आदरणीय बाबांना,.
बाबा, आता मी ५८ वर्षाची झाले. गेल्या ५८ वर्षातील ३८ वर्षे ४ महिने शिक्षिका पदावर कार्य करून सेवानिवृत्तही झाले. गेल्या ५८ वर्षात मला थोडफार समजायला लागल्यापासून विविध विषयावर तुमच्याशी खूप बोलले. तुमच्याशी बोलता बोलता खूप शिकले. पण मला अगदी अंत:करणापासून जे बोलायचं होत ते राहूनच गेलं. म्हणून या लेखातून तुमच्याशी बोलते आहे.
बाबा, मला आठवतोय तो माझ्या नोकरीचा पहिला दिवस. तुम्ही मला माझ्या शाळेत घेऊन आलात. मुख्याध्यापकांशी माझी ओळख करून दिलीत, त्यावेळी तुम्ही ही मुख्याध्यापक पदावर कवठेपिरान येथे कार्यरत होता. मी अगदी निश्चितपणे नोकरीत रूजू झाले, कारण मला आधार होता तो तुम्ही दिलेल्या शिकवणुकीचा व उत्तम संस्काराचा. तुम्ही नजरेनेच मला सांगितलत, ‘तुला डी.एड्.पर्यंतच शिक्षण देवून इथपर्यंत आणून सोडलय. तुझी नोकरी तू व्यवस्थित सांभाळ, काहीतरी वेगळं करून दाखव जेणेकरून तुझं पर्यायाने आपल्या कुटूंबाचं नाव उज्ज्वल होईल’. आणि बाबा खरं सांगू तुम्ही सांगितल्याप्रमाणेच अगदी मनापासून, कर्तव्यात कसूर न करता अध्यापनकार्य करत राहिले. आदर्श शिक्षिका म्हणून दहा पुरस्कार प्राप्त केले. पी.एच.डी. सारखी पदवीही मिळवू शकले. कुटूंबाला अभिमान वाटावा असे कार्य करू शकले.
माझ्या नोकरीच्या सुरूवातीच्या काळात वारंवार ब्रेक मिळत होता. ३ ते ४ महिने विनावेतन रहावे लागायचे. त्यामुळे खूपच ओढाताण व्हायची. आजीचा व माझा घरखर्च चालविणेही अवघड होते. त्यात आजी खूप आजारी पडली, तिच्या उपचारादरम्यान मला बसलेला मानसिक धक्का सहन न झाल्यामुळे मीही खूप आजारी पडले. मला खूप ताप भरला, दोन-तीन दिवस तो अंगावरच काढला. कारण बाबा, त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते आणि तुम्हाला त्यावेळी त्रास द्यायची माझी इच्छा नव्हती. तापामुळे माझं मानसिक संतुलनही बिघडल. मी गांवी आले त्यावेळी तिथल्या डॉक्टरांनी सांगलीला न्यायचा सल्ला दिला. त्याचवेळी तुमचा आष्टा येथे सेवांतर्गत कोर्स चालू होता, अधिकारी तुम्हाला रजा द्यायला तयार नव्हते. तुम्ही त्यांना म्हणाला, ‘साहेब, माझी मुलगी आजारी आहे. तिला औषधोपचारासाठी सांगलीला नेणे जरूरीचे आहे. आज माझा राजीनामा घ्या, वाट्टेल ती कारवाई करा पण आज मी जाणारच’. तुम्ही माझ्यावर औषधोपचार तर केलात पण माझ्यासाठी एवढा मोठ्ठा त्याग करणारे बाबा आहेत हे पाहून त्या भयंकर दुखण्यातून मी ताबडतोब बरी झाले.
बाबा, आठवतय तुम्हाला दहावी इयत्तेत मी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याचं मार्कलिस्ट तुम्हाला दाखवताच डोळ्यात पाणी भरून म्हणालात, ‘ज्युबेदा, तू आमच्यासारख्या गरिबाच्या घरात कशाला जन्माला आलीस, तुझ्या बुध्दीच्या मानाने उच्च शिक्षण आम्ही देवू शकत नाही’. माझ्यावरील प्रेमापोटी तुम्ही थोडं अतिशयोक्तीनं बोललात हे खरं पण त्या बोलण्याने माझ्या अंगावर मूठभर मांस चढले.
नोकरीतील बारीक-सारीक कटकटी, अडचणी मी तुम्हाला सांगायची, त्यावेळी तुम्ही मला सांगितलत. ‘बेटा, प्रेमानं जग जिंकता येतं. प्रेमळ वागण्यानं सर्वांची मने जिंकून घे; आणि लक्षात ठेव आपलं उत्कृष्ठ काम हाच आपला वशिला आहे. तुला भरपूर मित्र-मैत्रिणी जोडता आल्या नाहीत तरी चालेल पण तुझ्या वागण्याने शत्रू निर्माण करू नकोस” बाबा हे तुमचे तत्वज्ञान मला कुठल्याही पुस्तकी तत्वज्ञानापेक्षा मोलाचे वाटतात.
बाबा मला चांगलं आठवतय एक नातेवाईक माझ्या बाबतीत तुम्हाला म्हणाला, ‘गुरूजी तुमच्या मुलीच्या लग्नाचं बघा, स्त्री हे काचेचं भांड असतं’ तुम्ही ठामपणे उत्तर दिलंत, ‘माझं भांडं काचेचं नाही शिशाचं आहे तुम्ही नका काळजी करू’. एकदा कारखान्यात काम करणाऱ्या, कमी शिकलेल्या श्रीमंत मुलाचं माझ्या साठी स्थळ आल्यावर म्हणालात, ‘नको हे स्थळ, माझ्या मुलीची भाषासुध्दा त्याला कळणार नाही’. तुम्ही सहजपणे बोललेल्या शब्दांनी माझा आत्मविश्वास शतपटीने, वाढत गेला. एकदा पत्रातून तुम्ही याबाबतीत माझा निर्णय विचारलात. त्यावेळी मी तुम्हाला लिहीलं होतं, ‘बाबा ! प्रत्यक्ष ईश्वरानेही माझं कांही वाईट करण्याचा विचार केला तर माझे बाबा ईश्वराला प्रार्थना करून वाईट करण्यापासून परावृत्त करतील. तुम्ही घेतलेला निर्णय मी स्विकारेन’. तसंच केलत बाबा तुम्ही, माझ्यासाठी अगदी योग्य जोडीदार निवडलात, माझ्या आयुष्याचं सोनं झालं.
आम्हां भावंडासाठी आयुष्यभर कष्ट केलेत. शिक्षकाच्या नोकरीबरोबरच शिकवण्या घेतलात. शिलाईकाम केलतं. आपल्या गरजा कमी करून, काटकसरीने राहून आमच्यासाठी वह्या-पुस्तके पुरवलीत. शाळेचा गणवेशही माप न घेता अगदी बरोबर शिवून पाठवत होतात. बाबा, हे तुमचे उपकार या जन्मी तरी फिटणार नाहीत. तुमच्या उपकाराच्या ओझ्याखाली रहाणे मला जास्त आवडेल. माझा संसार सुरू झाला. तुमची आई म्हणजे माझी लाडकी दादी माझ्याजवळच रहात होती. त्यामुळे तुमचं येणं जाणं असायचं, प्रत्येक वेळी आम्ही घेतलेली एखादी वस्तू किंवा भांडं मी तुम्हाला दाखवायची. त्यावेळी एक अनमोल शिकवण तुम्ही मला दिली. ‘वस्तू-भांडं असं घ्यायचं की आपल्या आयुष्यात ते पुन्हा पुन्हा बदलायला लागू नये.’ तुम्ही सांगितल्याप्रमाणेच खरेदी होत गेली. तुमचे बोलणे म्हणजे एक जीवनसिद्धांत होता. आम्ही रामनगरमध्ये छोटेसे घर बांधल्यावर मला म्हणालात, ‘ज्युबेदा कोल्हापूर रोडवरून तुझ्या घराकडे येताना खूप मोठे बंगले दिसतात. त्यानंतर वडर समाजातील बांधवानी दगडाने रचलेल्या भक्कम झोपड्याही आहेत. बंगल्याकडे जरूर बघ पण त्यानंतर झोपड्यांकडे बारकाईने बघूनच आपल्या घराकडे बघ तुझं घर फार सुंदर वाटेल तुला’. जगातील कोणत्याही तत्वज्ञाने इतका महान संदेश आपल्या लेकीसाठी दिला नसेल.’
खरंच बाबा मी माझ्या मानाने खूप शिकले, शिकवलेही पण जीवनाची पाठशाळा मात्र मी तुमच्याकडूनच शिकले, कळत-नकळत तुम्हीच ठरला माझ्या जीवनाचे शिल्पकार! तुमच्यामुळेच मी शिकत गेले. हे सुंदर जीवन घडवू शकले. मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते. ‘माझ्या बाबांना आरोग्यपूर्ण उदंड आयुष्य दे’.
तुमची लेक – ज्युबेदा
माझे ग्रेट बाबा अर्थात माझे काका हा लेख युवकांचा नवा महाराष्ट्र या दैनिकामध्ये प्रकाशित झाला. त्यावेळी बाबा हयात होते , वाचून बेहद खूष झाले होते. बारा १२नोव्हेंबर २०१८ ला ते पैगंबरवासी झाले. त्यांना आमच्यातून जाऊन सात वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या आठवणी आम्हा सर्वांच्या ह्रदयात कोरलेल्या आहेत. त्यांच्या सातव्या पुण्यस्मरणा निमित्ताने हे मनोगत मनापासून……..


GIPHY App Key not set. Please check settings