in

पैशाने साऱ्या गोष्टी मिळत नाहीत – गोष्ट मटकाकिंगची!

हितेश भगत हा कुख्यात मटकाकिंग सुरेश भगत याचा लाडाने बिघडलेला मुलगा. 2008 साली आपल्या वडिलांची सुपारी देऊन हत्या केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक झालेली. त्याची आई जया भगत ही देखील या प्रकरणी आरोपी होती. नंतर ते जामीन देऊन बाहेर आलेले. मात्र या खटल्याची सुनावणी सुरु असतनाच अघटित घडलेलं.

हितेशची स्वतःची एक ऐय्याशीची नि मस्तीची दुनिया होती.
डान्सबारच्या जगात त्याचं लाडाचं नाव होतं चिंटूसेठ!

बारमध्ये तो पैसे उधळायला यायचा तेंव्हा त्याची साईज अदनान सामीसारखी सुपरहेवीवेट होती. पुढे त्याने लिपोसक्शनची शस्त्रक्रिया केली. देहाचा आकार कृत्रिमरित्या घटवून घेतला.
मात्र 2014 मध्ये या शस्त्रक्रियेचा त्याला फटका बसला आणि पोटात नव्या व्याधी उद्भवल्या, त्यातच तो मरण पावला.
त्याचे तीन फेमस डान्स बार होते (कार्निव्हल – वरळी, बेवॉच – दादर, टोपाझ – ग्रॅण्ट रोड) जिथल्या मुलींना त्यानं मोकळ्या हाताने बिदागी दिली. असो…

भगत कुटुंबाने भलेही या जहरी पैशांवर ऐश केली असेल मात्र त्याची फळे त्यांना कालांतराने भोगावी लागली. मटक्यात पैसे हरणाऱ्या लोकांची पुढे जाऊन काय अवस्था होत असेल आणि त्यांच्या कुटुंबातील बायकोपोरांची जिंदगी किती बदहाल होत असेल असा प्रश्न त्यांना कधी पडला नसेल का? 

गुन्हेगारीतून येणाऱ्या पैशाची चटक लागली की माणूस नीतीमत्ता नावाची गोष्ट विसरून जातो हेच खरे!
मटक्यामुळे देशभरात लाखो कुटुंबे उध्वस्त झाली हे कुणीच नाकारू शकत नाही.
इथे नियतीचा न्याय वगैरे लिहून सुटका करून घेता येईल तरीही काही प्रश्न अनुत्तरित राहतातच.

त्याचाच एक किस्सा. घटना एप्रिल 2004 मधली.
ग्रँट रोडच्या टोपाझ बारमध्ये शैला नावाची सुरेल आवाजाची नि बऱ्यापैकी प्रौढ गायिका होती.

 
तिच्या गायकीचे गारुड झालेला एक पन्नाशीतला हर्टब्रोकन आशिक झळाळत्या उन्हाळ्याच्या रात्री तिचं गाणं ऐकायला आलेला.
त्यानं तिला एक गाणं फर्माईश म्हणून लिहून दिलं. ते गाणं होतं – “हमारी सांसो में आज तक वो हिना की खुशबू महक रही है …” ती वेगळी फर्माईश, त्या व्यक्तीचं वय, त्याची चेहऱ्यावरची तगमग आणि डोळ्यातलं अधीरपण गायिकेने लगेच ताडलं.
 
तिने जीव लावून गायलं. आशिक एकदम खुश झाला मात्र त्याचे डोळे भरून वाहू लागले. 
त्याचे अश्रू काही केल्या थांबत नव्हते.
त्यानं ते गाणं लागोपाठ गाण्याचा आग्रह लावून धरला. त्याची तामिली काही होऊ शकली नाही मात्र एका गाण्याआड पुन्हा ते गाणं गाण्याचा सिलसिला सुरु ठेवला. बघता बघता त्याचा खिसा रिकामा झाला.
आता आणखी फर्माईशसाठी पैसे उरले नव्हते.

त्या दरम्यान हितेश भगत हा तिथे अय्याशीसाठी आलेला आणि तिथली ती जगावेगळी आशिकी पाहून त्याला भरून आलं. त्यानं त्या व्यक्तीला मिठी मारली आणि शैलाकडे त्याच्या गाण्याची फर्माईश केली. 

त्यानं त्या दिवशी उडवलेले सगळे पैसे हितेशने आपल्या खिशातून दिले.
‘दिलजले बडे अजीब होते हैं, उनकी आह नही लगती. फिरभी उन्हे नाराज नही करते…’ हे त्याचे उद्गार होते…

हितेश बायकांवर पैसे उधळत असला तरी त्यांचं शोषण करत नव्हता, कारण तो ही एक दिलजला आशिकच होता.
वरळीला सिटी बेकरीच्या मागच्या गल्लीत त्याची अख्खी इमारत होती. इमारतीच्या खालीच त्याचे खाजगी सुरक्षा रक्षक असत. आत शिरणाऱ्यांची कसून चौकशी होत असे. दर शुक्रवारी संध्याकाळी एक भेळपुरीवाला या इमारतीत यायचा. इमारतीत असणाऱ्या सगळ्यांना ते जे खातील ते फ्री असे. त्याचे बिल तो द्यायचा. 

घरात नेहमी बनियानवर असणारा, गोऱ्या पान कांतीचा तो, त्याच्या दारातून कधीतरी दिसायचा. 
तो कुटुंबवत्सल होता मात्र पत्नीशी त्याची अनबन होती. काहीनी वावड्या उठवल्या की तो आपल्या बायकोचा छळ करायचा. कदाचित हे खरेही असेल. खरे-खोटे कळायला मार्ग नाही.

वास्तवात तो अस्सल प्रेमाला आसुसला होता आणि जग त्याच्या पैशांवर प्रेम करत होतं! त्याच्यापाशी अफाट दौलत होती मात्र त्याच्यावर अंतःकरणापासून प्रेम करणारं कुणी नव्हतं!

ज्याही स्त्रिया त्याच्या आयुष्यात आल्या त्या त्याची संपत्ती धनदौलत पाहून आलेल्या! याची त्याला जबर खंत होती.
रात्र झाली की त्याची पावले आपसूक बाहेर पडत. छमछमच्या ओढीने त्याला खेचून नेत.
 
ज्या डान्सबार कल्चरने देशभरातील अनेक गरीब होतकरू पोरांच्या आयुष्याची माती केली तिथे हा जायचा नि आपले शौक फर्मावयचा! त्याच्या कलेजाला तिथे ठंडक मिळत नव्हती हे उघड आहे.
मध्यरात्री तो घरी परतायचा.
 
एका अर्थाने त्याच्यापाशी सारं काही होतं ही आणि खूप काही नव्हतं ही!
नियती सर्वांना सर्व देत नाही, कुठेतरी, काहीतरी हात राखून ठेवतेच!

– समीर गायकवाड.

अवांतर नोंदी – गुन्हेगारी विश्व आणि वाम मार्गाने येणारा पैसा संबंधितास भौतिक साधनं मिळवून देऊ शकतो, पण खरं सुख आणि मनशांती नाही. हितेशसारखी माणसं सुखाला पारखी असतात म्हणून त्यांच्यावर दया दाखवता येत नाही कारण अनेकांचे संसार उध्वस्त होण्यास हे कारणीभूत ठरलेले असतात. पोस्ट वाचून त्याची बाजू मांडण्यासाठीचा हा खटाटोप आहे असे काहींना वाटू शकते मात्र ते अनुचित होय. अशांच्या दुनियेतही एक वेगळेच अंतरविश्व नांदत असते इतकेच प्रयोजन.

लोकांना वाटतं की डान्स बार बंद पडले नि कित्येकांचे संसार उद्ध्वस्त व्हायचे वाचले; या दलदलीत अडकलेल्या मुली समाजात, संसारात परतल्या असं कुणाला वाटत असेल तर मग निष्कर्ष चुकतोय. बार बंद पडल्यानंतर यातल्या बहुसंख्य मुली बंगाल, बिहार, युपी, एमपी, असम, झारखंड इथे गेल्या. काही विकल्या गेल्या, समाजाने त्यांना स्वीकारलं तर नाहीच मात्र लुटण्यात कसर ठेवली नाही. उघड्यावर ऑर्केस्ट्रा बारमध्ये नाचण्यास मजबूर झाल्या नि त्यांची लक्तरे झाली. 2015 नंतर लग्नांच्या वरातीत देखील या मुली दिसू लागल्या. आताशा मॉल्समधील विविध छुप्या व्यवसायापासून ते सभ्य वस्तीतील अलिशान अपार्टमेंट्समध्ये देखील त्या आढळू लागल्यात. शोषणाचे रस्ते बदललेले असतात शोषण संपलेले नसते!

Read More 

What do you think?

15 Points
Upvote Downvote

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

किस ऑफ लाइफ आणि आत्महत्या!

इस्राइल आणि जॉर्डन