in

बशीर बद्र – खामोशी एका शायराची..

बशीर बद्र सरांना त्यांचा ख़ुदा आता नक्कीच दिसत असेल..

विख्यात शायर, कवी बशीर बद्र आजारी असल्याचं ऐकून वाचून होतो. मध्यंतरी काही नतद्रष्ट लोकांनी त्यांच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल केली होती, वास्तवात ते गंभीर आजारी आहेत.

नुकताच त्यांचा एक व्हिडिओ पाहण्यात आला, ज्यात बद्र सरांच्या पत्नी राहत बद्र, त्यांची शुश्रूषा करताना दिसल्या, बशीर सरांची यारदाश्त चांगली राहावी म्हणून त्यांच्या शेरो शायरीबद्दल बोलताना दिसल्या, बद्र सरांना डिमेन्शिया आणि अल्झायमरने ग्रासलेय.

त्यांचा भूतकाळ ते हळूहळू विसरत चाललेत, त्यांच्या माणसांची त्यांना ओळख लागेनाशी झालीय. त्यांचं स्वतःचं अस्तित्वही ते काही काळात विसरतील. त्यांचा जीव की प्राण असणारी शायरीदेखील त्यांच्या स्मरणनोंदीतून लुप्त होईल.

ते ब्लँक होतील. उरेल केवळ, त्यांची मंद गतीतली धडधडती नब्ज!

बशीर बद्र सरांच्या प्रकृतीच्या घसरणीचा वेग केवळ त्यांच्या शायरीमुळेच कमी आहे, कारण त्यांच्या पत्नी राहतजी, रोज त्यांच्याशी त्यांच्या शायरीविषयी बोलत असतात.

काही शेर त्या सुनावतात आणि आपल्या लाडक्या पतीने पुढचा शेर तोडक्या मोडक्या अल्फाजमध्ये फर्मावा म्हणून विनवत राहतात. राहत भाभी कधी कधी मतला सांगतात आणि पतीला पुढच्या पंक्ती सांगण्यासाठी हट्ट करतात.

मग बद्र सर, त्यांच्या आलम तनहाईच्या दुनियेतून बाहेर येण्याची धडपड करतात. इकडे तिकडे पाहतात, शून्यात नजर गढवतात. पत्नीकडे पाहतात, कसनुसे हसतात आणि मेंदूला ताण देतात, मग कुठे काही अल्फाज वा अख्खी पूर्ण पंक्ती त्यांना आठवते.

त्यांनी रदीफ़ बयान करताच राहतजींच्या चेहऱ्यावर समाधान विलसते. आपल्या प्राणप्रिय पत्नीला खुश पाहून मग बशीर सरांच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मितरेषा उमटते!

बद्र सर आता नव्वद वर्षांचे आहेत, माझ्यासारखे अनेक जण त्यांच्या शायरीवर प्रेम करत वाढले आहेत! त्यांच्या शायरीने अनेकांना दिलासा दिलाय, अनेकांना आधार दिलाय! राहतजी खऱ्या अर्थाने बशीर सरांच्या गझल झाल्या आहेत!

जी क्लीप, मी पाहिली होती त्यात त्यांच्या बेगमजान त्यांना जो शेर ऐकवत होत्या, त्याची पंक्ती अशी होती – ख़ुदा ऐसे एहसास का नाम है..,
ही पंक्ती त्या वारंवार सांगत होत्या आणि बशीर सरांना पुढची ओळ नाहीतर रदीफ़ ऐकवावा म्हणून गळ घालत होत्या,
तीन चार रिपिटेशन्सनंतर बशीर सरांना त्याची पुढची ओळ आठवली, ते काहीसे अडखळत उत्तरले – रहे सामने और दिखाई न दे!

आपल्या शोहरकडून शेर पूर्ण होताच लहान मुलांसारख्या त्या खुदखुदून हसल्या! बशीरजींच्या गालावरून हात फिरवत आपल्या कापऱ्या आवाजात त्यांनी संपूर्ण शेर अर्ज केला –
ख़ुदा ऐसे एहसास का नाम है
रहे सामने और दिखाई न दे..

बशीर बद्र सरांचा ख़ुदा त्यांच्या पत्नीच्या रूपाने त्यांची काळजी घेतोय, तो समोरच दिसतोय मात्र ते महसूस करू शकत नाहीत कारण ते या गोष्टींच्या पुढे गेलेत!

लौकिक अर्थाने, ते पाण्याची लिखावट वाचण्यास रवाना झाले आहेत, त्यांना ठाऊक आहे की, हरेक नदी हजारो वर्षांच्या कथा बयान करते! त्या कथांच्या, व्यथांच्या साम्राज्यात ते अलगद हरवून जातात!
अगर फ़ुर्सत मिले पानी की तहरीरों को पढ़ लेना
हर इक दरिया हज़ारों साल का अफ़्साना लिखता है..

एक नोंद सांगावीशी वाटते.
डॉक्टरसाब अगदी बेशकिंमती शेर सहजतेने सांगत असत, पैकी हा एक शेर विलक्षण रसाळ आहे-
अगर तलाश करूँ कोई मिल ही जाएगा
मगर तुम्हारी तरह कौन मुझ को चाहेगा..

हा शेर राहतजी, जेव्हा बशीर सरांना ऐकवत असतील तेव्हा ते राहतजींच्या प्रेम जाणिवांच्या परिघात, परिपूर्णतेने परतत असतील असे राहून राहून वाटते!

– समीर गायकवाड

नोंद 1 – बशीरसाबना एकुलता एक मुलगा होता, नुसरत त्याचं नाव. नुसरतच्या डोक्यात बालवयातच कवितेची ओढ होती, मात्र मीरत जाळपोळीत सर्वस्व लुटलं गेल्यानंतर बशीर सर व्याकुळ झाले होते. त्यामुळे मुलाने शायर कवी व्हावं असं त्यांना कधीही वाटलं नाही. परिणामी नुसरतच्या नज्मना त्यांनी कधी प्रेमाचा आसरा दिला नाही. याचे व्हायचे तेच परिणाम झाले, नुसरतला व्यावसायिक यश मिळण्यास फार मोठा कालावधी लागला. मुलाला उशिरा यश मिळाले म्हणून बशीर सर नाराज झाले नाहीत. त्यांना वाटलं सारं सुरळीत झालंय पण वास्तव तसं नव्हतं, प्रारब्ध काही वेगळंच होतं, नुसरत गंभीर आजारी पडला, तब्बल दशकभर तो आजारी होता. 2020 सालच्या फेब्रुवारीमध्ये त्याचं निधन झालं. बशीर आणि राहत, दांपत्य खचून गेलं. राहत भाभीना डगमगून चालणार नव्हतं, हळूहळू त्यांच्या पतीचा स्मृतीभ्रंश वाढत होता, त्यांना सावरण्यासाठी जगणं क्रमप्राप्त होतं. मुलाच्या मृत्यूने शोकविव्हळ झालेले बशीर बद्र एकांतात दुःखी राहू लागले जे की त्यांच्यासाठी हानिकारक होते. त्यांच्या पत्नीने त्यांना थोडेफार सावरले असले तरी काळजातली उदासी कधीकधी नकळत बाहर येई. बद्र सर लिहितात –

कभी कभी तो छलक पड़ती हैं यूँही आँखें
उदास होने का कोई सबब नहीं होता..

नोंद 2 – 1987 साली उत्तर प्रदेशातील मीरत शहरात सलग मार्च ते जून, चार महिने दंगली सुरु होत्या. हजारो घरे या दरम्यान जाळली गेली, साडेतीनशेहून अधिक लोक मारले गेल्याची अधिकृत आकडेवारी आहे. शहरातील हाशिमपुरा मोहल्ल्यातील तब्बल चाळीस मुस्लिम तरुणांना युपीच्या सशस्त्र पोलीस दलाच्या एकोणीस जवानांनी जबरदस्तीने पकडून नेलं. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये न्यायच्या ऐवजी गंगेच्या काठी घेऊन नेण्यात आलं; अत्यंत थंड डोक्याने या मुलांना अतिशय जवळून गोळ्या घालून ठार केले, सर्व तरुणांचे मृतदेह नदीपात्रात फेकून दिले. यापैकी वाचलेला एक तरुण पाण्यात पोहून नदीपार गेला, त्यानेच एफआयआरची नोंदवला. कॉँग्रेस नेते वीर बहादूर सिंह हे तत्कालीन युपीचे मुख्यमंत्री होते. न्यायाच्या नावावर तीस वर्षे कुचेष्टा केली गेली. 2015 साली यातील पीडितांच्या नातलगांना नुकसान भरपाई दिली गेली यावरून काय ते ओळखावे! असो. हा पोस्टचा मुद्दा नाहीये, या दंग्यात बशीर बद्र यांचे घर जाळण्यात आले. त्यांची अनेक हस्तलिखिते, डायऱ्या, पुस्तके आगीच्या भक्षस्थानी पडले, संसार उघड्यावर आला. डॉक्टरसाब व्यथित झाले. त्यांनी मीरत कायमचे सोडले आणि ते भॊपाळला स्थायिक झाले. या साऱ्या उद्विग्नतेच्या काळात त्यांनी तो शेर लिहिला जो त्यांची पहचान बनून गेला!

लोग टूट जाते हैं एक घर बनाने में
तुम तरस नहीं खाते बस्तियाँ जलाने में.. ..

ज्याचं जळतं त्यालाच ते बेहद्द कळतं, बाकी जग केवळ सहानुभूती देण्याशिवाय काही करत नाही. इतकं होऊनही ज्यांना द्वेष जारी ठेवावा वाटतो ते द्वेष करतच राहतात.. असो..

नोंद 3 – तसे तर त्यांनी त्यांच्या ख़ुदाला एक कैफियत त्यांच्या वयाच्या चाळीशीतच केली होती, ज्यात ते आपल्या परिस्थितीवर असे काही नाराज होते की त्यांच्या वेदना थेट काळजाला भिडतात..

ज़िंदगी तू ने मुझे क़ब्र से कम दी है ज़मीं
पाँव फैलाऊँ तो दीवार में सर लगता है..

बशीर सरांना त्यांच्या अंतिम कश्मकशचा अंदाज पूर्वीच आला असावा. अतिसंवेदनशील असणं त्रासदायक असतं..


नोंद 4 – काही शेर – 1971 च्या बांगलादेश स्वातंत्र्य युद्धाच्या कालखंडा दरम्यान बशीर बद्र यांनी लिहिलेला एक शेर आजही अनेक राजकारणी व्यक्ती त्यांच्या भाषणात वापरताना दिसतात. डॉक्टरसाब लिहितात –
दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे
जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों..
आजघडीला त्यांचे प्रकृतीस्वास्थ्य खालवले आहे. त्यांचा एक शेर राहून राहून आठवतोय -.
उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो
न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाए ..
आजकाल लोकांना ईश्वर हवाय, मात्र माणूस कुणालाच नकोय. कुणी माणूस भेटलाच तर लोक त्याच्याशी अंजान असल्यागत वागतात. माणसांमध्ये माणूसपण त्यागण्याची जणू चढाओढच लागलीय. या कोलाहलात बशीरसाब स्वतःला देव म्हणवून घेण्याऐवजी माणूस म्हणवून घेण्यात धन्यता मानतात! –
इसीलिए तो यहाँ अब भी अजनबी हूँ मैं
तमाम लोग फ़रिश्ते हैं आदमी हूँ मैं …

आजच्या काळातलं एक कठोर वास्तव बशीरसाब बयान करतात – माणूस गवसणं आजकाल खूप कठीण झालंय. पुष्कळ शोधून देखील खरा माणूस मिळत नाहीये. –
घरों पे नाम थे नामों के साथ ओहदे थे
बहुत तलाश किया कोई आदमी न मिला..

Read More 

What do you think?

11 Points
Upvote Downvote

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

श्री रेणुका स्तोत्र

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

शिऊलीची फुलं – अलंकृताची लोभस नोंद!