in

जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्याविषयीची एक नोंद..

जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं बालपण आयर्लंडमध्ये पांढरपेशी गरिबीत गेलं. त्यांचे वडील पेशाने कारकून होते, मद्याचा अंमल चढला की त्यांना आवरणे कठीण जाई. खेरीज ते काहीसे उदासीन स्वभावाचे होते. घरात रोज भांडणं होत, भांड्यांची आदळआपट चाले. नीरव शांततेच्या जागी किंकाळ्यांचा आवाज भरलेला असे.
या वातावरणातही शॉची आई, ल्युसिंडा गार्नी शॉ हिने आपला छंद लुप्त होऊ दिला नव्हता. ती अत्यंत प्रतिभावान गायिका होती. तिचा आवाज लोकांना भावविभोर करायचा. पण तिचं आयुष्य एका अपयशी लग्नाच्या सावटाखाली हळूहळू कोमेजत चाललं होतं आणि याचं तिला शल्य होतं.

दरम्यानच्या काळात त्यांच्या घरात एक संगीत शिक्षक येत असत; जॉर्ज वँडेल ली हे त्याचे नाव. हळूहळू शॉची आई त्याच्याकडे आकर्षित झाली. दोघांमध्ये आत्मिक जवळीक वाढली. जॉर्जच्या घरी शिसवी पियानो होता. आईची बोटे पियानोच्या कळांवरुन फिरू लागली की त्याचे मन भरुन येई. त्याला विलक्षण आनंद होई.

आईचे मन लागत नसले की ती पियानो वाजवते, हे जॉर्जला कळल्यापासून मात्र त्याच्या भावना बदलल्या. आईने पियानो वाजवला की त्याचं मन उचंबळून येई. जगातली सगळी दुःखे त्या स्वरांत विरघळून जात आणि त्याच्या मनातही दुःखाची झड लागे!

मात्र एके दिवशी त्यांच्या घरातलं संगीत मुकं झालं. त्या दिवशी जॉर्जच्या आईनं शेवटचं गाणं गायलं आणि तो झोपी गेल्यावर आपल्या दोन मुलींना सोबत घेऊन ती निघून गेली. आपल्या अबोल मायेचा दरवळ त्या रित्या घरात मागे सोडून ती निघून गेली, त्या बरोबरच जॉर्जचे शैशवही मौन झालं!

त्या रात्री जॉर्जला अचानक जाग आली, घरात आई आणि लाडक्या बहिणी नसल्याचे लक्षात येताच तो धाय मोकलून रडला. आईशिवायची त्याची पहिली रात्र होती ती! तिच्याविना ते घर जॉर्जला खायला उठलं. जॉर्ज तेव्हा सोळा वर्षांचा होता.

त्याला सावरणारं कुणीच नव्हतं! वडील मद्याच्या नशेत होते; आपलं घर आता कोसळणार असं जॉर्जला वाटू लागलं. पियानोदेखील भंगल्यासारखा भासू लागला. आईची तीव्र आठवण झाल्याने तो पियानोसमोर बसूनच शोकमग्न झाला होता.

‘जर संगीतात देव असेल, तर आई त्याच्याकडे का गेली?’ हा प्रश्न त्याच्या बालमनाला पडला! या प्रश्नाने जीवनभर त्याचा पिच्छा केला.

आपल्या एकुलत्या मुलाला आयर्लंडमध्ये मागे सोडून जॉर्जची आई लंडनला निघून गेली होती. पौगंडावस्थेतला शॉ आपल्या वडिलांसोबत त्या रिकाम्या घरात राहिला. तो दिवस-रात्र आपल्या आईची आठवण काढत असे.
एका पत्रात त्यांनी लिहिलं होतं – ‘माझ्या आयुष्यातील पहिली मोठी पोकळी त्या दिवशी निर्माण झाली. मी त्यानंतर कधीच त्या रित्या घरासारखं रितं काहीच अनुभवलं नाही.’

चार वर्षांनी ते लंडनला गेले आणि आईला भेटले. नंतरच्या काळात जॉर्ज विख्यात झाले असले तरी त्यांच्या लेखी, ते एका उदास शून्याचे मौनगीत गायचे, ज्याचा परीघ त्यांच्या एकट्यापुरताच सीमित होता.

जॉर्जची आई आता प्रसिद्ध गायिका नव्हती; तिचा आवाज पहिल्यासारखा राहिला नव्हता, चेहरा सुरकुतला होता, ती म्लान दिसत होती. ती निघून गेली त्याला दशके लोटली होती तरीही, त्या दिवशी तिच्या डोळ्यांत माया होती ज्यात अपराधाची छटा होती.

ते दोघे भेटले, शांतपणे बसून राहिले. आई आणि मुलगा एकमेकांकडे बराच वेळ बघत राहिले. आईचा हात आपल्या हाती धरून जॉर्ज तिच्या दुःखाचे कढ अनुभवत गेले.

तिच्या ओठांवर हलकीशी हालचाल झाली, ‘तू रागावला आहेस का, जॉर्ज?’
जॉर्ज कसनुशा चेहऱ्याने हसले.. कसेबसे ते बोलते झाले. त्यांच्या मनात चार वर्षांपासून ठाण मांडून बसलेले कैक प्रश्न कोणत्याही उत्तराशिवाय विरून गेले!

जॉर्जनी पुन्हा एकदा आईचे हात, हातात घेतले, त्यांना जाणवलं की, तिच्या बोटांत अजूनही संगीत थरथरत होतं.

त्या क्षणी त्यांना कळलं की, ती त्यांना सोडून गेली नव्हती; ती तर फक्त आपल्या सुरांच्या मागे निघाली होती. तिची वाटचाल अनंत काळाची होती.

त्यानंतर त्यांचा फार काही संवाद झाला नाही, किंबहुना आणखी संवादाची त्यांना गरजच नव्हती. त्यांची भेट खऱ्या अर्थाने मौनाच्या धगधगत्या भाषेत झाली.

पण त्या नि:शब्दतेत माफीनं आणि प्रेमानं भरलेलं एक अव्यक्त आलिंगन होतं, ज्याची अनुभूती एका आईला आणि एका मुलालाच येऊ शकते!

त्या रात्री मनातल्या गोष्टी शब्दांत उतरवण्यासाठी ते लिहायला बसले. पहिल्यांदाच शब्दांनी त्यांच्या डोळ्यांतले अश्रू पुसले.

त्यांच्या बहुतांश कलाकृतीमध्ये एखादा आर्त स्वर जाणवतो, ज्यात त्यांच्या आईच्या कोमल आवाजाचा आणि तिच्या अव्यक्त माफीनाम्याचा गंधार सामील असावा!

माणूस कितीही बुद्धिमान असो, त्याच्या हृदयात नेहमी एक ओलसर कोपरा असतो, जिथं आईचा आवाज अजूनही घुमत असतो.

विश्वविख्यात लेखक विचारवंत जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या लेखनाविषयी लिहिण्याची माझी पात्रता नाही, मात्र त्यांच्या लेखन प्रेरणेचा धांडोळा घेताना जे काही जाणवलं ते मांडताना असं लक्षात आलं की, अपवाद वगळता प्रत्येक कलावंताच्या मुळाशी खोलवर गेलं तर तिथे एक विलक्षण आर्त आणि टोकदार गोष्ट आढळते, जिने त्या व्यक्तीला आमूलाग्र बदललेलं असतं, त्या घटनेचे परिणाम त्याच्या कलाकृतीत आयुष्यभर डोकावत राहतात!

अकारण कुणी लिहू, बोलू वा काही घडवू शकत नाही! एखादी घटना, एखादा आघात त्याला कारणीभूत ठरतात! आयुष्याच्या वळणावर कोणत्या टप्प्यात काय घडते यावरून मग त्याची तीव्रता ठरते!

काही नोंदी – शॉ यांची आई त्यांना सोडून गेली तेव्हा तिचे वय पन्नाशीपार होते, म्हणजेच त्या परिपक्व होत्या. जाताना त्या मुलींना घेऊन गेल्या कारण आपला मद्यपी पती मुलींचा सांभाळ कसा करेल याची त्यांना चिंता असावी. मात्र मुलाला आपण सोबत नेऊ शकलो नाही याचे अव्यक्त शल्य त्यांना आयुष्यभर राहिले असावे. शॉ आपल्या आईकडे पाहताना तिरस्कारग्रस्त नजरेने न पाहता एका कलावंताच्या नजरेने पाहतात, ही बाब या सर्वात अधिक उदात्त आणि उत्तुंग वाटते!

शॉ, हे अकादमी पुरस्कार आणि साहित्यासाठी नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या दोन व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांना 1925 मध्ये त्यांना साहित्यासाठीचे नोबेल पारितोषिक देण्यात आले; पुरस्कार जाहीर झाल्यावर शॉ यांची प्रतिक्रिया अभूतपूर्व होती, ते म्हणाले – ‘डायनामाइटचा शोध लावल्याबद्दल मी नोबेलला माफ करू शकतो, परंतु मानवी रूपातील केवळ एक दानवच नोबेल पारितोषिक शोधू शकला असता”. त्यांनी पुरस्कार स्वीकारला मात्र पुरस्काराची रक्कम स्वीकारली नाही. लेखनातून मिळालेले पैसे पुष्कळ आणि पुरेसे आहेत असे त्यांचे तेव्हाचे उद्गार आहेत. नोबेल पुरस्काराची रक्कम, स्वीडिश नाटककार ऑगस्ट स्ट्रिंडबर्ग यांच्या साहित्यकृतींचे इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यासाठी वापरली जावी अशी सूचना त्यांनी केली. थक्क करणारे चिकित्सक पृथकरण ते करत असत, त्याचेच हे एक प्रतिबिंब!

शॉ यांचे शिक्षण अनियमित आणि विसंगत होते आणि ते वारंवार शाळा बदलत असत. 1865 ते 1871 दरम्यान, त्यांनी तीन वेगवेगळ्या शाळांमध्ये शिक्षण घेतले. बालपण आणि तरुणपणी त्यांनी आयर्लंडच्या नॅशनल गॅलरीत पुस्तके शोधण्यात बरेच तास घालवले. “माझ्या बालपणीचे प्रिय आश्रयस्थान” अशा शब्दांत त्यांनी गॅलरीचे आभार मानले. खेरीज त्यांच्या मरणोत्तर रॉयल्टीचा एक तृतीयांश भाग त्यांनी या गॅलरीला दिला, हा एक अविश्वसनीय उदार उपक्रम आहे ज्याने गेल्या सत्तर वर्षांत आयर्लंड नॅशनल गॅलरीत मोठे परिवर्तन घडलेय.

आज 2 नोव्हेंबर, आज शॉ यांचा स्मरणदिवस! वंदन!

#facebook #समीरगायकवाड #trending #blogger #mustread #goodread #threads #art #life #literature #साहित्य #sameergaikwad #blog #vlog #humanity #mankind #support #search #sameerbapu #समीरबापू #साहित्य #instagram

Read More 

What do you think?

11 Points
Upvote Downvote

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

शेवाळं

हे चाहूर आहे तरी काय?