in

गोष्ट, सरहद्दीची सीमा नसणाऱ्या नद्यांची आणि स्त्रियांची!


हा फोटो आज रात्रीचा आहे, बांगलादेशातील मित्राने पाठवला आहे. भारतीय सीमेलगतच्या बांगलादेशमधील 
‘राजशाही’ या शहरालगत पद्मा नदी वाहते. फोटोमध्ये हिरव्या रंगात दिसणारे राजशाही शहर आहे, त्याच्या पुढे काळसर करडे दिसणारे पद्मा नदीचे विशाल पात्र आहे आणि नदी पात्रापलीकडे एका रेषेत दिसत असलेले फ्लड लाइट्स असलेला भाग म्हणजे भारतीय हद्दीचा भूभाग आहे. राजशाहीच्या टेकडीवरून हा फोटो घेतलाय आणि भारतीय हद्दीत चमकत असणाऱ्या वीजा त्यात कैद झाल्या आहेत.

पद्मा म्हणजे भारतातली गंगा नदी. बंगालमध्ये आल्यावर गंगेचा प्रवाह विभाजित होतो, भागीरथी जिला हुगळी या नावाने ओळखले जाते ती एक नदी आणि बांगलादेशात प्रवेश करणारी पद्मा! हुगळीचा प्रवाह बंगालच्या उपसमुद्रात जाऊन मिळतो तर पद्मा अनेक देखणे वळण घेत भारतातून आलेल्या ब्रम्हपुत्रेशी संगम करते. या दोन्ही नद्या एकत्र येतात आणि बांगलादेशाच्या दक्षिणपूर्वेस वाहत जातात. पुढे जाऊन त्यांचेही विभाजन होते. त्यातली मेघना नदी ही मुख्य नदी!

मेघनेचे पात्र आणि खोरे अत्यंत देखणे आणि समृद्ध आहे. माथवंगा नदी ही या पद्मा नदीचीच एक छोटीशी उपनदी होय. या माथवंगेच्या काठावर दौलतदिया हा जगातला सर्वात मोठा व कुख्यात रेड लाइट एरिया आहे. या सर्व प्रवाहांची साक्षीदार गंगा आहे, कारण भारतातील सर्वात मोठा रेड लाइट एरिया कोलकत्यात सोनागाचीमध्ये आहे आणि हे शहर गंगेची उपनदी असणाऱ्या हुगळी नदीच्या काठी आहे.


वाराणसीपासून गंगेच्या काठालगतच्या मोठ्या शहरात स्त्रियांची फरफट जारी राहते ती थेट बंगालच्या उपसागरात मिळेपर्यंत कायम राहते! वाटेत तिला शरयू, सोन, घागरा, गंडक, गोमती यांचे प्रवाह मिळतात! नद्या आणि स्त्रिया यांचे परस्पर संबंध खूप गहिरे आहेत कारण प्रत्येक स्त्रीमध्ये एक नदी वाहते आणि प्रत्येक नदी ही एक स्त्रीरूपच असते!

फोटोमधील पद्मा नदीचे पात्र आता शांत दिसतेय मात्र तिच्या अंतरंगात काय चाललेय हे कुणालाच ठाऊक नसेल, जसे एखाद्या स्त्रीच्या मनात काय चाललेय हे कुणालाच कळत नाही, अगदी तसेच!

– समीर गायकवाड

Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

गोष्ट किन्नरांच्या लग्नाची नि वैधव्याची!

सारजामाय