डॉ.ज्युबेदा मन्सूर तांबोळी
फोटो:साभार गुगल
दोन भाऊ होते. साजिद व वाजिद नावाचे. दोघेही शेती करायचे. शेतात राब राब राबायचे. व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर गुजराण करायचे. असे बरेच दिवस गेले. नंतर नंतर पावसाच्या लहरीपणामुळे, निसर्गाच्या बदलत्या हवामानामुळे शेतीचे उत्पन्न घटू लागले. आर्थिक परिस्थिती हलाखीची होवू लागली. यावर काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे असे दोघांनाही वाटू लागले. त्यांना समजले की, येथून जवळच असलेल्या गावात एक शेतीतज्ञ आले आहेत. त्यांच्याकडे जावून सल्ला घ्यावा आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा. तो निश्चित तुम्हाला उत्पन्न वाढविण्याचे मार्ग सांगेल. दुसऱ्या दिवशी दोघेजण शेतीतज्ञाकडे गेले. त्यांनी त्यांची अडचण त्यांना सविस्तरपणे सांगितली. शेतीतज्ञांनी शेताची मशागत कशी करावी, जमिनीचा कस सुधारण्यासाठी सुपिक भागातील माती शेतात आणून टाकावी, बियाणे व खते कोणती व कशी वापरावीत हे सांगितले. पाणी कोणत्या सिंचन पद्धतीने द्यावे याचेही मार्गदर्शन केले.
साजिद-वाजिदनी वडीलोपार्जित जमिनीचा हिस्सा वाटून घेतलेला होता. दोघांच्या शेतीचे क्षेत्र सारखेच होते. शेतीची गुणवत्ताही सारखीच होती. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे दोघांनीही मशागत केली. सुपीक भागातील माती आणून टाकली. खते-बियाणे सारखीच वापरून गव्हाची पेरणी केली. तुषार सिंचन पध्दतीने पाणी दिले. औषध फवारणी एकाच दिवशी केली. गव्हाचे पीक चांगले आले. पण झाले काय साजिदच्या शेतातील गहू वीस पोती झाले तर वाजिदच्या शेतातील गहू पंधरा पोती झाले. दोघांचे क्षेत्र तेवढेच, मशागत सारखीच मग उत्पन्नात फरक कसा काय झाला.
त्यांनी परिचित असलेल्या एका आध्यात्मिक ज्ञान असलेल्या वयस्क व्यक्तीला याबाबत विचारले. ते म्हणाले, साजिदला मी ओळखतो. तो साध्या सरळ स्वभावाचा आहे. त्याची अल्लाहवर पूर्ण श्रध्दा आहे. तो शेतीत काम करताना मनात म्हणायचा माझ्या शेतात खूप गहू पिकू दे. त्यातला काही भाग मी गरीब गरजूना देईन. वाजिद तुझा स्वभाव आत्मकेंद्री आहे. गोरगरिबांना मतद करण्याची तुझी वृत्ती नाही. शेतात काम करताना तू मनात म्हणत होतास माझ्या शेतात खूप गहू पिकू दे. मी श्रीमंत होईन. गाडी, बंगला घेईन. यालाच म्हणतात जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. नियत (उद्देश) चांगली ठेवा. बरकत (समृध्दी) आपोआप येईल.
GIPHY App Key not set. Please check settings