in

मानिनी योजनगंधा

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

नुकतेच दुर्गा भागवत यांचे व्यासपर्व हे छोटेसे पण विचार करायला लावणारे पुस्तक वाचण्यात आले. पुस्तकात दुर्गाबाईंनी महाभारतातील काही महत्वाच्या व्यक्तीरेखांबाबतीत लिहिले आहे. त्यावरुन प्रेरणा घेऊन सुचलेले काही

भीष्माप्रमाणे सत्यवतीला जर मृत्युशय्येवर पडून स्वतःच्या आयुष्याकडे बघायला संधी मिळाली असती तर तिने काय विचार केला असता किंवा पंडूच्या मृत्यूनंतर जेंव्हा सत्यवती अरण्यात गेली तेंव्हा तिने स्वतःच्या आयुष्याकडे बघताना कुणाला दोष दिला असता स्वतःच्या प्राक्तनाला, पाराशर ऋषीला की भीष्माला

एक कोळ्याची कोवळी पोर, देवाने सौंदर्य दिले पण अंगाला दुर्गंधी होती. तीची ख्याती मत्सगंधा म्हणून होती. एक वाटसरू तिथे आला. तो वाट विसरला होता. त्याला वाट दाखवायला, यमुना पार करुन द्यायला तिच्या वडिलांनी तिला त्याच्यासोबत पाठविले. तो वाटसरू कोणी साधासुधा माणूस नव्हता तर ते होते एक विद्वान ऋषी पाराशर. ऋषींना ती आवडली. यानंतर कथा वेगवेगळ्या प्रकार सांगितली जाते. एक कथा सांगते की सत्यवतीच्या सौदर्याने ऋषी पाराशरांना वेडे केले आणि तिला जवळ येण्यासाठी सांगितले. तिने नाही म्हटले पण तो खूप मागे लागल्यावर ती तयार झाली पण एकांताची मागणी केली. ऋषींनी मग एकांताची निर्मिती केली. तिने सांगितले मी मत्सगंधा आहे मग ऋषींनी स्वतःच्या सामर्थ्याने मत्सगंधेची योजनगंधा केली. दुसरी कथा अशी आहे त्या वाटसरुला ती आवडली. तो वाटसरू तिच्या प्रेमात पडला. मग तिही त्याच्या प्रेमात पडली. दोघांच्या प्रेमाचे अपत्य जेव्हा तिच्या पोटात वाढायला लागले तेंव्हा ऋषीला जाण झाली की माझ्या आयुष्याचा मार्ग हा नव्हे मला ज्ञान संपादित करायचे आहे आणि म्हणून मग पाराशार ऋषी तिला सोडून निघून गेले. दोन्ही कथांमधाला तपशीलातला काही फरक सोडला तरी दोन्ही कथांचे सार मात्र एक आहे. एका विद्वान ऋषीला एक मुलगी आवडली त्याने तिच्याशी शरीर संबंध ठेवले, त्यातून एक पुत्र झाला आणि मग ते ऋषी निघून गेले. ऋषींनी स्वतःच्या सामर्थ्याने तिला तिचे कौमार्य परत दिले, तिच्या अंगाची दुर्गंधी काढून सुगंध दिला. ऋषींनी आशीर्वाद दिला तुझ्या पोटी परम तेजस्वी पुरुष जन्मास येईल तसा पुढे जाऊन या संबंधातून महर्षी व्यासांचा जन्म झाला. तरीही सत्य हेच की एका मुलीवर कोवळ्या वयात अन्याय झाला, अत्याचार झाला. ती एकटी राहिली.

ऐन तारुण्यात असा अनुभव आलेल्या त्या मुलीच्या मनाची अवस्था काय झाली असेल. तिच्या मनात काय भावना निर्माण झाल्या असतील, एकंदरीत पुरुष जमातीकडे, समाजाकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन काय झाला असेल. एक वेदविद्या संपन्न ऋषी जर असा वागला तर इतर पुरुषांचे काय सारे पुरुष हे असेच असतात. सारा समाज स्वार्थी आहे या स्वार्थी समाजात वावरायचे असेल तर आपण फक्त आणि फक्त आपला स्वार्थ बघितला पाहिजे. तिचे विचार असे टोकाचे झाले असतील तर तिचे काय चुकले? त्याचमुळे राजा शंतनुने तिच्या शरीराच्या सुगंधाने, तिच्या रुपाने वेडे होऊन जेव्हा तिला लग्नासाठी विचारले तेंव्हा तिने अटी घातल्या. काही सांगतात की अटी तिच्या वडिलांनी घातल्या होत्या पण तो तपशीलाचा भाग आहे. अटी तिने घातल्या काय किंवा तिच्या वडिलांनी तिने त्याला विरोध केल्याचे कुठेच वाचण्यात येत नाही. तेंव्हा या साऱ्याला तिची संमती होती असेच म्हणावे लागेल. काय होत्या तिच्या अटी. तिच्या पोटी जन्माला येणारा पुत्रच राजा व्हावा इतकेच नव्हे तर पुढे सुद्धा गादीवर बसणारा वंश हा तिच्या पोटी जन्माला आलेल्या पुत्रांपासून तयारा झालेला वंश असावा. मग देवव्रताचे काय? देवव्रत राजा शंतनुच्या पहिल्या बायकोपासून म्हणजे गंगापासून झालेला पुत्र. तो युवराज होता, राजा बनायाला योग्य होता. त्या क्षणाला तो सत्यवतीच्या खिजगणतीत नव्हता, असला तरी या क्षणाला त्याच्या आयुष्याच्या दोऱ्या माझ्या हातात आहे त्या मी मला हव्या तशा फिरविणार. त्या क्षणाला तिच्यासाठी तोही त्या साऱ्या पुरुषांसारखा एक पुरुष होता आणि ती एक अन्यायग्रस्त स्त्री होती. तिचे एकच उद्दीष्ट होते झालेल्या अन्यायाचा सूड उगवायचा. मी भोगले म्हणून मला आज मला संधी मिळाली आहे तेंव्हा मी यातून माझा स्वार्थ बघणार. कदाचित तिच्यातील आईचे प्रेम आणि त्या प्रेमातून फक्त आपल्या होणाऱ्या पुत्रांचा स्वार्थ तिच्या डोळ्यासमोर आला असेल. झालेला अन्याय आणि आईचे आंधळे पुत्रप्रेम यातून मत्सगंधा सत्यवती आता मानिनी योजनगंधा झाली होती. तिने व्यवहार केला. काय चुकले तिचे? अन्यायमुळे आलेली व्यवहारी शहाणपण, आईचे अंधळे पुत्रप्रेम हे तर कुणालाच चुकत नाही मग सत्यवतीचे उत्तरायुष्य दुःखात का गेले? ज्या सुखासाठी तिचे व्यवहारी मन धावत होते ते सुख तिला का मिळाले नाही? तिच्यासोबत असे का घडले? आयुष्याच्या उत्तरार्धात तिच्या वाट्याला भयंकर दुःख का आले?

सत्यवतीचे राजा शंतनु सोबत रीतसर लग्न झाले. लग्नानंतर दोन मुलं झाली, चित्रागंद आणि विचित्रविर्य. राजा शंतनुचे लवकरच निघन झाले हा तिच्यासाठी पहिला धक्का होता. हा धक्का सहन करायची तिची तयारी होती. राजा शंतनुच्या मृत्युनंतर देवव्रत अर्थातच भीष्माने सत्यवतीचा पुत्र चित्रागंद याला राजा करुन स्वतः कुरु साम्राज्याची धुरा सांभाळली. जो देवव्रत राजा होण्यासाठी सर्वार्थाने योग्य होता, ज्येष्ठ होता, शूर होता, न्यायी प्रवृत्तीचा होता पण सत्यवतीच्या अटींनी त्याला राजा होण्यापासून रोखले होते. इतकेच नव्हे तर पुढच्या पिढीत सुद्धा तिच्या पोटी आलेल्या पुत्राचा वंशच राजा व्हावा ही अट पूर्ण करण्यासाठी त्याने आजन्म अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा केली. त्याची निष्ठा आजन्म हस्तीनापुराच्या गादीशी राहील अशी प्रतिज्ञा देखील त्याने केली. सत्यवतीच्या पुत्रांच्या पुत्रांसाठी देवव्रत अविवाहित राहिला. सत्यवतीच्या पुत्रप्रेमाने कुणाला तरी बाप होण्यापासून रोखले. असा कुणी देवव्रत जगात असेल अशी तिला कधी कल्पनाच नव्हती. तोपर्यंत तिच्या आयुष्यात आलेला कुठलाच पुरुष तसा नव्हता. त्या क्षणी तिला त्या देवव्रताची पर्वा नव्हती, तिला हवे असलेले सुख तिने आपल्या अटींवर मागून घेतले होते. चित्रागंद शूर होता पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते आणि गंधर्वांसोबतच्या युद्धात चित्रागंद मारला गेला. हा सत्यवतीसाठी दुसरा आणि मोठा धक्का होता. आपला पराक्रमी पुत्र ऐन तारुण्यात जावा याशिवाय आईसाठी मोठे दुःख काय असणार आहे. तिला आतापर्यंत देवव्रताच्या भीष्म प्रतिज्ञेची, त्याच्या शौर्याची, पराक्रमाची पूर्ण कल्पना आली होती. आपण नकळत का असेना या व्यक्तीवर अन्याय केला आहे हे ध्यानात आले होते. परंतु आता तिला पहिल्यांदी जाणवले आपण देवव्रतावर जो अन्याय केला त्याची शिक्षा दैव तिला देत आहे. दैवाने आधी सुद्धा संकेत दिले होते की सत्यवती सूडाच्या अग्नीत अशी वाहवत जाऊ नको. तू देवव्रतावर अन्याय करतेस हे विसरु नको. या साऱ्या संकेतांना धुडकावून ती तिला जे करायचे होते त्यावर ठाम राहिली. आज तो देवव्रत राजा झाला नाही परंतु राज्याचा सांभाळ तोच करतोय, आजही त्याची अविवाहित असण्याची प्रतिज्ञा तशीच आहे आणि तिचा पुत्र चित्रागंद मात्र विवाह न होताच युद्धात मारल्या गेला. ज्या वंशासाठी तिने हे सारे केले होते तो वंश अजून सुरुच झाला नाही. सत्यवतीचे दुःख इथे संपणारे नव्हते. चित्रागंदाच्या मृत्युनंतर भीष्माने विचित्रवीर्य या सत्यवतीच्या दुसऱ्या पुत्राला गादीवर बसविले. त्याच्यासाठी स्वयंवरात जाऊन अंबिका आणि अंबालिका या दोन कन्या घेऊन आला. विचित्रविर्याचा दोघींसोबत विवाह झाला परंतु हे सुख फार काळ टिकले नाही आणि विचित्रविर्य आजारात गेला. विचित्रवीर्य गेला तेंव्हा त्या दोघींच्या पोटी पुत्र नव्हता. सत्यवतीसाठी केवढा मोठा धक्का होता. त्यावेळी तिची सोबत करायला, ते साम्राज्य परत उभे करायला कोण होता तर तोच देवव्रत . त्या क्षणाला तिला मनापासून वाटले असणार या भीष्माने आपली प्रतिज्ञा सोडावी आणि या शापित जगण्यातून तिची मुक्तता करावी. तिच्या शापासाठी नाही तर कुरु साम्राज्यासाठी तरी भीष्माने विवाह करावा किंवा अंबिका, अंबालिका यांच्याशी नियोग करुन कुरु साम्राज्याला वंशवृद्धीसाठी मदत करावी. तो पर्यत स्वतःवर झालेल्या अन्यायाच्या सूडाने पेटून उठलेली सत्यवती कधीच संपली होती. आंधळ पुत्रप्रेम जागृत ठेवायला पुत्रच उरले नव्हते. भीष्माच्या कठोर प्रतिज्ञेनेने तो अहंकार, ते व्यवहारी शहाणपण, तो स्वार्थ सारं जाळून खाक केले होते. आता हा दुसरा मोठा धक्का बसला होता. कुणी तिसरा व्यक्ती अन्याय करुन निघून गेला ते दुःख जवळच्यां व्यक्तींच्या सोबतीने, मदतीने सहन करता येतं, त्यातून उठून उभे राहता येतं परंतु आपल्या जवळची व्यक्ती आपण केलेल्या चुकीची शिक्षा म्हणून आपल्याला सोडून जात आहेत हे दुःख पचवणे फार अवघड असते. त्याक्षणाला जगणे स्वतःला स्वतःवरचे ओझे वाटू लागते परंतु मरण सुद्धा स्वीकारता येत नाही निदान सत्यवतीकडे तरी तो पर्याय नव्हता. आता ती एक अल्लड पोर नव्हती तर एका परमप्रतापी साम्राज्याची साम्राज्ञी होती. आपल्या पोटातून निर्माण झालेला वंशच कुरु साम्राज्याचा वारस असावा असा तिचा हट्ट होता परंतु आता वंश निर्वंश होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तिने भीष्माला नियोगाची विनंती केली परंतु भीष्म आपल्या प्रतिज्ञेवर अढळ राहिला. तो नियोगाला तयार झाला नाही. शेवटी तिने व्यासाला नियोगासाठी विनंती केली. त्यातून कुरु वंशाला वंशज मिळाला. नियतीने सत्यवतीचे ऐकले, तिच्या पोटी जन्माला आलेल्या पुत्रापासूनच कुरु वंशाचे पुढचे राजे जन्माला यावे ही तिची इच्छा पूर्ण झाली. नियतीने केलेली ही एक क्रूर थट्टा होती. सत्यवतीला हे असे अभिप्रेत नव्हते. सत्यवतीचे दुःख इथे संपत नाही, जे दोन पुत्र जन्माला आले त्यातला एक रोगग्रस्त पंडू तर दुसरा अंध धृतराष्ट्र. सर्वगुणसंपन्न तेजस्वी असा पुत्र जन्माला आला पण तो कुरु वंशाच्या राण्यांच्या पोटी नाही तर दासीच्या पोटी. इथेच पुढे जाऊन कुरु वंशातील महासंघर्षाची, एका अतिविनाशकारी पर्वाची मुह्रुर्तमेढ रोवल्या गेली.

सत्यवतीचे काय चुकले? तिच्यावर अन्याय झाला होता तरी नियतीने तिला अशी कठोर शिक्षा का दिली. काही दिवसांपूर्वी सेपियन हे पुस्तक लिहिणाऱ्या युवाल नोहा हरारी या लेखकाची मुलाखत बघितली होती. त्यात सात ऑक्टोबर नंतर इस्राईल वर झालेल्या हमल्यानंतर पुढे काय होऊ शकते यावर भाष्य करताना म्हटले होते की जेंव्हा दोन्ही पक्ष आमच्यावर अन्याय झाला आहे हि भूमिका घेऊन चर्चेला बसतात तेंव्हा काहीही तोडगा निघणे शक्य नाही. मी अन्यायग्रस्त आहे ही भावना जेव्हा खूप प्रबळ होते तेंव्हा माझी समाजाप्रती जबाबदारी काय आहे हे विसरल्या जाते. त्याच्या मते जगातले सारे राजकारणी हे अन्यायग्रस्ताची भावना किंवा इंग्रजीत ज्याला व्हिक्टीमहुड कार्ड म्हणतात ते वापरतात. सत्यवतीचे काहीसे असेच झाले. तिच्यावर अन्याय झाला ही एकच भावना तिच्या मनात होती. या भावनेतून जगताना ती तिची जबाबदारी विसरली. तिच्या हातून जाणतेपणी किंवा अजाणतेपणी एका देवव्रतावर अन्याय होत आहे हे ती विसरली. याचा अर्थ तिने तिचा स्वार्थ बघू नये किंवा व्यवहार बघू नये किंवा तिच्यावर अन्याय करणाऱ्याला शिक्षा देऊ नये हा नाही. स्वतःचा स्वार्था बघताना कुठेतरी आपण अतिरेक करत आहो हे ती विसरली. जेव्हा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होतो त्याचा परिणाम वाईटच होतो मग ती गोष्ट चांगली असो की वाईट. मला तर भीष्माची प्रतिज्ञा देखील एका विशिष्ट काळानंतर अतिरेकी वाटते. सत्यवतीने त्याच्यावर केलेल्या अन्यायाचा सूड म्हणून त्याने ती प्रतिज्ञा केली की काय अशी शंका येते. वडीलांच्या इच्छेसाठी देवव्रताने राजत्याग करणे, विवाह न करण्याचा निर्णय घेणे समजू शकतो परंतु सत्यवतीच्या दोन्ही पुत्रांच्या मृत्युनंतरही जेंव्हा कुरु वंशाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता तेंव्हाही प्रतिज्ञाबद्ध राहायचे कारण कळत नाही. भीष्माने जर का त्यावेळी नियोगाला कबुली दिली असती, किंवा अंबिका, अंबालिका यांचेशी विवाह केला असता तर कदाचित महाभारत घडलेच नसते. या जर तर ला आता अर्थ नाही. मान्य आहे ती प्रतिज्ञा तशी कठोर नसती तर कदाचित त्याला कोणी भीष्म प्रतिज्ञा म्हटले नसते. असे वाटते कालांतराने देवव्रत स्वतःच्या भीष्म असण्याच्या प्रेमात पडला होता आणि आपण चुकतोय किंवा चुकीच्या बाजूने आहोत याची जाण असूनही केवळ त्या प्रतिज्ञेसाठी चुकीच्या गोष्टीची साथ करीत राहिला.

अन्यायावरील सूड म्हणून केलेल्या बेछूट वागणुकीला भयंकर सजा मिळते याची महाभारतात बरीच उदाहरणे सापडतात. उदा. अश्वथामा. त्याच्या वडिलांना चुकीच्या पद्धतीने मारले म्हणून त्याने द्रोपदीच्या सर्व पुत्रांना झोपेत मारण्याचे महाभारतकार समर्थन करीत नाही. तीच गोष्ट कर्णाच्या बाबतीत आहे. कर्णावर अन्याय झाला म्हणून त्याने द्रौपदीचा केलेला अपमान किंवा अभिमन्यूचा मृत्यू या गोष्टींचे समर्थन होत नाही. असे असले तरी सत्यवतीच्या बाबतीत महाभारतकार अधिक क्रूर, निष्ठूर होते असेच मला वाटते. सत्यवतीने देवव्रतासोबत जे केले त्याचे कधीच समर्थन होऊ शकत नाही पण त्याची जी सजा तिला मिळाली ती फार मोठी होती असे वाटते. ज्या वयात तिच्यावर अन्याय झाला तेव्हा तिच्या मनात निराशेच्या, सूडाच्या भावना असणे साहजिक होते. त्या भावनेतून स्वतःचा स्वार्थ साधताना ती चुकली असेल पण त्याची शिक्षा काय तर दोन्ही पुत्रांचा मृत्यू. पुत्रांना मृत्युसमयी मुलबाळं नाही, नियोगाने नातवंड झाली तिही अपंग आणि तेच पुढे जाऊन महाभारताचे कारण ठरले. ज्या देवव्रताला तिने राजा बनण्यापासून दूर ठेवले त्या देवव्रताच्या मदतीने सारा राज्यकारभार करावा लागला. त्याचमुळे असे वाटते की भीष्माची कठोर प्रतिज्ञा हेच तिच्या दुःखाचे खरे कारण होते. आयुष्याच्या उत्तरार्धात जर तिला सर्वात जास्त कोणती गोष्ट खात असेल तर ती होती भीष्माची कठोर प्रतिज्ञा. खर तर एका काळानंतर प्रतिज्ञेच्या योजनेचे कारण संपले होते. एका व्यक्तीचा अतिरेकी हट्ट म्हणून ती प्रतिज्ञा उरली होती परंतु सत्यवती मात्र त्याचे दुःख तिच्या मृत्यूपर्यंत भोगत होती. हे प्राक्तन तिने स्वतःहून ओढवून घेतले होते. सत्यवतीला म्हणजे आपल्या आईला महाभारतकार व्यासांनी अशी कठोर शिक्षा दिली परंतु मग अन्याय करणाऱ्या वडिलांचे म्हणजे पाराशुरमुनींचे काय? महाभारतकार त्यावर फारसे भाष्य करीत नाही. ते पटत नाही. सत्यवतीने व्यवहार केला पण मग तो व्यवहार सोडून ती निघून गेली नाही. तिने देवव्रतावर अन्याय केला पण नंतर तिने त्याला सतत प्रतिज्ञा सोडण्याची विनंती केली. मानिनी योजनगंधेला महाभारतकारांनी सजा दिली असली तरी ती शेवटपर्यंत आपल्या कर्तव्यापासून ढळली नाही शिक्षा भोगत आपले कर्तव्य करीत राहिली. त्याचमुळे तिची प्रतिमा मोठी होते. कदाचित महाभारतकारांनाही तेच अभिप्रेत असेल.

Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by Mitraho

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

बुंदी…एक नवे आकर्षण

भेटीनं भारावलो!