विख्यात गायिका शमशाद बेगम यांनी गणपत लाल बट्टो यांच्याशी प्रेमविवाह केला होता. शमशाद बेगम चौदा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या ठीक दुसऱ्या दिवशी अमृतसरमध्ये जन्मलेल्या मात्र त्यांचं बालपण लाहोरमध्ये गेलं. त्यांचं कुटुंब तिथं स्थायिक झालेलं! पंजाबी मुस्लिम कुटुंबात जन्मलेली शमशाद अगदी गोड गळ्याची मुलगी होती. दहा अकरा वर्षांची असताना ती लग्न समारंभात गाऊ लागली तेव्हा त्यांच्या बिरादरीत गहजब उडाला. तेरा वर्षांची असताना उस्ताद गुलाम हैदर यांच्यासोबत तिचं गाणं रेकॉर्ड झालं, मग मात्र तिचे वडील हुसेन बक्ष तिच्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी तिला पाठिंबा दिला. शमशादचे धाडस वाढले ती स्टेजवर गाऊ लागली. या दरम्यान तिची ओळख गणपत लाल बट्टोशी झाली. तेव्हा शमशादचे वय फक्त चौदा वर्षांचे होते तर गणपत वयाने बराच मोठा होता, मात्र त्याचे घर तिच्या शेजारीच होते. ओळख जुनी होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं. दोघांनी लग्न करायचे ठरवले. 1935 साली त्यांचे लग्न झाले. शमशाद तेव्हा फक्त पंधरा वर्षांची होती! दोघांचे धर्म भिन्न होते आणि दोन्ही कुटुंबातून प्रचंड विरोध होऊनही हा विवाह संपन्न झाला. या दरम्यानच्या काळात फाळणीचे वारे वाहू लागले नि शमशादचा जीव पाखरासारखा झाला. कारण ती पतीसोबत अमृतसरला राहत होती आणि तिच्या आईवडिलांनी जन्मभूमी सोडण्यास नकार दिला. खेरीज त्यांना शमशाद शिवाय अन्य अपत्येही होती जी लाहोरमध्ये स्थिरावली होती. त्यांनी काळजावर दगड ठेवून शमशादला कायमचं अलविदा म्हटलं! शमशाद बेगम उन्मळून पडल्या. मात्र पती गणपत लाल जे एक चांगले वकील होते नि हौशी फोटोग्राफरही होते, त्यांनी तिचे मन रमावे आणि करियरही घडावे म्हणून ते दोघे मुंबईला आले!
त्यांचा संसार सुखाचा झाला. त्यांना एक देखणी मुलगी झाली. शमशाद बेगम त्यांनी तिचं नाव उषा ठेवलं. उषा मोठी झाल्यावर तिचे लग्न भारतीय सेनादलातील लेफ्टनंट कर्नल योगेश बात्रा यांच्याशी झाला. या वेळी शमशाद बेगम यांचं वय होतं फक्त पस्तीस वर्षांचं! एकुलत्या एक मुलीच्या लग्नानंतर दोघे काहीसे सुखी झाले नि काहीसे उदासही झाले. नियतीला त्यांचे सुख बघवले नाही कारण यानंतर दोनच वर्षांनी एकोणीसशे पंचावन्न मध्ये एका सडक अपघातात गणपत लाल बट्टो यांचं अकस्मात निधन झालं. शमशाद बेगम यांच्यासाठी हा फार मोठा आघात होता. यातून बाहेर जवळपास अशक्य होतं. सारं चराचर त्यांना वैरी वाटू लागलं, कशातच मन लागेनासं झालं. त्या इतक्या शोक व्याकुळ झाल्या की गायकी बंद करावी की काय असं त्यांना वाटू लागलं! त्यांचं माहेर पाकिस्तानात आणि त्या इथं विधवा अवस्थेत एकाकी! मुलीचं लग्न झालेलं आणि ती तिच्या सासरी हिमाचलमध्ये!
काळ त्यांना खायला उठला! राहून राहून घर आठवू लागलं. गणपत लाल सोबत घालवलेले सोनेरी क्षण आठवू लागले. दुःखी माणसाला आठवणी कधी कधी जगवतात तर कधी कधी त्यांचं स्लो पॉयझनिंग होतं! शमशाद बेगम यांचं असंच काहीसं झालं. त्या गणपतलालच्या आठवणीत जगत तर होत्या मात्र त्याच आठवणी त्यांना जिवंतपणी खात होत्या. पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी त्यांची अवस्था झाली. त्यांची ही दारुण स्थिती त्यांच्या लेकीला पाहवली नाही. तिनेच त्यांना धीर दिला. वास्तवात त्या काळच्या इंडस्ट्रीची गणिते पाहू जाता हा काळ शमशाद बेगम यांच्या प्रसिद्धीच्या शिखराचा होता. त्यांची गाणी एका पाठोपाठ एक हिट होत होती! मात्र पतीच्या निधनानंतर त्यांना असं उमेद हरल्याचं पाहून त्यांचे आवडते संगीतकार ओ. पी. नय्यर यांना वाईट वाटलं. ओपी नय्यर आणि विख्यात दिग्दर्शक अभिनेते गुरुदत्त त्यांना भेटायला गेले. त्यांनी शमशाद बेगम यांचे सांत्वन केले. त्यांच्या मनाची समजूत घालताना त्यांच्या पतीची महत्वाकांक्षा काय होती, त्यांनी मुंबईला का आणलं होतं याचे स्मरण करून दिले. करियरमध्ये पुढे जाणं, आपला गायकीचा प्रवास सुरू ठेवणं हीच त्यांना सर्वोत्तम श्रद्धांजली ठरेल असं या दोघांनी पटवून दिलं. अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या नव्या सिनेमाच्या गाण्यासाठी शमशादना मनवले.
तो सिनेमा होता, ‘सीआयडी’! देव आनंद, वहिदा रेहमान आणि शकिला यांच्या प्रमुख भूमिका त्यात होत्या. मजरूह सुलतानपुरी आणि जानिसार अख़्तर यांनी लिहिलेली गाणी होती. एकूण सहा गाणी होती. शमशाद बेगम यांना दोन सोलो गाणी गायची होती आणि एक गाणं रफी, आशा भोसले यांच्या सोबत गायचं होतं. ‘कही पे निगाहे कही पे निशाना..’ आणि ‘बुझ मेरा क्या नाम रे..’ ही सोलो गाणी होती तर ‘ले के पहला पहला प्यार..’ हे कॉम्बो गाणं होतं! यात त्यांच्या जोडीला लता मंगेशकर गाणार होत्या. त्या काळी असं म्हटलं जायचं की संगीतकार लता दिदीना त्यांच्या ओरिजिनल व्हॉईसमध्ये गाऊ देत नसत त्यांचा आग्रह असे की लता दिदीनी शमशाद सारखं गावं! असो. तर ‘सीआयडी’साठी सारं काही ठरवून देखील काही केल्या शमशाद बेगम स्टुडिओला यायला राजी नव्हत्या. गुरुदत्त पुन्हा त्यांना भेटायला गेले. त्यांनी सांगितलं की काहीही झालं तरी तुम्हाला गावंच लागेल, हे गाणं तुमच्या पहिल्या प्रेमाची निशाणी समजा. ज्या प्रेमासाठी तुम्ही सारं घरदार सोडलं, माहेर तोडलं, देश सोडला त्या प्रेमाला हे गाणं अर्पण केलेलं आहे! या गीतातच तुमच्या प्रेमाचा जादूगार जादूनगरीमधून आला आहे, त्याला तुम्ही भेटू शकता आणि आपलं मन मोकळं करू शकता. गुरुदत्त भेटून गेले आणि शमशाद बेगम दुसऱ्याच दिवशी ताडदेवला रेकॉर्डिंग स्टुडिओत आल्या.
त्या रात्री स्टुडिओत गाण्यासाठी गेल्या, पण गाण्याच्या ओळी आठवत नव्हत्या आणि अश्रू थांबत नव्हते. तरीही, त्यांनी स्वतःला सावरलं आणि त्या रात्रीचं गाणं रेकॉर्ड केलं, ‘ले के पहला पहला प्यार..’ गाताना त्यांच्या आसवलेल्या डोळ्यांत प्राणप्रिय पतीच्या प्रेमाच्या विरहाच्या आठवणी होत्या! रेकॉर्डिंग संपल्यानंतर त्या घरी जाऊन हमसून हमसून रडल्या. राहिलेली दोन गाणीही त्यांनी पूर्ण केली. गाणी रेकॉर्ड झाली, शुटींगही वेळेत पूर्ण झालं, तांत्रिक सोपस्कार नेटकेपणाने केले गेले. कारण तो गुरु दत्तचा सिनेमा होता. अखेर 1956 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला, तिकीटबारीवर त्याने पैशांची टांकसाळ खोलली! सिनेमा सुपरहिट झाला! यातल्या गाण्यांनी त्या काळातल्या लोकांना अक्षरशः वेड लावलं! जॉनी वॉकरवर चित्रित झालेलं ‘ये है बॉम्बे मेरी जान..’ हे देखील याच सिनेमामधलं होतं! ‘जाता कहा है दिवाने..’ आणि ‘आँखो ही आँखो में इशारा हो गया..’ हे देखील यातलेच! या गाण्यांनी शमशाद बेगमना अफाट प्रसिद्धी मिळवून दिली, तरीही त्या दोन वर्षे इंडस्ट्रीपासून दूर राहिल्या. त्यांचे मनच लागत नव्हते. त्या काही केल्या गाण्यांसाठी राजी होत नव्हत्या. अखेर विख्यात निर्माते दिग्दर्शक कमाल अमरोही यांनीच आईसब्रेक केला आणि त्यांना मदर इंडियाच्या प्लेबॅकसाठी राजी केलं. बेगम पुन्हा सक्रिय झाल्या मात्र त्यांचं मन त्यांच्या प्रेमापाशीच रुंजी घालत होतं! ‘ले के पहला पहला प्यार..’ गात होतं!
या गीतातल्या खाली दिलेल्या पंक्ती वाचल्या तर असे वाटते की, शमशाद बेगम यांचं दुःख हलकं व्हावं म्हणून तर नियतीने हे गाणं मजरुह सुलतानपुरी यांना लिहायला प्रेरित केलं असेल का? हे गाणं खास त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठीच जन्मास आलं असेल का? काहीही असो या गाण्याने त्या इंडस्ट्रीत परत आल्या आणि खचून न जाता आपल्या प्रेमाला गीत संगीतात शोधत राहिल्या.. तो काळ मंतरलेला होता जेव्हा माणसं द्वेषाने भारलेली नव्हती आणि माणुसकीचे झरे तेव्हा पुरेपूर वाहत होते! त्या काळात माणूस आपल्या भाळी मानवतेच्या खुणा मिरवत होता!
तुमने तो देखा होगा उसको सितारों
आओ ज़रा मेरे संग मिलके पुकारो
दोनो होके बेक़रार ढूँढे तुझको मेरा प्यार
जादू नगरी से आया है कोई जादूगर
लेके पहला पहला प्यार …
जब से लगाया तेरे प्यार का काजल
काली काली बिरहा की रतियां हैं
बेकल आजा मन के श्रृंगार करे बिन्दिया पुकार
जादू नगरी से आया है कोई जादूगर
लेके पहला पहला प्यार …
तो काळ परत येणार नाही मात्र आपण त्या काळातल्या माणसांसारखं वागू शकतो, द्वेषाला प्रेमानेच जिंकू शकतो! ‘ले के पहला पहला प्यार..’ गात आयुष्य सुखाने जगू शकतो!
– समीर गायकवाड
GIPHY App Key not set. Please check settings