कॅमेरा

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

काही वर्षापूर्वी आमच्या शेजारच्या घरी चोर आला होता. स्वतःच. शेजाऱ्यांनी चोराला आमंत्रण दिलं नव्हतं. तोच आला. त्याला माहित नव्हतं घरात कोणी असेल आणि तिला माहित नव्हतं की आपल्या घरी चोर येईल. तो आला, तिने त्याला बघितलं, त्याने तिला बघितलं. दोघांचे डोळे विस्फारले भितीने आणि दोघंही जीवाच्या आकांताने ओरडले. कोण कोणाला घाबरलं हे एकमेकांना समजायच्या आधीच चोर आल्यापावली मागच्यामागे मागच्या दाराने मागे बघत पळाला त्यामुळे पळतापळता अडखळला. ती पुढच्या दारातून मागे न बघता पळत सुटली ती तिच्यासारखंच दार उघडं टाकून बसलेल्या शेजारणीच्या घरात जाऊन धडकली. इथे गोष्ट संपायला हवी; पण झालं काय, आजूबाजूच्या सगळ्ळ्यांना ही बातमी कायप्पामुळे (whatsapp) त्वरीत समजली. प्रत्येकाला वाटायला लागलं की आता आपल्या घरी चोर येणार. त्यातला त्यात स्त्रीवर्गाला तर जास्मृच. त्यात मीही होतेच.


घंटा वाजली की वाटायचं चोर आला. मी जिथे असेन तिथे लपायचे, इकडून तिकडून डोकावून दाराबाहेरची व्यक्ती दिसते का ते पाहायचं. व्यायामाचे सगळे प्रकार त्मावेळात वाकण्याच्सा, लपण्याच्या, न दिसण्याच्या नादात व्हायचे. काचेच्या घरात राहत असल्यासारखं आमचं घर. आतल्याला बाहेरचं आणि बाहेरच्याला आतलं अगदी सहज दिसेल असं. कुठल्याही खिडकीला पडदे नाहीत त्यामुळे लपाछपीच्या इतक्या व्यायामप्रकारात खूप वेळ जायचा आणि चोर नसलेले सज्जन परत जायचे. सज्जन म्हणजे अॅमेझॉन, टपालखातं किंवा FedX वाले सज्जन. भेट झाली नाही म्हणून चुटपुट लागल्याच्या चिठ्ठ्या दाराबाहेर रोज ते डकवायला लागले. येऊन सामान न्नावं असा आदेशही त्यात असायचा. सामान आणायला गेलं की दुसरी चक्कर मारलेला सज्जन चिड्डी टाकून निघून जायचा. मग मी पुन्हा सामान आणायला निघायचे. शेजारणीकडे आलेल्मा चोराने माझं रोजचं काम प्रचंड वाढवलं.


माझी रोजची तीच कथा आणि भुणभुण ऐकायला नको म्हणून अखेर नवऱ्याने कॅमेरा लावला. त्माचं काम म्हणजे आज सुरु केलं की ६ महिन्यांनी संपणार, कॅमरा लागला पण तो जोडलेला कशालाच नाही. कोण, कोणाला, कुठून, कसं दिसणार हा प्रश्न तसाच.


“उपयोग काय त्याचा?” मी फणकारुन म्हटलं.


‘होईल. कॅमेरा दिसला की चोर फिरकणारच नाही आणि मी दोन चार पाट्यापण लावून टाकल्या आत्ताच.’ तो उत्साहाने म्हणाला.


‘कसल्या?’ विचारायच्या आधीच मला त्या पाट्या दिसल्या.


‘अरे, त्या विक्रेत्यासाठी असतात.” एवढंही माहित नाही, कळत म्हणून नाही इत्यादी अक्कल काढण्याचे सूर मी कौशल्याने एका वाक्यात गुंफले.


‘चोर माल न्यायला येतो. त्यालाही तोच नियम. कोण कोणाला मूर्ख बनवतंय तेच कळेना. असो. कॅमेरा लागला पण त्यातून कधी काही दिसलंच नाही. जेव्हा केव्हा दिसायला लागलं म्हणजे नवरोजींनी काम पूर्ण कैलं तेव्हा चोराने आपलं बस्तान आमच्या भागातून हलवलं होतं. चोऱ्यांचे किस्से दुसरीकडून ऐकायला यायला लागले होते. आता कॅमेराचं करायचं काय? लावला आहे म्हणून तरी वापरायला हवा !


नुकतंच आम्ही मांजर आणलं होतं. तिचं नाव त्सुनामी. बाहेरगावी गेलं की तिच्यावर नजर ठेवायला वापरु असं कधी नव्हे ते एकमत झालं. तोपर्यंत सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या कॅमेराचे रक्षण सोडून एकशेएक उपयोग मित्रमंडळीकडून ऐकले होतेच.


‘मी असं म्हटलंच नव्हतं’ असा मुलं वाद घालायला लागली की आमची एक मैत्रीण त्यांना कॅमेरा दाखवायची आणि चोर पकडल्यासारखी मुलांना शब्दात पकडल्यावर खूष व्हायची. आता तरी मुलं खोटं बोलायचं थांबवतील असा भाबडा आशावादही एकदा तिने मांडला. आम्ही तिच्या घरी गेलो तेव्हा घरातले सगळे बोलताना कॅमेराकडे बघत आणि कुजबूजल्यासारखंच बोलत.


‘हा काय प्रकार?” आम्हाला आधी आपण बोलायचं की नाही ते कळेना, मग कुजबूजायचं की मोठ्याने बोललं तरी चालेल हे कळेना. हे कोणाला विचारण्यासाठी तरी तोंड उघडायला हवंच तेही उघडायचं की नाही हे कळेना. शेवटी खाणाखुणाच सुरु झाल्या. तिनेही खाणाखुणा करुन बाहेर नेलं. बाहेर सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.


“कार्टी येताजाता कॅमेरा दाखवत बसतात. किती खोटं बोलतेस, किती नावं ठेवतेस सगळ्यांना असले फालतू आरोप करतात.”

“काय मेलं धाडस पोराचं. इतकं खरं सांगतात तुझ्याबद्दल तुलाच?” मी आश्चर्याने विचारलं. मी काय म्हणाले ते लक्षात यायच्याआधीच


‘कॅमेरा काढून टाका.” दुसरी मैत्रीण जोरात म्हणाली.


‘चोर आला तर?” तिने घाबरुन विचारलं.


‘सध्या तुमच्या भागात आहे की काय?” मी नवलाने विचारलं. कॅमेराचा मैत्रिणीकडे उपयोग करतात तसा करावा का याची चक्रही डोक्यात सुरु झाली आणि तेवढ्यात आमचं जपानला जायचं ठरलं.


भरभक्कम डॉलर्स देऊन आमच्या मांजरावर, त्सुनामीवर लक्ष ठेवायला, तिला खायला प्यायला घालायला डॉली नावाची बाई नेमली. ती रोज येणार होती. आम्ही पहिल्यांदाच त्सुनामीला सोडून चाललो होतो. आमच्या मित्रमैत्रीणींनाही आम्ही कामाला लावून टाकलं. त्सुनामीबरोबर खेळायचं. डॉली तिचं खाणंपिणं बघणार, मित्रमैत्रीणी रोज येऊन खेळणार. जपानला पोचलो आणि पोचल्यापोचल्या कॅमेऱ्याचा उपयोग लक्षात आला. डॉली तर दिसलीच, आमचे मित्रमैत्रिणीही दिसले. मला नादच लागला. डॉलीची वेळ झाली की सुरु करायचं ‘अॅप’. डॉली आली, डॉली गेली, डॉलीने फ्रिज उघडला. मग मला आमचे मित्र मैत्रिणीही कॅमेऱ्यात बघायला आवडायला लागले. अधूनमधून त्सुनामीही दिसायची. इतका आनंद व्हायचा पार कुठल्यातरी दुसऱ्या देशातून आपण आपल्या घरातलं सारं काही बघू शकतो याचा. क्रिकेटपेक्षाही धावतं समालोचन मी सुरु केलं. नवरा आणि मुलांना आपण जपान बघायला आलो आहोत की इथून आपलं घर हा प्रत्येकवेळी प्रश्न पडायला लागला. तो सोडवायच्या आधीच आम्ही परत आलोही.


चोराच्या निमित्ताने कॅमेरा लागला. दाराबाहेरचा चोर कधी दिसला नाही पण कॅमेराचा उपयोग अखेर झाला. डॉलीला अशा कॅमेऱ्यांची सवय असावी. तीही कॅमेऱ्याकडे बघून गोड हसायची पण आमच्या मित्रमैत्रीणींना मी चुकून उत्साहाने १०२ वा उपयोग सांगायला गेले आणि त्या नादात त्यांचं कसं रोज दर्शन व्हायचं तेही सांगून टाकलं. मग काय झालं ते तुम्ही विचारु नका आणि मी सांगणार नाही. मांजरावर लक्ष ठेवण्याऐवजी माणसांवर ठेवलं तर इतकं काय त्यात पण मित्रमैत्रिणीच ते. त्यांनी बदला घेतलाच. आता प्रत्येकाची मांजरं – कुत्रे सांभाळायला मी जाते आणि ते कुठेतरी जाऊन कॅमेऱ्यातून माझ्यावर लक्ष ठेवतात. काय म्हणायचं आता ह्याला? आलीया भोगासी असावे सादर, कॅमेऱ्याच्या उपयोगाचे किती ते पदर!


हा लेख माझा मराठीचा बोल या फेसबुक समूहावरील मित्रमंडळींनी कढलेल्या दिवाळी अंकात आला आहे.

Read More 

What do you think?

13 Points
Upvote Downvote

Written by Mohana Joglekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

माझे ग्रेट बाबा

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

कीर्तनकारांच्या मुखी घोडे लावण्याची भाषा शोभते का? – इंदुरीकरांच्या दुटप्पीपणाची नोंद!