात्री त्याच्या भिंतीवर शेवाळे चढते. तो एकटा असला की त्याच्या अंगाला शेवाळ्याचा दर्प येतो..
– समीर गायकवाड


GIPHY App Key not set. Please check settings