लघुकथा संग्रह क्र.१३
दिसतं एक असतं दुसरंच .
फोटो साभार: गुगल
(१) आनंदी आव
प्रतिभाताई शिक्षिका नुकत्याच रिटायर झालेल्या. हुशार, चुणचुणीत व सदैव हसतमुख. आवाज सुंदर, वक्तव्य छान. व्यक्तिमत्त्व एकदम रूबाबदार. सर्वांना हेवा वाटावा असे तिचे चालणे बोलणे. दोन मैत्रिणीमध्ये एकदा तिचा विषय निघाला. त्या दोघींपैकी एक तिच्या शेजारी राहणारी, तिला पूर्णपणे ओळखणारी. दुसरीने तिच्या या आनंदाचे रहस्य विचारले असता पहिली म्हणाली,” तिचा एकुलता एक मुलगा डिप्रेशन मध्ये गेलाय. त्याची बायको त्याला सोडून गेली आहे. तिची एकुलती एक कन्या इंजिनिअर आहे. लठ्ठ पगाराची नोकरी आहे तिला पण ती नवऱ्यापासून विभक्त झाली आहे. हे दुःख लपविण्यासाठी प्रतिभाताई आनंदी असल्याचा आव आणते झालं”.
(२ ) पडद्यामागची सेवा
सुनील व अनिल दोन भाऊ. धाकटा अनिल अल्पशा आजाराने मरण पावला. आईवडील आनिलकडेच रहायचे. जेमतेम उत्पन्न असलेल्या पुतण्यावर भार नको म्हणून सुनीलने त्यांच्याकडे रहायला येण्याचा आग्रह केला पण ते मूळ घर सोडायला तयार झाले नाहीत. उतारवयातील आईच्या तब्बेतीच्या तक्रारी सुरू झाल्या. धाकटी सून सेवा करते म्हणून येणारे जाणारे नातेवाईक तिचं तोंड भरून कौतुक करीत अर्थात मोठ्या सुनीलला नावे ठेवत. पण त्यांना हे माहित नव्हते की अनिल मयत झाल्यापासून सुनील सकाळ संध्याकाळ आईवडिलांना जेवणाचा डबा आणून देतो. शिवाय आईच्या सेवेसाठी त्याने दरमहा आठ हजार देऊन नर्स ठेवली आहे. असतं एक आणि दिसतं एक हेचं खरं.
(३) उत्कृष्ट सेवेचं रहस्य
आनंदीबाईंना तीन मुलं. तिघेही वेगळे राहतात. आनंदीबाई मात्र धाकट्या मुलांकडेच रहायच्या. दोन्ही मुलंसुना त्यांच्याकडे रहायला बोलवायच्या पण आई त्यांच्याकडे निमित्तमात्र जायच्या. धाकटी सून त्यांची फार लाडकी. ती सासूबाईना वेळेवर जेवण द्यायची. त्यांच्याशी प्रेमळपणे वागायची. औषधपाण्याला हयगय करायची नाही. मग काय सर्वजण धाकट्या सुनेला शाबासकीची थाप देत असत. एक दिवस मोठ्या सुनेनं धाकटीचं कौतुक ऐकलं व म्हणाली,”तिचं काय बिघडतय सेवा करायला महिन्याला वीस हजार सासूबाईना मिळणारी मामंजीची पेन्शन घेते शिवाय गोड बोलून भाजी निवडणे. धान्य निवडणे इत्यादी सर्व घरकामे त्यांच्याकडून करून घेते”. आहे की नाही गम्मत दिसतं तसं नसतं!
(४) फुकट्या मदनभाऊ
मदनभाऊ एकदम स्टायलीश माणूस. टिपटाँप, आधुनिक फॅशनेबल कपडे वापरायचे. इस्त्री ताठ असायची. अभिनेत्यासारखी हेअर स्टाईल असियची. अशा रूबाबात राहणाऱ्या मदनभाऊना पर्यटनाची फार आवड होती. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ग्रुपमधून पर्यटन करायचे. प्रत्येकाला वाटायचं एवढा रूबाबदार माणूस आपल्या ग्रुपमध्ये आला तर बरे होईल कारण रुबाबात राहणारा मदनभाऊ जाणकार असेलच अशी सर्वांची मनोभावना होती. एके दिवशी त्यांचे दोन मित्र चर्चा करत होते. प्रत्यक्ष अनुभव सांगू लागले मदनभाऊचे हे दिखाऊ रूप आहे. त्याचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. आमच्याबरोबर महिनाभर ट्रीपला होता. आम्ही राईसप्लेट मागवू या म्हटलं की हा म्हणायचा,” अरे राईसप्लेट काय खाता मित्रांनो, पंजाबी मागवा. भरपूर ऑर्डर द्यायचा, भरपेट जेवायचा व सर्वांच्या आधी बाहेर पडायचा वेगवेगळ्या क्लुप्त्या करून.”दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं.
(५ ) नाटकी सून
शब्बीरभाईना पॅरालिसीस झाला. अचानक ओढवलेल्या या आजारपणामुळे पाहुण्यांची आणि स्नेह्यांची रीघ लागली होती. शब्बीरभाईना दोन सुना. मोठी सून उच्चशिक्षित व शांत स्वभावाची आहे. ती अभ्यासात हुशार होतीच शिवाय स्वयंपाकात व घरकामात तरबेज आहे. तिला लवकर उठायची सवय आहे याउलट धाकटी सून जेमतेम दहावी शिकलेली आहे. ति उशीरा उठायची. कामात चुकारपणा करायची पण मुलखाची नाटकी. मोठी सून लवकर उठून स्वयंपाकाला लागायची, धाकटी तिने केलेली गरम गरम चपाती घेऊन सासऱ्याना आग्रहाने वाढायची. पाहुण्यांना पोहे तयार करायची मोठी सून, ट्रे घेऊन बाहेर यायची धाकटी. सर्वांशी छान गप्पा मारायची गोड गोड बोलायची. पाहुण्यांसमोर तेलाची वाटी घेऊन सासऱ्यांचे पाय दाबायची. एक पाहुणी म्हणाली, “तुमची धाकटी सून गुणाची आहे हो” सासूबाई म्हणाल्या,” माझी मोठी सून कामाची व गुणाची धाकटीला सवय नाटकं करण्याची .”
GIPHY App Key not set. Please check settings