in

प्रवास… गोष्टीपासून चित्रापर्यंतचा

महाराष्ट्रातील अनेक घरांत अगदी प्रामुख्याने आढळून येणारे वर्तमानपत्र म्हणजे लोकसत्ता. आणि या वर्तमानपत्रातील प्रत्येक चित्रातून घराघरांत पोहोचलेले व्यंगचित्रकार निलेश जाधव हे त्यांच्या कलेच्या माध्यमातून सर्वांच्याच परिचयाचे झाले आहेत. ही सर्व चित्रे घरात लोकसत्तातील विविध पुरवण्यांमध्ये नेहमीच पाहायला मिळतात पण तरीही तीच चित्रे जेव्हा एकत्र दादर येथील पु ल देशपांडे कला अकादमी मधील कलादालनात पाहिली तेव्हा त्या चित्राची जादू काही वेगळीच होती. प्रत्येक चित्रातील व्यक्तिरेखा आपल्याला काही सांगू पाहत आहे इतके जिवंत भाव त्या चित्रात होते… मग त्यातील व्यक्ती सामान्य असो वा असामान्य , ती तितकीच बोलकी असतात. हे सर्व पाहताना निलेशची चित्रे अशी कलादालनात पाहायला मिळणे ही खूप वर्षांपासूनची असलेली माझी इच्छा पूर्ण झाली असे वाटले. सुमारे १५० विविध विषयांतील चित्रे तिथे सजवलेली होती पण तरी हा त्याच्या कार्यातील महत्त्वाचा असा १५-२० % च भाग असावा. असे अनेक प्रदर्शने भविष्यातही पाहायला नक्कीच आवडेल. ही चित्रे कलादालनात मला वेगळी वाटली कारण नेहमी वर्तमानपत्रात एक कथा किंवा बातमी सोबत जोडून आलेल्या चित्राचा मागोवा घेणे सहज शक्य होते. चित्र अचूक समजूनही येते. पण इथे कलादालनात तीच चित्रे प्रेक्षकाला नव्याने विचार करण्यास भाग पाडतात. गोष्टीपासून चित्र आपण नेहमीच अनुभवतो पण चित्रापासून गोष्टीचा प्रवासही इतका सुंदर असू शकतो हे आज अनुभवले. 

या चित्र प्रदर्शनासोबतच निलेश जाधव यांनी आपल्या बालमैफिलीतील बालगोपाळांसाठी घेतलेली कार्यशाळाही खूप विशेष होती. पेन्सिल, रंग , कागद या सर्वांसोबत प्रत्येकाचा चित्रप्रवास अगदी लहान वयातच सुरु होतो, आणि त्याच वेळी जर योग्य मार्गदर्शन मिळाले तर नक्कीच ती कला एखाद्यात खोल रुजण्यात आणि उद्याच्या जगात बहरून येण्यास सफल ठरते. खरे तर दीड तासात कोणी मोठा चित्रकार बनू शकत नाही हे जरी खरे असले तरी त्या दीड तासात मिळालेले ज्ञान कुठेतरी मनात नक्कीच चांगला बदल घडवून आणण्यात यशस्वी ठरू शकते. अशाप्रकारे दीड तासात असा बदल घडवून आणण्यासाठी कार्यशाळेमध्ये नक्की काय घेतले जाईल याची उत्सुकता मलादेखील होती. मुलांचा निलेश दादा बनून आकारांचे महत्व मुलांना खूप छान प्रकारे समजावले. कुठल्याही चित्राचा मूळ पाया म्हणजे काय…आपल्या नेहमीच्या परिचयाचे वर्तुळ, त्रिकोण , चौकोन आणि रेषाच की. फक्त हे सर्व किती प्रमाणात , कशाप्रकारे आणि किती कलात्मकतेने वापरतात यावर त्या चित्राचे स्वरूप ठरत जाते. एका रेषेत केलेला बदल चित्रातील भावना किती वेगळ्या पद्धतीने बदलतात हे सोप्या ईमोजी सारख्या चित्रांतून समजून घेण्यात मुलांना खूपच मज्जा आली. सुरुवातीला ‘माझी चित्रे बोलतात ना तुमच्याबरोबर ?’ या प्रश्नावर गोंधळून गेलेली किलबिल आता प्रत्येक चित्रासोबत संवाद साधू लागली होती. चित्राची भाषा हळूहळू कळू लागली होती. निर्जीव वस्तू तर सोडाच पण प्राणी असो पक्षी असो वा माणूस…यांमध्ये सुद्धा आकार दडलेले असतात हे कदाचित या मुलांना नव्याने समजले असेल त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक नवा शोध लागल्याची भावना दिसून येत होती. आणि ते अधिक उत्साहाने यात सहभागी होत होते. बालमैफिल मधील चित्रे पाहताना अनेकदा हा प्रश्न मला देखील पडायचा कि एखाद्या प्राण्याचे किंवा मुलाचे हावभाव , आपल्या मनाचा वेध घेता येणारी कृती कशी बरे सुचत असेल , नक्की कुठून सुरुवात होत असेल किंवा कथेतील नेमका कोणता भाग चितारायचा हे कसे ठरवले जात असेल. आज प्रत्यक्ष गोष्टीचे चित्र होताना पाहिले आणि जणू माझ्या मनात गुंतलेली ही प्रश्नांची वीण उलगडत गेली . ढोल्या हत्ती आणि चिंटुकल्या मुंगीची गोष्ट इतक्या सहज सुंदर पद्धतीने चित्रात मांडली कि ती दोघेही  बोलके झाले होते आता. 

त्यानंतर एका लहानश्या छकुलीला स्टेज वर बोलावून चित्र काढण्याचा प्रवास कसा सुरु होतो, आणि पुढे ते चित्र कसे साकारत जाते याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहायला सर्वाना खूप आवडले. कौतुक त्या छकुलीचेही जी अगदी उत्साहात आणि उत्सुकतेने छानप्रकारे निःस्तब्ध उभी राहिली. लहान मुलांना आपल्या वयातल्या मुलांपेक्षा मोठ्यांवर होणारे प्रयोग पाहण्यात काही विशेष मज्जा येते आणि हे निलेशनी अगदी अचूक हेरले. मग काय, एका दादांना स्टेजवर बोलावण्यात आले. त्यानंतर सर्वानी त्यांच्या शरीयष्टीचा , हावभावाचा अभ्यास केला आणि पाहता पाहता त्यांचे व्यंगचित्र सर्वांसमोर प्रस्तुत झाले. त्यांनाही आणि मुलांनाही खूप आनंद झाला . असा हा छोटासा पण तितकाच दमदार कार्यक्रम संपत जरी आला तरी या कार्यशाळेतून मुलांनी नक्कीच काहीतरी घेतले असेल. आशा आहे त्यांना आता पटले असावे कि देवाने डोळे आणि हात नुसते मोबाईलला पाहण्यासाठी नव्हे तर आसपास दिसणारे व न दिसणारे असे अनेक आकार पाहून ,अनुभवून ते कागदावर उतरवण्यासाठी दिले आहेत. कदाचित या क्षणी तीच मुले आईकडे हट्ट करून मिळालेल्या मोठ्या कागदावर चित्राच्या साहाय्याने आपल्या मनाला, स्वतःला मांडत असावे. आणि जर खरेच असे एकाही घरी झाले असेल तर तीच या कार्यशाळेची खऱ्या अर्थाने झालेली सफलता आहे. 

– रुपाली ठोंबरे 

Read More 

What do you think?

Written by Rupali Thombare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

घुसमट

ट्रम्प, अमेरिका आणि जागतिक बदलाचे वारे – २ : ट्रम्प आणि इस्रायल