in

रमजान ईद

                       डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी

                          फोटो:साभार गुगल

         इस्लाम, कुरआन व उपवास (रोजा) यांच्या गौरवाचे आणि अल्लाहप्रति भक्ती व कृतज्ञतेचे रमजान ईद हे प्रतिक आहे. अल्लाहनी मुस्लिम बांधवांसाठी व त्यांच्या संबंधीतासाठी रमजान महिना हा देणगी स्वरूपात दिला आहे. या महिन्यामध्ये पवित्र कुरआन अवतरित झाले. हजरत मुहमंद पैगंबर सल्लल्लाहू अल्लैहिवस्सलम यांच्या शिकवणुकीनुसार रोजा म्हणजे फक्त अन्न-पाणी वर्ज्य करणे नव्हे तर आपल्या शरीरातील अवयवापासून दुसऱ्या व्यक्ती किंवा प्राणिमात्रास इजा होवू नये असे आचरण जी व्यक्ती करेल तिचा रोजा अल्लाहजवळ कबुल झाला असे मानावे. रमजान महिन्यामध्ये पवित्र कुरआमनचे वाचन, चिंतन व मनन केले जाते. पाच वेळच्या नमाजबरोबर रात्रीची तरावीह ही विशेष केली जाते. रमजान महिना आयुष्य घडविण्यासाठी प्रशिक्षण काळच होय.


         बंधुभाव, सामाजिक न्याय व समरसता रूजविणारा सण ईद-उल्-फितर म्हणजेच रमजान ईद होय. ईद म्हणजे आनंद व फितर म्हणजे दान. विशेष करून अन्नदान. सन ६२४ मध्ये जंग-ए-बदरची लढई जिंकल्यानंतर मुहमंद पैगंबर (स.अ.) यांनी आपल्या अनुयायांसह पहिली ईद साजरी केल्याचा संदर्भ आहे. रमजान ईदच्या दिवशी प्रार्थनाप्रसंगी पेशइमाम म्हणजे मुख्य धर्मगुरू खुत्बा देतात. म्हणजे कौटूंबिक, सामाजिक व आध्यात्मिक कर्तव्याचा उपदेश करतात. हजरत मुहंमद पैगंबर (स.अ.) यांची शिकवणही केवळ विशिष्ट जाती जमातीपुरती नसून अखिल विश्वातील मानव जातीच्या कल्याणासाठी आहे. एक संस्कृती, एक मातृभूमी मानून सामाजिक न्याय, समता, उदारता व समरसता या मानवी मुल्यांचे पालन व संवर्धन सर्वांनीच करावे ही बाब पैगंबरसाहेब यांना अपेक्षित होते. याला उजाळा देण्यासाठी हा सण साजरा केला जातो. रमजान महिन्यात गरीब, अनाथ बांधवांना जकात दिली जाते. म्हणजे या सणाचा आनंद लुटण्यासाठी मदत केली जाते. ईदच्या दिवशी वैरभाव विसरून मित्राप्रमाणे सर्वांची गळाभेट घेवून शुभेच्छा दिल्याने बंधुत्वाची भावना वाढीस लागते. महिनाभर उपवास केल्याने मनातील राग, द्वेष, मत्सर, इर्षा, संघर्ष या दुर्गुणांचा नायनाट होण्यासाठी मदत होते. मन हलके-फुलके होवून माणुसकीचा गहिवर मजबूत होतो. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजापासून कोणीच वंचित राहू नये, एकमेकांच्या मदतीला धावून गेले पाहिजे हा संदेश अधोरेखित करणारा हा सण आहे. जगातील सर्व मुस्लिम बांधवाना व समाजिक न्याय, समता, उदारता, बंधुत्व व स्वातंत्र्य या मुल्यांचा गौरव करण्यासाठी कृतीशील असलेल्या सर्व बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा.

Read More 

What do you think?

Written by jyubedatamboli

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

मी टक्कल केले

अमेरिकेतील भारतीय रिक्त का संपृक्त ?