डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी
फोटो:साभार गुगल
अल्लाह आपल्या दासांवर अत्यंत दयाळू, कृपाळू आणि मेहरबान आहे. मनुष्यप्राणी कुरआनच्या म्हणण्याप्रमाणे दृष्ट, अत्याचारी व अडाणी आहे. निसर्गातील प्रत्येक निर्मितीपेक्षा तो स्वतः कितीतरी पटीने दुर्बल आहे व अल्प वयोमर्यादा दाखवणारा आहे. पूर्वीच्या लोकांचे वय आजच्या मानाने जास्त असायचे. सर्वसाधारण माणसाचे वय शे-पाचशे वर्षे असायचे. परंतू आजचा मनुष्य साठ-सत्तरच्या पलीकडे फारसा जात नाही. कमी वयात कमी उपासना केल्याने कमी पुण्यप्राप्तीची खंत प्रत्येक माणसाला वाटणे साहजिकच आहे. परंतू अल्लाकडे दीर्घ आयुष्याला महत्त्व नसून तुमचा हेतू आणि सद्विचार याला महत्त्व आहे. म्हणून म्हणतात जैसी नियत वैसी बरकत.
रमजानच्या महिन्यात एक पवित्र रात्र अशी दिली आहे की, ज्यातील प्रार्थना आणि उपासना एक हजार महिन्यापेक्षा जास्त पुण्य मिळवून देणारी आहे. या पवित्र रात्रीचा उल्लेख पवित्र कुरआनच्या तिसाव्या खंडात सूरह (अध्याय) अल्कद्रमध्ये आहे.
ज्यात म्हटले जाते की, वमा अद्राका मा लैलतुल कद्र, लैलतुल कद्रि खैरूम्मिन अल्फिशहर या वचनाचा अर्थ असा तुम्हाला काय माहित की लैलतुल कद्र काय आहे. लैलतुल कद्र हजार महिन्यापेक्षा बेहतर रात्र आहे. म्हणजे ही रात्र आणि त्यात शांतपणे जागरण करून केल्या जाणाऱ्या सर्व प्रार्थना, नमाज, दुआ, जप (जिक्र) व कुरआन पठण आणि याच प्रकारच्या सर्व उपासनांचा मोबदला हजार पटीने जास्त दण्यात येतो. त्याचप्रकारे दुष्कर्माचा गुन्हादेखील हजार पटीने जास्त दिला जातो.
आपल्याला सुचविण्यात आले आहे की, या रात्रीला रमजान महिन्यातील अंतीम दहा दिवसाच्या विषम तारखांमध्ये शोधा. म्हणजे २१, २३, २५, २७, २९ या तारखांपैकी कुठल्याही एका तारखेला ही रात्र असू शकते. याचा अर्थ असा की या विषम तारखांमध्ये आपण जागरण करावे व अल्लाहचेइनाम प्राप्त करावे. या तारखांमध्ये कुठली उपासना करावी या संदर्भात असे सुचविण्यात येते की, ज्या उपासनेत आपले मन लागेल ती उपासना करावी. आपल्या आयुष्यात अनेक वेळची नमाज चुकली असेल. कजा ए उम्र म्हणून ती प्रथम भरून काढावी. अल्लाहकडे देण्यास खूप आहे. आपल्याला मागता येत नाही. अल्लाहकडे खूप मागा. कारण तिथे कोणीच मदतनीस मिळणार नाही. शबे कद्रसाठी हार्दिक शुभेच्छा.
GIPHY App Key not set. Please check settings