पवित्र कुरआन : सर्व मानवजातीसाठीचा ग्रंथ
रमजानच्या पवित्र महिन्यात कुरआनचे अवतरण झाले हे सर्वांनाच माहित आहे. पवित्र कुरआन हा एकमेव असा ग्रंथ आहे, ज्याच्या वाचकांची, अभ्यासकांची, अध्यन करणाऱ्यांची, पठण करणाऱ्यांची आणि विशेषतः मुखोद्गत करणाऱ्यांची संख्या जगभर मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक मशिदीमधून प्रत्येक नमाजमध्ये कुरआनचे पठण केले जाते. पहाटेच्यावेळी घराघरातून कुरआनचे पठण केले जाते. काही कुटूंबातून आई-वडिलांच्यासोबत लहान मुलेदेखील कुरआनचे पठण करतात. त्यांना यावेळी कुरआन पठणाची पध्दत, नियम, कायदे, उच्चारण, शिष्टाचार इत्यादी बाबींचे प्रशिक्षण देण्यात येते. प्रत्येक मशिदीतून कुरआन पठण शिकविण्याचे वर्ग दररोज भरविले जातात. कुरआनची मूळ भाषा अरेबिक असल्याकारणाने त्याच्या उच्चारणावर विशेष भर देण्यात येतो. काही विशेष वर्गातून त्याचा अर्थ व भाषादेखील शिकविण्याची व्यवस्था केली जाते.
पवित्र कुरआन एक आकाशी ग्रंथ आहे आणि दिव्यबोधामार्फत प्रेषित हजरत मुहम्मद सलेअल्लाहु अलैवस्सलम यांच्यावर अवतरित करण्यात आला आहे. कुरआन ईश्वरवाणी आहे. त्याला कुणी माणसाने ग्रंथित केले नसून खुद्द प्रेषित साहेबांनीदेखील लिहिले नाही. पवित्र कुरआनमधील शब्द न शब्द अल्लाहकडून आदेशात्मक स्वरूपात उतरला आहे. स्वतः कुरआन आपल्याबद्दल साक्ष देतो की, ‘कुरआन ईशवाणी व मार्गदर्शन असल्याबद्दल यत्किंचीतही शंका नाही’ असे दुसऱ्या खंडातील अलबकरा अध्यायात पाचव्या श्लोकात म्हटले आहे. कुरआन, अल्लाहकडून आलेला प्रकाश व सत्यदर्शी ग्रंथ आहे. त्याद्वारे लोकांना शांतता व सुरक्षिततेच्या पध्दती दाखविल्या जातात व त्यांना अंधारातून प्रकाशाकडे नेले जाते. पवित्र कुरआन एक समृध्दशाली ग्रंथ आहे.
कुरआन ईशवाणी आहे. या संदर्भात कुरआनमध्ये अनेक संकेत व अवाहने देण्यात आली आहेत. ‘कुरआन एका प्रतिष्ठीत प्रेषिकामार्फत सांगितलेला आहे. हे कोणत्या कवीचे काव्य नाही की, कुणा भविष्यकाराची वाणी नाही असे अलहाक्का अध्यायातील ४० ते ४३ व्या श्लोकात म्हटले आहे. पुढे एक आवाहन देण्यात येत आहे की, ‘कुरआन ईशग्रंथ आहे किंवा नाही यात जर शंका वाटत असेल तर त्याच्या समान एकच अध्याय रचून आणा.’अशा आवाहनांना चौदाशे वर्षाचा इतिहास आहे. रमजानच्या महिन्यात लोक कुरआनचे पठण करतात. त्या पठणाच्या स्वराने परिसर दुमदुमून जातो. तरावीहच्या नमाजमध्ये महिनाभरात संपूर्ण पठण करण्यात येते. कुरआनचा वर्षदिन साजरा करण्याची ही विधायक रीत होय.
पवित्र कुरआन अल्लाहकडून या पृथ्वीतलावर अवतरित होणारा अंतिम ग्रंथ असल्याकारणाने त्याची परिपूर्णता आणि उदारता विलक्षण आहे. तो सर्व मानवजातीला उद्देशून आदेश देतो, तर्क करवितो, बोलावितो, आकर्षित करतो. त्यांच्या कल्याणासाठीचे गुण शिकवितो आणि संदेश देतो. पवित्र कुरआनचे प्रबोधन सर्व मानवजातीसाठी असल्याची घोषणा वारंवार करण्यात आली आहे. ‘कुरआन मानवांना पुरेपूर मार्गदर्शन करणारा, सत्य व असत्य वेगवेगळे करून दाखवणारा ग्रंथ आहे’ असे अल्बकरा या अध्यायात १८५ व्या श्लोकात म्हटले आहे. कुरआन लोकांसाठी स्पष्ट व उघड तंबी आहे, तर अल्लाहचे भय बाळगणाऱ्यांसाठी मार्गदर्शन व उपदेश आहे. असे आलेइम्रान या अध्यायातील एकशे आडतिसाव्या श्लोकात म्हटले आहे. जी माणसे सत्याच्या शोधासाठी आणि मानसिक व आत्मिक शांतीसाठी सतत हैराण होत असतात, पवित्र कुरआन त्यांच्या शोध प्रवासाचे अंतिम चरण आहे व होऊ शकते. त्यांनी केवळ विश्वास ठेवून त्याचे अध्ययन केले पाहिजे. कारण ‘पवित्र कुरआनला अल्लाहने उतरविले आहे. अत्यंत कल्याणकारी व समृध्दी प्रदान करणारा ग्रंथ आहे. तसेच पूर्वीच्या ईशग्रंथातील सत्यताही प्रमाणित करणारा ग्रंथ आहे, असे अल्अनआम या अध्यायातील ९२ व्या श्लोकात म्हटले आहे.
माणसांना अनेक रोगांचा संसर्ग होणे शक्य आहे. शारीरिक रोगांपेक्षा मानसिक, नैतिक आणि आत्मिक आजार अधिक धोकादायक असतात. मनस्थिती, मनःशांती व मनःशक्तीचे पवित्र कुरआन प्रेरणास्थान आहे. ‘कुरआन मनाला बळकटी देणारा, सत्यज्ञान प्रदान करणारा आणि श्रध्दावंतांसाठी उपदेश देणारा ग्रंथ आहे’ असे हृद या अध्यायातील १२० व्या श्लोकात म्हटले आहे. कुरआन अरबी भाषेत उतरला आहे. त्यात लोकांना वक्र चालीपासून दूर ठेवण्यासाठी व त्यांना शुध्दीवर आणण्यासाठी विविध प्रकारे तंबी देण्यात आल्या आहेत.
पवित्र कुरआनमध्ये एक विलक्षण श्लोक म्हणजेच महावाक्य आहे. त्याचा मराठी अर्थ असा ‘ज्याने एखाद्या माणसाला कारण नसताना ठार केले त्याने जणू काही समस्त मानवजातीला ठार केले; आणि ज्याने कोणाला जीवदान दिले, त्याने जणू काही समस्त मानवजातीला जीवन प्रदान केले असे अल्माईदा या अध्यायात बत्तीसाव्या श्लोकात म्हटले आहे.काहीच आयती येथे नमूद केल्या आहेत. संपूर्ण कुरआनमध्ये अनेक ठिकाणी माणसांना आपल्या जीवनातील अनेक समस्यांचे समाधान शोधून देणारा हा एक वैभवशाली ग्रंथ आहे.


GIPHY App Key not set. Please check settings