पैगंबर साहेबांचे आज्ञाधारक सोबती
प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहिवस्सलम यांना जे अनुयायी आणि सोबती लाभले. पैगंबरसाहेबांचे हे सोबती कसे आज्ञाधारक होते याचा एक छोटासा दाखला देत आहे. एकदा प्रेषितसाहेब आपल्या मशिदीत शुक्रवारचे प्रवचन देत होते. लोक बसण्यासाठीच्या जागेच्या शोधात थोडेफार विखुरलेले होते. हे दृश्य पाहून पैगंबर साहेब प्रवचनादरम्यान एकदम उद्गारल, ‘बसून घ्या’ हे ऐकताच जो माणूस ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी जमिनीवर बसला. नंतर पैगंबर साहेब म्हणाले, ‘मला असे म्हणायचे होते की… जागा शोधून लवकर बसून घ्यावे’ परंतु सोबती यांना वाटले की, बसण्याच्या आदेशाचा अवमान केल्याने जणू काही ईश्वरी प्रकोपाला सामोरे जावे लागेल.
दुसरे उदाहरण मदिनेत एक बागायतदार सोबती आपल्या खजुराच्या बगिच्यात खजुराच्या फुलांचे संक्रमण करीत होते. जाताना पैगंबर साहेबांची नजर त्यांच्या या कामावर पडली. त्यांनी सहज विचारले, ‘काय असे करणे जरूरीचे आहे?’ हे ऐकताच त्या गृहस्थाने संक्रमण करण्याचे काम स्थगित केले. नेमके त्या वर्षी त्यांच्या बागेचे उत्पन्न कमी झाले. पैगंबर साहेबांनी कारण विचारल्यावर त्यांनी सांगितले की, आपल्या म्हणण्यानुसार मी संक्रमणाचे काम थांबविले. प्रक्रिया पूर्ण न झाल्याने उत्पादनावर प्रभाव पडला म्हणून पीक कमी आले. हे ऐकताच पैगंबर साहेब म्हणाले, ‘मी तर तुझ्या कामाबद्दल सहज विचारले होते की, हा काय प्रकार आहे? काम थांबवायला थोडेच सांगितले होते. शेतीच्या कामात तुम्ही आपला अनुभव वापरीत जा.
जुलै ६३० मध्ये तबूकचे युध्द रोमच्या कारस्थानामुळे या नवनिर्मित समाजावर लादले गेले. दक्षिणेपासून उत्तरेकडील खूप लांबचा प्रवास, उन्हाळ्याचे दिवस, अत्यंत खराब हवामान आणि त्यात खूप वाईट आर्थिक परिस्थिती पैगंबर साहेबांनी युध्दसामग्रीसाठी मदतीचे आवाहन केले. प्रेषित साहेबांच्या सेवेत लोक आपापली मदत घेऊन धावले. जी वस्तू ज्या व्यक्तीकडे होती त्याने ती पैगंबर सोहेबांच्या सेवेत अर्पण केली. हजरत उस्मान खूप श्रीमंत होते. त्यांनी आपल्या मिळकतीमधून एक चतुर्थांश इतकी रक्कम युध्द सामग्रीत दिली. याप्रसंगी हजरत उमर यांनी बाजी मारण्याचे ठरविले. त्यांच्यात आणि हजरत अबूबक्रमध्ये नेहमी चुरस असायची. उमर यांनी मागेपुढे न पाहता आपल्या संपत्तीचे दोन भाग केले. आणि निम्मी रक्कम पैगंबर साहेबांच्यापुढे आणली. मुला-बाळांकडून विचारल्यावर म्हणाले की, निम्मा माल अल्लाह आणि त्यांच्या प्रेषितांचा व निम्मा माल घरच्यांचा. आज त्याच्यापुढे कुणीच जावू शकत नव्हता. इतक्यात हजरत अबूबक्र त्या ठिकाणी पोहचले. त्यांच्यासमवेत रोख रक्कम, जिन्नस, सोन्या-चांदीची नाणी, हत्यारे, घोडे, खेचर, गाढव, उंट आदींनी लादलेला ताफा होता. हे पाहून पैगंबरसाहेब म्हणाले, ‘कुटूंब आणि परिवाराची काळजी घेणे अत्यावश्यक आहे’ हे ऐकून हजरत अबूबक्र सिद्दीक म्हणाले, ‘प्रेषितसाहेब, तुमच्यामुळे चंद्र आणि सुर्य प्रकाशमान आहेत. तुमच्यामुळे संसाराची निर्मिती करण्यात आली. जसे फुलाला बुलबुल आणि समईसाठी परवाना पुरेसा आहे, मी पण आपल्या घरात अल्लाह आणि त्यांच्या प्रेषितांचे नाव सोडून आलो आहे’ असे होते पैगंबरसाहेबांचे अनुयायी.
हजरत मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहिवस्सलम रमजान महिन्याच्या आगमनाचे स्वागत दोन महिन्या आधीपासून करायचे. रज्जब आणि शाबान हे ते दोन महिने होत. रज्जबचा महिना आला की पैगंबर साहेब उपवास ठेवायला सुरूवात करायचे. जास्तीत जास्त कुरआन पठण, जप, अधिक नमाज आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उपवास करायला सुरूवात करायचे. पैगंबर साहेबांचे अनुकरण त्यांचे सोबती म्हणजेच सिहाबी हमखास करायचे. त्यामुळे रमजानच्या आगमनाचे आणि त्याच्या स्वागताचे एक उत्साही वातावरण तयार व्हायचे.
पैगंबर साहेब अत्यंत दयाळू सवलतीवर निगा राखणारे होते. ही गोष्ट, त्यांच्याकरिता अत्यंत आनंददायक होती की, लोक त्यांचे अनुकरण करीत आहेत. परंतु मानवहितामुळे ते या दोन महिन्यात अधूनमधून उपवास करण्याचे टाळायचे कारण त्यांचे कथन आणि कृत्यच नंतर शरीअतमध्ये म्हणजे इस्लामी कायद्यामध्ये परावर्तित होणारे होते. लोकांना असे वाटू नये की रज्जब आणि शअबानचे दोन महिने सुध्दा उपवासाचे महिने आहेत. म्हणून या दोन महिन्यात ते अधून मधून उपवास खंडित करायचे. अल्लाहचा आदेशही तसाच होता.
पैगंबर साहेबांचे हे कार्य तंतोतंत करणारी मंडळी आजही मुस्लिम समाजात आहेत. ही माणसे केवळ उपवासच नव्हे तर बाकीच्या सर्व इबादती म्हणजे उपासना अत्यंत उत्साहात करतात. त्यांच्या या इबादती त्यांच्याकरिताच नव्हे तर संपूर्ण मानवजाती व सृष्टीकरिता एक अनोखा उपहार आहे.


GIPHY App Key not set. Please check settings