जकात : एक आर्थिक उपासना
डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी
फोटो:साभार गुगल
रमजानच्या पवित्र महिन्यात सर्व मुस्लिम बांधव एक आर्थिक उपासना करतात आणि ती आहे जकात. हे एक प्रकारचे दान आहे. जे आपल्या मालमत्तेवर वर्षातून एकदा हिशेब करून देणे गरजेचे आहे. पवित्र कुरआनमधून अनेक ठिकाणी नमाज बरोबर जकातीचाही उल्लेख आढळतो.
जकात ‘साहिबे निसाब’ म्हणजे दारिद्रयरेषेच्या वरची धनाढय लोक देतात. आजपासून तब्बल साडेचौदाशे वर्षापूर्वी ही दारिद्रयरेषा ठरविण्यात आली. ज्या माणसाजवळ ८४.४७९ ग्रॅम इतके सोने अथवा ६१२.३५ ग्रॅम इतकी चांदी किंवा या किमतीचा विकाऊ माल किंवा नाणी, नोटा, एफडी, शेअर सर्टिफकेट, कंपनीमध्ये इतर गुंतवणूक, लोकांना दिलेले कर्ज इत्यादि रकमेवर जकात आहे. ही जकात एकूण मालाचा चाळीसावा भाग म्हणजे अडीच टक्के वजा करून गोरगरीबामध्ये वाटून टाकावी. जवळच्या नातेवाईकांना प्राधान्याने देण्यात यावी. मालावर एक संपूर्ण वर्षाचा कालावधी ओलांडला गेला पाहिजे. आईवडील आपल्या मुलांमुलींना तसेच मुले आपल्या आईवडीलांना जकात देवू शकत नाहीत. तसेच आजी-आजोबा व मुलामुलीच्या संतानाना देखील जकात देवून शकत नाहीत. दांपत्य एकमेकांना जकात देवू शकत नाहीत. परंतू काही उलेमांच्या मते पत्नी पतीला जकात देवू शकते. कारण त्याच्या खर्चाची जबाबदारी पत्नीवर नाही.
मालावर एक संपूर्ण वर्ष ओलांडल्यानंतरच जकात लागू होते. वर्षाच्या मध्यंतरी कितीही माल आला. परंतू वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच खर्च झाला तर त्यावर जकात नाही. जकात अनिर्वाय होण्याइतका माल असला आणि वर्षभर त्यात माल जमा होत राहिला तर संपूर्ण जमा पुंजीवर जकात काढावी. काही विशेष कारणासाठी पैसे काढून ठेवले असतील. परंतू ते काम वर्षाच्या आत पूर्ण झाले नाही आणि रक्कम तशीच शिल्लक राहिली अशा रकमेवर जकात आकारावी, कुणी आपल्याकडे एक मोठी रक्कम अनामत ठेव म्हणून सांभाळ करण्याकरीता आणून ठेवली. अशा रकमेवरदेखील जकात नाही. मात्र मुळ मालकाने त्याची जकात दिली पाहिजे. पती आणि पत्नीचा माल वेगवेगळा आहे. दोघांनी वेगवेगळी जकात काढली पाहिजे.
एलआयसी, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी आणि असा सर्व निधी आणि रकमा ज्याचे स्वामित्व अथवा मालकी हक्क आपल्याकडे नसतील अशा सर्व रकमावर जकात लागू होत नाही. व्यवसायाची सर्व अवजारे व हत्यारे जसे डॉक्टरी मशिन्स, ट्रक, ट्रॅक्टर, वाहने, विमाने इत्यादिवर जकात नाही.
GIPHY App Key not set. Please check settings