in

गावाकडचे उन्हाळ्यातले दिवस..


आमच्या भागात उन्हाळा संपेपर्यंत पारा आता चाळीस डिग्रीहून खाली येत नाही. आणखी अडीच महीने सूर्य आग ओकत राहतो. दुपारी रस्ते ओस पडतात. गावाकडे शेतशिवारं रखरखीत वाटू लागतात. ज्यांची बागायत असते तेही घायकुतीला येतात, काही तालेवार यातही हात मारतात! जिरायतवाल्यांच्या तोंडाचे पाणी पळते. रान भुसभुशीत होऊन जातं. खुरटी झुडपंही मान टाकतात. दूरवरच्या माळांनी सगळं गवत शुष्क पिवळं करडं होऊन जात. बांधावरच्या बोरी बाभळी मौन होतात. शेतांच्या कडेने असणाऱ्या वडाच्या झाडांपाशी सावल्यांची झिल्मील अव्याहत जारी राहते.

दुरून येणारा होल्यांचा आवाज उगाच धीर देऊन जातो. कडब्याची गंज हळूहळू आक्रसू लागते. शेतवाटेने असणारी झाडे निश्चल मौन उभी असतात, वारं रुसून बसतं. पानं उदास होतात. पाऊलवाटांवरचा फुफुटा खाली बसतो.आडवाटेला असणारी गावदेवांची मंदिरे खूप दिवसांपासून विजनवासात असल्यासारखी वाटू लागतात. गावातल्या मंदिरांचे कळस आभाळात मस्तक खुपसून बसतात, गावाबाहेरच्या रस्त्यालगत असणाऱ्या एकमेव पीरसाहेबाच्या दर्ग्याचे मीनार अबोला धरल्यागत झुकून जातात. तिथला पारव्यांचा गलकाही कमी होतो. चिंचपट्टीला असणाऱ्या चिंचेच्या झाडांचा पाला गुंजपत्त्याच्या नक्षीत तबदील होऊन जातो.

गावाच्या दक्षिण शिवेला आमराई आहे, तिथे मात्र सावलीचा गारवा वाढतो, रिकामटेकडी मंडळी आमराईत लोळत पडतात दुपार सरताच चावडीवर पत्त्यांचा फड मांडून बसतात. झाडांच्या सावल्या स्वतःशीच लपंडाव खेळतात. दुपारची उन्हे जसजशी तापत जातात तसतसं गाव रिकामं वाटू लागतं. अधूनमधून एखादी अवकाळी पावसाची सर येते. कधी तर शिरवळही दाटून येते. गुरांच्या पाळीवर आलेली गुराखी पोरे एखादं मोठं झाड बघून पाठ टेकतात. बोडख्या माळांवरल्या एखाददुसऱ्या झाडाखाली भटकी कुत्री सावलीला बसतात, एखादं मोकार जित्राबही तिथं रवंथ करत बसतं. अगदी दूर अंतरावरून वेगाने जाणाऱ्या मोठाल्या वाहनांचा आवाज बऱ्यापैकी स्पष्टपणे ऐकू येतो.

भर उन्हातही एखादं गवतफुल सुर्याला वाकुल्या दाखवत राहतं. चैत्राच्या पालवीचे नावीन्य सरते. वैशाख वणवा पोळून काढतो. सारं चराचर मौन उदास होऊन जातं. माणसं सावलीशिवाय गोष्ट करत नाहीत पण झाडांचं नवल वाटतं कडकडीत उन्हांतही त्यांना रंगीबेरंगी सुगंधी फुलं फुलतात. धगधगत्या उन्हांत ती फुलं दोन दिवस का होईना पण जिवंत राहतात. नव्या कळ्या उमलत राहतात. भुंग्यांशी संग करत राहतात, पुन्हा पुन्हा संकर होत राहतो. नाजूक कोवळी फुलपाखरं त्यांच्यावर झेप घेत राहतात. फुलांचं आयुष्य दोनेक दिवसांचं तर फुलपाखरांचं चार दिवसांचं! ऐन उन्हांत ते फुलतात, विहरतात पण कधी तक्रार करत नाहीत नि आपला गुणधर्म बदलत नाहीत. फ़ुलांना जोवर द्वेषाचे गणित ज्ञात होत नाही तोवर तरी हे जग बेहद्द सुंदर राहील! पानंफुलं उन्हाला भीत नाहीत!

पारा जसा वाढू लागतो तशा विहिरी वेगाने खाली जातात. जलस्तर घटत जातो, चाऱ्याचा प्रश्न बिकट होतो. साधारणपणे मे महिन्यात बऱ्याच जिल्ह्यात जनावरे खाटकाकडे रवाना होतात कारण त्यांना पोसणं होत नाही. छावण्यांचा सरकारी बाजार सुरु होतो. मग काही भागात पाण्याचे टँकर सुरु होतात. पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नेमेचि येतो उन्हाळा या उक्तीला अक्षरशः जागते. पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडतो. लोक रोजच म्हणत राहतात की, आजचा दिवस फार धगधगीचा होता. रात्री टिपूर चांदणं न्याहाळताना झोपी जात उद्याच्या दिवसाची विवंचना असते. उद्याचा दिवस तरी बरा जावा, वाऱ्याच्या झुळुकेने सुखाचा सांगावा द्यावा असे वाटते पण त्याच बरोबर शंकाही असते. पण सकाळी हीच पानं, फुलं पाहून बरं वाटतं.

उन्हाळ्यातले बाकी राहिलेले दिवस रोजच मोजले जातात आणि यंदाचा उन्हाळा जास्तीच तीव्र आहे याच्या चर्चा घरोघरी झडत राहतात. मळ्यातली जुंधळ्याची काढणी होते नि शेतातली कामे संपतात. पाऊस महिन्यावर लांब असला तरी कास्तकऱ्याच्या घरी जाऊन अवजारे ठीक करण्याच्या गप्पा सुरु होतात. खोपटातली म्हातारी बायडाबाई उगीच्या उगी उन्हाळ्यातच येरली स्वच्छ करून ठेवू लागते. कुणीएक नवाडी माळवदावर वाळवण घालते. तिथं पाखरांची किलबिल अंमळ जास्त राहते.


गावाच्या वेशीपाशी असणाऱ्या पाराला बरे दिवस येतात. म्हातारे कोतारे तिथं गोळा होतात, पानतंबाखूची चंची मोकळी होते. चुकार पोरं तिथं सावलीला येऊन खेळत राहतात. काही निबर माणसं काही अंतरावर उभं राहून आपलं गावकीचं भावकीचं दळण दळतात. पोट खपाटीला गेलेलं कुत्रं अंगाचं वेटोळं करून निमूट बसून राहतं. गावातली घरं आळसावून दार म्होरं करून कोंडून घेतात. पाखरं जिकडं तिकडं ज्या त्या झाडावर जाऊन बसतात. घाम वाऱ्याशी बोलू लागतो आणि गाव निगुतीने उन्हाळा झेलू लागतो!

गावाकडचे उन्हाळ्यातले दिवस रखरखीत असले तरी ते सह्य असतात कारण तिथला माणूसपणाचा ओलावा अजून तरी टिकून आहे. हा ओलावा माणूस आणि निसर्ग यांच्यातला पूल आहे! यालाच साहित्यिक आपल्या भाषेत म्हणतात की, ‘गावाकडच्या माणसांमध्ये मातीची ओढ जिवंत आहे!’ ही ओढ हे उन्हाळे सुसह्य करतात, बस्स बाकी काही नाही!!

– समीर गायकवाड

Read More 

What do you think?

10 Points
Upvote Downvote

Written by SameerBapu

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

अल्लाहवरील श्रध्दा व विश्वासाचे फळ

आओगे जब तुम साजना..