शारिरीक स्वच्छता व पावित्र्य
इस्लामी धर्मशास्त्राप्रमाणे जेव्हा गुस्ल म्हणजे स्नान आणि वुजू म्हणजे धर्मशास्त्राप्रमाणे तोंड, हात, पाय धुण्याची गरज असते. तेव्हा माणसाने टाळाटाळ करू नये व हे काम लवकर आटोपून टाकावे. तसे न केल्याने बाधा होण्याची भीती जास्त असते. शूचिर्भूत झाल्याने माणसात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो आणि पुढे शूचिर्भूत होईपर्यंत त्यास ईश्वरी संरक्षणाचे विशेष कवच लाभते.
खगोल शास्त्रज्ञांच्या मते माणसांसाठी राहण्याचे सर्वात असुरक्षित स्थान म्हणजे आपले पृथ्वीतल कारण आकाशातील हवामानापेक्षा जमिनीवरचे वातावरण कितीतरी पटीने हाणीकारक व बाधक असते. संसर्ग फक्त बॅक्टेरिया आणि अन्य जंतू पासूनच होत नसून काही कारणे अशी असतात. ज्यांच्यामुळे माणूस मानसिकरित्या आजारी पडतो. शारीरिक विकासापेक्षा मानसिक आणि आत्मिक विकार खूप त्रासदायक असतात. हे रोग लवकर बरे होत नसल्याने माणसे हतबल होतात आणि शेवटचा उपाय म्हणून तांत्रिक मांत्रिकांच्या कारस्थानांना बळी पडतात. खरे पाहता मानवी शरीरात संसर्गजन्य परिस्थिती केव्हा निर्माण होते. उत्तर अत्यंत सोपे आहे. शरीराची देखरेख अथवा स्वच्छतेकडे लक्ष दिले नाही तर आजारी पडण्याची भीती अधिक असते. स्वच्छता ही चिकीत्साविषयक संज्ञा झाली परंतु ‘ धर्मशास्त्रात केवळ स्वच्छता अभिप्रेत नसून तिथे एक दर्जा अधिक म्हणजे पवित्रता किंवा पावित्र्य ही आहे. परिधान केलेले कपडे कितीही स्वच्छ दिसत असले तरी त्यावर मद्य, पू, रक्त, शौच, वीर्य अथवा लघवीचे थेंब असतील तर असे कपडे स्वच्छ असूनसुध्दा मलिन आहेत. इस्लामी शरीअतप्रमाणे असे कपडे परिधान करून कुठलीही इबादत म्हणजे प्रार्थना आपण करू शकत नाही आणि केलीच तर अल्लाहच्या दरबारात त्यांना स्वीकृती लाभत नाही.
ईस्लाम धर्मात शारीरिक पावित्रतेला खूप महत्व आहे. शरीर शुध्द असले तर मन शुध्द रहाते. मन शुध्द राहिले तर आत्मा शुध्द रहातो. शरीर शुध्द नसल्याने काही विकार होणे अगदी नैसर्गिक आहे. त्या शारीरिक विकारांचा दुष्पपरिणाम मनावर होतो. मनाचे आरोग्य बिघडते तर आत्मा विचलित होतो. आत्मा बैचेन झाला की, माणसाला झपाटल्यासारखे वाटते आणि तो नको त्या उपायांच्या शोधात हिंडतो-फिरतो. म्हणून सफाई आणि पावित्र्य या. दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सफाई केवळ शरीराला शुध्द करू शकते, परंतु पवित्रता मात्र आरोग्याचा एक अत्यावश्यक असा गुण आहे. ज्याला पर्याय नाही. पावित्र्य एक अदृश्य शक्ती आहे. त्यामुळे माणसाला ईश्वराचे सामीप्य प्राप्त होते. अपवित्र माणूस ईश्वरी देणग्यांच्या निकट जावू शकत नाही. पवित्रता माणसाच्या शारीरिक, मानसिक, आत्मिक शक्तीच्या संरक्षणासाठी सदैव तयार असते.
इस्लामी धर्मकायद्यात शारीरिक निर्मलता आणि पावित्र्यास खूप महत्व आहे. हे पावित्र्य मूल जन्मल्यापासून अगदी मृत्यूपर्यंत जोपासण्यात येते. माणूस मरण पावला तरी त्याच्या अंत्यविधीत प्रेताला स्नान घालण्याचे खूप महत्व आहे. प्रेताला स्नान घालण्याचे काम त्याच्या निकटच्या नातेवाईकांनी पार पाडावे. प्रेताला स्नान यासाठी की ती व्यक्ती आता संसारातील आपली सर्व कामे आटोपून मृत्यूमार्गे अल्लाह दरबारी दाखल होत आहे आणि अल्लाहचे स्थान अत्यंत पवित्र असे आहे. तेथे इहलोकातील अनिर्मल व अपवित्र शरीर घेवून जाणे म्हणजे अल्लाहच्या प्रकोपाला चिथावणी देण्यासारखे ठरेल.
एवढेच नव्हे तर आता त्याचे संबंध अत्यंत पवित्र अशा ईश्वर निर्मित सृष्टी आणि फरिश्ते म्हणजे ईशदूत यांच्याबरोबर येणार असून ते संसार मानवाच्या संकल्पनेपासून अत्यंत भिन्न असे आहे. म्हणून मृत शरीराला सुध्दा सजीव प्राण्याप्रमाणेच स्नान घालण्याचे आदेश आहेत.
गुस्ल करतेवेळी आधी शूचीर्भूत होण्याचा इरादा करावा नंतर ‘बिस्मिल्लाह’ उद्गारून सर्वप्रथम मनगटापर्यंत हात धुवावेत. शरीरावर जिथे घाण लागली असेल प्रथम ती धुवावी. नंतर गुळणी करून, नाकात पाणी टाकून नाक स्वच्छ करावे. नंतर सर्व शरीरावर पाणी टाकून चांगले चोळून चोळून मळ काढावा. नंतर तीनदा उजव्या खांद्यावरून, तीनदा डाव्या खांद्यावरून व तीनदा डोक्यावरून पाणी टाकावे. संपूर्ण शरीरावर एका केसाइतकीही जागा कोरडी राहिली असेल तर गुस्ल परिपूर्ण होणार नाही आणि उपासकाला पवित्र न झाल्याने त्याला व्यवस्थित स्नान केल्याशिवाय कुठलीही प्रार्थना करता येणार नाही. गुस्लकरिता किमान एक किलो ऐंशी ग्रॅम इतके पाणी आवश्यक आहे.
मलमूत्रापासून सावध न रहाणे अत्यंत छोटा गुन्हा असला तरी त्याच्या यातना गुन्हेगाराला भोगाव्या लागतील. यावरून आपणास जाणीव होईल की ईस्लामी धर्मात शारीरिक स्वच्छता व पावित्र्य याला किती महत्व आहे. तेव्हा बंधूभगिनींनो या महिन्यात पावित्र्य राखून उपासना करा.


GIPHY App Key not set. Please check settings