in

ड्रॅक्युला – सैतानी दुनियेच्या अनभिषिक्त सम्राटाची जन्मकथा!


हॉरर, थ्रिलर सिनेमे पाहाणाऱ्या दर्दी रसिकास ‘ड्रॅक्युला’ माहिती नसावा असे होत नाही! ब्रॅम स्टोकरने ज्या काळात ड्रॅक्युला ही कादंबरी लिहिली तो व्हिक्टोरियन एरा होता. या कालखंडात प्रामुख्याने चार वर्ग होते – उच्च, मध्यम, श्रमिक आणि तळाशी असणारा निम्नवर्ग. या चारही वर्गांची विभागणी केवळ सामाजिक स्तरावर नसून आर्थिक स्तरदेखील त्यात अंतर्भूत होता. या वर्गवारीचे युरोपमध्ये बऱ्यापैकी सक्त आणि कठोर विधीसंकेत होते. व्यक्तीचा आर्थिक स्तर, त्याचा हुद्दा, शिक्षण यावरून त्याचा वर्ग ठरे. यामुळे सामाजिक देवाणघेवाण अगदी कमी होई, असे असले तरी पुरुष हवे तिथे तोंड मारत आणि स्त्रियांची कुचंबणा ठरलेली असे, मग ती कोणत्याही वर्गातली असली तरीही! एखाद्या उमरावाच्या पत्नीचे जीवन भलेही ऐश आरामात, आनंदात जात असले तरी व्यक्तीस्वातंत्र्याच्या बाबतीत तिचा आणि तळाच्या स्त्रीचा स्तर जवळपास समान असे. बाहेरख्याली पुरुषांना आपल्या अवतीभवती पाहून, त्या स्त्रियांच्या मनात कोणते विचार येत असतील यावर विपुल लेखन झालेय, मात्र त्यांच्या लैंगिक शोषणाविषयी बोलताना त्यांच्या लैंगिक गरजांविषयी तुलनेने कमी लिहिले गेलेय. ब्रॅम स्टोकरने हा मुद्दा बरोबर पकडला आणि त्याच्या मनात घोळत असलेल्या गोष्टी त्यात बेमालूम मिसळल्या.

ब्रॅम स्टोकरने ही कादंबरी का लिहिली हे जाणून घेण्यासाठी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात आणि त्या कालखंडात डोकवावे लागते. ब्रॅम स्टोकरचा जन्म नोव्हेंबर 1847 मधला. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्याप्रमाणेच त्याचाही जन्म डब्लिन शहरातला. क्लोंटार्फ येथील मॅरिनो क्रेसेंटमधील घरात तो जन्मला. हे घर आता ब्रॅम स्टोकर पार्क नावाने ओळखले जाते. त्याचे आईवडील अँग्लो-आयरिश होते. वडील अ‍ॅब्राहम स्टोकर हे सिव्हिल सर्व्हंट होते, तर आई शार्लोट या चॅरिटी वर्कर आणि लेखिका होत्या. ब्रॅमचे बॅप्टिझम इथेच झालेलं. पुढे जाऊन त्याने धर्माकडे तटस्थतेने पाहिलं.

स्टोकर हा सात भावंडांपैकी तिसरा होता, त्याचे बालपण अत्यंत कठीण अवस्थेत गेले. जन्मापासूनच्या पहिल्या सात वर्षांत तो एका अज्ञात आजाराने अंथरुणाला खिळून होता. तो चालू शकत नव्हता, त्याचा आवाजही नाजुक होता. आईशिवाय तो राहू शकत नव्हता. या काळात त्याच्या आईने त्याला आयरिश लोककथा सांगितल्या आणि विशेष म्हणजे त्यांच्या जोडीने काही भयावह गोष्टीही सांगितल्या. आईने अशा गोष्टी सांगाव्या म्हणून ब्रॅम हट्ट करायचा! या गोष्टींत कोवळ्या मुलांचे मृत्यू, दफनभूमी, सामूहिक कबरी आणि जिवंत लोकांना मृतांसोबत पुरले जाण्याच्या घटना आदींचा उल्लेख असायचा. आईने सांगितलेल्या गोष्टी चिमुकल्या ब्रॅमच्या डोक्यात खिळा ठोकावा तशा रुतून बसल्या. भविष्यातील त्याच्या सुपरनॅचरल हॉरर कथांचे बीज इथे रुजले गेले. ज्याप्रमाणे त्याच्या आजाराचे निदान झाले नाही त्याचप्रमाणे त्याच्या एकाएकी बरे होण्याचेही कारण कळले नाही. सातव्या वर्षी तो ठणठणीत बरा झाला. विशेष म्हणजे नंतर कधीही त्याला गंभीर आजार झाला नाही. मात्र या सात वर्षांत सतत आईपाशी घरी एका खोलीच्या कोपऱ्यात राहून तो एकांतप्रिय झाला, तसेच नैसर्गिक रित्या विचार करण्याची कुवतही त्याला आपसूक लाभली.

घरात प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर तो बेक्टिव्ह हाऊसच्या शाळेत गेला. पुढे जाऊन डब्लिनच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये त्याने प्रवेश घेतला. एमएपर्यंतचे शिक्षण तिथेच पूर्ण केले. खेरीज तो एक उत्तम खेळाडू होता. कल्पनाविश्वातील आणि वास्तव समाजातील सनसनाटी मागची कारणे त्याने एका शोध निबंधातून मांडली, साहित्याशी हा त्याचा पहिला स्पर्श होता! इथे त्याच्या आयुष्यात आणखी एक घटना घडली, त्याने वॉल्ट व्हीटमनशी मैत्री केली. वॉल्ट व्हीटमन हे तत्कालिन विख्यात अमेरिकन कवी पत्रकार निबंधकार होते. त्यांनी आपल्या खाजगी आयुष्यात स्वत:च्या लैंगिकतेविषयी कधी खुलासा केला नाही मात्र हे एलजीबीटीक्यूचे पुरस्कर्ते होते हे नक्की. त्यांच्या लेखनातून समलैंगिकता आढळते. त्यांनी लिहिलेल्या लिव्ह्ज ऑफ ग्रासमधली पुरुषांच्या देहरचनांच्या वर्णनांवर आणि लैंगिक व्यवहारावर कडाडून टीका झाली, त्यांना सरकारी नोकरी गमवावी लागली. मात्र ते झुकले नाहीत, त्यांनी आपली मांडणी आणि विषय आशय बदलण्यास नकार दिला. ब्रॅम स्टोकरचे त्याच्याशी समलैंगिक संबंध होते असा कोणताही पुरावा नाही मात्र त्या विषयावर त्यांची चर्चा झाल्याचे त्यांचा पत्रव्यवहार सांगतो. ड्रॅक्युलामधल्या लैंगिक वर्णनावर वॉल्ट व्हीटमनच्या लेखनशैलीचा पगडा त्यामुळेच जाणवत असावा.

1880 च्या सुमारास ब्रॅम स्टोकर, अभिनेता हेन्री आयर्विंगच्या संर्पकात आला. त्याने साकारलेल्या हॅम्लेटची कठोर ब्रॅमने चिकित्सा केली. ‘डब्लिन इव्हनिंग मेल’मध्ये तो नाट्यचिकित्सक म्हणून रुजू झाला. विश्वविख्यात लेखक ऑस्कर वाइल्डचा जिच्यावर जीव होता, त्या फ्लोरेन्स वॉलकॉमबरोबर त्याने लग्न केले आणि तो प्रसिद्धीच्या झोतात आला. या दरम्यान त्याची मैत्री, जेम्स ब्रॉडीसोबत झाली. हा माणूस विलक्षण बुद्धिमान, प्रतिभावान आणि विचारी होता. याने लिहिलेली ‘द डेव्हील्स मिस्ट्रेस’ ही सत्यघटनेवर आधारित कादंबरी त्या काळात चर्चेचा विषय झाली होती. या कादंबरीत इजाबेल गाउडी ह्या सतराव्या शतकातील खऱ्याखुऱ्या स्कॉटिश महिलेचे मुख्य पात्र होते. इजाबेलचे नाव अनेक जादूटोण्याच्या अनेक प्रकारात गोवलेलं होतं. तिने दिलेल्या कबुली जबाबानुसार सैतानाशी तिने संबंध ठेवले होते, त्याच्याशी जीवनमृत्यूचा करार केला होता. मानवी देहरुपाचे दानवी प्रतिकात रूपांतर करण्याचे कसब तिला अवगत होते. तत्कालीन कागदपत्रांनुसार तिला दैवी व अलौकिक शक्ती वश होत्या. तिचे वर्णन इतक्या रोमांचक आणि थरारक पद्धतीने केले गेलेय की आजही स्कॉटिश आणि ब्रिटिश लोककथांमध्ये व संशोधनात ती लोकप्रिय आहे. या सर्व गोष्टी ब्रॅम स्टोकरच्या पथ्यावर पडत गेल्या, त्याच्या बालपणापासून ते त्याच्या पन्नाशीपर्यन्त भुताटकी आणि सैतानी गोष्टी, कळत नकळत त्याची सोबत करत आल्या! त्या देखील विभिन्न रुपांत!

लंडनमधल्या जागतिक किर्तीच्या लिसियम थिएटरचे मॅनेजरपद ब्रॅमने तब्बल सत्तावीस वर्षे भूषवले. या काळातच व्हिटबीच्या चर्चचे अवशेष    व्हाईट हाऊसला त्याने भेट दिली. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांच्याशी त्याची भेट झाली. आर्थर कोनान डोयल, ओस्कर वाइल्ड, जेम्स अबॉट मॅक्नील व्हिसलर, हॉल केन या सारख्या दिग्ग्जजांशी त्याची मैत्री झाली. या काळात त्याने अनेक नाटके पाहिली, अनेक दिग्गजांचा अभिनय त्याच्या पाहण्यात आला. त्यातलं सार त्याच्या डोक्यात मुरत राहिलं! दरम्यान सलग कामानंतर 1890 मध्ये त्याने दीर्घ सुट्टी घेतली आणि गर्दीपासून दूर एकांताच्या शोधात तो थेट यॉर्कशायरमधील व्हिटबीच्या समुद्र किनाऱ्यावर मुक्कामास गेला. इथे जाण्यासाठी रेल्वे होती. व्हिटबीचे स्टेशन रात्रीच्या वेळी कसे भासत असावे, हे आपण ड्रॅक्युला सिनेमा पाहून इमॅजिन करु शकतो. असो. तर या समुद्र किनाऱ्यावर तो बराच काळ रेंगाळला. उत्तरेस समुद्र किनारा आणि पूर्वेस वळणावळणाच्या रस्त्याने वरवर जाणाऱ्या टेकड्या असा इथला गूढ माहोल. या टेकड्यांचा कातळ जिथे समुद्रास भिडतो तिथे एका विशाल सुळक्यावर चर्च आहे, मूळ चर्चची इमारत भव्य आणि विशाल होती. तीन शतकापासून तिचे अवशेष तिथे उभे आहेत, रात्रीच्या वेळी काळजात धडकी भरवण्यास ते पुरेसे आहेत. ब्रॅम स्टोकरच्या ड्रॅक्युलाची जी हवेली दाखवली आहे, तिचे रेखाचित्र आणि व्हिटबीच्या अवशेषात बरेच साम्य आहे!

इथे मुक्कामी असताना ब्रॅमला अनेक भयावह आणि सूचक स्वप्ने पडली. त्या स्वप्नांचे अर्थ लावण्यासाठी तो दिवसा सिनेमामधली हवेली  त्या परिसरात फिरायचा आणि माहिती गोळा करायचा. स्वप्नांच्या शृंखलेत एके दिवशी मानवी रक्त पिणाऱ्या प्राण्यांचे स्वप्न पडले आणि तो दचकून जागा झाला. इथे त्याच्या मनातला ड्रॅक्युला आकारास आला. अर्थात हाही एक कयासच आहेत, मात्र त्याच्या लेखन प्रेरणेशी अधिक जवळीक दाखवणारा आहे. या स्वप्नाविषयी त्याने अभ्यास करायचे ठरवले. स्टोकरच्या आधीपासून व्हॅम्पायरबद्दलच्या दंतकथा आणि कथा युरोपियन लोककथांमध्ये प्रचलित होत्या. डॉ. जॉन पोलिडोरी यांची ‘द व्हॅम्पायर’ आणि शॅरिडन ले फानू यांची ‘कार्मीला’ या सारख्या कथांचा त्याच्यावर प्रभाव पडला. याच ओघात त्याने ट्रान्सिल्व्हेनियाच्या इतिहासावर संशोधन केले. त्या अभ्यासा दरम्यान 15 व्या शतकातील वलेशियाचा क्रूर राजपुत्र, व्ह्लाड द इम्पेलर याच्याबद्दलची माहिती त्याच्या वाचनात आली. व्ह्लाडच्या क्रूर कथांनी त्याच्या मनावर गारुड केले. रोमानियन लोककथांचा अभ्यास करताना त्याचा परिचय ‘ड्रॅक्युल’शी झाला, हा एक रोमानियन शब्द होता, ज्याचा अर्थ होता उडणारा ड्रॅगन!

इथे ब्रॅमच्या आयुष्यात आणखी एक संयोग झाला, रोमानियन शब्द ‘ड्रॅक्युल’चा अर्थ ड्रॅगन होता आणि बायबलनुसार ड्रॅगन म्हणजे सैतान! ब्रॅमचा जुना मित्र जेम्स ब्रॉडी याने या संदर्भात पुरवलेली माहिती ब्रॅमच्या कामी आली. आपल्या कादंबरीसाठी त्याने ड्रॅक्युलचा शक्तिशाली मुलगा अर्थात ड्रॅक्युला हे पात्र नक्की केले. व्हिटबीवरुन परत आल्यावर त्याच्या डोक्यात एकसारखा ड्रॅक्युलाचा विषय घोळत होता. दीर्घ विचाराअंती त्याने कादंबरी लिहायला घेतली. 19 व्या शतकाच्या अखेरीस लिहिलेल्या या गॉथिक हॉरर कादंबरीला आजही त्या जॉनरमधील सर्वश्रेष्ठ कादंबरीपैकी एक गणले जाते.

ही कादंबरी पत्रे, जर्नल नोंदी आणि वर्तमानपत्रातील क्लिपिंग्जच्या मालिकेतून उलगडत जाते. जोनाथन हार्कर या 

तरुण इंग्रजी सॉलिसिटरला आलेले अनुभव स्टोरीबेस म्हणून दाखवलेत. हार्करचा प्रवास त्याला ट्रान्सिल्व्हेनियाला घेऊन जातो, जिथे तो गूढ काउंट ड्रॅक्युलाला भेटतो, जो एक रोमांचक आणि गूढ माहौल बनवतो. आधी आकर्षक भासणारा भवताल भीती, मोह आणि पिशाच्च जगताच्या अलौकिकतेच्या विषयांमध्ये खोलवर भिनत जातो. कादंबरीच्या सुरुवातीला जोनाथन हार्करच्या जर्नल नोंदी सादर केल्या आहेत, ज्या रिअल इस्टेट व्यवहारासंदर्भात काउंट ड्रॅक्युलाला भेटण्यासाठी त्याच्या प्रवासाची सुरुवात दर्शवतात. हार्कर पूर्व युरोपातील नयनरम्य लँडस्केप्समधून त्याच्या ट्रेन प्रवासाचे वर्णन करतो, ज्यामध्ये त्याला येणाऱ्या आव्हानांना सूचित करणारे भयानक वातावरण आणि स्थानिक अंधश्रद्धा अधोरेखित होतात. काउंटच्या किल्ल्यावर पोहोचल्यावर, हार्करला अस्वस्थता जाणवते, विशेषतः जेव्हा स्थानिक गावकरी चिंता व्यक्त करतात आणि त्याला वाईट आत्म्यांपासून संरक्षणात्मक गोष्टींचे आकर्षण दाखवतात. हार्कर ड्रॅक्युलाला भेटतो तेव्हा कादंबरीमधला संघर्ष सर्वोच्च स्तरावर जातो. वरवर विनम्र वाटणाऱ्या ड्रॅक्युलाचे आस्ते कदम, विचित्र आणि अस्वस्थ करणारे वर्तन समोर येते. रात्रीच्या वेळेसचे भास, भय आणि गूढ वाढत राहते. हे सर्व विलक्षण काफ्काएस्क आणि क्लॉस्ट्रोफोबिक पद्धतीने समोर येते, ज्यामुळे वाचक भयभीत होतो. सुरुवातीच्या प्रकरणांद्वारे हार्करला ड्रॅक्युलाच्या जगात अडकल्याची जाणीव करून देण्यासाठीचे जाळे प्रभावीपणे विणले आहे, ज्याद्वारे ड्रॅक्युलाच्या हळूहळू उलगडत जाणाऱ्या कथेसाठी एक भयप्रद गूढ बेस तयार होतो. कथेत पुढे काय घडते हे आपण सर्वांनी सिनेमांत पाहिलेय आणि कादंबरीतही वाचलेय.

बारकाईने पाहिलं तर असं ध्यानात येतं की, ब्रॅम स्टोकर हा वयाच्या सात वर्षांपर्यंत निदान न झालेल्या अनाकलनीय आजाराने अंथरुणास खिळून होता, बालपणीच त्याने एकांत अनुभवला, भुताखेताच्या गोष्टी ऐकल्या. तारुण्यात असताना त्याच्या मित्र वर्तुळातली लैंगिक अस्वस्थता त्याच्या नजरेतून सुटली नाही. वॉल्ट व्हीटमन ते जेम्स ब्रॉडी यांच्याबरोबरच्या चर्चा त्याच्या कामी आल्या. तो ज्या काळात जन्मला वाढला त्या काळातल्या सैतान कथा, लोक कथा यांचे त्याच्यावर प्रभाव पडलॆ. त्याला पडलेली स्वप्ने आणि त्या अनुषंगाने त्याने शोधलेली उत्तरे, व्हिटबीच्या समुद्र किनाऱ्यावर मुक्कामास असताना तिथल्या गूढ निसर्गाशी जुळलेले नाते त्याच्या पथ्यावर पडले. ट्रान्सिल्वानियन लोककथांचा अभ्यास करताना भेटलेला ड्रॅक्युल हे सर्व त्याच्या मनात घोळत राहिले. या सर्व रसायनातुन ब्रॅम स्टोकरचा ड्रॅक्युला जन्माला आला! 1840 ते 1900 या साठ वर्षांच्या व्हिक्टोरियन कालखंडातल्या समाजात मानवी स्थलांतर, स्त्रियांची लैंगिकता आणि आधुनिक विज्ञान विरुद्ध अंधश्रद्धा यांची घुसळण होत होती. किंबहुना यामुळेच ब्रॅमच्या ड्रॅक्युलामध्ये हे सर्व घटक इतक्या निखालसपणे एकजीव झालेत की त्यांचे स्वतंत्र अस्तित्व जाणवत नाही.

कादंबरी लिहिणे हा विनोद नाही, किरकोळ बाब नाही, त्यासाठी अभ्यास हवा, वैचारिक बैठक हवी. लिहिण्याचा सराव हवा. काय लिहायचेय याचा आराखडा हवा आणि त्यातले सर्व घटक मनात पक्के रुजलेले हवेत. ब्रॅम स्टोकरने ही कादंबरी एका रात्रीत लिहिली नव्हती, त्याच्या वयाची चाळीस बेचाळीस वर्षे त्यात कामी आली होती. तो ज्या काळात जगला त्यातला भवताल त्याला टिपता आला. त्याने केवळ भयप्रद लैंगिक वर्णनें केलेली नाहीत, पॉर्नच्या सीमेपर्यन्त नेणारी देहिक व्यवधानेही दूर केली. समाजातील अनेक गोष्टींचा मेळ घातला. आयुष्यात त्याच्या वाट्याला माणसं हा त्याच्या कादंबरी निर्मितीचा सर्वात मोठा प्लस पॉईंट ठरावा. ब्रॅमचा शेवट आर्थिक विवंचनेत गेला. अखेरची काही वर्षे त्याला झटके येत होते. त्यातच वयाच्या 64व्या वर्षी त्याचे निधन झाले. काही अभ्यासकांच्या मते त्याला सिफेलिसची बाधा झाली होती मात्र याची पुष्टी होऊ शकत नाही. ड्रॅक्युला हा विषय चांगला का वाईट या वादात न पडता ब्रॅम स्टोकरला ही कादंबरी का लिहावीशी वाटली याचे उत्तर देण्याचा हा प्रयत्न आहे. या सर्व गोष्टी अभ्यासताना, एक लेखक म्हणून हे सर्व अफाट आणि विलक्षण वाटले!

– समीर गायकवाड

नोंद – नायक जोनाथन हार्करला ड्रॅक्युलाच्या हवेलीकडे घेऊन जाणारी चालक विरहित बग्गी हा देखील जिज्ञासेचा विषय होता. एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभी लिहिलेल्या रॉबर्ट स्टीव्हन्सनच्या ‘द बॉडी स्नॅचर’मध्ये पहिल्यांदा अशी बग्गी आढळते. त्या नंतर जेम्स ब्रूडीच्या कादंबरीतही दिसते. तिचेच वेगळे व्हर्जन ब्रॅम स्टोकरच्या कादंबरीत आले.

Read More 

What do you think?

37 Points
Upvote Downvote

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

गोष्ट सुटकेसमध्ये ठेवलेल्या मृतदेहाची!

घुसमट