in

मोहॉकची रणदुंदुभी

नमस्कार!

आज अजून एक पुस्तक आपल्यासमोर सादर करत आहे. या बद्दल मी पूर्वी लिहिले होते. हे माझे २५ वे पुस्तक. . अजून २/३ पुस्तकांचे मनात आहे.. बघू या कसे काय जमते आहे ते. पुस्तकाचे नाव आपल्याला माहीतच आहे – मोहॉकची रणदुंदुभी. या पुस्तकात मी जे मनोगत लिहिले आहे ते खाली देत आहे, ज्यावरून आपल्याला हे पुस्तक कशाबद्दल आहे याची कल्पना येऊ शकेल.

मोहॉकची रणदुंदुभी –

मनोगत

शाळेत असताना आम्ही पूर्वी वाड्यात राहायचो. माझा एक मित्र (अतुल, जो आता या जगात नाही) त्याला आणि मला त्याच्या मोठ्या भावाने एक चांगले जाडजूड पुस्तक वाचण्यास दिले ‌‘‌‘मोहॉकची रणदुंदुभी‌’‌’ हे मी वाचलेले पहिले मराठी पुस्तक. आम्ही पुस्तक वाचल्यावर तो काय म्हणाला हे माझ्या चांगले लक्षात आहे ‌‘‌‘ॲडमचा पाठलाग इंडियन करतात तो भाग कसा वाटला रे तुम्हाला? तो अर्थातच आम्हाला रोमहर्षक वाटला होता. मी नंतर हे पुस्तक मिळवण्याचा बराच प्रयत्न केला, पण ते काही मिळाले नाही.. मी जेव्हा लिहायला लागलो, (आता १२ वर्षे झाली) तेव्हाच ठरवले की या पुस्तकाचा अनुवाद केला पाहिजे. शेवटी आत्ता याचा योग आला.. गेली दोन वर्षे मी हे पुस्तक लिहितोय, अवांतर माहिती गोळा करतोय. याचा एक फायदा मात्र झाला तो म्हणजे अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाचा बराच अभ्यास झाला. त्यावरही एक स्वतंत्र पुस्तक लिहायचे मनात आहे..

मोहॉकची रणदुंदुभी ही एक अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या काळातील मोहॉकच्या खोऱ्यात घडणारी ऐतिहासिक कादंबरी आहे. कथा, तरुण दांपत्य गिल आणि लाना मार्टिन यांच्या जीवनाभोवती फिरते. नव्या वसाहतीत घर वसवताना त्यांना युद्ध, हल्ले, भीती, उपासमार आणि वैयक्तिक दुःख यांचा सामना करावा लागतो.

या कादंबरीचा काळ आहे १७७६ च्या आसपास. म्हणजे पेशवे आणि इंग्रजांच्या (इस्ट इंडिया कंपनी) पुरंदरच्या तहाच्या काळात. भारतीय आणि तेथील स्वातंत्र्यप्रेमी जनतेची तुलना केल्याशिवाय मला रहावत नाही, पण लोकांना ते आवडणार नाही. तेथील मुठभर डच, जर्मन आणि काही इंडियन जमातींनी ब्रिटिशांचा पराभव केला आणि स्वातंत्र्य मिळवले. ब्रिटिश आणि त्यांच्या पाठिराख्यांनी कॅनडाला पलायन केले. आपल्या येथे आपण हे का करू शकलो नाही हा एक अभ्यासाचा विषय आहे. असो.

ही कादंबरी ज्या मोहॉकच्या खोऱ्यात युद्ध सुरू असते त्याचे अत्यंत वास्तववादी चित्रण करते. येथे शौर्याचे रोमहर्षक वर्णन नसून कष्ट, धैर्य आणि जिद्द यांवर भर आहे. विशेषतः लानासारख्या स्त्रियांचे मानसिक व शारीरिक धैर्य प्रभावीपणे दाखवले आहे. पात्रे जिवंत वाटतात आणि त्या काळातील वातावरण डोळ्यासमोर जिवंतपणे उभे राहते.

जगण्यासाठीचा संघर्ष, प्रेम आणि चिकाटी यांचे हृदयस्पर्शी व ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध चित्रण करणारी ही एक प्रभावी कादंबरी. युद्धातील वीरगाथेपेक्षा सामान्य माणसाच्या धैर्याची खरी कहाणी सांगणारे पुस्तक.

या कादंबरीतील प्रत्येक पात्रांचे गुण/दुर्गुण अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत. विशेषतः लानाचे जीवन फारच वाचण्यासारखे आहे.

लाना ही या कादंबरीतील सर्वात जिवंत, विकसित आणि मानसिकदृष्ट्या मजबूत व्यक्तिरेखा आहे. सुरुवातीला ती नाजूक, शहरात वाढलेली आणि आरामशीर जीवनाची सवय असलेली मुलगी असते; पण मोहॉक खोऱ्याचे कठोर वास्तव तिचे व्यक्तिमत्त्व पूर्ण बदलते.

कादंबरीच्या सुरुवातीला लाना ही भावनिकदृष्ट्या संवेदनशील आणि अननुभवी आहे. तिला आघाडीवरील जीवनाची कल्पनाही नसते. ती सर्वस्वी गिलवर अवलंबून असते. भीती, असुरक्षितता आणि एकटेपणा तिच्या मनात वारंवार दिसतो.

युद्ध, हल्ले, घर जळणे, उपासमार, बाळंतपणातील संकट, या सर्व अनुभवांनी लानाचे व्यक्तिमत्त्व कणखर झाले. भीती असूनही ती पळून जात नाही; ती परिस्थितीला निर्भयपणे सामोरी जाते. शारीरिक कष्ट, मानसिक वेदना आणि एकटेपणा सहन करण्याची ताकद तिच्यात निर्माण होते. ती अस्तित्त्वाची लढाई लढण्यास शिकते असे म्हणण्यास हरकत नाही.

या लढाईत तिच्या मातृत्त्वाचा मोठा वाटा आहे हे आपल्याला जाणवते. आई मुलांसाठी काय करू शकते याचे हे एक उदाहरण म्हणावे लागेल.

कादंबरीत लाना ही फक्त एक व्यक्ती नसून त्या भागातील, त्या काळातील सर्व स्त्रियांची प्रतिनिधी आहे.

ती युद्धात तलवार चालवत नाही, पण तिची मानसिक ताकदच तिचे शौर्य दाखवते. लानाच्या मनातील भीती कधीच जात नाही. फरक इतकाच – सुरुवातीला भीती तिला नियंत्रित करते आणि शेवटी ती भीतीवर नियंत्रण ठेवते.

लानाचे पात्र लिहिताना मला गॅलन्टचे खालील वाक्य आठववते –

मॅविस गॅलन्ट म्हणते ‌‘‌‘..विदीर्ण झालेल्या आयुष्यवस्त्राबद्दल व्यवहारिक विचार एखादी स्त्रीच चांगल्याप्रकारे करु शकते. ती ते शिवायचा प्रयत्न करते, त्याला ठिगळं लावते व त्याचे काठ सरळ राहतील याची काळजी घेते. त्या वस्त्राचा शेवटचा धागा उरला तर तो ती जमिनीवर पसरते व त्याची लांबी मोजते व विचार करते, “ याचा मी काय उपयोग करु शकते ? व त्यासाठी या धाग्याचे आयुष्य किती असावे लागेल ?

हे पुस्तक लिहिताना मला सतत छ. शिवाजी महाराजांच्या काळात शेतकरी आदेश आल्यावर कसे शस्त्रं उचलत असतील याची कल्पना येत होती. त्यांच्या कुटुंबियांचे कसे हाल होत असतील, युद्ध संपल्यावर ते परत एकदा आपल्या कष्टप्रद जीवनास सामोरे जात असतील, मुसलमानांच्या लुटारू टोळ्यांना कसे तोंड देत असतील याची कल्पना आली. मी असे का म्हणतोय हे तुम्हाला हे पुस्तक वाचल्यावर उमगेल..

हे पुस्तक वाचण्याआधी, परिशिष्ट प्रथम वाचावे ही विनंती. त्याने तेथील भौगोलिक परिस्थितीची आपल्याला कल्पना येईल.

– जयंत कुलकर्णी

१२ फेब्रुवारी २०२६

एकूण पाने भरली ५४३

किंमत रु ६५०.

या पुस्तकाचे वितरण १५ एप्रिलला सुरु करण्यात येईल. या महिन्यात जे वाचक पैसे पाठवतील त्यांना हे पुस्तक घरपोच मिळेल. ( अंदाजे १०% सवलत) खाली या पुस्तकासाठी पैसे पाठवण्याचा QR Code जोडलेला आहे. कृपय स्कॅन करून पैसे पाठवावेत. ज्यांना पुस्तक सहीकरून पाठवायचे आहे त्यांनी पैसे पाठवताना नोट मध्ये तसे लिहावे किंवा मला मेसेज करावा.

पत्ता पाठवण्यास कृपया विसरू नये.

Read More 

What do you think?

Written by Jayant Kulkarni

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

कअबागृहाची संक्षिप्त माहिती