in

जागरण -पुस्तक परिक्षण

जागरण (आत्मकथन) – पुस्तक परीक्षण

✍ डॉ. ज्युबेदा तांबोळी

                     
पुस्तक – जागरण
लेखक – भारत सातपुते
 प्रकाशनगर , लातूर
पिन कोड – 413531
प्रकाशिका – सुषमा भारत सातपुते
मांजरा प्रकाशन, लातूर 
पृष्ठे – 302   
मूल्य – 600/-रू.
प्रथमावृत्ती – 09 एप्रिल 2024
ISBN: 11205471035



       
       ‘जागरण’ हे लेखक भारत सातपुते यांचं आत्मकथन आहे. यामध्ये लेखकांनी बालपणापासूनचा गरिबीतील प्रवास ते नोकरीतील रिटायरमेंटपर्यंत चा संघर्षमय प्रवास प्रभावीपणे , दमदार शैलीत खुबीने मांडला आहे. ‘बालपणाचा काळ सुखाचा’असे म्हणतात पण तो सर्वांनाच सुखाचा नसतो कारण गरिबी काहींच्या पाचवीलाच पूजलेली असते. तशी लेखकांच्याही पाचवीला पूजलेली होती. संबळ, तुणंतुणं घेऊन, झोळी खांद्यावर अडकवून जागरण करणाऱ्या, फिरस्ती कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अशाही परिस्थितीत आईवडिलांनी शिकविण्याचा प्रयत्न केला हेच कौतुकास्पद आहे. त्यांना दिवाळीत कधी फटाके मिळाले नाहीत. शेतीच्या कामात मदत करत शिक्षण घ्यावे लागले. आईवडिलांनी लेखकाना व त्यांच्या भावंडांना जागरणाला जाऊ दिले नाही. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी  मात्र आयुष्यभर जागरणे केली. त्यांच्या घरी साधी सांडशीसुद्धा नव्हती आई पदराने पातेली उचलायची. असे कमालीचे दारिद्रय वाटेला आलेले असतानाही त्यांनी आपल्या मुलांवर सुसंस्कार केले हे लेखकांनी अनेक उदाहरणे देऊन सांगितले आहे. ‘रावण्या ‘या श्रीमंत मित्राची ह्रदयद्रावक आठवणही लेखकांनी नमूद केली आहे. पायाला बसणारे चटके व दुखणारी कुरपे आठवून लेखकांनी लहानपणी एकदा दुसऱ्यांचे चप्पल उचलून आणले होते , ते वडिलांनी परत होते तिथे ठेवायला लावले. आईने एकदा पैशाच्या बदल्यात दुसऱ्यांचा तांब्या ठेवून घेतला असता वडील तिला रागावले. बालपणातील रेडिओ बद्दलचा व स्नेहसंमेलनातील धोतराबद्दलचा किस्सा मनोरंजक वाटला. लेखकांनी बालपणातील केलेले वर्णन माझ्याही बालपणातील परिस्थितीतीशी मिळते जुळते असल्याने मला अगदी मनापासून भावले पण हे वर्णन पान नंबर अडतीसवरच संपले आणि पान नंबर एकोणचाळीस पासून लेखकांच्या जीवनातील संघर्षमय पर्वाला सुरुवात झाली.
       
        श्री. सातपुते सरांना शिक्षक पदावर रुजू होताच समाजातील अस्पृश्यतेचा पगडा लक्षात येऊ लागला. स्त्री पुरुष यांची निखळ मैत्रीही समाजाला अमान्य आहे हे जाणवू लागले. काटकसरीचा मंत्र देणारे यादव गुरुजी त्यांना भेटले. प्रतिज्ञेचा अर्थ जाणून न घेता फक्त म्हटली जाते , त्याप्रमाणे आचरण होत नाही हे दिसून आले.”हाँटेलच्या दोन माणसांच्या खर्चात दहा माणसे पोटभर खाऊ शकतात ” हे सरांच्या आईचे वाक्य मला पटले. धूम्रपानास विरोध करताना माझ्या खिशातल्या पैशांनी खर्च करतोय, तुमचं काय जातय? असं ऐकून घ्यावं लागलं. शिक्षकांना वेळेवर शाळेत येण्याची सक्त सूचना अंगलट आली.शिक्षणाधिकाऱ्यानाही ‘ गुराख्यासारखे काय बोलायलाव ‘असे म्हणून त्यांच्या अंगावर धावून जाण्याचे साहस नोकरीत नवे असतानाही सरांच्या अंगी होते हे विशेष. ‘ बायकोने नवऱ्याच्या अन् कर्मचाऱ्यांने अधिकाऱ्याच्या विरोधात बोलू नये’ असा अलिखित नियम सर्वजण पाळत असताना त्यांनी विरोध पत्करला यावरून त्यांचे धाडशी व्यक्तिमत्त्व लक्षात आले. सातपुते सरांनी  रागाने माहेरी निघालेल्या महिलेस परत सासरी नेऊन सोडण्याचे सत्कार्य केले.
    
        ‘नुसतंच थोबाड वर करून कविता लिहितोस कर्ज काय तुझ्या बापानं फेडायचं का’  या चेअरमनच्या बोलण्याने व्यथित होऊन त्यांनी स्वतःची जागा विकून कर्ज फेडले याला म्हणतात स्वाभिमान! 
        सातपुते सरांना नोकरीच्या कालावधीत विद्यार्थ्यांना वर्गात थंडीत बसवून थंडीच्या दिवसांत जुने शैक्षणिक साहित्य जाळून शेकत बसलेले शिक्षक भेटले. रजामंजुरी, भविष्य निर्वाह निधी, कर्जाचे व मेडिकल बिलाचे प्रस्ताव इत्यादि कामात अडवणूक करत लाच खाणारे क्लार्क व अधिकारी भेटले. अधिकारी महाराष्ट्र दर्शनाच्या बिलासाठी टक्केवारी मागतात हे निदर्शनास आले.dirtrict primary education project म्हणजे d. P.e .p या प्रोजेक्ट बद्दल एक गटशिक्षणाधिकारी म्हणतात ” डी. पी. इ. पी. म्हणजे देशी पी इंग्लिश पी. काय म्हणावे या अधिकाऱ्यांना? लेखकाप्रमाणे वाचकानाही चीड येईल नक्की. एका अधिकाऱ्याने तर केंद्रप्रमुखाना खेचर म्हटले.
       
        लाच घेणाऱ्यांची वेळेवर दखल घेऊन शिक्षा केली नाही तर लाचखोरीचे प्रकार वाढतात या सरांच्या मताशी मी 100% सहमत आहे. सोसायटीच्या निवडणुकीतील वात्रटपणा लेखकांनी खुल्या मनाने कबूल केला आहे. राजीव गांधी शाळा योजनेतील फोलपणा म्हणजे रोजगार हमी काम कमी , काम कमी अर्धै तुम्ही अर्धे आम्ही. ही योजना सरांनी बंद केली.
 उपचार वर्गातील ‘त्या ‘ शिक्षिकेच्या आरोपामुळे सरांना राष्ट्रपती पुरस्कार मिळण्याची संधी गेली. या प्रसंगानंतर सरांचे हे स्वगत वास्तव व चिंतनीय वाटते. ” माझे हे वागणे चुकलेच, आदर्श चारित्र्य, तत्वे, माणुसकी आदि या घटनेमुळे पायदळी तुडविली गेली. दुसऱ्याचा संसार सांभाळण्याच्या नादात
         
       स्वतः च या संसाराच्या इज्जतीचा पालापाचोळा केला त्याचे काय? सांडलेली प्रतिष्ठा, वाया घालवलेले क्षण हे सर्व आता परत येणार का?”
लेखकांच्या झुंजार वृत्तीची प्रतिमा लोकांच्या मनात होती त्यामुळे लोक म्हणायचे’ “हे व्यवस्थापक माजी शिक्षणाधिकाऱ्याचे नातलग आहेत. ही कडू वाळकं तुम्हीच तोडू शकता” हा पाहुणचार आहे पण लोकांच्या खिशातून खाणे बरे नाही” ही सरांची भूमिका अनुकरणीय आहे. सरांच्या सडेतोड वागण्याबोलण्यामुळे अनेंकांची लबाडी उघड झाली. त्यामुळे त्यांची गाडी पंक्चर करणे, कुठे काचा फोडणे, कुठे अडवणूक चालायची पण सरांना या खाचखळग्यांची सवय झाली होती. शाळाभेटीच्या वेळी लेखकांना अनेक ठिकाणी हास्यास्पद विस्कळीतपणा दिसायचा. आठ आठ दिवस टाचण न काढणाऱ्या शिक्षिका दिसायच्या, नशापाणी करून धिंगाणा घालणारे शिक्षणाधिकारी दिसायचे कांही दिवसांनी तेच उपसंचालक पदावर हजर झालेले दिसायचे. अशावेळी’ उध्दवा अजब तुझे सरकार’ म्हणून आवाज उठवायची पाळी लेखकांवर यायची. मेवा दिल्याशिवाय सेवा न करणारे अधिकारी त्यांच्या निदर्शनास आले. शिक्षकांना नैतिकतेचे धडे देणाऱ्या डाएटचे लागोपाठ दोन प्राचार्य लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात सापडल्याचे लेखकांनी पाहिले. अधिकारी पळवाटांच्या पुढे नोटासाठी पायघड्या घालण्यात धन्यता मानतात. कुंपणानेच शेत खायचे ठरविले तर मालकाने काय करावे? ही शिक्षणव्यवस्थेची दुर्दशा पाहून मन व्यथित  होते. लेखक म्हणतात,” भाषणात साने गुरुजी अन् वागण्यात नाणे गुरुजींचे पीक जोमात आहे. आदर्श मात्र कोमात आहे.” लेखक पुढे म्हणतात” 
       
         यहाँ सब नकटोंका मेला है, जो भी नाकवाला है, वह भी मेरा चेला है।येथे चांगल्यांची कदर नाही. भ्रष्टाचार कमी व्हावा असे कोणाला वाटत नाही. प्रसादमाध्यमे सत्यासाठी चालू आहेत की सत्तेसाठी? हेच कळत नाही” जिल्हा परिषद प्रशाला निलंगा केंद्रापुढे लेखकांच्याबद्दल खोडसाळपणे लिहिले होते की, यह केंद्र मौत का कुआँ हे ,यहाँ भारत सातपुते केंद्रचालक है।हे वाक्य लेखकांच्या धारदार, शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्वाची साक्ष देते.
        सातपुते सरांना काँपी पुरविणारे शिक्षक दिसले. इमारतीवर संत नामदेव लिहिणारे संस्थाचालक दाम घेऊन काम करत असल्याचे दिसले. सतत लाचखोरीत वावरणाऱ्या प्रशासनाला तुकडा फेकून पुन्हा लाचार करणे अवघड नसते असे सरांचे मत आहे याबद्दल कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही.’ पुण्यनगरी हितसंबंधामुळे पापनगरीला साथ देते ‘या वाक्यावरुन सरांची लेखनातील कल्पकता व तळमळ दिसून येते. लेखकांनी पान नंबर १६९,१७० वर अप्रगत विद्यार्थ्यांची मांडणी शिक्षणाचे विदारक चित्र दर्शवते. 
     
         दहा हजार उत्पन्न कमी करून न आणता मुलीची फी भरणारे सरिंसारखे पालक दुर्मिळ आहेत. विद्यार्थ्यांचे शरीर मजबूत करण्यासाठी शाळेत पहाटे व्यायामाचे नियोजन म्हणजे  सर्वांगिण विकासाची गुरुकिल्ली आहे हे ओळखून झपाटून काम करणाऱ्या आदर्श शिक्षकाचे काम आहे हे सरांनी लीलया पार पाडले आहे. या आत्मकथनातील वैशिष्ट्य म्हणजे लेखकांनी मान सांगावा जना , अपमान सांगावा मना हे तत्व न वापरता जे व जसे घडले तसे लिहिले आहे. राष्ट्रगीत वैयक्तिक म्हणावयास सांगताना आत्मविश्वास ढळल्याने ते दडून बसल्याचे सांगितले आहे. चेक लिहिताना त्यांच्या हातून घडलेल्या चुका प्रांजळपणे कबूल केल्या आहेत.
      
        डी.लिट. पदवी साठी दीड लाख भरण्याचे टाळून लेखक म्हणाले,” दीड लाखात तीन म्हशी येत्यात त्या सांभाळल्या तर महिन्याला दुधाचे लाखभर रुपये मिळतिल” हा त्यांचा त्याग वाखाणण्याजोगा आहे. पुरस्काराबाबत त्यांचे मत असे ‘ ना दाम, ना लिंगना वशिला, ना लाच,ना गटतट, ना जातधर्म वापरता केवळ गुणवत्तेवर, कार्यावर व निरपेक्ष भावनेने कोणी सत्कार केला तरच तो स्विकारावा” हे मत मला पटले.
वार्ताहर श्री. किशोरजी यांनी लेखकाविरूद्धची बातमी दिल्याने राजीनामा दिला. रागाने सहा सात महिने काम बंद केले ही लेखकांच्या सत्कार्याची पोचपावती आहे. त्यांच्या वरच्या खटल्याचा निकाल लागल्यावर लोक म्हणाले,” सत्य  हे परेशान होते परंतु पराजित होत नाही. मँडमवर अब्रू नुकसानीचा दावा ठोका ” पण सरांनी समंजसपणे ते टाळले.आजच्या समाजात गुलालापेक्षा दलालच श्रेष्ठ वाटतात. अशा समाजात लेखकांसारखे तत्वाला धरून वागणारे दहा हजार पेन्शन जास्त मिळाल्याचे पंचायत समितीच्या निदर्शनास आणून कमी करून घेतात. केवढा विरोधाभास आहे हा एकीकडे अंधार तर दुसरीकडे तेजस्वी लख्ख प्रकाश. 
     
    संपूर्ण आत्मचरित्रात आपल्या संसाराविषयी, मुलांबाळाविषयी फार कमी लिहिले आहे. मुलीच्या लग्नातील सूटकेस विसरल्याचा प्रसंग, सासूच्या पाठीवर त्यांनी मारलेला रट्टा इत्यादि गमतीदार प्रसंग वगळता सर्व प्रसंग शैक्षणिक दुरावस्था व त्याविषयीची लेखकांची चीड पानांपानावर दिसून येते. त्यांनी आई वडिलांविषयीचा आदर प्रसंगानुरूप व्यक्त केला आहे. वडिलांच्या चांगल्या शिकवणुकीचे व त्यांच्या शहाणपणाचे प्रसंग वाचकांसमोर उभे केले आहेत. 
आत्मचरित्रात लेखकांनी लिहिलेली बोलीभाषा ज्वलंत व वास्तव वाटते. त्यामुळे लेखनाला नवा साज चढलेला आहे. उदा. भुका लागल्यात, काढताल, म्हणायलात, रडाया लागलाबोलायलाव, मगा, घडतेल का?.

     लेखकांनी मांडलेला शिक्षणव्यवस्थेतील भ्रष्टाचार कमीअधिक प्रमाणात सगळी कडे दिसतो पण प्रत्येकजण कातडीबचाव धोरण स्विकारतो.लेखकांनी तसे न करता भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. हे बघून गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या एका वचनाची मला आठवण झाली ‘ अस्तमानाला जाणाऱ्या सूर्यास एकदा वाटले ,मी अस्तमानाला गेल्यावर इथं पूर्ण अंधार पसरणार,त्यावेळी कोण देईल इथं प्रकाश? कोणीही पुढे आले नाही. तेंव्हा एक छोटीशी पणती पुढे आली व म्हणाली मी देईन प्रकाश माझ्या परीने’ सर या पणतीप्रमाणे तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात तुमचा कार्यरुपी प्रकाश दिला आहे. तुमच्या या अमूल्य कार्याला, धडपडीला अगदी मनापासून प्रणाम!
आत्मचरित्राच्या शेवटी लेखकांनी मांडलेले विचार जीवनाचा सार सांगून जातात. लेखक म्हणतात,” चिखलावर दगड फेकला तर आपल्याच अंगावर चिखल येणार हे खरे असले तरीही चिखलाचा चिखल होण्याऐवजी सुगंधी फूल उगवावे असे वाटते.” 
     
       सुषमाताईंचा लेखकांशी बोलणाऱ्या कवितांचा संग्रह ऊनसावली उशीरा का होईना प्रकाशित केला हे वाचून एक स्त्री या नात्याने मला खूप समाधान वाटले.
सर, आपले आत्मचरित्र वाचताना पुस्तकातील प्रत्येक पान आपल्या झुंजार वृत्तीची साक्ष देते व झुंज पिक्चमधील ‘    झुंजार माणसा झुंज दे,झुंज दे’ या गाण्याची आठवण आली.
आपल्या पुढील लेखन कार्यास व समाज कार्यास हार्दिक शुभेच्छा!

Read More 

What do you think?

20 Points
Upvote Downvote

Written by jyubedatamboli

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

वर्गमित्र स्नेहमिलन

स्वप्नात पाहिले जे …