लघुकथा संग्रह १२ ( विधायक अलक )
जावई आमचे भले !
जावयांबद्दल एक गोड गैरसमज आहे. जावयांबद्दल बोलताना लोक म्हणतात तो सासुरवाडीत ताठपणाने वागतो, वेगवेगळ्या मागण्या करतो, हट्ट करतो, मानपान हवा असतो. हे सर्व बोलताना आपणही कुणाचेतरी जावई आहोत हे सोईस्करणे विसरतात. बदललेल्या जमान्यात जावयीबुवासुद्धा बदललेत. प्रसंगी ते सासुरवाडीच्या नातेवाईकांवर कसे प्रेम करतात ते वाचा या लघुकथांमधून………।
(१ ) सलून बंद
विमलताई व केशवराव स्काटलँड या देशात मुलगी व जावयी यांच्या आग्रहास्तव एका महिन्याकरीता गेले. लेकजावयी दोघे इंजिनिअर, त्याठिकाणी जॉब करतात. त्यांनी या दोघांचे यथोचित स्वागत केले. त्यांना प्रेक्षणीय स्थळे दाखविली. तेथील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांचा आस्वाद दिला. तृप्त मनाने आईवडील परतणार होते एवढ्यात कोरोनाने सर्व जगभर थैमान मांडले व त्यांना दोन महिने तेथेच राहणे भाग पडले. सलून बंद असल्याने केशवरावांचे केस कापण्याची पंचायत झाली. सट्टीच्या दिवशी जावयी म्हणाले, “बाबा बसा या खुर्चीवर मी तुमचे केस व्यवस्थित कापून देतो”. जावयांनी टकाटक केस कापल्यावर सासरेबुवा खूश होऊन म्हणाले, “जावयी आमचे भले.”
(२ ) मोठेपणा जावयाचा
रामरावांना चार मुली. चारही मुलींचे त्यांनी थाटामाटात विवाह करून दिले. चौघीही आपापल्या संसारात रमल्या होत्या. रामरावांना मुलगा नव्हता. दुर्दैवाने रामरावांचे ह्रदयविकाराने आकस्मित निधन झाले. आत्ता प्रश्न आला वाटणीचा. मुलींनी समंजसपणे बँक बॅलन्सच्या पाच वाटण्या केल्या. त्यांचे घर होते आठ खोल्यांचे. चौघीनी दोन दोन खोल्या वाटून घेतल्या. प्रत्येकीने खोल्या भाड्याने देऊन महिन्याला भाडे मिळविण्याचा प्लॅन केला व आई चौघींकडे तीन तीन महिने राहील असे चौघीनी ठरविले पण आई मी कुणाच्याही घरी जाणार नाही असे म्हणाली. आता आई मग राहणार कोठे? चौघी एकमेकीकडे पाहू लागल्या. मनाचा मोठेपणा एकीनेही दाखविला नाही शेवटी छोटे जावयी म्हणाले, “आमच्या वाटणीला आलेल्या खोल्यांमध्ये आई तहयात राहतील”.सासूबाई मनात म्हणाल्या ‘जावयी माझे भले ‘
(३ ) बेस्ट सेवा जावयाची
सलीमभाईना पॅरालिसीसचा अटॅक आला. औषधोपचार झाले पण त्यांच्या उजव्या बाजूची हालचाल होत नव्हती. डॉक्टरांनी फिजिओथेरपी सुरु करण्यास सांगितले. दर दिवशी सकाळ संध्याकाळ एका फिजिओथेरपिस्ट घरी येऊन मालिश करू लागला. त्याची फी दर दिवशी सातशे रूपये होती. सुदैवाने त्यांचे जावयी त्याच गावात रहात होते. ते ऑफिसला जाता येता सासऱ्याना भेटायला यायचे. जावयांनी मालिश चालू असताना सूक्ष्म निरिक्षण केले. महिना झाल्यावर ते सासऱ्याना म्हणाले,” उद्यापासून मालिशवाला बंद. मी करत जाईन मालिश सकाळ संध्याकाळ’. जावयांनी ही सेवा पुढे सहा महिने सुरु ठेवली. सलीमभाई काठी घेऊन चालू लागले. सर्वांना सांगू लागले. ‘जावयी माझा भला’.
(४ ) माझी आई तुझी आई
श्रीधर सुजाताला सकाळी सकाळी म्हणाले, “आईची तबेत्त बिघडलीय मी निघतो आणि तिला आपल्याकडे घेऊनच येतो”. श्रीधरचे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच सुजाताच्या तोंडाचा पट्टा चालू झाला’. मुलांच्या परीक्षा जवळ आल्यात, त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं. आणायला तुमचं काय बिघडतय, सेवा मलाच करावी लागते. प्रत्येक वेळा तुम्ही च का बघता तुमचे मोठे भाऊ नाहीत का बघायला?’ तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून श्रीधर गाडी काढून निघून जातात. सायंकाळी पाच वाजता श्रीधर गाडीतून उतरले व मागे झोपलेल्या सासूबाईंना धरून येऊ लागले.सुजाताची बोलतीच बंद झाली. सासूबाई म्हणाल्या, ‘जावयी माझे भले’.
(५ ) एक्स्प्रेस सेवा
जानकी शिक्षिका पदावर जयसिंगपूर येथे कार्यरत होत्या. एका ट्रेनिंगसाठी त्या कोल्हापूरला गेल्या होत्या. त्यांच्या लाडक्या मोठ्या भावाची तबेत्त अचानक बिघडल्याने त्यांना मिरज येथील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. अत्यवस्थ असल्याने वारंवार लवकर येण्यासाठी फोन येत होते. सुदैवाने त्यांचे लेकजावयी कोल्हापूरात रहात होते. सैरभैर अवस्थेत त्यांनी लेकीला फोन केला की मला बस स्टॅंडवर पोहचवायला जावयी येतील का?
पाच मिनिटांत जावयी दुचाकीसह हजर झाले. गाडी स्टँडवर न नेता मिरजेच्या दिशेने वेगात निघाली. थंडीचे दिवस, सायंकाळची वेळ हवेत गारठा होता. जावयांनी गाडी थांबवून आपले जर्किन सासूबाईंना घालायला दिले व पाऊण तासात हॉस्पिटलमध्ये पोहोचविले व अत्यवस्थ भावाची भेट घडवली. भाऊ बरे झाले. बहीण आनंदाने म्हणाली ‘जावयी माझे भले’
म्हणून सांगते वाचक बंधूभगिनीनो मुलीचा जन्म टाळू नका.जावयीबुवासुद्धा मुलाची भूमिका बजाऊ शकतात.होय ना?……
GIPHY App Key not set. Please check settings