’थरार अनुभवला’ हा लेख महाराष्ट्र टाईम्स (०६.०७.२०२३) या वृतपत्राच्या पुरवणीत प्रसिध्द झाला आहे.
रिव्हर राफ्टिंगचा थरार
जीवनात आपल्या सर्वांची वैशिष्ट्येपूर्ण अशी ध्येय असतात, काही मनात इच्छा आकांक्षा असतात. कागदावर वर जरी आपण ही लिस्ट ,यादी लिहलेले नसली तरी मनात मात्र कुठं तरी ती खोल दडलेली असते आणि वेळोवेळी आपल्या आठवण करून देत असते. अशीच माझी बकेट लिस्ट मोठी आहे. ती पूर्ण करण्यासाठी ची माझा प्रयत्न सुरु आहे. या बकेट लिस्ट मध्ये रिव्हर राफ्टिंग करण्याची इच्छा लिहून ठेवली आहे. मनात राहून गेलेल्या गोष्टींपैकी ही एक गोष्ट आहे. पाहिलेली स्वप्न जेव्हा पूर्ण होतात तेव्हा होणारा आनंद काही निराळाच असतो.
रिव्हर राफ्टिंग चे साहस करण्याची संधी मिळाली होती पण पाण्याच्या भितीने माझ्या कडून राफ्टिंग करण्याचे धाडस झाले नाही. आम्ही कॉलेजमधले मित्र ३० मार्च २०२३ रोजी कोलाड जवळील सुतारवाडी या गावातील एका मित्रांच्या फार्म हाउस गेलो होतो. तेथे रिव्हर राफ्टिंग करण्याची पुन्हा संधी चालून आली. सगळ्या मित्रांनी साठी गाठलेली असली तरीही काही मित्र रिव्हर राफ्टिंग करण्यास पटकन तयार झाले पण काही मित्र भितीने राफ्टिंगच्या सुरक्षेची चौकशी करु लागले. संध्याकाळी रिव्हर राफ्टिंगबद्दलची योग्य माहिती देण्यासाठी व जाण्याचे नक्की करण्यासाठी मंडळी भेटून गेली. राफ्टिंगची माहीती मिळाल्याने थोडा धीर आला. सुरक्षेबद्दलच्या प्रश्नांची योग्य उत्तरे मिळाल्यावर व सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिल्याने सगळ्यांनी राफ्टिंग जाण्याची तयारी केली.आम्ही आयुष्यातला पहिलाच रिव्हर राफ्टिंगचा अनुभव घेण्याचे ठरवले.
सकाळी साडेसात वाजता गावातून राफ्ट जीपवर चढवून ’कुंडलिका’ नदीच्या दिशेने निघालो. रोज सकाळी भिरा धरणातून एका गेटमधून ’कुंडलिका’ नदीत पाणी सोडले जाते. या नदीतील धरणातून सोडलेल्या पाण्याच्या वेगावर राफ्टिंग केले जाते. त्या दिवशी धरणातून दोन गेटमधून नदीत पाणी सोडल्याने पाण्याला वेग होता. जीपवरुन राफ्ट उतरवून नदीत सोडला. लाईफ़ जॅकेट चढवली व वल्हे घेतली. प्रशिक्षकाने राफ्टमध्ये बसण्याची सुचना केल्यावर आम्ही सगळे देवाचे नाव घेऊन राफ्ट्मध्ये पहिल्यांदा बसलो. पाण्यात जाईपर्यंत सगळेच शूरवीर होतो, पण ते दूरवर पसरलेलं पाणी बघून मनामधे हळूहळू भीती जमा होऊ लागली होती. प्रशिक्षक राफ्टमध्ये कसे बसायचे यापासून वल्हे कसे मारायचे याची माहीती देत होता.अपघात झाला तर न धाबरता शांत रहा .मी तुम्हाला पुन्हा राफ्ट्मध्ये घेणार याची खात्री मिळाल्यावर आमची थोडी भिती कमी झाली.
राफ्टने नदीचा किनारा सोडला. पाण्याच्या वेगाने राफ्ट वेगात पुढे जाऊ लागला. प्रशिक्षक सुचना देत होता. नदीचा प्रवाह वळणा वळणाने फेसाळत खडकातून मार्ग काढत वाहत होता. संथ पाण्यावर राफ्ट सरळ तरंगत पुढे जात होता. पण खडकाळ भागात पाण्याला वेग असल्याने राफ्ट देखील वेगात पाण्याच्या प्रवाहातून आपला मार्ग शोधून काढत असतो. त्यावेळी राफ्टींग किती साहसी खेळ असलेल्याची जाणीव असते. खळखळत्या प्रवाहातून जाताना राफ्ट खाली वर होतो. पाणी राफ्टमधे येते आपण पूर्ण भिजून जातो. त्यावेळी खूप भीती वाटते. रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवला. या राफ्टींग मध्ये चार (रॅपिड्स) ठिकाणी पाण्याचा प्रवाह आपली परीक्षा घेतो. प्रशिक्षकाने दिलेल्या सुचनेचे योग्य पालन केल्याने त्या परीक्षेत आम्ही सगळे मित्र पास झालो. आम्ही जेष्ठ असूनही आमच्या कामगिरीवर प्रशिक्षकखुष झाला. पुढे पाण्याचा प्रवाह शांत झाल्यावर आमच्या कडून प्रशिक्षकाने वेगवेगळे प्रकार करुन घेतल्याने मजा आली. पाणी संथ वाहत असल्याने राफ्ट शांतपणे प्रवाहात पुढे जात होता. आम्हाला पाण्यात पोहण्यास सांगितले. राफ्ट किना-याला घेत त्यांनी आम्हाला राफ्ट मधून सुरक्षित खाली उतरवले. राफ्टिंगचा आनंद घेतल्याने सर्व मित्रांनी प्रशिक्षकाचे आभार मानले. आमची सफर मस्त पार पडली.
माझ्या बकेट लिस्टमधली एक गोष्ट पूर्ण झाल्याने आनंद झाला. छोट्या छोट्या गोष्टींनी का होईना पण अजून ही माझी बकेट लिस्ट अजून भरलेलीच आहे. बकेट लिस्टमधली उरलेली स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीत आहे.
GIPHY App Key not set. Please check settings