✍️:डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी
पुस्तक परीक्षण
शब्दगंधाशी जडता नाते (काव्यसंग्रह )
कवी -राजकुमार दामू चौगुले.
प्रकिशक -अक्षरदीप प्रकाशन ,
हरिओमनगर रंकाळा (पश्चिम )’कोल्हापूर.
प्रथमावृत्ती- २६/१/२५
पृष्ठे- १०४
मूल्य – रु.१५०-/
‘शब्दगंधाशी जडता नाते ‘हा कवी राजकुमार चौगुले यांनी लिहिलेला कविता संग्रह पहिला वाचनात आला.सुंदर मुखपृष्ठ, मजबूत बांधणी, सुबक मांडणी यांनी परिपूर्ण असलेला हा काव्यसंग्रह वाचताना मनस्वी आनंद झाला. वाचकाच्या मनाची पकड घेण्यात हा काव्यसंग्रह यशस्वी झाला आहे.
कवी राजकुमार चौगुले हे हाडाचे शिक्षक व शिस्तप्रिय मुख्याध्यापक आहेत. नोकरीच्या कालावधीत त्यांनी ‘ जीवनदीप – शारीरिक शिक्षण कार्यपुस्तिका व नोंदवही इयत्ता नववी व इयत्ता दहावी साठी अशी दोन पुस्तके प्रकाशित केली आहेत. यावरून त्यांची शारीरिक शिक्षणाबद्दलची अभिरुची दिसून येते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना असलेली तळमळ स्पष्ट होते. म्हणूनच ‘ऐकशील का ‘ या कवितेत विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणतात “।पोपटपंची ज्ञानाने शाना कधी होशील का ?”कवी राजकुमार चौगुले यांनी विविध विषयांवर कविता लिहिलेल्या आहेत. त्यांच्या कवितांचे विषय आहेत निसर्ग, प्रवासवर्णन, शेतातील पिके, विद्यार्थी, समाजस्थिती, राजकारण, जीवनसाथी, नातवंडे, जीवनविषयक तत्त्वज्ञान इत्यादी.हे सर्व विषय पाहता असे दिसून येते की कवी एक आदर्श शिक्षक, कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक, कुटूंबवत्सल पिता, समजूतदार पती,कष्टाळू शेतकरी, संयमी नागरिक व प्रेमळ आजोबा आहेत. कवितांचे वाचन करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू उलगडतात.
सेवानिवृत्तीनंतर मातीतून मोती पिकवत असताना त्यांच्या हाती शब्दांचे मोती आपसूकच हाती आलेले आहेत. त्या मोत्यांची सुरेख मांडणी करून त्यांनी ‘शब्दगंधाशी जडता नाते’ हे सुंदर शब्दशिल्प तयार केले आहे.
‘आगमन मान्सूनचे ‘ या कवितेत ते म्हणतात,
रिमझिम बरसत
मान्सून आला
पाहूनिया मृगधारा
बळीराजा सुखावला
या कविता संग्रहातील सर्वच कविता सहजपणे अंतर्मनातून सहज बाहेर पडल्या आहेत. त्यात कुठेही कृत्रिमता नाही कवीच्या मनीचे भाव प्रांजळपणे व्यक्त झाले आहेत.
आजकाल सर्वच लोक पर्यटनाला जातात , निसर्गसौंदर्याचा आनंद लुटताना फोटो काढून स्टेटसला लावण्यातच धन्यता मानतात. सरांनी पर्यटनात निसर्गसौंदर्य डोळ्यानी टिपून ह्रदयात साठवून कवितेत मांडलय.
‘सुंदर काश्मीर ‘या कवितेत ते म्हणतात
सरीवर सर येते,
न्हाती धुती होते,
फूल फुलांच्या सुगंधाला.
भूल जीवाला पडते.
‘स्वप्न पुस्तकाचे’ या कवितेत कवी
म्हणतात
पुस्तके येतात स्वप्नात
बोलतात माझ्या कानात
सारखाच होतो हातात
शब्दगंध असे मुखात
‘शोध सुखाचा ‘ या कवितेत सरांनी समाजातील एक अलिखित सत्य मांडले आहे.
सुख शोधलं शोधलं
कधी नाही गवसलं
वाटलं सापडलं सापडलं
पण हुलकावणीच दिलं
सुख हे मृगजळ आहे, त्याचा मागे न धावता जीवनगाणे गातच राहिले पाहिजे हा कवींचा सकारात्मक दृष्टीकोन आहे.
‘हूं म्हण ‘या कवितेत ते म्हणतात
हूं म्हण लेका ,
कानी सांगतो जन्माची
रात ध्याड, राबून मुला
शाणं कसं कसं झाल्याची.
धर्माचे विडंबन न करता, मंदिरे बांधू नका , त्यापेक्षा ज्ञानमंदिरे बांधण्याचा सल्ला ‘गरज ‘या कवितेत कवीनी दिला आहे.
‘पैसा बोलतोय ‘या कवितेत पैशांच्या खेळात जीव गुदमरतो हे सांगितले आहे.
‘ घराचे घरपण ‘या कवितेत सौ.विषयी गोड तक्रार केली आहे. तिच्या सतत बोलण्याने घराचे घरपण जिवंत राहिल्याचे शेवटी त्यांनी कबूल केले आहे.
‘मी जगाचा पोशिंदा ‘या कवितेत शहरात राहणाऱ्या लोकांना उद्देशून म्हणतात
दररोजचे दूध तुला
गबाळ्याच्या गोठ्यातूनच येते
रोजची भाजी तुला
अडाण्याच्या शेतातूनच येते.
या कवितासंग्रहातील कांहीं कवितेत कवींनी गेयता आणली आहे. गाजलेल्या मराठी गीतांवर आधारित रचना केलेली आहे.
उदा.सुंदर काश्मीर- काळया मातीत मातीत तिफन चालते.
राजकारण- कशी नशिबानं थट्टा कशी मांडली.
साज – गाडी चालली घुंगराची
एकंदरीत हा काव्यसंग्रह उत्तम साहित्यकृती आहे.कवीचे मनापासून अभिनंदन व पुढील लेखनास हार्दिक शुभेच्छा।
GIPHY App Key not set. Please check settings