कअबागृहाचे अंतरंग व किल्लीचे हस्तांतरण
पवित्र कअबागृहातील आतील चटईक्षेत्र अंदाजे २६ बाय ३० फूट इतके आहे. त्याच्या भिंती अंदाजे तीन फूट जाड आहेत. आतील उत्तर पूर्व कोपऱ्यात एक वर्तुळाकार जिना आहे. ज्याभोवती सुबक भिंती उभारून एक लहानशी खोली तयार करण्यात आली आहे आणि त्यावर अस्सल सोन्याच्या चादरीनी मढलेला लाकडी दरवाजा लावण्यात आला आहे. या दरवाजाचे नाव ‘बाबुत्तौबा’ म्हणजे पश्चातापाचा दरवाजा असे आहे. या दारावर कामदानीचा पडदा, ज्यावर सोन्याच्या तारेने पवित्र कुरआनातील आयती म्हणजे श्लोक लिहिण्यात आल्या आहेत. हा दरवाजा २.३० मीटर उंच व ७० से. मी. रुंद आहे. त्यामधील जिना कअबागृहाच्या वर जाण्याकरिता आहे. छतावरील सफाई, दुरूस्ती आणि वर्षातून एकदा कअबागृहावरील वस्त्र बदलण्याकरिता या जिन्याचा उपयोग करण्यात येतो. छतावर एक छिद्र आहे. ज्याची लांबी, रुंदी १.७ बाय १.४ मीटर इतकी आहे. ज्यावर काचेची झडप आहे. त्याद्वारे सुर्यप्रकाश सतत कअबागृहात वास्तव्य करीत असतो.
कअबागृहाची जमीन संगमखरी टाईल्सने सुसज्ज आहे. आणि भिंतीवर देखील अत्यंत मजबूत, आकर्षक व रंगीत संगमरवर बसविण्यात आला आहे. ज्यावर सुबक नक्षी कोरण्यात आली आहे. आतील भिंती व छतावर हिरव्या रंगाचे पडदे लावण्यात आले आहेत. ज्यांच्यावर पवित्र कुरआनातील आयती लिहिण्यात आल्या आहेत. या पवित्र गृहाच्या मध्यभागी लांबीच्या दिशेने छताला आधार देण्याकरिता तीन गोलाकार खांब आहेत. पूर्वी हे खांब चंदनाचे होते आणि बहुधा भारतीय चंदनापासून तयार करण्यात आले असावेत कारण चंदनाची झाडे केवळ भारतातच आढळतात. कअबागृहाचा छत लाकडी असून त्यात एक पोटमाळा आहे आणि वरच्या भागावर स्लॅब टाकण्यात आला आहे.
पवित्र कअबागृहाचे बाहेरील दर्शनी दार लाकडी असून त्यावर सोन्याचे पत्रे चढविण्यात आले आहेत आणि त्यावर पवित्र कुरआनच्या आयती कोरण्यात आल्या आहेत. इ. स. १९७८ च्या आसपास जुने दार बदलून शाह खालिदने नवीन दार लावण्याचे आदेश दिले. ज्यावर एक कोटी ३४ लाख सौदी रियाल इतका खर्च आला. आणि २८० किलो सोन्याची किंमत याच्या व्यतिरिक्त आहे. प्राचीन काळात जेव्हा कअबागृहाची उभारणी करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्यावर छप्परही नव्हते आणि दारसुध्दा लावण्यात आले नव्हते. या पवित्र वास्तूवर पहिला एकपाटी दरवाजा येमेनचा बादशहा ‘असअद तब्बुअ सालिस’ याने बसविला. इ. स. ६०६ मध्ये जेव्हा कुरैशने या वास्तूची पुनर्बाधणी केली, तेव्हा जमिनीपासून एक उंच चबुतरा बांधून दाराची उंची वाढविली जेणेकरून या पवित्रगृहात प्रवेश देण्याची मक्तेदारी त्यांच्याचकडे राहिली. तसेच त्यांनी पश्चिमेकडील दारही बंद करून टाकले. याचवेळी दोन पेटी दारही बसविण्यात आले. इसवी सन ६३१ मध्ये पैगंबर साहेबांनी जेव्हा मक्केवर विजय मिळविला. त्यावेळी स्वायत्तता असूनसुध्दा या वास्तूत कुठलेही फेरबदल केले नाहीत. कारण इस्लाममध्ये दाखल होणाऱ्यांच्या भावना त्यांना जास्त प्रिय होत्या. हिजरी सन आठमध्ये पैगंबर साहेबांना मक्केवर भव्य विजय प्राप्त झाला. तेव्हा प्रथमतः पैगंबर साहेबांनी उमराच्या विधी पार पाडल्या आणि सर्वांना कअबागृहाच्या पटांगणात एकत्रित होण्याचे आदेश दिले. हजारोंच्या संख्येने मक्केचे पराभूत झालेले नागरिक, बलाढ्य लढवय्ये आणि पैगंबर साहेबांचे सैनिक जमा झाले. सर्वांच्या देखत कअबागृहाच्या किल्ली राखणाऱ्याला म्हणजेच कलीदरबरदार राखणाऱ्याला बोलाविण्यात आले. याच इसमाने काही वर्षापूर्वी पैगंबर साहेबांसाठी कअबागृह उघडण्याच्या विनंतीला मान दिला नव्हता, परंतू आज तो एका विजेत्याच्या समोर मान खाली घालून उभा होता. पैगंबर साहेबांनी त्या इसमाला म्हणजेच उस्मान बिनतल्हाला आदेशपूर्वक किल्ली देण्याची आज्ञा दिली. पैगंबर साहेबांनी किल्ली घेवून आत पाचारण केले. बाहेर आल्यावर ते उस्मानबिनतल्हांना उद्देशून म्हणाले, ‘आज अल्लाहच्या आज्ञेने आम्ही मक्केवर विजय मिळविला. आता किल्ली माझ्या हातात आहे. मी ज्याला पसंत करीन त्याला ही किल्ली देईन. मी ही किल्ली तुला देत आहे आणि अशी घोषणा करतो की ही किल्ली प्रलयापर्यंत तुझ्याच वंशात राहील, जो कुणी तुझ्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करील, तो मोठा पापी व अत्याचारी मानला जाईल’. त्यावेळी कुरैश हजर होते. पैगंबर साहेबांचे नातेवाईक हजर होते. परंतू, पैगंबर साहेबांनी ती किल्ली उस्मानला प्रदान केली. ती आजतागायत शैबी कुटूंबियांकडे आहे, जे उस्मान बिनतलहा वंशातील आहेत. पैगंबर साहेबांच्या वचनाचा हा चमत्कारच की उस्मान बिन तल्हाचे वंशज मक्केत हयात आहेत. किल्ली त्यांच्याकडेच आहे. त्यांच्या मर्जीविना सौदी बादशहा व मंत्रीसुध्दा पवित्र कअबागृहाच्या आत जावू शकत नाहीत. मौलाना सैयद अबुल हसन नद्वी १९१३ ते १९९९ या कालावधीतील एकमेव भारतीय विश्वविख्यात विद्वान असे आहेत. ज्यांच्या सन्मानात अनेकदा कअबागृह उघडण्यात आले. मुस्लिम जगतात हा सर्वात मोठा सन्मान समजला जातो.


GIPHY App Key not set. Please check settings