in

बारा गावचं संचित (कथासंग्रह) – पुस्तक परीक्षण

बारा गावचं संचित (कथासंग्रह) – पुस्तक परीक्षण

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी
लेखक – सुप्रसिद्ध कथाकथनकार जयवंत आवटे
प्रकाशक – शब्द शिवार प्रकाशन
पृष्ठे – १७२
मूल्य – २०० रुपये
प्रथम आवृत्ती – ३१ मे २०२२
ISBN: 978_93_91232_47_4
 
       बारा गावचं संचित हा कथासंग्रह वाचनात आला. पहिल्या कथेपासून सुरु झालेला वाचनप्रवास विनाथांबा शेवटची कथा वाचूनच थांबला. सर्व कथा वाचनीय, उत्कंठा वाढविणाऱ्या, मनोरंजक आहेत. या कथासंग्रहातील सर्वच पात्रे कष्टाळू आहेत. त्यांनी कष्टाबरोबरच इमानदारी जपलेली आहे. ही माणसं खेडेगावात राहणारी साधीसुधी माणसं आहेत. त्यांच्याजवळ प्रामाणिकपणा आहे. उदा. जाणती कथेतील सदाचे आईबद्दलचे विचार आदर्शवत आहेत. समाजातील नीतिमत्ता ढासळली तरी ती ढासळू नये म्हणून कथेतील पात्रे प्रयत्न करतात. उदा. ‘गावधोंड’ कथेतील शिक्षक. या कथासंग्रहातील पात्रे भोळीभाबडी आहेत, निष्ठा कथेतील भिमा मालकाचे नाटकी बोलणे खरे मानतो व स्वतः घाम गाळून मिळालेलं मानधन मालकाच्या हवाली करतो. असा स्वामीभक्त भिमा वाचकांना निष्ठा कथेत भेटतो. व्यसनाधीन नवऱ्याला स्वीकारुन, आपल्या मनातील वेदना उराशी बाळगून संसाराचा गाडा समर्थपणे सांभाळणारी मंजुळाची आई ‘मंजुळा’ कथेत भेटते.  आपल्या वाट्याला आलेली गरीबी देवाचं देणं समजून ही माणसं समाधानात जगून एक आदर्श समाजापुढे ठेवतात. उदा. ‘माधवी’ कथेतील सासूसासरे.


       या कथासंग्रहातील सर्व कथांचे शीर्षक एका शब्दांचे आहे, कथा आशयाने ओथंबलेल्या आहेत. कथा वाचून मनोरंजन होतेच शिवाय मनात कालवाकालव आणि ह्रदयात विचारांचं वादळ निर्माण होतं. समाजाचं प्रबोधन करण्यासाठी लेखकांनी केलेले प्रयत्न यशस्वी झालेले दिसतात.


       मला विशेष आवडलेली बाब म्हणजे लेखकांनी स्त्री ची विविध सामर्थ्यशाली रुपे. शीलरक्षणासाठी मंगळसूत्राचा त्याग करणारी बाजार कथेतील अलका, व्यसनी नवऱ्याला सांभाळून संसार नेटाने चालवणारी मंजुळा कथेतील पार्वती, आईला वाईट वाटू नये म्हणून आपलं दुःख काळजात लपवून ठेवणारी मंजुळा, शिक्षण घेत असताना फक्त वाचकमित्र म्हणून महेशशी मैत्री करणारी साधी, सोज्वळ अशी तरूणाई कथेतील सुलभा, विहीर कथेतील ज्ञानदा तर सर्व स्त्रियांची नायिका शोभते अब्रूवर उठलेल्या पतीच्या मित्राला शिक्षा करून अद्दल तर घडवतेच पण दोघांच्या मैत्रीत बाधा न आणता त्याला सुधारण्यासाठी संधीही देते. स्त्रियांची विविध रूपे रेखाटताना लेखकांच्या  लेखनशैलीचं आणि निरीक्षण शक्तीचं कौतुक करावं तेवढं थोडच आहे.


       बारा गावचं संचित या कथासंग्रहातील निष्ठा ही पहिली कथा काळजाचा ठाव घेणारी आहे. रात्रंदिवस कष्ट करून आपल्या मालकावर अपार निष्ठा ठेवणाऱ्या भिमाची ही अप्रतिम कथा आहे. एखादा माणूस मालकाच्या शेतात राब राब राबतो, घाम गाळून मळा फुलवून देतो पण मालकाला त्याची बिल्कुल पर्वा नसते. नोकर मालकाला देव मानतो पण मालक त्याला एक क्षुल्लक नोकर समजतो.  भिमाने रक्ताचं पाणी करून फुलवलेल्या मळ्यातून भरपूर उत्पन्न मिळते. त्या उत्पन्नाच्या जोरावर मालक राजकारण करतो, ऐष आराम करतो. प्रामाणिक भिमाने पैशाची मागणी केली असता खोटा अभिनय करून त्याला कटवतो, त्याच्या गरजांची खिल्ली उडवतो पण निष्ठावान भिमा रात्रभर कष्ट करून मिळालेली पाच हजाराची रक्कम मालकाला देतो, तेंव्हा म्हणावेसे वाटते वा! भिमा वा! मालकाची बायको म्हणजे कृतघ्नपणाचा कळस आहे. ती पतीच्या खोट्या बोलण्याचं, खोट्या अभिनयाचं कौतुक करते.

       ही कथा वाचल्यावर एक वाक्य आठवले.’एक मनुष्य म्हणतो, “मी इतका गरीब आहे की माझ्याजवळ नोटांच्या बंडलाशिवाय कांही नाही”. तर दुसरा म्हणतो, “मी इतका श्रीमंत आहे की माझ्याजवळ चार शिळ्या भाकरीच्या तुकड्याशिवाय कांही नाही”. या कथेतील गरीब कोण व श्रीमंत कोण? लक्षात येईल.

       भिमा मनाने श्रीमंत असलेला, घाम गाळून श्रम करणारा, प्रामाणिक व निष्ठावान माणूस. त्याची समंजस बायको आपल्या पतीला कोणत्याही परिस्थितीत साथ देणारी असते ती पतीला म्हणते, “असं खांदं पाडून बसलेला नवरा बघायची सवय न्हाय मला”.

      कथेत वापरलेली भाषाशैली अतिशय प्रभावी व परिणामकारक वाटते. उदा. सरावलेल्या पायांना मळलेल्या वाटेचा अंदाज असतो. भिमाचा मालक म्हणतो, “आरं ही शेताची मेहनत, खतं, बी बियाणे हा खर्च बघतुयास तू. आता ही पाटीलकी मिरवायची म्हटल्यावर नुस्त बुलेट घेऊन फिरून चालत नाही. राजकारणात पद प्रतिष्ठा लागते बाबा, राहू दे आमदारकी, निदान पंचायत समिती तरी पदरात पाडून घेतली पाहिजे त्यासाठी लोकांना काय हवं काय नको पहावं लागतं. मंत्री संत्री आलं की घरी आणावं लागतं”.


        ‘आरक्षण’ ही कथा सध्याच्या भ्रष्ट राजकारणाचे हुबेहूब चित्रण करणारी आहे. एखादा मुरलेला राजकारणी उमेदवाराची निवड कशाप्रकारे करतो? त्याला उमेदवार फार हुशार, जाणकार नको असतो. तो निरुपद्रवी असावा, राजकारणातील कांही न समजणारा भोळाभाबडा असायला हवा तरच त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून या पुढाऱ्याला आपले राजकारणातील स्थान अबाधित राखता येते. गोरगरिबाला खोटी स्वप्ने दाखवून त्याच्या संसाराची राखरांगोळी झाली तरी या बड्या नेत्यांना त्याचं सोयरंसुतक नसतं. असंच झालं आरक्षण कथेतील बिरुचं. पुढाऱ्याच्या शब्दावर विश्वास ठेवून बिरूनं आपली शेरडं विकून टाकली. ज्याच्यावर त्याचा संसार अवलंबून होता, त्याची उपजिविका चालत होती. हुशार नेत्याला गोड बोलून आपल्याकडे वळविण्यात हे पुढारी वाकबगार असतात. असंच झालं या कथेतील धर्माच्या बाबतीत. पुढाऱ्यापेक्षा त्याचा पी. ए. हुशार असतो. तो मालकाला नेहमी लेवलमध्ये ठेवतो. त्याला आवरतो, सावरतो. पडद्यामागे काम करणारा हा पी. ए. सर्व डावपेच करत असतो हे कथेतील हंबीरने सिद्ध केले.


       सर्वसामान्य जनतेच्या आयुष्याचं वर्णन करताना लेखक या कथेत म्हणतात, “आमचं आयुष्य शेरडीच्या शेपटागत असतं, धड लाज राखत नाही की माशी उठत नाय नुसत हाय म्हणायला आणि जगाला दाखवायला”. हे वाक्य सामान्य माणसाच्या परिस्थितीचं विदारक चित्रण करतं. थोडक्यात या कथेत गरिबाला मोठी स्वप्नं दाखवायची व ऐनवेळी दुसऱ्यालाच उमेदवारी द्यायची हा राजकारणातील सर्रास चालणारा खेळ लेखकांनी आरक्षण कथेत मोठ्या खुबीने मांडला आहे.

        ‘लेखक’ ही कथा लेखकाच्या आर्थिक परिस्थितीची व्यथा मांडणारी जबरदस्त कथा आहे. लेखकावर शब्दशारदेची नजर असते पण लक्ष्मी त्याच्यावर नेहमी कोपलेली असते. लेखक राबत असतो, तळमळीने लिहित असतो पण त्याला संसार चालवण्यापुरतेसुद्धा मानधन मिळत नाही. मान थोडाफार मिळतो पण धन त्याच्यापासून कोसो दूर पळालेले असते त्यामुळे त्याला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो.

       थोडक्यात काय तर लेखक गर्दीत एकटा असतो तर एकटा असताना मनात विचारांची गर्दी असते. एखादी साहित्यकृती जन्म घेण्यापूर्वी लेखकांना अनंत यातना सहन कराव्या लागतात. लेखकाची आर्थिक व कौटुंबिक परिस्थिती सांगताना लेखक म्हणतात, “माणसं लेखकाचं तोंड भरून कौतुक करायची पण या लखलखणाऱ्या दुनियेत त्याचं साहित्य प्रकाशित करायला कुणी तयार नव्हतं”. लेखक कावळ्याला म्हणतात, “बाळा, शिळंपाकं रहायला रात्री जेवण सोगळं बनावं लागतं. चुकीचं घर निवडल राजा” लेखकाची बायको म्हणते, “पोराबाळाच्या पोटाला काय घालायचं? कौतुकानं आणि मानसन्मानानं पोट भरत नाय”. हे वाक्य लेखकाच्या आर्थिक स्थिती चे वर्णन करते.

       ‘लेखक’ कथेतील ‘बाळानो, वाचनाशिवाय लिखाण म्हणजे पत्नीशिवाय संसार’ हे वाक्य वाचनाचं महत्त्व सांगून  जाते. कथेच्या शेवटची वाक्ये ह्र्दयद्रावक आहेत. पोटच्या पोराला उघड्यावर टाकून, बायकोच्या आयुष्याची लक्तरे केल्यावर, जन्मदात्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केल्यावर आणि वेदनांचा समुद्र ओलांडल्यावर लेखकाला शब्दशारदा प्रसन्न होते.

         ‘बाजार’ या कथेतील बाजाराचे लेखकांनी केलेले चित्रण त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीचे दर्शन आहे. बाजारात सर्व प्रकारचे व्यापारी, शेतकरी व ग्राहक येतात. त्यांची व्यक्तीचित्रे लेखकानी हुबेहूब वाचकांसमोर मांडली आहेत. त्यामुळे कथा वाचतांना बाजारातच असल्याचा भास होतो. एका गरीब शेतकऱ्याची व्यथा या कथेत मांडली आहे. लाईट बील भरलं नाही म्हणून वीज कापली जाते. वीज कापल्यामुळे भाजीपाला वाळून जातो व भाजीपाला वाळल्यामुळे शेतकऱ्याचं कुटूंब उध्वस्त होतं. पोटापाण्याचे हाल होतात. पोटात पुरेसे अन्न नसल्याने शेतकरी आजारी पडतो. औषधपाण्याला पैसा नसतो. अशा असहाय्य परिस्थितीत अलकासारखी स्त्री बाजारात जाते. आपली व्यथा आक्कासारख्या अनुभवी व्यापारणीला सांगते. आक्का तिला मदत करण्याचा प्रयत्न करते पण या परिस्थितीचा फायदा घेणारी रंग्यासारखी व्यभिचारी, दुष्ट, नालायक माणसं घेतात. अशा वखवखलेल्या गिधाडांना धडा शिकविणारी अलका स्त्रीचं कणखर रुप दाखवते. कोणत्याही परिस्थितीत आपल्या चारित्र्याला डाग लागू देत नाही. स्त्रीचं हे दुर्गारूप मला खूप आवडले.

       बाजाराचं वर्णन करताना लेखक म्हणतात, “अब्रू माळव्याप्रमाणे उघड्यावर टाकणारी भांडणे, वादविवाद व्हायचे, सुरवातीची कुरबूर एकेरीवर यायची, आयाबहिणींचा उद्धार व्हायचा. नको त्याच्याबरोबर नांव जोडून अब्रू माळव्यासारखी उघड्यावर टाकली जायची”. कथेच्या शेवटी अलका जेंव्हा रंग्याला धडा शिकवून घरी निघते तेंव्हा लेखक म्हणतात, “अंधारानं परिचयाचे रस्ते अनोळखी झाले असताना अलका मात्र काळोखातून प्रकाशाकडे नेणाऱ्या वाटेने आपलं घर जवळ करत होती”. ‘बाजार’ ही कथा साहित्यविश्वातील सुंदर कलाकृती वाटते.


        ‘स्वप्न’ ही कथा छोट्या गरीब अशा दोन भावंडांची आहे. गोरगरिबांची स्वप्नं छोटी असतात पण ती साकार होत नाहीत. स्वप्नं साकार न झाल्याचं दुःख पचवायची कला गरिबाला ईश्वराकडून मिळाली आहे. दिव्या आणि मोना ही दोन लहान भावंडं, त्या दोघांना सायकल फिरवायची खूप इच्छा असते पण जिची सायकल आहे तिला द्यायला त्यांच्याकडे कांही खाऊ नसायचा. ती सायकलवाली मुलगी खाऊ देणाऱ्यानाच सालकल फिरवू द्यायची. शेवटी दिव्या आपल्या छोट्या भावासाठी मोनासाठी सायकल देण्याची विनंती करते पण ती या दोघांची टिंगल करते व सायकल देत नाही. 


       बालमनाची छोटी स्वप्नं रेखाटण्याचा प्रयत्न लेखकांनी केला आहेच त्याचबरोबर शेतकऱ्यांची व्यथाही या कथेतून प्रभावीपणे मांडली आहे. अवकाळी पावसाने पिकांचं झालेलं नुकसान शेतकऱ्यांला मेटाकुटीला आणतं. यंदा पीक चांगलं वाढलय. उत्पन्न चांगलं मिळेल म्हणून शेतकरी दांपत्याने कांहीं स्वप्ने पाहिलेली असतात. ती स्वप्नं अवकाळी पावसाने धुळीला मिळतात. अशावेळी पावसाला तारक म्हणावं की मारक हेच समजत नाही. डोक्याला हात लावून निराशेच्या गर्तेत जाण्यांपलीकडे तो कांहीं करू शकत नाही. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही. आपल्या लेकरांच्या मागण्या तो पूर्ण करू शकत नाही. पण जिवाचं रान करून, पोटाला चिमटा काढून तो लेकरांची स्वप्नं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोच हे सांगणारी ही सुंदर भावकथा आहे.

       ‘विहीर’ ही कथा रहस्यमय वाटते. कथेचा उलगडा कथेच्या शेवटच्या २-३ वाक्यांनी होतो. विजय व ज्ञानदा यांचा प्रेमविवाह झालेला असतो. ती दोघं रानात आनंदाने व सुखाने रहात असतात. एके दिवशी विजय पटापट शेतातली व घरातली कामे आटोपतो. ज्ञानदाला त्याच्या या कामाचं कौतुक वाटतं. विजयला ज्ञानदाकडून एक परवानगी मागायची असते. आपल्या दिलीप नावाच्या मित्राबरोबर लावण्या बघायला परगांवी जायचं असतं. दिलीप एक नंबरचा बाहेरख्याली, उनाड अविवाहित तरुण असतो. विजयला लावणी बघण्यात गुंतवून तो मित्राचा विश्वासघात करणार असतो. या कथेत लेखकानी स्त्रिचं एक आगळंवेगळं समजूतदार, धाडशी, चतुर असं रूप दाखवलं आहे. आपल्या शीलाचं रक्षण करण्यास समर्थ असलेली ज्ञानदा हाती कुऱ्हाड घेऊन दिलीपचा सामना करते. दुष्ट हेतू ठेवून आलेल्या माणसाला जख्मी करण्यासही मागेपुढे पहात नाही. विशेष म्हणजे घडलेला प्रकार पतीला सांगत नाही कारण त्यामुळे त्यांच्या मैत्रीला बाधा येईल, अनर्थ घडेल. चुकीचं पाऊल टाकू पहाणाऱ्या मित्राला सुधारण्यासाठी संधी देऊ पहाते. ज्ञानदा म्हणते, “वाईट मित्र म्हणजे नासलेला आंबा नव्हे टाकून द्यायला. ज्ञानदाच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो”.

         ‘गावगाडा’ या कथेत गावच्या राजकारणाचे यथोचित वर्णन आले आहे. अल्पशिक्षित असलेले गावचे पुढारी, त्यांचे हेवेदावे, ईर्षा, द्वेष, मत्सर या सर्वांना जपून गावच्या विकासाकडे कसे दुर्लक्ष करतात याचे चित्रण आहे. सत्तेसाठी खून, मारामाऱ्या या गोष्टी सहज स्विकारल्या जातात. निवडणुका जवळ आल्यावर सर्वसामान्य जनता आपला स्वतःचा काय फायदा होतो का ते बघतात. निवडणुकीपूर्वीच आपला कार्यभाग साधून घेतात व पुढील पाच वर्षाचं खाबुगिरीचं लायसन पुढाऱ्याना देतात. हे गावचं राजकारण या कथेत प्रकट झाले आहे.

       ग्रामीण भाषाशैलीचा उत्कृष्ट नमुना “चहा नको मग कडुनिंबाचा काढा करायला सांगू का घशाला चांगला असतो”. या कथेतील कुशाप्पा आत जावून वहिनीना नाश्ता करायला सांगतो व बाहेर येऊन सांगतो की वहिनी म्हणत्यात नाष्टा झाल्यावर मग चहा देते अशा गमतीदार वाक्यातून कथेला जिवंतपणा आलाय. लेखक म्हणतात, ”शहरातील अर्धा कप चहा गावच्या लोकांना चहा पिल्याचं समाधान देत नाही. त्यांना कपबशी भरून चहा लागतो. पोह्यात खोबरं भरपूर लागतं हिमालयावर बर्फ पडल्याप्रमाणे”.

       ‘जाणती’ ही अस्सल ग्रामीण कथा आहे. सदाचं लग्न झालं. बायको घरात आली. पण सदाला तिच्याशी बोलता येत नाही कारण त्याचं घर छोटं एका खोलीचं होतं. आईसोबत राहणारा सदा घुसमट होऊनही आईला कांहीं बोलू शकत नाही. तो मित्रांना म्हणतो, “आप्पा या जगात कुणाची तर आई लेकाच्या संसारात आडवी पडते का?” माझं लग्न व्हावं म्हणून तिनं पाहण्या पैचं उ़बरं झिजवलं. लग्न झाल्यावर मला हजारदा म्हणाली सदा मला गावात गमत नाय, मी रानात राहती पण हे न कळण्याइतका मी दुधखुळा नाय, हयात असलेली आई घरात नसेल तर घराला घरपण नाय “पुढे तो म्हणतो, “सगळ्या गोष्टीत विनोद करणं, सगळं हसण्यावारी नेणं, ज्याला रहायला दोन खोल्यांचं घर नाही त्याच्या वेदना तुम्हाला काय कळणार, जो बायकोशी दोन शब्द बोलू शकत नाय त्याच्या भावना तुम्हाला कशा समजणार? आपल्या आईला अनाथाश्रमात ठेवणाऱ्या मुलापेक्षा आपल्या आईसाठी देवळात झोपणाऱ्या सदाला स्वीकार”. नाग्याचं पात्र या कथेत विनोदांची पेरणी करतं त्यामुळे कथा विनोदी, समाजप्रबोधन करणारी वाटते. कथेचा शेवट बहारदार आहे.

       ‘मंजुळा’ ही कथा बालविवाह केल्यामुळे एखादी उमलू पहाणारी कळी अवेळीच कशी कुस्करली जाते हे सांगणारी आहे. व्यसनाधीन झालेला बाप, जिद्दीने अपार कष्ट करून संसाराचा गाडा चालविणारी आई, दीदीवर मायेचा वर्षाव करणारा अल्लड भाऊ लेखकांनी मोठ्या ताकतीने आबा, पार्वती, मंजुळा आणि सोन्या यांच्या रूपात वाचकांसमोर उभा केला आहे. मंजुळा अभ्यासात हुशार असते. कविता करण्याची तिला आवड असते. वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन ती नंबर काढत असते. जिल्ह्यात प्रथम क्रमांक काढून उत्तीर्ण होण्याची तिची क्षमता असते. अशी अष्टपैलू मंजुळा परिस्थितीमुळे, आईवडिलांच्या इच्छेखातर लग्नास मूकसंमती देते. गरीब गाय बनून लग्न करते व सासरी जाते. बरोबरीच्या मुली शाळेत व क्लासला जाताना पाहून मंजुळाच्या आईचं काळीज तिळतिळ तुटतं पण व्यसनी नवऱ्यापढे तिचे कांही चालत नाही. सासरी गेलेल्या मंजुळाला माहेरी आणण्यासाठी गेलेल्यांनी विनवणी करूनसुद्धा तिची सासू तिला माहेरी पाठवत नाही. त्या प्रसंगी सासूबद्दल म्हटले आहे ‘ओल्या हातानं हात घातला तर वासरू नसलेल्या गायीलाही पान्हा फुटतो पण या बाईला पाझर फुटला नाही’. सोन्यानं दीदीला माहेरी येण्यासाठी केलेले संभाषण काळजाला भिडणारे आहे. मंजुळा आईला म्हणते, “आई, तू सांगितलस तर मी मरणाला बी माळ घालेन”. अशा वाक्यानी कथेला साज चढला आहे.

       मंजुळा म्हणते, ‘अपुऱ्या वयात आणि कमी शिक्षणात लग्न झालेली मुलगी म्हणजे फाटकी चिंधी असते. ती गरज नसताना कुठल्या कोपऱ्यात पडली आहे. याची जगाला फिकीर नसते. जगात कुठल्याही मुलीचं लग्न अपुऱ्या वयात आणि कमी शिक्षणात होवू नये.’

          ‘गावधोंड’ ही कथा ‘सावकारी पाश, करी कुटुंबाचा विनाश’ हे स्पष्ट करणारी आहे. ग्रामीण भागात व काही प्रमाणात शहरी भागातसुद्धा गरीब लोक आपल्या गरजेसाठी सावकाराकडून कर्ज घेतात. दुर्दैवाने यातील बरेच लोक निरक्षर असतात. सावकार लोक या अडाणीपणाचा फायदा घेतात. दरवर्षी अव्वाच्या सव्वा व्याज वसूल करतात. मुद्दल कधीच फिटत नाही आणि शेवटी कर्जदाराची, जमीन, घर अशी स्थावर मालमत्ता जप्त करतात नव्हे तर बळकावून बसतात व त्या कुटुंबाला देशोधडीला लावतात.

       काही लोक इर्षेपोटी लग्न, बारसे, वाढदिवस इत्यादी समारंभ थाटामाटात करण्यासाठीही कर्ज काढतात व अनावश्यक खर्च करतात. कर्जबाजारी होतात. ग्रामीण भाषेत लोकांना रीन काढून सण करण्याची सवय असते. हौसेपोटी व इर्षेपोटी काढलेल्या कर्जाची आयुष्यभर फेड करत बसतात व मेटाकुटीला येतात. या विनोदी कथेत लेखकांनी शिक्षक समाजपरिवर्तन करु शकतो. शिक्षक विद्यार्थ्यांमार्फत उद्बोधन पालकापर्यंत पोहचवू शकतो. समाजातील व्यसनाधीनता घालवू शकतो हे विधान  पटवून दिले आहे.

       या कथेतील सर आनंदाने हात जोडून म्हणाले, “हे शिक्षकांचं कर्तव्य असतं पण इथून पुढे लक्षात ठेवा. ऐपत नसता मोठी लग्नं करु नका, नवस करून बोकड कापून खर्चात पडू नका, मोठमोठे वाढदिवस घालू नका, दारू पिऊ नका ते पैसे मुलांच्या शिक्षणासाठी ठेवा. देव कधी भक्ताला कर्जबाजारी हो म्हणत नाही. श्रद्धा व अंधश्रद्धा ह्यातील अंतर ओळखा”. अशाप्रकारे लेखकांनी या कथेतून समाजपरिवर्तनाचा मार्ग दाखविला आहे.

        ‘तरणाई’ या कथेतील तरूणाई भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ न मानता प्रेमाच्या गावी जाते. तिथेच त्यांची फसगत होते. तरूणाईला सबकुछ झूठ वाटते. स्वतःचे पोट भरण्याइतकेही स्वावलंबन नसताना, ऐपत नसताना, झेपत नसताना प्रेमात पडतात व स्वतःच्या ध्येयापासून शेकडो कोस दूर जातात. या कथेतील तरुणाईचे प्रतिनिधित्व करणारा महेश बारावीला केंद्रात प्रथम येतो. आईवडिलांच्या अपेक्षा उंचावतात व त्याला शिक्षणासाठी शहरात पाठवतात. महेश मित्रांच्या सहाय्याने शहरी जीवनात प्रवेश करतो. शहरी वातावरणात बावचळतो. एक मैत्रीण दोस्त म्हणून जवळ येते आणि महेश तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागतो. ती जेंव्हा त्याचे प्रेम नाकारते तेंव्हा तो बाण लागलेल्या पक्षाप्रमाणे घायाळ होतो. पुन्हा एकदा तिळगूळ देऊन मैत्री जोडण्याचा प्रयत्न करतो. ती त्याच्या पाया पडते आणि पाया पडण्याचा अर्थ महेशने काढला की तिने माझ्या प्रेमाचा स्वीकार केलाय, त्याला आनंद होतो तो मित्रांना पार्टीही देतो व नंतर कळतं की ती त्याच्या मित्रांच्याही पाया पडली आहे. महेशची घोर निराशा होते. या कथेत एक नवीन म्हण वाचायला मिळाली ‘दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान, आपण विसरतो आपले भान.’

        ‘माधवी एक सत्यकथा’ या कथेतील माधवी शहरी वातावरणात वाढलेली असते. लग्न झाल्यावर खेड्यात राहणाऱ्या वसंतच्या कुटूंबाचा तिला दोन दिवसातच वीट येतो. लग्न झाल्यावर पूजा होईपर्यंत राहण्याचा आग्रह सासरचे लोक करतात पण ती त्यांना न जुमानता शहरात निघून जाते. दोन खोल्यात संसार मांडते. कांही दिवसानी तिला एकटेपणाचा कंटाळा येतो. त्याचवेळी कोरोना महामारी सुरु होते. प्रथम माधवीच्या आईवडिलांवर कोरोनाचं संकट येतं. ती त्या प्रसंगात भावाला मदत करते पण जेंव्हा तिच्यावरच कोरोनाचं संकट येतं तेंव्हा भावाने त्याच्या घरी येण्यासाठी परवानगी दिली नाही. माधवीने सासरच्या लोकांना दुखवले होते पण अशा प्रसंगी सासू सासऱ्यानी तिच्या औषधोपचारासाठी सोनंनाणं विकलं, जनावरं विकली, आयुष्यभराची सारी कमाई दोन -तीन लाख खर्च केले आणि माधवीला वाचवले. तिच्या सासूसासऱ्याना जेंव्हा कोरोना झाला तेंव्हा त्यांच्या जवळ कांहीच नव्हते. औषधोपचाराविना ते मरण पावले. बिचारी कांचीही मरण पावली. काचीचं पात्र लेखकानी फार खुबीने मांडले आहे. ती वेडसर वाटते पण तिचं शहाणपण शहाण्याला विचार करायला लावतं. या कथेत खेड्यातील लोकांचा मोठेपणा आणि शहरातील लोकांचा कोतेपणा दिसून येतो.

         ‘बारा गावचं संचित’ या कथासंग्रहातील सर्वच कथा रंजक व विनोदी शैलीत लिहिलेल्या. हे विनोद गरिबाच्या फाटलेल्या संसाराचं खरंखुरं चित्रण करणारे आहेत. शेतकऱ्यांच्या व्यथा वाचकांच्या डोळ्यात अश्रू जमा करणाऱ्या आहेत. कथेतील पात्रे वाचकांच्या ओळखीची
 
       वाचकांशी हितगूज करणारी आहेत. कठिणातील कठीण परिस्थितीतही समाधानानं संसार करणारी माणसं कथेत भेटतात. त्यांच्या जीवनावरील प्रेमाचं चिवट नातं वाचकांना मंत्रमुग्ध करतं. समाधानानं कसं जगावं याचा संदेश प्रत्येक पात्रातून मिळतो. आपल्या प्रामाणिक कष्टातून परिस्थितीला धीरानं तोंड देण्याचं सामर्थ्य सर्व कथावाचकांना मिळतं.कष्टाच्या जोरावर जग जिंकता येते असा ठाम विश्वास कथेत दिसून येतो. समाजातील वाईट लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. लेखकांनी कथातून सामाजिक विषमता, राजकारण यांच्यावर प्रकाश पाडला आहे. कथासंग्रहाच्या प्रत्येक पानावर लेखकाची समृद्ध प्रतिभा व अचूक निरीक्षणशक्ती दिसते.

       कथांची सुरुवात मनोरंजक व  उत्कंठावर्धक आहे उदा.’पूर्वेकडे नुकतंच तांबडं फुटण्याच्या मार्गावर होतं, गारठा मी म्हणत होता, थंडीनं अंग गोठून जातंय की काय, अशी प्रत्येकाच्या मनात शंका निर्माण झालेली. भल्या पहाटे उठून बायका स्वयपाकाचं निमित्त करून चुलीजवळ जाऊन बसलेल्या, आराला भाकरी लावायची सोडून जाळाला पाय लावण्यात प्रत्येक बाईला धन्यता वाटत होती.

       कथांचा शेवटही वाचकांच्या काळजाला भिडणारा आहे. उदा. कोसळणारा पाऊस हळूहळू कमी झाला, अंगावर दैवार घेऊन झाड न् झाड तृप्त झालं, पाखरांनी अंग झाडलं, कोकरांनी ओंडक्यावर उड्या मारल्या ओलितं सपार त्या शिवारात अंग निथळत उभा होतं. भिजलं दार तिनं अदबीनं उघडलं आणि दवानं भिजलेल्या गुलाबाच्या फुलासारखी खाली मान घालून ती घराच्या दिशेने चालू लागली. तिच्या मनाचं हलकंफुलकं पीस झालं होतं. ती धन्य झाली होती. तिच्या पतीचं प्रेम तिला उमजलं होतं, एका कळीचं फूल झालं होतं, ओला वारा तिच्या अंगावरुन गेला आणि सुगंधित झाला. निसर्गाशी एकरूप होऊन ती सुखावली होती.’ही उपमा लाजवाब आहे.

लेखकांना पुढील लेखनकार्यास खूप खूप हार्दिक शुभेच्छा ।

Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by jyubedatamboli

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

‘सोशल’ आक्रोशाचा दांभिकपणा!

Two card tarot