in

कार्ल मार्क्स…

कार्ल मार्क्स…

१८८३च्या मार्च महिन्यात कार्ल मार्क्सचा मृत्यू झाला. त्याच्या अंत्यविधीसाठी लंडनमधे दहा बारा लोक उपस्थीत होते आणि त्यात त्याच्या कुटुंबियांचा जास्त भरणा होता. म्हणजे त्याच्या मृत्यूसमयी कार्ल मार्क्सची लोकप्रियता (?) पूर्ण घसरली होती असे म्हणायला हरकत नाही. पण हेही मान्य करायला हरकत नाही, की त्याच्या मृत्यूनंतर ते आत्तापर्यंत त्याच्या तत्वज्ञानाने जेवढा पगडा जगभर जनमानसाचा घेतला आहे तेवढा कुठल्याही तत्वज्ञानाने घेतलेला नाही. मला तर वाटते इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटीलाही त्याने एके काळी टक्कर दिली होती. दुर्दैवाने हे जग ‘‘चांगले’’ करण्याच्या हट्टहासापोटी कम्युनिस्टांनी जगभरात २० कोटी लोकांचे मुडदे पाडले.

पश्चिमी देशात मार्क्सने जी भांडवलशाहीविरुद्ध कडवट टीका केली त्याने तेथील समाजाच्या विचारपद्धतीवर बराच प्रभाव टाकला. एवढेच नव्हे तर चीन, रशिया , कोरिया इ. इ. देशांच्या सरकारांनाही आर्थिक बाबीत ढवळाढवळ करण्याची दुर्बुद्धी दिली आणि त्याचा परिणाम आपण पाहतोच आहे. १९१७ सालातील रशियातील क्रांती, चीनमधील लाल क्रान्ती, क्युबामधील उठाव, उत्तर कोरियातील समाजवाद, व्हिएटनाम ही त्याची काही ठळक उदाहरणे. मला वाटते आता चीन आणि उ. कोरियाच फक्त कसाबसा तग धरून उभा आहे. उत्तर कोरियाही उभा आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही.

मार्क्सवादाने पुरस्कृत केलेल्या नवीन जगाची अशी वाताहात झाली. मार्क्सवादाने गुलामीची नवीन पद्ध आणली, अत्याचार, वेठबिगार, उपासमार आणि असंख्य लोकांच्या कत्तली हे या तत्वज्ञानाचे वैशिष्ट्य ! या सर्वनाश करणाऱ्या तत्वज्ञानाचा जन्मदाता कार्ल मार्क्स प्रत्यक्षात कसा होता हे समजण्यासाठी या लेखाचा प्रपंच केला आहे.

कॅ. स्मीता गायकवाड यांनी माओवाद आणि तत्सम वादांचे बुरखे फाडायचे काम त्यांच्या व्हिडियोंमधून उत्तमप्रकारे केले आहे आणि ते सर्व तुम्ही युट्युबवर पाहू शकता. काहीच्या लिंक्स मी खाली दिल्या आहेत. यात कॅ. स्मिता गायकवाडांची माओवादी आणि समाजवादी आणि कमुनिस्टांच्या डावपेचांची जी माहिती दिली आहे त्याने तुम्ही हादरून जाल. तरुणांना सतत काहीतरी वेगळे करायला हवे असते म्हणजे त्यांच्या रक्तात स्वस्थ बसणे नसते याचाच फायदा हे समाजवादी आणि माओवादी उचलतात. जेव्हा तरुणांच्या लक्षात हे येते तेव्हा फार उशीर झालेला असतो. हे लोक किती ढोंगी असतात हे त्या व्हिडियोंवरून आपल्याला सहज कळेल. असाच ढोंगी होऊन गेला कार्ल मार्क्स. ते कसे हे वाचा…

कार्ल मार्क्सचा जन्म झाला ५ मेला १८१८ मधे. ट्राएर नावाच्या ऱ्हाईनलँडमधील एका गावात. त्याचे घराणे ज्यू होते आणि त्याच्या घराण्यात आणि आजोळी धर्मगुरूंची परंपरा होती. पण प्रुशियामधे कायद्याचा अभ्यास करायला मिळावे म्हणून त्याच्या वडिलांनी प्रोटेस्टंट पंथ स्विकारला. ते ख्रिश्चन झाले. कार्ल मार्क्स लहानपणीच सर्व धार्मिक बाबांपासून दूर होता. तो नास्तिक झाला पण धर्माला अफू मानणाऱ्या या माणसाने एका अत्यंत कडव्या आणि बेगडी धर्माला केव्हा जन्म दिला हे त्याचे त्यालाच कळले नाही.

बॉन येथे काही काळ काढल्यावर पुढील अभ्यासासाठी त्याने त्याचा मुक्काम बर्लिनला हलवला. त्याला तत्वज्ञानात डॉक्टरेट करायची होती. पण तो एक अत्यंत आळशी आणि साधारण विद्यार्थी होता. शेवटी त्याने जेना विद्यापीठातून त्याची पदवी मिळवली. त्याने आयुष्यभर नोकरी वैगरे न करता काही वर्तमानपत्रांसाठी लेख लिहिले आणि त्यांच्यासाठी पत्रकारीता केली. ती वर्तमानपत्रे नंतर काही वर्षात बंद पडली. काही पैशाअभावी बंद पडली, काही त्यातील भिकार लिखाण वाचण्यास वाचक न मिळाल्यामुळे बंड पडली तर काहींवर बंदी घातली गेली. त्याच्या लिखाणामुळे त्याला अनेकवेळा घरे बदलायला लागली आणि काही वेळा देशही. शेवटी १८४९ साली ज्या देशात भांडवलशाहीची मुळे घट्ट रुजली होती अशा देशात त्याने आश्रय घेतला. इंग्लंडमधे!

कम्युनिस्टांचे हे वैशिष्ट्य आहे. ते भांडवलशाहीवर पोट भरतात आणि त्यांनाच शिव्या घालतात. कुठलाही समाजवादी त्याच्या तत्वज्ञानाचा प्रसार त्याच्या घरी करत नाही. त्यावेळी त्यांना व्यक्तिस्वातंत्र्य आठवते. ज्या कारखान्यात काम करतात त्या मालकालाच शिव्या घालतात. हे सतत भांडवलदार शोषण करतात म्हणून किंचाळत असतात पण स्वतःच्या घरी दारी दुसऱ्यांचे शोषण करण्यात पुढे असतात. सतत मोठमोठे शब्द वापरून तरुणांवर प्रभाव पाडायचा आणि त्यांचा बुद्धीभेद करायचा हा यांचा अत्यंत आवडता छंद आहे. मला आठवते श्री. ना. ग. गोरे यांचे उभे आयुष्य अमेरिकेवर टीका करण्यात गेले पण जेव्हा त्यांची मुले अमेरिकेत स्थायिक झाली तेव्हा ते अमेरिकेचे गोडवे गायला लागले होते. (तसा त्यांनी कुठल्यातरी वर्तमानपत्रात लेख लिहिल्याचा मला स्मरते) परत कार्ल मार्क्सकडे वळूया.

मार्क्स जरी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आला तरी त्याचे वागणे बऱ्याच बाबतीत हे परंपरावादी व्हिक्टोरियन समाजासारखे होते. पण त्याच्या पत्नीच्या बाबतीत मात्र तो पूर्णपणे आधुनिक विचाराचा होता. त्याने विवाहाच्यावेळी घेतलेल्या आणाभाका मोडल्या आणि तो एका बाईच्या नादी लागला. त्याच्याकडे नोकर असलेल्या मोलकरणीशी त्याने संबंध ठेवले ज्यातून त्याला एक मुलगाही झाला. वास्तविक या क्रांतीकारक विचारांच्या माणसाला कर्मठ समाजाला घाबरण्याचे काही कारण नव्हते, त्याने या अनौरस मुलाला सांभाळायल काहीच हरकत नव्हती पण त्याने ते केले नाही त्याला त्याच्या समाजातील प्रतिमेची जास्त काळजी होती. त्याला त्याच्या पत्नीपासून सात अपत्ये झाली त्यातील तीन पुढे जगली.

या माणसाने खोट्या प्रतिष्टेपोटी त्याच्या अनौरस मुलाला त्याच्या आईला भेटण्यासही मना केले. या मुलाला घराचा फक्त मागचा दरवाजा वापरायला परवानगी होती. एवढेच नाही तर त्याने त्याचा मित्र एंगल याला या मुलाचे पितृत्व घेण्यास भाग पाडले. कारण समाजात त्याची कुचंबणा झाली असती म्हणून. लाखो लोकांच्या भावनांचा विचार करणारा हा महापुरुष त्याच्या मुलाच्या मनाच विचार करू शकला नाही याचे एकच कारण आहे ते म्हणजे खोटारडेपणा.

पॉल जॉन्सन त्याच्या इंटलेकच्युअल्स या पुस्तकात लिहितो –

इंग्लंडमधे असताना ब्रिटिश भांडवलशाहीचा अभ्यास करताना त्याने कमी मोबदल्यात काम करणाऱ्या कामगारांचा बराच अभ्यास केला पण त्याला मोबदला मिळतच नाही असा एकही कामगार सापडला नाही. त्याने जर नीट शोधले असते तर त्याला असा कामगार त्याच्या घरातच सापडला असता. त्याची मोलकरीण हेलेन डिमुथ. त्याच्या घरातील ही एक वेठबिगार होती. तिला आयुष्यभर तिच्या कामाचा एक छदामही मोबदला मिळाला नाही.

१९४९ च्या आसपास ती मार्क्सची रखेल झाली आणि तिला मार्क्सपासून एक मुलगाही झाला पण त्याने त्या मुलाची जबाबदारी घेण्यास स्पष्ट नकार दिला एवढेच नाही तर त्याचे पितृत्वही नाकारले. त्या मुलाला लेविस नावाच्या कामगाराच्या घरी ठेवण्यात आले आणि मागील दरवाजाने त्याच्या आईस भेटण्याची मोठ्या उदार अंतःकरणाने परवानगी देण्यात आली. मार्क्सला सतत भीती वाटत असे की ही भानगड जर प्रकाशात आली तर त्याच्या क्रांतीकारकाच्या प्रतिमेला मोठा बट्टा लागेल. त्यासाठी त्याने त्याच्या मित्राला, एंगलला त्या मुलाचे पितृत्व घेण्यासाठी भरीस घातले. त्याला ते नको होते पण त्या दडपणाला तो बळी पडला असावा. एंगल घशाच्या कर्करोगाने ५ ऑगस्ट १८९५ या दिवशी मरण पावला. त्याला त्यावेळेस बोलता येत नव्हते पण त्याने पाटीवर लिहून सांगितले की फ्रेडी हा मार्क्सचा मुलगा आहे.

जवळ जवळ सगळे समाजवादी आणि कमुनिस्ट हे क्रूर आणि एकाधिकारशाहीवर विश्र्वास ठेवतात. आजही तुम्ही नेटवर पाहू शकता की ते एखाद्या झुंडीसारखे वागतात. त्यांच्या विचारसरणीस विरोध करणाऱ्या कुठल्याही माणसाच्या पोस्टखाली असणाऱ्या त्यांच्या प्र्तिक्रियांवर नजर टाकल्यास आपल्याला ते समजून येईल. बुद्धिभेद करण्यासाठी ते काय काय करू शकतात हे कॅ स्मिता गायकवाड यांच्या व्हिडियोंमधून आपल्याला चांगले समजून येईल. कार्ल मार्क्सही याला अपवाद नाही. तो विरोधकांना अत्यंत वाईट पद्धतीने वागवीत असे. सभांमधे विरोधकांचा अत्यंत हिणकस पद्धतीने पाणऊतारा करण्यात त्याचा कोणी हात धरू शकणार नाही. प्रसंगी लाळघोटेपणा करण्यास त्याची हरकत नसे. पण काम झाल्यावर त्याच माणसांवर तो जहरी टीका करे आणि तीही त्यांच्या पाठीमागे. काही जणांचा पाणऊतारा करताना तो जातीचा/वंशाचा उद्धार सर्रास करत असे. उदा. त्या काळात १८६२ साली त्याने एंगलला लिहिलेल्या एका पत्रात दुसऱ्या एका समाजवाद्याचा कसा उद्धार केला आहे ते पहा. मार्क्स म्हणतो –

‘‘..ज्यू निगर लासाल्ले… नशिबाने या आठवड्याच्या शेवटी जाणार.. त्याच्या डोक्याच्या आकारावरून आणि त्याच्या केसांवरून माझ्या लक्षात एक गोष्ट आली आहे ती म्हणजे त्याच्यात निग्रोंचे रक्त आहे. असे निग्रो जे मोसेसबरोबर इजिप्तच्या रणातून पळाले. (किंवा त्याच्या आईने किंवा आजीने एखाद्या निगरबरोबर संग केला असेल) आता जर्मन, ज्यू आणि मुळ निग्रोचे रक्त यांचे मिश्रण झाल्यावर हा असला विचित्र प्राणी तयार झाल्यास त्यात आश्चर्य ते काय…’’

भांडवलशाही समाजात जे काही वाईट आहे ते बुर्ज्वा समाजातून आले आहे आणि ही भांडवलशाही नष्ट झाल्याशिवाय माणसातील दुर्गुण नष्ट होणार नाहीत या तत्वावर त्याचा दृढ विश्र्वास होता. पण हे सगळे तो लिहित होता ते वडिलांच्या पैशावर आणि मित्रांच्या पैशावर जे याच भांडवलशाही समाजात राहून पैसे कमवत होते. ते त्याला चालत होतं. आजही आपण पहातो सध्याच्या काळात बुद्धिभेद झालेला समाज भांडवलशाही रचनेत पैसे कमवितात अणि हे समाजवादी, माओवादी त्यावर स्वतःला पोसतात आणि सत्तेची स्वप्ने पाहतात. पण शेवटी काय झाले ते पहा. पृथ्वीवरून कम्युनिझम उखडले गेले आणि उरलेल्या देशातून लवकरच जाईल. चीनमधे मी समाजवाद आहे असे मी मानत नाही. त्यांच्याकडे भांडवलशाहीच आहे.

कार्ल मार्क्स त्याच्या ‘‘ज्यूंचा प्रश्र्न’’ या निबंधात लिहितो, –

‘‘…ज्युडाइझमच्या निधर्मीवादाला कशाचा आधार आहे? गरज, हाव, आणि स्वार्थ. ज्यूंचा समाज घासाघीस करणाऱ्यांचा समाज आहे. त्यांचा परमेश्र्वर कोण आहे? पैसा. पैसा हा असा परमेश्र्वर आहे, की तो इतर कुठल्याही देवाला जगू देत नाही. पैसा जगातील सगळ्या देवांचे अधःपतन करतो आणि त्याचे रुपांतर एखाद्या उपभोग्य वस्तूमध्ये करतो. ज्यूंच्या धर्मात काय सांगितले आहे? अप्रत्यक्षपणे कलेचा तिरस्कार, तत्वांचा तिरस्कार आणि इतिहासाचा तिरस्कार.. समाजाची ज्यूंपासून मुक्तता म्हणजेच समाजाची ज्यूपणापासून मुक्तता.’’

हे ओळखीचे वाटतंय ना? बरोबर १९३० साली नाझींच्या वंशशास्त्रज्ञांनी असेच विचार मांडले होते.

मार्क्सला काहीजण लेखनचोर अशीही उपाधी लावतात. १८५२ ते १८६२ या काळात मार्क्स न्यु-यॉर्क डेली ट्रायबूनसाठी युरोपमधे काम करत होता. त्याला आठव्ड्याला फक्त दोन लेख लिहायचे होते आणि पैसेही चांगले मिळत होते पण तो द कॅपिटल लिहिण्याच्या मार्गावर होता. थोडक्यात त्याने भांडवलदारांकडून पगार घेतला आणि एंगलकडून बरेच लेख लिहून घेतले. या थोर तत्वज्ञानी माणसाला ही चोरी चालली. मी तेही समजू शकतो की जीवनाच्या लढाईत त्याला ते करावे लागले असेल पण सध्याच्या जगात काय चाललंय? सगळ्या समाजवादी लोकांचे मोठमोठे ट्रस्ट आहेत आणि ते देणग्यांवर मोठमोठ्या गाड्या उडवतात. पंचतारांकित हॉटेल्सवर पांढऱ्या दाढ्या कुरवाळत, बीयरचे घोट घेत क्रांती घडवून आणण्याच्या गप्पा हाणतात. जमा केलेल्या पैशातून काही तुकडे जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसमोर फेकले की नवीन देणग्या मिळविण्यास ते मोकळे.

साधी राहाणी आणि गलिच्छ राहणी यातील फरक या समाजवाद्यांना समजत नाही. १८५० साली प्रुशियन गुप्तहेराने लंडनमधे मार्क्सच्या घराला भेट दिली. त्याने एका जर्मन क्रांतीकाराचे सोंग वठवले होते. त्याने जो अहवाल पाठवला होता तो असा –

… तो क्वचितच कपडे धुतो किंवा कपडे बदलतो. तो बहुतेक वेळा दारू पिऊन तर्र असतो. बहुतेक वेळा तो निरुद्योगी असतो पण कामाला लागला की दिवसरात्र काम करतो. झोपायला जाण्याची आणि उठण्याची त्याची वेळ निश्चित नसते. रात्री जागरण झाल्यावर खोलीत एखाद्या सोफ्यावर तो ताणून देतो तेव्हा त्याला कशाची शुद्ध नसते. त्या घरात एक साधी खुर्ची ही स्वच्छ नाही. सगळ्या वस्तू तोडक्या मोडक्या, फाटक्या आणि सगळ्यावर कमीत कमी अर्धा इंच धूळ साठलेली आहे. सगळीकडे भयंकर अस्वच्छता आहे… जेव्हा तुम्ही त्याच्या घरात प्रवेश करता तेव्हा तंबाखूच्या धुराने तुमच्या डोळ्यात पाणी येते. धुळीमुळे कुठे बसणेही अशक्य आहे. समोर एक तीन पायाची खुर्ची आहे आणि एका चार पायाच्या खुर्चीवर मुले स्वयंपाकाचा खेळ खेळत आहेत. ही खुर्ची तुम्हाला दिली तर सांडलेल्या अन्नाने तुमची विजार खराब होण्याची शक्यता आहे.’’

आता मला माहिती आहे की तरूण वयात हे सगळे भव्य दिव्य वाटते पण दारूला पैसे आहेत, तंबाखूला पैसे आहेत पण स्वच्छतेला पैसे नाहीत हे काही पटण्यासारखे नाही. शिवाय मोलकरणीलाही तो पैसे देत नव्हता. हे त्याचे कामगांवरील प्रेम. तरुणांनी प्रश्र्न केले पाहिजेत स्वतःला, की हे असं का?

एक गुस्ताव नावाचा क्रांतीकरी अधिकारी त्याच्या घरी राहीला होता. तो लिहितो, –

‘‘… त्याची बुद्धिमत्ता अफाट होती आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव ही पटकन पडत असे. मी त्या काळात सुरुवातीला त्याचा हात धरून अंगाऱ्यावरूनही चाललो असतो. पण माझी खात्री आहे की या माणसात जेवढे गुण होते ते सगळे गुण त्याच्या स्वार्थी ध्येयाने गिळून टाकले होते. तो त्याच्या अनुयायांवर ते मूर्ख असल्यासारखे हसतो आणि त्याच तुच्छतेने कम्युनिष्टांनाही हसतो. त्याचे सर्व सहकाऱी मूर्ख आहेत असा त्याचा दृढ समज आहे आणि कोणी जास्त शहाणपणा केला तर तो लगेचच त्याला त्याची जागा दाखवून देतो. खरे तर त्याच्या अनुयायांमधे अनेक बुद्धिमान माणसे होती.’’ आजही त्यांच्यात असलेला हा स्वार्थीपणा कॅ. गायकवाड यांच्या भाषणातून आपल्याला सहज सजून येतो.

समाजरचना नष्ट करणे हे त्याचे ध्येय आणि त्याचा रक्तपिपासूपणा त्याच्या योजनेत सहज दिसतो. ही क्रांतीची योजना कागदावर आणली त्याने व एंगलने. १८५० साली त्यांनी ही लिहिली सेंट्रल कमिटी ऑफ द कम्युनिस्ट लीग यांच्यासाठी. व्लादिमीर लेनिनने जी बोल्शेव्हिक क्रांती रशियामधे घडवून आणली ती याबरहुकूम. त्यात मार्क्स म्हणतो, ‘‘जो श्रीमंत वर्ग आहे त्याचे उच्चाटन हे आपले प्राथमिक ध्येय आहे. यासाठी प्रथम किरकोळ आणि उदारमतवादी बुर्ज्वा राजकीय पक्षांची मदत घ्यावी लागेल. या पक्षांना त्यांचा उदारमतवादी कार्यक्रम राबवायचा आहे. जेणेकरून सरकार समाजासाठी कमी खर्च करेल आणि खाजगी उलाढाल वाढेल. कमकुवत वर्गासाठी ते किरकोळ योजना राबवतीलही. त्यामुळे खाजगी मालमत्ता वाढीस लागेल.. हा वर्ग आपल्याला नष्ट करायचा आहे. हे धोरण आपल्याला सर्व देशांमधे राबवायचे आहे. या उलट आपली क्रांती ही कायम स्वरूपाची असायला हवी. त्यासाठी ज्यांच्याकडे संपत्ती अहे त्यांना सत्तेवरून हाकलले पाहिजे. फक्त आपल्या देशात नाही तर सर्व जगात. (सगळीकडे दारिद्र्य आले की तुलना होणार नाही अशी यामागची मेख आहे म्हणून ही क्रांती सगळ्या राष्ट्रांमधे केली पाहिजे) खाजगी मालमत्तेच्या अधिकारात आपल्याला सुधारणा करायची नसून तो अधिकार समूळ नष्ट करायचा आहे. वर्गकलह लपवायचा नाही तर वर्गच नष्ट करायचे आहेत. आहे त्या समाजात आपल्याला सुधारणा करायची नसून आपल्याला नवीन समाजच घडवायचा आहे…’’

राजेशाही नंतर स्थापन झालेली उदारमतवादी लोकशाही उलथवून टाकण्यासाठी मार्क्स म्हणतो, ‘‘त्यासाठी जेथे या सरकारचे हात पोहोचू शकत नाही तेथे तेथे शस्त्रसज्ज समित्या स्थापन केल्या पाहिजेत. ’’ रशियामधे लेनिनने हीच पद्धत वापरली आणि झारला हुसकावून लावले. त्यानंतर स्थापन झालेले हंगामी लोकशाही सरकारही त्याने असेल उलथवून टाकले. मार्क्स पुढे म्हणाला, की ताब्यात आलेल्या जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात देऊ नयेत त्याऐवजी त्या सरकारजमा कराव्यात आणि शेमजूर व शेतकऱ्यांकडून त्यावर काम करून घ्यावे. (गुलाम?) उद्योगाचे राष्ट्रीयकरण करावे जेणे करून भांडवशाहीचे अस्तित्व राहणार नाही. ’’

हे उद्योग चालविण्यासाठी भांडवल कुठून आणायचे हे मात्र त्याने सांगितले नाही. मग त्यासाठी नोटांचे कागद छापण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. त्याने काय झाले हे आपण जेथे जेथे समाजवादी अर्थव्यवस्था होत्या तेथे काय झाले हे आपण पाहिले. पोते भरून नोटा घेऊन जायच्या आणि कपभर कॉफी प्यायची हे त्या सिद्धांताचेच फळ आहे.

पुढे मार्क्स म्हणतो, ’’मिळालेल्या विजयाने लोक भारावून जातील व स्वस्थ बसतील. तसे होता कामा नये. ही क्रांती जास्तीत जास्त काळ चालली पाहिजे. तिरस्कारातून जनतेने कायदा हातात घेतला व रक्तपात केला तर ते आपण खपवून घेतले पाहिजे. तो थांबविण्याचा आजिबात प्रयत्न करू नये उलट तो तिरस्कार व द्वेषाला योग्य दिशा दाखविण्याचे काम आपल्या कार्यकर्त्यांनी पार पाडले पाहिजे.’’

थोडक्यात काय मार्क्स समाजात अशी उलथापालथ घडवून आणायचा प्रयत्न करीत होता. ज्याचा द्वेष करतोस त्याचा सूड घे, म्हणजे त्याला संपव असे त्याचे सांगणे होते. लेनिनने हाच मार्ग रशियामधे स्विकारला आणि लाखो लोकांची कत्तल केली. माओने ‘‘१०० फुले उमलू दे..’’ याच्या नावाखाली लाखो बुद्धिजिवी माणसे नरकयातनात पाठवली.

जर या लोकांना आपल्या येथे यश मिळाले तर काय होईल याची ही झलक आहे. आपल्या घरी तरूण असतील त्यांना यांच्या व्यापक कटाची माहीती द्या त्यांना सावध करा… एवढे तरी करा. लोकांना दरिद्री करून आपण श्रीमंत होत नाही हे त्यांना समजावून सांगा. कष्ट आणि अक्कलहुशारी हाच यशाचा मार्ग आहे हे त्यांना सांगा… अपयशाने खचून समाजवादाच्या नादी लागू नका… त्याने तुम्ही भिकारी बनाल आणि इतरांनाही भिकारी कराल… करोनापेक्षाही अत्यंत भयानक असा हा वैचारिक व्हायरस आहे….

– जयंत कुलकर्णी

Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by Jayant Kulkarni

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

जेनोसाईड-वंशसंहारासाठी नरसंहार

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

ब्लू बॅकची शिकार…